Tuesday, November 7, 2017

आनंदाचे डोही दु:खाचे तरंग (पूर्वार्ध)

gold mine के लिए चित्र परिणाम

“The world has enough for everyone's need, but not enough for everyone's greed.”   ― Mahatma Gandhi

एका आश्रमात सर्व शिष्यगण सकाळी जमा झालेले असताना आचार्यांनी अकस्मात आजचा वर्ग नदी पलिकडल्या टेकडीवर घेण्याचे जाहिर केले. मुलांचा फ़राळ संपला आणि मग सर्व विद्यार्थी पायपीट करीत निघाले. आश्रमाच्या जवळच नदी होती आणि तिचे पात्र ओलांडून झाल्यावर आचार्य म्हणाले, आता प्रत्येकाने नदीच्या पात्रातील गोटे निवडा आणि आपल्या सोबत घेऊन चला. ते कशासाठी याचा खुलासा त्यांनी केला नाही. एकदोन शिष्यांनी विचारणा केली असता गुरूजी उत्तरले, जमतील तितके गोटे प्रत्येकाने घ्यावे. कशासाठी त्याचे उत्तर टेकडीवर गेल्यानंतर मिळेलच. मग त्या घोळक्यातील प्रत्येक मुलाने आपल्या सोयीनुसार व स्वभावानुसार वर्तन केले. कोणी निष्ठेने उचलून नेता येतील तितके गोटे गोळा केले; तर कोणी दोनचारच घेतले. कोणी काहीही घेतले नाही, तर कोणी एकच नावापुरता गोटा घेतला. काही तासांनी ही मुले टेकडीवर पोहोचली तेव्हा दमलेली होती. त्यातल्या ज्यांनी अधिकचे गोटे गोळा केलेले होते, त्यांची तर खुपच दमछाक झाली. शेवटी टेकडीवर पोहोचल्यानंतर गुरूजी एक एक गोष्ट समजावू लागले. निसर्गाचे महात्म्य सांगू लागले. पण सोबत आणलेल्या ओझ्याविषयी ते काहीच बोलत नव्हते. त्यामुळे ओटीभर गोटे गोळा केलेल्या एका थकल्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला. गुरूजी पण आता या गोट्यांचे काय करायचे? तेव्हा हसून गुरूजी उत्तरले, ‘ते विसरलोच होतो मी. एव्हाना त्या गोट्यांचे सोने झालेले असेल.’ तात्काळ मुलांनी आपापले गोटे तपासले तर खरेच त्यांचे सोने झालेले होते. एकदोन आळशी मुले सोडल्यास प्रत्येकाच्या हातात सोने होते. पण प्रत्येक मुलाची प्रतिक्रीया वेगवेगळी होती. ज्यांनी सोबत काहीच घेतलेले नव्हते, त्यांनी मनोमन आपल्या नशीबाला दोष लावला, तर ज्यांनी एकदोनच गोटे घेतलेले होते, त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. एक दिवस आणि काही तास ओझे उचलण्याचा आळस, म्हणजे त्यांना आयुष्यभरचा मुर्खपणा वाटला होता. उलट ज्यांनी तो अतिभार उचलून इतका चढाचा प्रवास केलेला होता, त्यांचे चेहरे खुललेले होते. त्यांनी आयुष्यभर मौज करायला पुरेल असे सोने मिळवले होते. पण काही वेळातच त्या मुलांच्या लक्षात आले, की आचार्यांनी एकही गोटा घेतलेला नव्हता. त्यापैकी एका चिकित्सक मुलाने विचारले, गुरूजी हे सर्व ठाऊक असताना तुम्ही कशाला नदीतला एकही गोटा आणला नाही? पुन्हा हसून गुरूजी उत्तरले, हे सोने फ़क्त इथे टेकडीवरच असते. जसेजसे पुन्हा माघारी जाल तसतसे त्याचे पुन्हा गोटे होत जातील. सोने हवे असेल तर इथेच टेकडीवर वास्तव्य करावे लागेल. मला तर परत जायचे आहे म्हणून मी त्या मोहात कधी सापडलो नाही. तुमच्यापैकी कितीजणांची इथे ओसाड निर्मनुष्य टेकडीवर वास्तव्य करायची तयारी आहे? सर्वांचेच चेहरे उतरले होते. आता रिकाम्या हाती टेकडी चढलेले सुखावले, तर ओझे उचलून चढलेले निराश झाले. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून गुरूजी भरभर माघारी निघाले. तेव्हा तर मुलांमध्ये कमालीची चलबिचल सुरू झाली. कोणाला सोन्यासारखे दिसणारे ते गोटे फ़ेकायची इच्छा नव्हती, तर कोणाचा पाय माघारी टेकडी उतरण्यासाठी राजी नव्हता. हळुहळू एक एक विद्यार्थी नामुष्कीने गुरूंजींच्या मागे चालू लागला आणि प्रत्येकाच्या चेहर्‍यावर निराशाच होती. अखेरीस एका मुलाने धीर करून गुरूजींना सवाल केला. पण गुरूजी आजच्या धड्याचे काय? गुरूजी हसले आणि म्हणाले, सोने, पैसा, संपत्ती वा श्रीमंती ह्या सगळ्या गोष्टी मानवी व्यवहारातल्या व वस्तीतल्या असतात. जिथे माणूसकीच संपते तिथे त्यांचे मूल्यही नामशेष होते. पैसा वा संपत्तीची महत्ता कुठे व किती, हेच आज आपण शिकलो असू तर उपयोग आहे. अन्यथा तुम्ही आणि टेकडीवरच्या गोट्यांचे सोने, यात तसूभर फ़रक नाही.

