Friday, December 23, 2016

नावात काय आहे?



क्रिकेटचा मोठा फ़लंदाज व माजी कर्णधार नबाब पतौडी यांचा सुपुत्र अशी ओळख असलेल्या सैफ़ अली खान, याला अलिकडेच पुत्ररत्नाचा लाभ झाला. तो व्यवसायाने अभिनेता आहे आणि पित्याच्या क्रिकेटपेक्षा त्याने आईच्या अभिनय क्षेत्राला पसंत केले होते. त्याची आई म्हणजे मागल्या जमान्यातली लोकप्रिय हिंदी अभिनेत्री शर्मिला टागोर होय. अशा दोन नावाजलेल्या पतीपत्नीचा पुत्र, ही मुळात सैफ़खानची ओळख! त्यानेही पुढल्या काळात अमृता सिंग नावाच्या अभिनेत्रीशी लग्न केले आणि पिताही बनला. पण त्यांना एकत्र संसार करता आला नाही. सैफ़च्या नंतर चित्रपट क्षेत्रात आलेली करीना कपूर, हिने मग सैफ़शी दुसरा विवाह केला. अशा अभिनय कलासंपन्न जोडप्याला अलिकडेच पुत्र झाला. खरे तर यापुर्वी अनेक अभिनेत्री विवाहित झाल्या आणि गर्भवतीही झाल्या. पण त्यांच्या गर्भारपणाची फ़ारशी चर्चा झाली नव्हती. नाही म्हणायला अपवाद म्हणुन अमिताभची सुन ऐश्वर्या राय हिच्याकडे बोट दाखवता येईल अभिनयात अपयशी ठरलेल्या अभिषेक या अमिताभ बच्चनपुत्राशी विवाह केल्यानंतर ऐश्वर्याने अभिनय संन्यास घेतल्यासारखा होता. पण तिच्याही गर्भारपणाच्या थोड्या बातम्या झळकल्या. करीनाने त्याच्याही पुढली मजल मारून गर्भारपणातही प्रसिद्धीचा हव्यास धरला. त्यामुळेच तिच्या प्रत्येक महिन्याचे डोहाळजेवण घातल्यासारख्या बातम्या येत राहिल्या आणि एकदाचे तिचे बाळंतपण कधी येते, अशी लोकांना चिंता सतावत होती. मग ती बातमी आली. आता तरी करीनाचे गर्भारपण संपेल, अशी अपेक्षा होती. पण ती फ़ोल ठरली आहे. कारण आता तिच्या गोंडस बाळाला ठेवण्यात आलेले नाव, चर्चेचा विषय होऊन गेले आहे. करीनाचा पती सैफ़ अली खान याने जन्मत:च आपल्या पुत्राचा नामविधी उरकून घेतला आणि कल्लोळ सुरू झाला. ते नाव आहे तैमूर!

खरे तर मुलाचे नाव काय ठेवावे, हा त्याला जन्म देणार्‍या मातापित्यांचा मामला असतो. दिवंगत समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या पुत्राचे नाव हमीद असे ठेवलेले होते. कारण ते हमीद दलवाई या मुस्लिम सुधारकाचे सहकारी होते आणि मित्रही होते. त्याच्या स्मरणार्थ त्यांनी असे केले हे उघड आहे. पण त्यातही कोणाला मुस्लिम शोधायचा असेल, तर कोणी अडवू शकत नाही. हमीद हे नाव मुस्लिम असले तरी बहुतांश कट्टर मुस्लिमच हमीद दलवाईंचा द्वेष करीत होते. कारण त्यांना कट्टर इस्लाम मान्य नव्हताच. पण कुठल्याही धर्माच्या कट्टरतेचे हमीदभाई विरोधकच होते. अशा व्यक्तीचा स्मरणार्थ हमीद नाव ठेवण्यात इस्लाम शोधणे दुर्दैवी म्हणावे लागले. पण लोकशाहीत प्रत्येकाला मतस्वातंत्र्य असल्याने त्याही विरोधात आजही मते व्यक्त होत असतात. पण असे करताना दाभोळकर यांचा आपल्या मुलाचे नाव ठेवण्याचा जो अधिकार आहे, त्यावर अतिक्रमण होते, याचा तरी विचार झाला पाहिजे ना? पण तसे विचारायची सोय नाही. कारण मग नावाला आक्षेप घेणारा लगेच मतस्वातंत्र्याच्या आश्रयाला जात असतो. थोडक्यात असे कुठल्याही बाजूने आक्षेप घेणारे आपापल्या सोयीनुसार प्रत्येक अधिकार व नियमांचा आडोसा घेत असतात. जेव्हा तोच नियम त्यांच्यासाठी अडचणीचा असतो, तेव्हा भूमिका बदलत असते. यात एकाच बाजूच्या लोकांना दोष देण्यात अर्थ नाही. दोन्हीकडली परिस्थिती अजिबात भिन्न नाही. तैमुर हे नाव मुस्लिम असल्याने अनेकांच्या हिंदूत्वाला बाधा येते. कारण करीना ही जन्मदाती हिंदू असल्याचे त्यांचे दुखणे असते. पण अनेक मुस्लिम कुटुंबात हिंदू नावेही दिलेली आढळू शकतात. पण त्या वादात शिरण्याची गरज नाही. कारण त्यातून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. अर्थात काहीजण तैमुर या नावासाठी मग इतिहासातही जातात.

