Friday, December 9, 2016

भूकंपविषयक नवे संशोधन

rahul on demonetisation के लिए चित्र परिणाम

राहुल गांधी यांनी आता देशातील विरोधी पक्षांचे नेतृत्व हाती घेतले असून, त्यासाठीच विरोधी पक्षांना शुभेच्छा देण्याची वेळ आलेली आहे. कारण राहुलनी गेल्या चार वर्षात कॉग्रेससारख्या शतायुषी पक्षाची लिलया धुळधाण उडवून दाखवली आहे. सहाजिकच त्यांच्याच हाती आपल्या तमाम विरोधकांचे नेतृत्व जावे, अशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा असली, तर नवल नाही. नोटाबंदीनंतर त्या दिशेने राजकारण वळते आहे. गेल्या तीन आठवड्यात संसदेचे कामकाज ठप्प करून दाखवण्यात राहुल यशस्वी झाले असून, राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जीही त्यामुळे विचलीत झाले आहेत. म्हणून तर आपले घटनात्मक पद संभाळतानाही त्यांना आपल्या राजकीय वारशाची चिंता ग्रासत असावी. अन्यथा त्यांनी संधी मिळताच अशा आक्रस्ताळेपणाचा कान पकडण्याचे औचित्य दाखवले नसते. उघडपणे राष्ट्रपती राजकीय पक्षाचे नाव घेऊन भाष्य करू शकत नाहीत. पण त्यांनी सुचकरित्या कॉग्रेस आत्मघाताकडे वाटचाल करीत असल्याचे मतप्रदर्शन केलेले आहे. धरणे व घोषणा देण्यासाठी अन्य जागा आहेत. संसद हे चर्चा, प्रतिवाद आणि निर्णय घेण्याचे स्थान आहे, अशा कानपिचक्या त्यांनी विरोधकांना दिलेल्या आहेत. संसदेचे कामकाज ठप्प करण्याने त्या संस्थेला निकामी केले जाते, असे प्रणबदांना म्हणायचे आहे. पण आज कॉग्रेस व तिच्या मागे फ़रफ़टणार्‍या कुणाला प्रणबदांचे ऐकायचे आहे कुठे? राहुल कधी भूकंप करतात, त्याची आशाळभूतपणे विरोधक प्रतिक्षा करीत आहेत. अडीच वर्षांनी पुन्हा राहुलना भूकंप करण्याची उबळ आली आहे. अडीच वर्षापुर्वी त्यांनी शतायुषी कॉग्रेसला एकाच भूकंपाने उध्वस्त करून टाकले. आता उरल्यासुरल्या विरोधी पक्षालाही धाराशायी केल्यावर त्यांचे समाधान होऊ शकेल. अन्यथा आपण लोकसभेत बोललो तर भूकंप होऊन जाईल, अशी भाषा राहुल कशाला बोलले असते?

पाच महिन्यांपुर्वी अशीच काहीशी भाषा महाराष्ट्रातले ज्येष्ठ माजी मंत्री नाथाभाऊ खडसे बोलले होते. आपल्या प्रत्येक बोलण्यातून राजकारणात भूकंप करण्यासाठीच खडसे प्रसिद्ध आहेत. पाव शतकाची जुनी शिवसेना भाजपा युती तोडण्याची अन्य कुणात हिंमत नव्हती. पण ते धाडस आपण केले आणि युती संपल्याची घोषणा आपण करू धजलो; असे ते म्हणाले होते. अशी आपलीच पाठ थोपटून घेणार्‍या नाथाभाऊंना राजकारणाच्या भूगर्भात का उसळत होते, त्याचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. म्हणूनच एकेदिवशी ते अशाच कुठल्या भूकंपाची नवी जुळवाजुळव कराण्यात मग्न असताना, त्यांच्या पिंपरी चिंचवड येथील एका व्यवहाराचे कागद समोर आले आणि सरकारमधून त्यांना राजिनामा द्यावा लागला होता. नेहमी आपल्या बोलण्याने भूकंपच घडवणार्‍या नाथाभाऊंना हा भूकंप कधी व कसा झाला, त्याचा थांगपत्ताही लागला नव्हता. आता त्याला वर्ष उलटून गेले आहे. पण भूकंप घडवण्याची त्यांची खुमखुमी संपलेली नाही. म्हणून तर गेल्या जुन अखेरीस त्यांनी आपल्या बालेकिल्ल्यात जळगाव येथे तीच धमकी दिलेली होती. मी बोलत नाही आणि बोललो तर देशात मोठे भूकंप होतील, असा इशारा त्यांनी दिला होता. पण नाथाभाऊंनी शब्द पाळला आणि बोलले नाहीत. म्हणून आपला देश अजून स्थिरस्थावर आहे. अन्यथा नोटाबंदी करायला पंतप्रधानांन उसंतच मिळाली नसती, की राहुल गांधींना भूकंपाच्या भाषणाच्या तयारीला वेळ मिळाला नसता. म्हणूनच आधी राहुलनी नाथाभाऊंचे आभार मानायला हवेत. सहा महिने उलटत आले, तरी नाथाभाऊ गप्प आहेत आणि अन्य कुठे भूकंप झालेला नाही. तसा झाला असता, तर देशात भूकंप घडवण्याची धमकी तरी राहुल देऊ शकले असते काय? म्हणून त्यांनी आधी नाथाभाऊंचे आभार मानावेत आणि आपल्या हादरे देणार्‍या भाषणाची सुरूवात करावी.

