Thursday, December 15, 2016

रांगेबाहेरचे गरीबनवाज

Image result for india today sting on note ban

नोटाबंदीनंतर नोटबदलीचे काम सुरू झाले, तेव्हा विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोपांचा भडीमार केलेला होता. त्यापैकी एक महत्वाचा आरोप असा, की कुठल्या बॅन्केच्या दारात काळापैसावाला उभा आहे दाखवा? सगळी सामान्य गरीब जनता रांगेत ताटकळते आहे आणि काळापैसावाले श्रीमंत मौजमजा करीत आहेत. नोटाबंदी करून मोदींनी लोकांचे हाल वाढवले आणि आपलाच पैसा गरीबांना मिळू नये, अशी तुघलकी केल्याचेही आरोप केले. सामान्य गरीबांचा कैवार घेऊन संसदेपासून रस्त्यापर्यंत सदोदीत कल्लोळ करणार्‍या या पक्षांमध्ये कॉग्रेस, राष्ट्रवादी, जनतादल आणि बहुजन समाज पक्ष आघाडीवर होते. त्यांचा प्रश्न होता काळापैसा बाळगणारे कुठल्या बॅन्केत व कुठल्या रांगेत उभे आहेत, ते दाखवा. हा प्रश्न इतका वेळ विचारला गेला, की असे लोक कुठल्या रांगेत आहेत आणि त्यांना कोण पैसे बदलून देतो आहे, ते शोधणाची अनिवार इच्छा एका वृत्तवाहिनीला झाली. ‘इंडीयाटुडे’ नामक वाहिनीने मग त्याचा शोध सुरू केला आणि छुप्या कॅमेरात अनेक नोटबदलू कैद होऊन गेले. अशा व्यवहारात हवाला किंवा अन्य कुठल्या गैरव्यवहारातले लोक समाविष्ट असले तर नवल नाही. त्यांचा तोच बारमाही धंदा असतो. पण अलिकडेच या वाहिनीने केलेल्या छुप्या चित्रणात; चक्क कॉग्रेस, बसपा, जदयु अशा विविध पक्षांचे नेते व कार्यालयेच गुंतल्याचे उघडकीस आलेले आहे. या पक्षांच्या कार्यालयातूनच हा नोटाबदलीचा व्यवहार होत असल्यानेच काळापैसावाले बॅन्केत येण्यापेक्षा त्यांच्याच कार्यालयात जाऊन काळपैसा बदलत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सहाजिकच अशा गरीबनवाज राजकीय पक्षांचे पितळ उघडे पडले आहे. कारण ते काळापैसाच नसल्याचे दावे बाहेर करीत आहेत आणि आपल्याच कार्यकर्ते व संघटनांच्या माध्यमातून जुन्या नोटा गुपचुप बदलून देण्याचा धंदाही करीत आहेत.

या पक्षांपाशी किती काळापैसा आहे, त्याला महत्व नाही. त्यांच्या कार्यालयात वा पदाधिकार्‍यांकडूनच जुन्या नोटा मोठ्या घाऊक संख्येने बदलून देण्यासाठी कमिशन मागितले जात असेल, तर काळापैसा आहे याची ग्वाहीच दिली जाते ना? खेरीज बॅन्केच्या रांगेत सामान्य नागरिक उभे असल्याने दु:खी झालेल्या अशा पक्षांची वेदना कसली आहे? आपल्याकडे कमिशनवर नोटा बदलून घेण्याऐवजी लोक बॅन्केच्या रांगेत उभे रहातात, हे दुखणे आहे काय? कारण तिथे उभे राहिल्याने या पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांना नोटाबदलीचे मिळणारे कमिशन बुडते, याची वेदना त्यांना बोलायला भाग पाडते आहे काय? गेला महिनाभर ज्यांनी नोटाबंदीसाठी संसद बंद पाडली आणि रांगेत उभ्या असलेल्या लोकांसाठी अश्रू ढाळले. त्यापैकी कोणी त्याच गरीबांना दिलासा देण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही. याच पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता रांगेत ताटकळणार्‍यांना पाणी पाजायला गेला नाही किंवा जिथे पैसे उपलब्ध आहेत, अशा बॅन्के शाखेची माहिती द्यायला फ़िरकला नाही. पण तोच कार्यकर्ता काळापैसा लपवू बघणार्‍यांच्या सेवेत अखंड रुजू होता. ३०-४० टक्के कमिशनच्या बदल्यात जुन्या नोटा बदलून देण्याचे ‘परिवर्तन’ कार्य जोमाने चालू होते. त्याची जबाबदारी कुठल्या एका पक्षाचा नेता तरी घेणार आहे काय? कारण कॅमेरात बंदिस्त झालेले लोक, हे त्या त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याच कार्यालयात अशा हालचाली होतानाचे चित्रण बंदिस्त झालेले आहे. पण आता अशा दलालांची पक्षातून हाकालपट्टी करून हात झटकले जातील आणि गरीबनवाज पक्षनेते नामानिराळे होतील. मात्र तेच तावातावाने कुठल्याही बॅन्कशाखेत हेराफ़ेरी झालेली असेल, तर त्यासाठी मोदींना जबाबदार धरताना दिसतील आणि अर्थमंत्री जेटली यांचा राजिनामाही मागताना पुढे सरसावलेले दिसतील. कारण ते गरीबनवाज आहेत ना?