पाकिस्तानी वंशाचे मुस्लिम तारेक फ़तेह, हे बराच काळ कॅनडामध्ये वसलेले आहेत. त्यांनीही या नावावर आक्षेप घेतला आहे. प्रत्यक्षात फ़तेह यांनी मुस्लिम असूनही आपल्या मुलीचे नाव लक्ष्मी असे ठेवलेले आहे. त्यावरून त्यांनाही शिव्या खाव्या लागत असतात. कारण ते पाकिस्तानी मुस्लिम आहेत. त्यांची पत्नीही मुस्लिम आहे. मग त्यांनी इस्लामचा कसलाही संदर्भ नसलेले लक्ष्मी हे नाव मुलीला कशाला ठेवले? अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. पण मग तोच अधिकार सैफ़ वा करीना यांनाही असतो. त्यांनी आपल्या मुलाचे नाव हवे तसे ठेवण्यात इतरांना पोटदुखी व्हायचे कारण काय? खुद्द फ़तेह यांनी तरी आक्षेप घेण्याचे कारण काय? तर फ़तेह यांनी त्याला इतिहास जोडला आहे. सहासात शतकापुर्वी भारतात तैमूर नावाच्या मुस्लिम सुलतानाने आक्रमण केलेले होते आणि हजारोच्या संख्येने एतद्देशीयांची कत्तल केली होती. सहाजिकच त्या नावावर डाग लागलेला आहे. फ़तेह यांचा आक्षेप त्यासाठी आहे. पण अशी अनेक नावे असतात आणि त्यांचा इतिहासातला संदर्भ घेतला म्हणजे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. उदाहरणार्थ गोडसे ह्या नावाचा उच्चारही संसदेत करू नये, असे काही मध्यंतरी ठरवले गेले आणि त्यावर शिवसेनेच्या खासदाराला आक्षेप घ्यावा लागला. कारण त्याचे आडनावच गोडसे आहे. लोकसभेत लोकांची मते घेऊन आलेल्या एका खासदाराचे नाव अवैध कसे ठरवले जाऊ शकते? त्यामुळे त्यावरचा आक्षेप मागे घ्यावा लागला होता. एकूणच हा वाद पोरकट असतो. कारण नावाने व्यक्ती ओळखली जाते आणि पुढल्या काळात त्याने काही कर्तबगारी दाखवली, तरच त्या नावाशी त्या कर्तॄत्वाची सांगड घातली जात असते. ती कर्तबगारी चांगली किंवा वाईट ठरवण्यातही भेदभाव होतच असतो. म्हणून काही नावे शिव्या होतात आणि काही नावे पवित्र होऊन जातात.

