सांगली पोलिस कोठडीत मारहाणीमुळे अनिकेत कोथळे नावाच्या आरोपीचा मृत्यू झाल्याने एकूणच पश्चीम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कारण कुठल्या दरोड्याचे प्रकरण तपासासाठी आलेले असताना काही आरोपींना अटक झालेली होती. त्यापैकी एक अनिकेत होता आणि त्याला खुप अमानुष मारहाण झाली. शारिरीक छळवाद झाल्याने त्याचा मृत्यू झालेला होता. अशा घटना नव्या नाहीत. देशातील अनेक पोलिस ठाण्यात आरोपीला संशयित म्हणून ताब्यात घेतल्यावर मारहाण करून गुन्हा केल्याचे जबाब घेतले जातात. कालपरवाच हरयाणा पोलिसांच्या विरोधात असेच वादळ उठलेले आहे. रियान स्कुल नामक शाळेतील कोवळ्या बालकाच्या हत्येनंतर त्या शाळेतील बस कंडक्टरला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेले होते. पुढे लौकरच त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन जाहिर केले होते. तेवढेच नाही, तर त्याने खुनी हत्यारही पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले होते. पण मृत बालकाच्या मातापित्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि सीबीआयमार्फ़त चौकशी व्हावी असा आग्रह धरला. जनमानसाचा रेटा इतका जोरदार होता, की हरयाणा सरकारनेही विनाविलंब तपास सीबीआयकडे सोपवला. महिनाभर तपासात गेला आणि आता त्या चौकशीत कंडक्टर नव्हेतर शाळेच्याच अन्य विद्यार्थ्याने प्रद्युम्न या बालकाची हत्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे. शेकडो विद्यार्थी व कर्मचार्यांच्या जबान्या घेतल्यावर सीबीआय या निष्कर्षाप्रत आली. त्यानंतर या मुलाला संशयित म्हणून उचलण्यात आले आणि प्रश्नांच्या सरबत्तीसमोर तो विद्यार्थी कोसळला. त्याने गुन्हा मान्य केला. पण मग हरयाणा पोलिसांनी कंडक्टरकडून मिळवलेल्या कबुलीजबाबाचे काय? तो खोटा पडतो ना? यातून गुन्हेतपास व पोलिसी कारवाईवर प्रश्नचिन्ह लागते. सांगलीत त्याचीच पुनरावृत्ती व अतिरेक झालेला आहे.
संशयिताला ताब्यात घ्यायचे आणि प्रथम माध्यमांचा गदारोळ शांत करायचा. मग खरे गुन्हेगार मोकाट राहोत किंवा त्यांनी आणखी गुन्हे करोत. त्याची पोलिसांना काही फ़िकीर नाही, असा याचा अर्थ होतो. कोणालाही मारून मुटकून गुन्हेगार म्हणून पेश करायचे. माराच्या भयापोटी त्याच्याकडून कबुलीजबाब घ्यायचे, असा खाक्या झाला आहे काय? मालेगावच्या बॉम्बस्फ़ोटाच्याही तपासाचा असाच विचका उडालेला आहे. त्यात आधी काही मुस्लिम तरूणांना संशयित म्हणून पकडलेले होते. पण मग सत्तेतील काही राजकारण्यांनी हा मुस्लिम दहशतवाद नसून हिंदू दहशतवाद असल्याची वावडी उडवली. मग त्याला दुजोरा देणारे आरोपी शोधण्याचा पोरखेळ सुरू झाला. त्यानुसार मग कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह काही हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना अटक झाली. मात्र आजपर्यंत त्यांच्या विरोधात सिद्ध होणारे कुठलेही पुरावे समोर येऊ शकलेले नाहीत. पण तात्काळ पत्रकार परिषदा घेऊन तपास पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी भक्कम सज्जड पुरावे हाती लागल्याचा दावा तेव्हाही केलेला होता. हेमंत करकरे कसाब टोळीकडून मारले गेले. पण आज नऊ वर्षानंतरही त्यांनी मिळवलेले पुरावे कोणाला बघता आलेले नाहीत वा कोर्टातही सादर झालेले नाहीत. हा आपल्याकडे आता पोलिस तपासाचा खाक्या झालेला आहे. दाभोळकर पानसरे यांच्याही हत्याकांडात पुरावे सापडल्याचे दावे वारंवार झालेले आहेत आणि काही संशयितांना ताब्यातही घेण्यात आलेले आहे. पण त्यांच्याकडून मिळालेल्या तथाकथित कबुलीजबाबाच्या पलिकडे कुठलाही सिद्ध होणारा पुरावा समोरे येत नाही, ही नित्याची बाब झालेली आहे. सांगलीत त्यापेक्षा काहीही वेगळे झालेले नाही. नेहमीच्या खाक्याप्रमाणे संशयित ताब्यात घेऊन त्याच्याकडून कबुली मिळवण्याच्या खेळाचा अतिरेक झाला आहे आणि त्यात एकाचा बळी गेला आहे.
