राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस किती जोमदार घरवापसी करते आहे, त्याची साक्ष आता खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच दिलेली आहे. शनिवारी मुंबईत त्यांनी आपल्या क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिला आणि दोन उपरोधिक विधाने केली. त्यापैकी एक सर्वोच्च न्यायालयासंबंधी होते आणि दुसरे देशातील राजकीय कोंडीविषयीचे होते. क्रिकेट नियामक मंडळाच्या बाबतीत लोढा समिती नेमून कठोर पवित्रा सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे. त्यानंतर मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्ष पदावरून बाजुला केले जाण्याची टांगलेली तलवार पवारांच्या डोक्यावर होतीच. कारण हे पद त्यांनी यापुर्वीच दोनदा भूषवलेले आहे आणि त्यापेक्षा अधिक काळ त्यावर कोण व्यक्तीला दावाही करता येणार नाही; असा न्यायालयाचा कटाक्ष आहे. शिवाय वयाची सत्तरी उलटलेल्या व्यक्तीलाही अधिकारपद घेण्यावर निर्बंध लागू करण्याचा निर्णय त्यात आलेला आहे. त्यावर कोर्टाने आदेश देण्यापर्यंत थांबायचे, की सन्मानाने बाजूला व्हायचे; इतकेच पर्याय पवारांपाशी होते. त्यांनी दुसरा पर्याय निवडला. आजवरच्या अनुभवाने त्यांना तितके नक्की शिकवले आहे. कारण झुंज देण्याची ही वेळ नाही, हे त्यांनाही कळलेले आहे. ज्या पद्धतीने नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना कोर्टाने जाब विचारला आहे. त्यानंतर अधिक लढायला आगा उरलेली नाही, हे पवारांसारखा चाणाक्ष माणूस ओलखतो. म्हणूनच त्यांनी पदाचा राजिनामा दिला आणि यापुढे क्रिकेटचे सामनेही कोर्टच भरविल, अशी उपरोधिक भाषा वापरून त्यांनी अंग काढून घेतले आहे. पण जाता जाता त्यांनी कोर्टावर बोचरी टिकाही केली आहे. तरी शब्दात फ़सू नये याची काळजी घेतली आहे. त्याचवेळी राहुलवरही केलेली मल्लीनाथी लक्ष्यवेधी आहे. किंबहूना राहुलचा मोदीविरोधी दावा किती फ़ुसका आहे ,त्याचीच त्यातून ग्वाही दिली आहे.
नाहीतरी देश कसा चालवावा हे सरकारला सध्या कोर्टच सांगते आहे, आता क्रिकेटचे सामनेही कोर्टच आयोजित करील; असे बोलण्यातला उपरोध लपून रहाणारा नाही. सरकारने शासकीय निर्णय घ्यायचे असतात आणि त्यात हस्तक्षेप करून कोर्ट सरकारचे अधिकार आपल्या हाती घेत चालले आहे; असेच पवारांना सुचवायचे आहे. मग जिथे सरकारलाच कोर्ट अधिकार देत नसेल, तर क्रिकेट नियामक मंडळ खुप छोटी संस्था आहे. त्याचेही बारीकसारीक निर्णय कोर्टच आपल्याकडे घेत चालले आहे. म्हणून मग अशा संस्थेत आपल्याला काही करायची सोय उरलेली नाही, असा पवारांच्या विधानाचा आशय आहे. बाकी शब्दात त्याला कोणी कोर्टाचा अवमान म्हणून शकत नाही. किंबहूना आपल्याला कोर्टाचा अवमान करायचा नाही, असे म्हणूनच पवारांनी उच्चारलेले हे विधान अधिक बोलके होऊन जाते. त्यात अजिबात तथ्य नाही असेही कोणी म्हणू शकत नाही. घटनेसह अनेक बाबतीत अंतिम सत्य आपणच सांगू; अशा दिशेने अनेक बाबतीत न्यायालयाची चाललेली वाटचाल नजेरत भरणारी आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांमध्ये किती चलबिचल आहे, त्याचा पडताळा अनेकदा आलेला आहे. अरुणाचल विधानसभेतील गडबडीनंतर कोर्टाने माजी मुख्यमंत्र्यांना नव्याने सत्तेत आणून बसवले आणि राष्ट्रपतींचा आदेश रद्दबातल केला होता. पण काही दिवसातच त्याच मुख्यमंत्र्याने बहूमत पाठीशी नाही म्हणून राजिनामा दिला आणि मग कॉग्रेसचा नवा मुख्यमंत्री सगळे आमदार घेऊनच पक्षांतराने भाजपात दाखल झाला. मग मध्यंतरी कोर्टाकडून झालेल्या हस्तक्षेपाने काय साधले? पण ते सर्वच सव्यापसव्य करावे लागले होते आणि त्यानंतरही राजकीय घटनात्मकतेमध्ये कुठलाही फ़रक पडलेला नव्हता. पण कोर्टाच्या निर्णयामुळे ते करावे लगलेले होते. त्याकडेच पवारांचा कटाक्ष आहे. पण त्याहीपेक्षा राहुलच्या आवेशाची त्यांनी उड्वलेली खिल्ली लक्ष्यवेधी आहे.