सुर्याजी पिसाळ ही महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातली शिवी मानली जाते. पण आजही महाराष्ट्रात त्या आडनावाची माणसे व घराणी आहेतच ना? मग त्यांनाही आपण आक्षेप घेणार आहोत काय? करुणानिधी यांनी आपल्या लाडक्या पुत्राला स्टालीन असे नाव दिलेले होते. आज हा स्टालीन द्रमुक या तामिळ पक्षाचा म्होरक्या झालेला आहे. पण त्याने स्टालीन या नावाला शोभणारे कुठलेही कृत्य केलेले नाही. स्टालीन हा सोवियत काळात अनेक बुद्धीजिवी वा त्याचे विरोधक असलेल्यांची कत्तल करणारा क्रुरकर्मा म्हणून ओळखला जातो. करूणानिधी पुत्राने असे काही केलेले नाही. पण त्याचे नाव स्टालीन आहे, म्हणून त्यालाही चुक म्हणायचे काय? नाव हा एकप्रकारचा शिक्का किंवा ओळखशब्द असतो. ज्याच्या उच्चाराने तुमच्या समोर एका व्यक्तीचा चेहरा येतो, किंवा त्या नावाची व्यक्ती तुमच्या हाकेला प्रतिसाद देत असते. त्यापेक्षा नावात अधिक काहीही नाही. सैफ़-करीनाचा पुत्र पुढल्या काळात काय पराक्रम करतो ते दिसेलच. कदाचित त्याने काही विधायक पराक्रम केला, तर तैमूर या शब्दाचा अर्थही नव्याने सांगितला जाऊ शकेल. त्यासाठी आज या नव्या बाळाला लक्ष्य करण्याची गरज नाही. नवदाम्पत्याला संतती झालेली आहे, त्याचा आनंद उपभोगण्याची संधी नाकारण्याइतके आपण कद्रू झालो आहोत काय? याक्षणी त्या अर्भकाला आपला धर्म किंवा नावही ठाऊक नाही. त्याच्या निरागसतेला बघण्याची जाण नसेल, तर आपले वय वाढून काय उपयोग आहे? नवनवे मुद्दे समोर करून त्या कोवळ्या बालकाच्या बाबतीत व्यक्त होणारी मते, किंवा त्याच्या जन्मदात्यांवर होणारी टिकाटिप्पणी, कुठल्या सभ्यता संस्कृतीत बसणारी आहेत? इतिहासातला तैमूर हा क्रुरकर्मा व नरपशू असेल, तर कोवळ्या अर्भकाच्या चेहर्‍यावरची निरागसता नजरेआड करून, भराभर वार करत सुटलेले आपण तरी कोण असतो?

9 comments:

  1. प्रश्न नाव काय ठेवल ते महत्वाच नाही भाऊ , या वरूण सैफ अली खान ची "हिंदू" आणि भारत विरोधी मानसिकता लोकांना कळली. हिंदुनि अखंड सावधान असावे जिहादी आतंकवाद प्रत्तेक गोष्टीतुन त्यांच्या वर विषारी साप म्हणून त्यांना डासतो आहे

    ReplyDelete
  2. त्या तान्ह्या बालकाची निरागसता कोणीही नाकारलेली नाहीच मुळात! त्याच्या जन्मदात्यांना झालेला आनंदही समजू शकतो... प्रश्न तो नाही... प्रश्न आहे तो त्या जन्मदात्यांच्या वृत्तीचा किंवा मानसिकतेचा !
    आता उदाहरणार्थ त्या मुलाचे नाव "झाकीर" ठेवले असते, तर मोठेपणी त्याने "हुसेन" व्हावे की "नाईक" व्हावे हा त्याचा "चॉइस" राहील. पण "तैमुर" या नावाने इतिहासात किंवा वर्तमानात दुसरे कोणी प्रसिद्ध (किंवा कुप्रसिद्ध) नाही. तैमुर म्हटल्यावर साधारणपणे तेवढी एकच व्यक्तीरेखा डोळ्यासमोर येते. अशा नरराक्षसाचे नाव स्वतःच्या मुलाला देण्याचा अट्टाहास कशासाठी ? इतर देशभक्त मुस्लीमांची नावे तुम्हाला का द्यावीशी वाटत नाहीत ? प्रश्न भावनांचा असतो.
    रामायण-महाभारतासारख्या महाकाव्यांतही नायकांना जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढीच त्यातील खलनायकांना मिळाली. पण म्हणून स्वतःच्या मुलांची नावे कोणी "रावण","दुर्योधन","दुःशासन" वगैरे ठेवत नाही ! "नावात काय आहे?" याचे हे उत्तर आहे. वृत्तीतील फरक दुसरे काय !!!