म्हटले तर ही बोधकथा आहे नाही तर भाकडकथा आहे. याच कथेशी जुळणारा एक इंग्रजी सिनेमाही १९५० च्या दशकात गाजला होता, ‘मॅकेनाज गोल्ड’ नावाचा! गोष्ट वा वस्तू यातला आशय वा तथ्य विसरलात, तर त्याचे मूल्य काहीही उरत नाही, हे त्यातले सत्य आहे. आजच्या एकविसाव्या शतकातही त्याचा बोध कायम आहे. जर आपण लक्षात घेणार असू तर ठिक, नाही तर बुडबुडे उडवण्यापलिकडे काहीही साध्य होणार नाही. १९७१ सालात लोकसभा जिंकण्यासाठी इंदिराजींनी ‘गरीबी हटाव’ अशी घोषणा दिली होती आणि कालपरवा मागल्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांनीही ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी गर्जना केलेली होती. साडेचार दशकानंतर भाजपा नेते कॉग्रेसला सवाल करतात, ती गरीबी किती दूर झाली? साडेतीन वर्षानंतर कॉग्रेसवाले भाजपाला सवाल करतात, कुठे आहेत ‘अच्छे दिन’? या दोन्ही गटाल्या लोकांना गरीबी वा अच्छे दिन म्हणजे नेमके काय, ते तरी आजवर जाणून घ्यावे असे वाटलेले आहे काय? असते तर त्यांनी एकमेकांना असले खोचक प्रश्न विचारले नसते, की आपलीच पाठ थोपटून घेण्याचा आगंतुकपणा केला नसता. कारण गरीबी-श्रीमंती यांची व्याख्या व्यक्ती व भुगोलानुसारही बदलत असते आणि एकाच प्रदेशात वास्तव्य करणार्‍या एकाच समाजातही त्यात भेद भिन्नता असू शकते. मुंबईच्या धारावीत किड्यामकोड्याचे जीवन कंठणार्‍या व्यक्ती व देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहाचे म्होरके मुकेश अंबानी, यांच्या श्रीमंती वा गरीबीच्या कल्पनाच किती भिन्न असू शकतात ना? सामान्य घरातला कुणी नवरा पत्नीला वाढदिवसाची भेट म्हणून फ़्रीज दागिना असे काही देऊन फ़ुशारक्या मारू शकतो. त्याची पत्नीही सुखावते. किंवा त्यातले काही देता आले नाही, म्हणून नवरा हताश होऊन जातो आणि पत्नीही नाराज असू शकते. पण त्याच मुंबईतला उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या पत्नीला वाढदिवसाची भेट म्हणून चक्क जेट विमान भेट देऊ शकतो. त्यातला त्याचा आनंद वा पत्नीची खुशी यांची तुलना अन्य कुणा मुंबईकराशी होऊ शकते काय? किरकोळ वीसतीस हजार रुपये किंमतीचा दागिना मिळाल्याने सुखावणारी मध्यवर्गियाची पत्नी व मुकेश अंबानींच्या पत्नीचा आनंद कुठल्या मोजपट्टीने मोजायचा? त्या दागिन्याने सुखावणार्‍या मध्यमवर्गिय पत्नीची कुठल्या झोपडपट्टीतील गरीबीत जीवन कंठणार्‍या गृहीणीशी तुलना होऊ शकेल काय? वर्षातून वाट्याला येणारी एक किरकोळ किंमतीची साडी, वाढदिवशी नवर्‍याने अगत्य दाखवून आणली, तर तिला मिळणारा आनंद मुकेश अंबानीने पत्नीला जेट विमान दिल्यापेक्षाही मोठा असतो. कधी तिकडे आपण गंभीरपणे बघतो तरी काय? ही इतकी किरकोळ किंमतीची साडी दहा मैत्रीणींना कौतुकाने दाखवणारी ती गरीबी गृहीणी, पुढले कित्येक दिवस त्या साडीची घडीही मोडत नाही आणि मूल्यवान दागिन्यासारखी जपून ठेवते. उलट अंबानींची पत्नी पहिल्याच दिवशी जेटमधून आकाशात फ़ेरफ़टकाही मारून येते. यांचे मूल्यमापन कसे करायचे? 