जामिन मिळाल्यावर कर्नल पुरोहित वा साध्वी प्रज्ञासिंग यांनी आपल्या छळवादाच्या कहाण्या कथन केलेल्या आहेत. त्यापेक्षा सांगलीच्या पोलिस कोठडीत खुप काही वेगळे वा अमानुष घडलेले नाही. पण गदारोळ सांगलीचा चालू आहे आणि त्याच पद्धतीची माहिती समोर येऊन पुरोहित प्रकरणात कोणी अवाक्षर बोलयला राजी नाही. पानसरे दाभोळकर तपासातल्या आरोपींची कहाणी वेगळी आहे काय? त्यातले दोन फ़रारी असल्याचे सांगितले जाते. ते खरे़च फ़रारी आहेत? की तपासासाठी ताब्यात घेतल्यावर त्यांनाही असेच बेपत्ता करण्यात आलेले होते? मालेगाव प्रकरणातही असेच दोन संशयित इंदुर येथून मुंबईला आणले गेले आणि त्यानंतर ते कुठल्या कुठे गायब झाल्याचे सांगितले जाते. त्यांना तपासानंतर सोडून देण्यात आले व ते घरी गेल्याचा खुलासा करण्यात आलेला होता. पण तसे झालेले नाही. उलट त्याच काळात करकरे यांच्या तपास पथकात असलेल्या एका पोलिस अधिकार्याने या दोन्ही गायब संशयितांची पोलिसांनी कोठडीतच हत्या केल्याचे प्रतिज्ञापत्र सोलापूरच्या कोर्टामध्ये दाखल केलेले आहे. सांगायचा मुद्दा इतकाच, की असे कोठडीत आरोपी व संशयितांचे मृत्यू होणे नवे नाही. पोलिसांवर तसे आरोपही नवे नाहीत. घाटकोपर व अन्य स्फ़ोटातील संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या एका मुस्लिम तरूणाचा कोठडीत मारहाणीने मृत्यू झाला आणि नंतर त्याला अहमदनगर येथे घेऊन जाताना तो फ़रारी झाल्याचा बहाणा करण्यात आला होता. शेवटी त्याच्या मातापित्यांनी कोर्टाचे दार ठोठावले आणि भरपाई म्हणून काही लाख रुपये पालकांना देण्याचा आदेश कोर्टाने दिलेला होता. त्यामुळे सांगलीच्या कोठडीत असे का,ही प्रथमच घडलेले आहे किंवा यापुर्वी तसे काही घडत नव्हते असा कांगावा करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्रात व देशाच्या अनेक पोलिस कोठडीत असे अनेक संशयित मारले जातात, ही वस्तुस्थिती आहे.
यात एक गोष्ट अगत्याची आहे. आजवर झालेल्या अशा हत्या व त्यामागची पोलिसी मानसिकता, याचा कसून अभ्यास व्हायला हवा आहे. कुठल्या स्थितीत व कारणाने पोलिस अशा अतिरेकी व अमानुष वर्तनाकडे झुकलेले आहेत, त्याचा तपास महत्वाचा ठरेल. यात पकडले जाणारे आरोपी व संशयित यांचे त्या ठराविक पोलिसांशी काही वैर नसते वा दुष्मनी नसते. त्यामुळे़च कोठडीत घेऊन त्याला अमानुष मारहाण करण्यामागे काही व्यक्तीगत हेतू असू शकत नाही. पण घडते तसे आणि मारहाण हा नेहमीचा विषय झाला आहे. तर पोलिसांच्या भावना मेल्या आहेत किंवा कसे? की बाहेरच्या, सामाजिक वा राजकीय दबावामुळे पोलिस अशी टोकाची कारवाई करायला प्रवृत्त होतात? याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यातून मग गुन्हेतपास करताना कोणती काळजी घेतली जावी, या़चे काही आडाखे बनवता येतील. तशी बंधने पोलिसांना घालता येतील. आजही पोलिस कोठडी व न्यायालयीन कोठडी असे दोन प्रकार आहेत. त्यात न्यायालयीन कोठडी म्हणजे पोलिस आरोपीला हातही लावू शकत नाहीत. पण पोलिस कोठडी म्हणजे तपास अधिकार्याच्या हाती संशयिताचे सर्वस्व जात असते. माध्यमातून अशा घडामोडींचा इतका उहापोह चालतो, की त्याचेही पोलिसांवर मोठे दडपण येत असते. त्यामुळे एकदाचा निचरा करून त्यातून सुटण्याच्या आकांताने पोलिस असे अतिरेकी वागू लागले आहेत काय? त्याचाही शोध आवश्यक झाला आहे. आता संगलीत घडले त्यासाठी ठराविक पोलिस व अधिकार्यांचा बळी घेऊन हा विषय संपवला जाईल. पण म्हणून तशा घटना व्हायचे थांबणार आहे का? नसेल तर वेगळा मार्ग चोखाळला पाहिजे. यामागची विकृती व समस्या शोधून उपाय शोधायला हवेत. तरच आरोपीच्या जीवाशी खेळ होणार नाही व तपासही योग्य दिशेने होऊ शकतील. गुन्हेगार पकडले जातील आणि निरपराधांचा हकनाक बळी जायचे थांबेल.
मालेगाव प्रकरणातही असेच दोन संशयित इंदुर येथून मुंबईला आणले गेले आणि त्यानंतर ते कुठल्या कुठे गायब झाल्याचे सांगितले जाते. त्यांना तपासानंतर सोडून देण्यात आले व ते घरी गेल्याचा खुलासा करण्यात आलेला होता. पण तसे झालेले नाही. उलट त्याच काळात करकरे यांच्या तपास पथकात असलेल्या एका पोलिस अधिकार्याने या दोन्ही गायब संशयितांची पोलिसांनी कोठडीतच हत्या केल्याचे प्रतिज्ञापत्र सोलापूरच्या कोर्टामध्ये दाखल केलेले आहे.
ReplyDeletebhau ya baddal savistar lihal ka please
भाऊ ...............तो दिवस फार दूर नाही जेंव्हा सामान्य नागरिक अशा वर्दीतील गुंडाना त्याच भाषेत उत्तरे देऊ लागतील...............भले काही लोक त्यांना नंतर नक्षलवादी का म्हणेनात वा अराजक !!
ReplyDelete