    ReplyDelete


  3. भाऊराव,

    आता असं बघा की, इंदिरा गांधी मुसलमान. त्यांचं खरं नाव मैमुनाबेगम. त्यांच्या नवऱ्याचं नाव फिरोजखान. जेव्हा इंदिरा गांधी १९७१ साली म्हणतात की आम्हाला ५००० वर्षांच्या विजयाची परंपरा आहे, तेव्हा ही परंपरा मुस्लिमांची नसून हिंदूंची आहे. मुस्लिम असूनही इंदिरा गांधींना हिंदू परंपरा आपलीशी वाटते. यांतंच हिंदूंच्या वैभवशाली वारशाची शक्ती दडलेली आहे.

    आता तैमूर हे नाव ठेवल्याने हा वारसा सशक्त होईल का, असा प्रश्न आहे. की तारेक फतांनी लक्ष्मी हे नाव ठेवल्याने हा वारसा सशक्त होईल? उत्तर उघड आहे.

    आपण परत १९७१ कडे येऊया. तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे पडले. स्वतंत्र बांगलादेश निर्माण झाला. मात्र यामुळे हिंदूंची परिस्थिती सुधारली का? १९७१ नंतर अवघ्या १५-२० वर्षांत काश्मिरी हिंदूंना घरंदारं सोडून मायदेशातच निर्वासित व्हायची वेळ आली ना? कुठे गेला हिंदूंचा मोठा गौरवास्पद वारसा? हा हिंदूंच्या मनात खोलवर दडलेला सल आहे. तैमूर हे नाव ऐकून हा हळवा सल उफाळून येणारंच ना? कोण्या मुस्लिमाने तैमूर असं नाव ठेवल्याचं ऐकिवात नाही. मग आत्ताच का म्हणून?

    मुस्लिमांच्या मनात नक्की काय आहे? बहुसंख्य पाकिस्तानी मुस्लिम जनतेचा वेगळा पाकिस्तान काढायला अजिबात पाठींबा नव्हता. तरीपण पाकिस्तान वेगळा झालाच ना? त्यासाठी १० लाख मुंडकी छाटली गेलीच ना? जेंव्हा हिंदू तैमूर हे नाव ऐकतो तेंव्हा भारताची आजून एक फाळणी होणार का, असा प्रश्न त्याच्या मनी निपजतो. फाळणीच्या भीषण आठवणी जाग्या होणं अत्यंत नैसर्गिक आहे.

    म्हणूनंच तैमूर नावाला वेळच्या वेळी विरोध केलेला बरा, असं माझं मत आहे. मी हे सगळं निदान लिहू तरी शकतो. बहुसंख्य हिंदू हे स्पष्ट शब्दांत सांगू शकंत नाहीत. त्यांच्या रागाचा अचानक स्फोट झाला तर काय गहजब माजेल!

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. Tarek Fateh yanchya mulinchi naave Natasha aani Naaziya aahet..Lakshmi nahi

    ReplyDelete
  5. भाऊ आपल्याकडून अशा समर्थनाची अपेक्षा न्हवती

    ReplyDelete
  6. माणसाची ओळख त्याच्या नावाने आिण कामाने होते
    धर्म , जाती या मानवनिर्मित आहेत व यांचा वापर स्वताच्या िहतासाठी केला जातो . या गोष्टींनी सर्वांचे नुकसान केले आहे . एखाद्या नावाला धर्माशी जोडने चुकीचे आहे .

    ReplyDelete
  7. हा बालक तैमूर मोठा झाल्यावर कसा वागेल हे आताच सांगता येणार नाहीं हे योग्य आहे.
    पण सैफ अली खान मात्र कट्टर मुसलमानासारखाच आज वागतो आहे हे हिंदूंनी दुर्लक्ष करण्यासारखी घटना नक्कीच नाहीं.
    सैफला भारतीय मुसलमानांकरीता आदर्श निर्माण करता आला असता. पण त्यानी आपल्या सगळ्याच कृतीतून कट्टरताच दर्शविली आहे.
    आक्षेप या कट्टरपंणाला आहे.
    बापाने कट्टरतेच बाळकडू पाजलेला मुलगा कट्टरपंथीच होईल ही शंका अनाठायी म्हणता येत नाही.

    ReplyDelete
  8. नावात नक्कीच काही तरी आहे. एखाद्याने मुलाचे नाव हिटलर ठेवले तर सामान्यतः हिटलर चा इतिहास डोळ्यांपुढे येणार. निरपेक्षपणे नावाकडे पाहायला सामान्य जनता तेवढी ' बुद्धीवंत' नसते .

    ReplyDelete