कोलकात्याच्या कुठल्या बॅन्केत भाजपाच्या पदाधिकार्‍याने काही दिवस आधी कोटी रुपयांची रोकड जमा केली, म्हणून मोदी आरोपी असतात. बिहारमध्ये दोनतीन महिने आधीच भाजपाच्या शाखांनी जमिनी खरेदी केल्या, म्हणजे पैसे पांढरे करण्यासाठीची चलाखी असते. त्यासाठीही थेट पंतप्रधान गुन्हेगार असतो. पण यांच्याच पक्षाच्या कार्यालयात बाद नोटा पांढर्‍य़ा करून देण्याचे सौदे करताना पदाधिकारी कॅमेरात टिपला गेला असेल; तर त्यात नेत्यांचा हात असू शकत नाही. किती म्हणून बेशरमपणा चालणार आहे? आपल्याकडे मोदींच्या विरोधातले पुरावे असल्याने लोकसभेत आपल्याला बोलू दिले जात नाही, म्हणून राहुल गांधी दोन दिवस आकाशपाताळ एक करीत आहेत. पण दिल्लीतील त्यांच्याच पक्षाच्या कार्यालयातला एक पदाधिकारी खुलेआम जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा कमिशनवर बदलून देण्याचे सौदे राजरोसपणे करताना वाहिनीच्या कॅमेराने टिपलेला आहे. त्याच्याकडे वळून बघायला राहुलना सवड मिळालेली नाही. पुरावे इतरांचे गोळा करताना आपल्याही विरोधातले पुरावे थोडे तपासून घ्यावेत, असे त्यांना अजून कोणी शिकवलेले नसल्याचा तो परिणाम असावा. किंवा पुरावे हे आपल्या विरोधातले असूच शकत नाहीत, कारण आपण गांधीघरचे आहोत, असाही समज असण्याची शक्यता आहे. किंवा पुरावे कशाला म्हणतात तेही या पक्षाच्या उपाध्यक्षाला अजून माहित नसावे. अन्यथा पायाशी काय जळते आहे, त्याची दखल घेण्यापेक्षा त्यांनी असे दिवे लावले नसते. अर्थात नुसते पक्ष कार्यकर्तेच त्यात गुंतलेले नाहीत, तर त्यांनी त्यासाठी कुठल्या स्वयंसेवी संस्था उपलब्ध आहेत, त्याचाही तपशील त्यात कथन केला आहे. अशा पक्षांच्या नेत्यांनी रोज उठून काळापैसावाले कुठल्या रांगेत उभे आहेत, ते दाखवण्याचे आव्हान सरकारला द्यावे, हे संयुक्तीकच आहे. कारण ते सगळे काळपैसावाले यांच्याच कार्यालयात रांगा लावून उभे आहेत ना?

त्यांनीही गडबडून जाण्याची गरज नाही. कुठल्या बॅन्क शाखेतून कोणी परस्पर नोटा घाऊक बदलून दिल्या, त्याचा शोध घेतला जात असून; त्यासाठी बॅन्कांच्या शाखेचे सीसीटिव्ही फ़ुटेजही जमा करण्यात आलेले आहे. तिथे कुठल्या पक्षाचे कोण कोण नेते कार्यकर्ते भिंतीआड रांगा लावून नोटा बदलून घेत होते, त्याचेही दर्शन लोकांना पुढल्या काळात होणार आहे. तसे नसते तर या कार्यकर्ते नेत्यांनी छातीठोकपणे कोट्यवधीच्या नोटा बदलून देण्याचे सौदे केलेच नसते. किंबहूना अशारितीने नोटाबदली घाऊक संख्येने होऊ शकते, याचाही अंदाज मोदी सरकारने आधीच बांधलेला असावा. अन्यथा पाचशे बॅन्कांमध्ये छुपे चित्रण करायची आधीच सोय कशाला करून ठेवली असती? त्याखेरीज अनेक बॅन्केतील सीसीटिव्ही फ़ुटेजही गोळा केले जात आहे. त्यामुळे आताच घाईगर्दीने काळापैसावाले कुठल्या बॅन्केत व कुठल्या रांगेत उभे राहिले, ते दाखवण्याची सरकारला गरज वाटलेली नाही. उलट जेव्हा तावातावानेच बोलणार्‍या गरीबनवाजांचे सहकारी अनुयायीच काळा उद्योग करताना लोकांना बघायला मिळतील, तेव्हा खरी मजा येणार आहे. आता नुसत्या खबरीनुसार धाडी चालू आहेत. ३० डिसेंबर संपला, मग अनेक चित्रणे व छुप्या कॅमेराच्या करामती समोर यायच्या आहेत. तेव्हा पुरावे कशाला म्हणतात आणि पुरावे सादर करण्यासाठी लोकसभेत बोलायची गरज नसते; त्याचा साक्षात्कार राहुलना होईलच. नाहीतरी बारा वर्षे मोदींकडून याच छुपा कॅमेरा वा खुल्या कॅमेराने राजकारणातले धडे गिरवून घेतलेत ना? मग तो माणूस त्याच हत्यारांचा आपल्या विरोधकांना अनुभव दिल्याखेरीज राहिल काय? आपली फ़लंदाजी येईपर्यंत मोदी थांबतात आणि मगच फ़टकेबाजी सुरू करतात, हा आजवरचा अनुभव आहे. तेव्हा पुराव्याच्या गर्जना राहुल व इतरांनी करायला त्यांची अजिबात हरकत नाही. कारण नववर्षाची भेट म्हणून या गरीबनवाजांचे मुखवटे फ़ाडण्याचीच सज्जता सध्या चालू असणार.

1 comment:

  1. On tha backdrop of chaos by all political people this write up has made me feel very positive. Dhanyavad aani shatashah pranam...

    ReplyDelete