आपल्यापाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातले व्यक्तीगत भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत आणि आपण ते लोकसभेत मांडले, तर मोदींना पळता भूई थोडी होईल. त्यातून भूकंप होईल, असे आवेशपुर्ण दावे राहुलने केलेले होते. किंबहूना त्यामुळेच आपल्याला लोकसभेत बोलू देत नाहीत. कारण मोदी भयभीत झालेले आहेत, असा राहुलचा दावा होता. पण अखेरच्या क्षणी पुरावे मोदींच्या तोंडावर मारण्याऐवजी राहुल शिष्टमंड्ळ घेऊन मोदींना भेटले आणि साधे शेतकर्यांच्या मागण्याचे निवेदन देऊन परतले. सहाजिकच त्या भूकंप घडवणार्या पुराव्याचे काय झाले, हा विषय चर्चेचा झालेला आहे. अनेकजण राहुलपाशी पुरावे मागत असून, त्यांनी ते जाहिर करावेतच, त्यासाठी लोकसभेतच बोलण्याचा हट्ट करू नये; असेही अनेकांनी राहुलला डिवचलेले आहे. केजरीवाल यांनी तर मोदींना भेटून राहुलनी परस्पर सौदा केल्याचाही संशय व्यक्त केला आहे. राहुलनी असा पुरावा दिलाच तर मोदी विनाविलंब भावजी रॉबर्ट वाड्राला अटक करतील, असेही केजरीवाल यांनी म्हटलेले आहे. अशा प्रार्श्वभूमीवर पवारांनी केलेली मल्लीनाथी मजेशीर आहे. संसद अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसात सर्वच खासदार भयभीत झालेले होते. कारण भूकंप झाला तर कोसळून पडणार्या ढिगार्यातून सुखरूप बाहेर कसे पडावे; याची आम्हाला चिंता सतावत होती. पण तसा भूकंप झाला नाही हे नशीब; असे पवारांनी म्हटले आहे. त्याचा अर्थच राहुलने निव्वळ पोरखेळ केला आणि एकूणच विरोधी राजकारण हास्यास्पद करून टाकले; असेच त्यांना सुचवायचे आहे. आपल्यापाशी असलेल्या पुराव्यांनी मोदी भयभीत झालेले आहेत म्हणूनच आपल्याला बोलू दिले जात नाही; असे राहुल म्हणाले होते. पण पवार म्हणतात, घाबरले होते संसदेचे सर्वच खासदार. कारण भूकंपाने संसदेला धक्का बसण्याची भिती होती, असे पवाराना म्हणायचे आहे. हे शब्द हास्यास्पद आहेत, तेही त्यांना कळते.
राजकीय आरोप किंवा भ्रष्टाचाराच्या पुराव्याने खरा नैसर्गिक भूकंप होत नाही वा कुठली इमारत धरणी हादरत नाही. हे पवारांनाही कळते. मग त्यांनी संसदेलाही हादरे बसतील असे विधान कशासाठी गृहीत धरले आहे? तर ज्या राजकारण्यापाशी असे स्फ़ोटक पुरावे किंवा कागदपत्रे असतात, तो धमाका करण्यापुर्वी कुणाला पुर्वसुचना देत नसतो. धमाका वा स्फ़ोट हा थक्क करून सोडणारी क्रिया आहे आणि त्यात समोरच्याला बेसावध गाठण्याने अधिक भयंकर परिणाम घडवता येत असतात. त्यातली जागा किंवा लक्ष्य आधीच जाहिर केले जात नाही. तसे असते तर कुठल्याही घातपाताची आधी सूचना दिली गेली असती आणि जितके मोठे नुकसान होताना दिसते; तितके होऊ शकले नसते. म्हणूनच भूकंप वा स्फ़ोटातले सामर्थ्य त्याच्या आकस्मिकतेमध्ये असते. राहुलनी स्फ़ोटाच्या धमक्या देण्यातच वेळ दवडला आणि जो काही मालमसाला आहे, त्याविषयीच रहस्य निर्माण करून ठेवले. त्यात थोडे जरी तथ्य असते, तर सरकार हादरून गेले असते. पण मोदी वा त्यांचा सत्ताधारी पक्ष सर्व काळात निर्धास्त होता. याचा अर्थच त्यांना भयभीत करणारे राहुलपाशी काही नव्हते. नुसत्या शब्दापलिकडे राहुल काही करू शकले नाहीत. त्यांचा बार फ़ुसका होता असेच पवारांना त्यातून सुचवायचे आहे. किंबहूना त्यामुळे विरोधी पक्षात तयार झालेली एकजुट व आवेशच मातीमोल झाला, असे जाणत्या पवारांना सांगायचे आहे. अतिरेकी साहस करून माणुस फ़सतो आणि आपल्यालाच गोत्यात घालून घेतो. तेव्हा हिंदीत म्हणतात, ‘जान बची लाखोपाय, लौटके बुद्दू घरको आय’. राहुलचा सर्व आवेश व नाट्य त्यापेक्षा किंचीतही वेगळे नाही, असेच पवार त्यातून सुचवित आहेत. अन्यथा त्यांनी अशी उपरोधिक भाषा वापरली नसती, की अशा विषयावर भाष्यही केले नसते. राहुलच्या खेळापासून आपल्या पक्षाने दुरावा कशाला ठेवला, त्याचाही हा खुलासा असू शकतो.
No comments:
Post a Comment