खरे तर राहुलनी आता देशाचे कल्याण करायचे विचार डोक्यातून काढून टाकावेत आणि आपले उर्वरीत आयुष्य इस्रो किंवा नासा या संस्थांना दान करून टाकावे. गेल्या कित्येक वर्षापासून अशा संस्था-संघटना व त्यातले हजारो शास्त्रज्ञ भूकंप कशामुळे होतात आणि त्याचे आधीच भाकित करता येईल काय, याच्या संशोधनात मग्न आहेत. अवघे आयुष्य भूगर्भशास्त्र आणि भूचुंबकीय शास्त्राचे रहस्य उलगडण्यात खर्ची घालूनही, त्यापैकी कोणाला अजून कधी कुठे व कशामुळे भूकंप होऊ शकेल, याचा वेध घेता आलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर राहुलनी केलेला गौप्यस्फ़ोट अतिशय मोलाचा आहे. देशातले वा पृथ्वीतलावरचे भूकंप त्यांच्याच बोलण्याने होतात, असा शोध त्यांनी लावलेला आहे आणि म्हणूनच या संस्थांनी राहुल गांधी यांच्या जुन्या नव्या तमाम भाषणांचे बारकाईने संशोधन करण्याची गरज आहे. त्यामुळे जगभर होणार्‍या आकस्मिक भूकंपाचे रहस्य उलगडू शकेल. लक्षावधीच्या संख्येने होणारी जिवीतहानीही टाळली जाऊ शकेल. किंबहूना राहुल संसदेत बोलल्यावर किती रिश्टर स्केल मापनाचा भूकंप होतो आणि अन्यत्र बोलले तर किती मापनाचा भूकंप होऊ शकतो; याचाही वेगवेगळा अभ्यास व्हायला हवा आहे. कारण तसे राहुल संसदेत फ़ारसे बोलत नाहीत. अन्यत्रच ते सतत बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून व भाषणातून कॉग्रेस नावाची भूमी व तिचे विविध बालेकिल्ले पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडलेले आहेत. तेव्हा राहुलच्या शब्दावर विसंबून इतके संशोधन व्हायला काहीच हरकत नसावी. जयपूरच्या पक्ष चिंतन शिबीरात राहूलनी कॉग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून सुत्रे हाती घेतली आणि त्यातून ते अधिवेशन इतके हादरले, की त्यात बोलताना गृहमंत्री सुशीलकुमार यांचीही जीभ घसरली होती. ती राहुलच्या भाषणाने निर्माण होणार्‍या भूकंपनाची पहिली साक्ष होती. पुढला पुरावा लोकसभा निकालांनी समोर आणला होता.

राहुल गांधी आज काय सांगत आहेत? त्यांना लोकसभेत बोलायची संधी मिळाली, तर त्यांचे भाषण होईल आणि त्यातून भूकंप होतील. तसे झाले तर त्यात आपोआपच नरेंद्र मोदी सरकार कोसळून पडायला वेळ लागणार नाही. पण राहुलना तशी संधीच मिळत नाही. मात्र त्यांच्या भाषणाला मोदी वा सत्ताधारी पक्षाने कुठलीही आडकाठी केलेली नाही. सरकार चर्चेला तयार आहे. त्यामुळेच हवे तेव्हा राहुल लोकसभेत बोलू शकतात. पण राहुल यांच्या शब्दावर विश्वास असलेल्या कॉग्रेसजनांनीच देशहित लक्षात घेऊन राहुलना बोलण्याची संधी नाकारलेली आहे. ज्याच्या बोलण्याने कॉग्रेस जमिनदोस्त झाली, त्याच्याच भाषणाने देश हादरून जाईल आणि संसदही कोसळून पडण्याची प्रत्येक कॉग्रेसनिष्ठाला खात्री आहे. सहाजिकच देश व संसद भवन वाचवायचे असेल, तर त्यांच्यासमोर एकच पर्याय आहे. तो म्हणजे राहुलना लोकसभेत भाषण करण्याची संधी नाकारणे. त्यासाठी लोकसभाच चालू द्यायची नाही आणि कामकाज ठप्प करायचे. आपोआपच राहुलचे भाषण होत नाही आणि संसद भवनासह देश सुरक्षित होऊन जातो. याच कारणास्तव कॉग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज रोखलेले आहे. त्यासाठी खरेतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने राहुल गांधींचे अभार मानायला हवेत. कारण राहुलच्या अशा पुर्वसुचनेमुळेच कॉग्रेसनेते संसद रोखून बसले आहेत आणि पर्यायाने मोदी सरकार कोसळून पडण्याचा धोका टळलेला आहे. खुद्द माता सोनियाजींनी पक्षाचा लोकसभेतील नेता म्हणून राहुलना कशासाठी संधी दिली नाही, त्याचेही उत्तर यातच दडलेले असावे. आपले सुपुत्र जितका वेळ बोलतील, तितके भूकंप होऊन उरलासुरला देश जमिनदोस्त होऊन गेला तर? ह्याच भितीपोटी राहुल यांच्याऐवजी मल्लिकार्जुन खरगे यांना नेतापदी नेमण्यात आले. खडसे यांच्यानंतर बहुधा राहुलच अबोल राहुन देशाला सुरक्षित ठेवू शकले म्हणायचे.

3 comments:

  1. जबरदस्त भाऊ मस्तच

    ReplyDelete
  2. Zabbardast.... Hasun Hasun pot dukhtai... Khupach chaan lekh ahe

    ReplyDelete
  3. इस्रो, नासा वाला paragraph अती कल्पना विस्तार वाटलं किंवा तुम्ही stretch केलंत अस वाटलं -- बाकी छान !

    ReplyDelete