अवघ्या जगाला सुखीसमाधानी करायला निघालेल्या बौद्धीक राजकीय प्रेषितांना कधी अन्य लोकांच्या आनंदाचा वा सुखसमाधानाचा निकष शोधण्याची गरज वाटलेली आहे काय? आपल्याच मस्तीत गरीब श्रीमंत जगत असतात आणि आपल्याच संकल्पनांच्या कसोटीवर सुखदु:ख साजरे करीत असतात, त्यापेक्षा समाजातील शहाण्या वा बुद्धीमान लोकांची कथा वेगळी नसते. श्रीमंत वा गरीब अथवा अन्य मध्यमवर्गिय आपापल्या सुखदु:खात असतात. पण अशा सर्व समाजाच्या सुखदु:खाचा डोलारा आपल्यावरच अवलंबून असल्याच्या चिंतेने सतत ग्रासलेल्यांना मात्र, वास्तवाचे अजिबात भान नसते. त्यांच्या कल्पनेत श्रीमंती असते आणि त्यांच्या समजुतीमध्ये गरीबीच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यानुसारच त्यांच्या भूमिका बनत असतात, विचार प्रसवले जात असतात आणि त्यानुसारच काल्पनिक उपायशी शोधले सांगितले जात असतात. त्यात मुकेश अंबानी, मध्यमवर्गिय वा झोपडपट्टीतला गरीब, असा कुठलाही भेदभाव सहसा होत नाही. अशा वास्तवाशी नाळ तुटलेल्या जाणकारांकडे देशाची वा समाजाची सुत्रे गेली, मग समस्या सोडवल्या जाण्यापेक्षा अधिक जटील होत जातात. त्यांना नोटाबंदी हानीकारक वाटली असेल तर गरीबांचे हाल झालेले दिसू शकतात. लोकप्रक्षोभ असल्याचे साक्षात्कार होतात. जगण्यातले संघर्ष त्यांनी बघितलेले नसतात आणि बघितलेले असतील, तरी पोथीनिष्ठा त्यांना तिकडे गंभीरपणे बघू देत नाही. टेकडीवर सोने वाटणारे गोटे पुन्हा खाली उतरल्यावर दगड होऊन जाणार, ही कल्पनाच त्यांना भयभीत करते. पण मानवी व्यवहारात मानवी अनुभूतीनुसार मोजमाप चालते, याचे भान त्यांना ठेवता येत नाही. त्याप्रमाणे विचार करता येत नाही. म्हणून मग असे लोक जाणकार होऊन समाजाचे जीवन अधिकच हलाखीचे करू शकत असतात. किंबहूना भारतीय समाजाला आजकाल तीच सर्वात मोठी समस्या भेडसावते आहे. देशातील गरीबी वा दु:खदैन्य संपवण्यासाठी सत्तर वर्षात चाललेले अखंड प्रयास अपेशी ठरून, माणूस अधिकाधिक दु:खीकष्टी कशाला होत गेला, त्याचेही रहस्य याच अनवधानात सामावलेले आहेत. प्रत्येक योजनेचे अपयश त्यातून शोधता व जोखता येऊ शकते. उदाहरण म्हणून आपण एकच योजना तपासूया.

मुंबईत माजलेल्या झोपडपट्ट्यांचा विकास करून गलिच्छ वस्त्या संपवण्याचा प्रयास चार दशकाहून अधिक काळ चालू आहे. त्यासाठी गृहनिर्माण मंडळ निघाले. पुनर्वसन योजना आल्या आणि तरीही अर्धाअधिक मुंबईकर उकिरड्यात जगताना दिसतो आहे. ऐंशी-शंभर चौरस फ़ुटांच्या आडोश्यात पाचसात जणांचे कुटुंब जगताना दिसते. कधी ती झोपडी असते तर कधी ती जुन्या मोडकळीस आलेल्या चाळीतली खोली असते. पण त्यांचे पुनर्वसन करताना मात्र त्या कुटुंबाला दोनशे तीनशे वा चारशे चौरस फ़ुट जागा मिळायलच हवी, अशी धोरणे व नियम करण्यातून पुनर्वसनालाच खोडा घातला गेला आहे. पुनर्वसन करताना या मुळच्या रहिवाश्यांचे अधिकार जपण्याच्या नावाखाली झालेल्या उलथापालथीने लक्षावधी लोक उकिरड्यात जगत आहेत. पुनर्वसनात आपल्याला इतके चौरस फ़ुट जागा मिळू शकते आणि अधिकच सौदेबाजी केल्यास शेसव्वाशे चौरस फ़ुट वाढवून मिळू शकते. त्याची बाजारू किंमत इतके लाख वा कोटीत आहे. या समजुतीने रहिवाश्यांना भारावून टाकलेले आहे. मग तशा मागण्या करणारे पुढे आले आणि उकिरड्यात आणखी दहावीस वर्षे कंठूनही कोट्याधीश होण्याचा मोह कोणाला आवरेनासा झाला आहे. योजना मुळात मोडकळीस आलेल्या इमारतीतील नागरिकांच्या पुनर्वसनाची व झोपडपट्टी निर्मूलनाची योजना होती. ती आता मुंबईसारख्या शहरात चाळकरी जीवन जगणार्‍यांसाठी जुगारी लॉटरी बनून गेलेली आहे. घर, निवारा, आडोसा ही कल्पनाच निकालात निघालेली असून, अमूक इतक्या लाख कोटीची मालमत्ता असे घराचे स्वरूप होऊन गेले आहे. तेच स्वप्न साकारण्यासाठी आयुष्यातील उमेदीची वर्षे उकिरड्यात खितपत पडण्यालाही लोक आनंदाने तयार झालेले आहेत. किंबहूना दु:खदैन्यालाच आनंद समजण्यापर्यंत आता अशा मोठ्या शहरातील गरीब येऊन पोहोचला आहे. त्याला तिथे कोणी आणून सोडले? कधीतरी त्याचा शोध वेध घेतला जाणार आहे काय?   (अपुर्ण)

अर्थपुर्ण   दिवाळी अंक २०१७ 

1 comment: