Saturday, November 11, 2017

अटेनबरोचा ‘गांधी’ आणि भन्साळीची ‘पद्मावती’ (पुर्वार्ध)

 attenborough gandhi के लिए चित्र परिणाम

१९८० साली इंदिराजी जनता दलाचा सफ़ाया करून पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या आणि त्यांनी देशाच्या राजधानी दिल्लीत एक मोठा शेतकरी मेळावा योजलेला होता. त्या निमीत्त देशाच्या कानाकोपर्‍यातून काही डझन रेल्वेगाड्या खास दिल्लीसाठी सोडण्यात आल्या होत्या. नेमका असाच हिवाळा होता आणि दैनिक ‘मराठा’तल्या आमच्या जुन्या गोतावळ्याची टोळी दिल्ली व उत्तर भारताची सफ़र करायला सहपरिवार निघालेली होती. कशीबशी आम्हाला राजधानीची तिकीटे मिळाली होती आणि ती गाडी पकडण्यासाठी आम्ही बॉम्बे सेन्ट्रल स्थानकावर पोहोचलो होतो. तिथे आधीच जादा गाड्यांसाठी कॉग्रेसी प्रवाश्यांची गर्दी झालेली होती आणि त्यातच नेहमीच्या गाड्यांचे प्रवासी आपापले सामान संभाळत गाड्या शोधत होते. त्या गर्दीत इतरही काही गोर्‍या लोकांची लुडबुड चाललेली होती. एक कोळश्याचे रेल्वे इंजिनही धडाडत होते. वास्तविक त्यापुर्वीच कोळश्याची इंजिने अशा मार्गावर वा मुंबईत थंडावलेली होती. मग हे इंजिन कुठून शोधून आणले व ते जादा गाड्यांसाठी आणले असावे काय, अशी माझ्या मनात शंका होती. मी कुतुहलाने तशी चौकशीही केली, तर कळले की ते जुने इंजिन चित्रपटाच्या शुटींगसाठी खास आणलेले होते. त्यामुळे एका फ़लाटावर ते इंजिन व गोर्‍या सावळ्या लोकांची धावपळ चाललेली होती. त्या चित्रपटाचे नाव होते ‘गांधी’. अर्थात अटेनबरोचा ‘गांधी’. त्याच्या पथकातले अनेकजण रेल्वे फ़लाटावर हमाल वा अन्य वर्दळ कशी असते, ते समजून घेत होते. चित्रणापुर्वीची सज्जता चाललेली होती. आमची गाडी सापडली आणि नंतरच्या सहलीत तो विषय कुठल्या कुठे विस्मरणात गेला. पुढे दोन वर्षांनी तो चित्रपट पडद्यावर झळकला आणि त्याला ऑस्कर वगैरेही मिळाली. आम्ही मित्रांनीही बघितला. आम्हाला सर्वांना तो अतिशय आवडला आणि जगभर त्याचे कौतुकही झाले.

पुन्हा मला कुतूहल होते. गांधी हा विषय नवा नव्हता. तसे गांधींवर अनेक माहितीपट निघालेले आहेत आणि भारतात तेव्हाच्या पिढीसाठीही गांधी हा चावून चोथा झालेला विषय होता. मग ह्या चित्रपटाला त्या पिढीने इतके डोक्यावर घेण्याचे कारण काय? कुणा भारतीयाने काढलेल्या माहितीपटापेक्षा अटेनबरोचा ‘गांधी’ थोडाही वेगळा नव्हता, किंवा त्याने त्यात कुठली मोठी कल्पनाशक्तीही लढवलेली नाही. जो गांधी लोकांच्या वाचनात व ऐकिवात होता, तसाच त्याने कथारूपाने सादर केलेला होता. मग किंचीतही नाविन्य नसताना त्याचे इतके कौतुक वा अप्रुप कशाला? चित्रपट हा माझा विषय नाही, म्हणूनच त्यात लिहीत असलेला व रस घेणारा माझा मित्र वसंत सोपारकरला (जो आज हयात नाही आणि हा लेख लिहीताना आज नेमका त्याचा सहावा स्मृतीदिन आहे) हाच प्रश्न विचारला. अटेनबरोच्या ‘गांधी’मध्ये भारावून टाकणारे असे काय आहे? त्याच्यावर जगभर उड्या का पडाव्यात? मनमोकळा हसून सोपारकर म्हणाला, विश्लेषक व चिकित्सक माणसाची हीच गोची असते. त्याला साधेसरळ रसग्रहण करता येत नाही. म्हणून त्याला सारही सापडत नाही. अटेनबरोचा गांधी वास्तवातला गांधी नाही, की इतिहासाने नोंदलेला गांधी नाही. अशा विविध स्वरूपात जसा गांधी मागल्या अर्धशतकात लोकांसमोर आला व त्याची जी प्रतिमा मनीमानसी खिळलेली आहे; त्याचे एकत्रित रुप म्हणजे अटेनबरोचा ‘गांधी’! तो पुर्ण वास्तविक वा ऐतिहासिक नाही. पण गांधी म्हणून एक प्रतिमा भारतीयांच्या मनात आहे. मग ते त्याचा तिरस्कार करणारे असोत किंवा गांधीभक्त असोत. त्यांच्या मनात गांधी नावाची एक गोष्ट ठसलेली आहे. पण ती गोष्ट कायम अमुर्त राहिली. ज्यांनी गांधी जवळून बघितला वा आधीच्या पिढीने गांधी अनुभवला, त्यांच्यापेक्षा १९८० ची पिढी एकदम वेगळी होती. त्यांच्यासाठी गांधी ही नुसतीच वेगवेगळ्या स्वरूपात ऐकलेली दंतकथा होती. त्याची गोळाबेरीज अटेनबरोने आपल्या चित्रणातून केली. त्यामुळे प्रत्येकाला त्याचा त्याचा जीवंत गांधी या चित्रपटात बघायला मिळतो. तो कुणाला उत्तेजित करीत नाही, डिवचत नाही; तर नुसता ओळखीचा वाटतो. काही व्यक्तीमत्वे अशी परिचयाची असतात वा दंतकथेसारखी मोठ्या लोकसंख्येच्या मनात कायमची रुजलेली असतात. त्यांचे चित्र साकार करताना काय करावे, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.   

आज सत्तर वर्षे उलटून गेल्यावरही गांधीभक्त व गोडसे समर्थक यांच्यात गांधी हत्येवरून झुंबड उडालेली आपण बघतो. पण अटेनबरोच्या चित्रपटात गोडसे पिस्तुल रोखून गांधीजींना गोळ्या झाडताना दाखवला आहे, म्हणून किती गदारोळ झाला होता? गोडसे समर्थकांनी आपल्या लाडक्याला खलनायक म्हणून रंगवल्याचा आक्षेप घेतला नाही, की चित्रपटाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला नव्हता. कारण तो चित्रपट बनवताना अटेनबरोने कुठल्याही ऐकीव वा प्रचलीत इतिहासाला धक्का लावण्याचा कुठलाही प्रयास केलेला नव्हता. आपल्या सर्जनशीलता वा कल्पकतेचा अविष्कार म्हणून कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्योग केला नव्हता. कुठलीही कला ही मानवी जीवनात आनंद घेऊन येणारी असते. ज्यातून हिंसेला वा विरोधाला जोश यावा, त्याला कला मानता येणार नाही. प्रामुख्याने जेव्हा एक मोठा जनसमुदाय एका ठराविक गोष्टीविषयी अभिमान वा गर्व बाळगत असेल, तर त्याच्या श्रद्धेला धक्का लावण्याच्या कृतीला कला मानता येत नाही. बाबरी मशिद पाडली जाण्यातही मग कला बघता येईल. कारण त्यामुळे कोणाच्या तरी भावना दुखावल्या गेल्या आहेत. किंबहूना कुठले मंदिर जमिनदोस्त करण्यामागेही तोच हेतू असतो. एखादी वास्तु पाडल्याने कोणाच्या जीवाला इजा केली जात नाही. पण त्या वास्तुशी संबंधित भावना गुंतलेल्या असतील, तर ती कला नव्हे हिंसा असते. वास्तु आणि जनसमुदायाच्या भावना, श्रद्धा या भिन्न नसतात. अशा भावना वा श्रद्धेतूनच वास्तु व इमारती उभ्या केल्या जात असतात. मंदिर वा मशिद हे नुसते बांधकाम असते. पण जेव्हा लाखो करोडो लोक त्या बांधकामाला श्रद्धास्थान मानु लागतात, तेव्हा ते नुसते बांधकाम उरत नाही. गांधी वा अन्य कुठल्याही ऐतिहासिक व्यक्तीमत्वाची तशीच गोष्ट असते. त्या व्यक्ती काही शतकांपुर्वीच्या असतात आणि त्यांच्याविषयी दंतकथा व आख्यायिका जनमानसातील त्यांच्या प्रतिमा प्रतिके बनलेल्या असतात. त्या गोष्टी अशा मोठ्या समुदायाच्या जगण्याचे आधारस्तंभ बनलेल्या असतात. त्या जगण्याच्या आधाराला धक्का बसत असेल, तर त्या जनसमुहाला जीवन उध्वस्त झाल्यासारखे दु:ख होत असते. त्यामुळे़च ती एकप्रकारची हिंसाच असते.

कोणाला हा युक्तीवाद किंवा तर्काचा अतिरेक वाटेल. भाबडेपणा वाटेल. पण हा नुसता भाबडेपणाचा विषय नाही. अगदी जे लोक स्वत:ला तर्कवादी बुद्धीमंत विचारवंत समजतात, त्यांनाही अशा श्रद्धांनी गुरफ़टून ठेवलेले असते. एखाद्या मंदिरात वा मशिदीत जाणार्‍या श्रद्धाळूप्रमाणे बुद्धीमानही आपल्या तर्क, समजुती वा भावनांशी तितकाच बांधिल असतो. तसे नसते तर भारतातले बुद्धीमंत पुरोगामी बाबरी पाडली गेल्याच्या जखमा अजून कशाला कुरवाळत बसले असते? एक जुनी नामशेष ओसाड पडलेली मशीद, पंचवीस वर्षापुर्वी पाडली गेली. तेव्हा तथाकथित हिंदूत्ववादी झुंडीला मुस्लिमांच्या भावनाच पायदळी तुडवायच्या होत्या. त्या धर्मभावनांची हिंसाच करायची होती. पण त्यात मुस्लिम श्रद्धाळू जितके दु;खीकष्टी झाले नाहीत, त्यापेक्षा अधिक वेदना धर्मनिरपेक्ष सेक्युलर म्हणवणार्‍या निधर्मी लोकांना झालेल्या आहेत. नास्तिक असूनही त्यांना मशिदीच्या पतनाने रडकुंडीला आणलेले आहे. याचा अर्थ त्यांना बाबरीविषयी वा इस्लामविषयी खास आत्मियता आहे, किंवा त्यांना इस्लामची तळी उचलून धरायची आहे, असा आजिबात होत नाही. बाबरी पाडली गेल्याने मुस्लिम दुखावणे स्वाभाविक आहे. पण नास्तिक निधर्मवादी लोकांचा जीव कशाला असा विव्हळतो आहे? ते एक जुने ओसाड बांधकाम होते, इतकी साधी समजूत ते आपल्या मनाची कशाला काढू शकलेले नाहीत? तर त्याचे उत्तर त्यांच्या मनात ठसून बसलेल्या पुरोगामीत्वात दडलेले आहे. आपला भारत देश सेक्युलर असून, इथले आपण हिंदू अन्य धर्मांची कदर करतो. अन्य धर्मियांनी कितीही अन्याय अत्याचार केले तरी आपण निमूट सोसतो, पण त्याचा प्रतिकार करत नाही. ही समजूत अशा नास्तिक सेक्युलरांची आता धर्मश्रद्धा झालेली आहे. ती त्यांनी साठसत्तर वर्षात इतकी उराशी कवटाळुन धरलेली आहे, की ती आता एकप्रकारे त्यांची धर्मश्रद्धा झालेली आहे. म्हणूनच मुस्लिमांपेक्षाही असे तर्कवादी व बुद्धीवादी विचलीत होऊन गेले. त्यांना मशिद पडल्याचे दु:ख अजिबात नाही. त्यांच्या मनातल्या धारणा वा समजूतींना त्या घडामोडीने जमिनदोस्त झाल्याचे दु:ख त्यांना सहन करता आलेले नाही.

समजूत, श्रद्धा, धारणा वा मनस्थिती या अशा गोष्टी असतात, की त्यांचा विवेकाने निचरा करता येत नाही. तशीच गांधी ही व्यक्ती नसते, ती एक श्रद्धा असते. राजपूतांच्या इतिहासात राणी पद्मीनी व तिच्यासह हजारो स्त्रियांनी अग्निकाष्ट भक्षण केलेला जोहार, ही श्रद्धा व जीवनाची आधारशीला असते. त्या श्रद्धेच्या आधारे जगणार्‍या लाखो राजपूतांना पद्मिनीचे गणगोत सांगता येणार नाही, की चितोडच्या इतिहासाचे बारकावे माहिती नसतात. तो इतिहास त्यांना जगण्यातल्या अनेक प्रश्न व समस्यांवर मात करायला हिंमत देत असतो. त्याला अभिमान म्हणतात. आपण राजपूत आहोत आणि आपल्या पुर्वजांनी इतके पराक्रम केले, तर इतकीशी समस्या आपल्याला कशी भेडसावू शकते? हा विचार त्यांच्या जगण्याला आधार देत असतो. जितक्या आस्थेने कुठलाही सेक्युलर पुरोगामी विचारवंत बाबरी मशिद पाडायला नको होती, असे ठामपणे तुम्हाला पटवू शक्तो; तितक्याच अगत्याने व हिरीरीने कुठलाही अभिमानी राजपूत पद्मिनीच्या समर्पणाचे महात्म्य तुम्हाला पटवू शकतो. कारण दोघांची श्रद्धा सारखीच असते. तिची विटंबना त्यांना सहन होत नाही. बाबरी पाडण्याची कृती वा गांधीहत्येचा येणारा राग आणि पद्मिनीच्या इतिहासाला काल्पनिक ठरवून चाललेला विरोध; यात तसूभर फ़रक नसतो. इतिहास हा भूतकाळ असतो आणि त्याकडे माघारी बघून पुढे चालता येणार नाही, असे अनेक विचारी लोक मोठ्या आवेशात तुम्हाला पटवून देतील. पण मग त्यांना तरी भूतकाळातून बाहेर पडता आलेले असते काय? गांधीहत्या विसरून जाऊ अणि एकविसाव्या शतकाकडे वर्तमान म्हणून बघू; असे म्हटले तर असे शहाणे गप्प बसू शकतील काय? ते गोडसेकडे पाठ फ़िरवू शकतील काय? अजिबात नाही. गोडसेचा भूतकाळ त्यांना हवासा असतो. कारण भूतकाळ विसरल्यास त्यांचा गांधी निकालात निघतो. पण तेच लोक पदमिनीचा विषय आला, मग भूतकाळात कितीकाळ रमणार असा प्रश्न तुम्हाला विचारू लागतील. हा एकूणच मानवी स्वभावातला विरोधाभास असतो. त्यात ज्याच्यापाशी युक्तीवाद करण्याची कुशलता असते, त्याला विचारवंत बुद्धीमंत म्हटले जाते इतकेच. बाकी कोणी सामान्य बुद्धीच्या माणसापेक्षा शहाणे फ़ारसे समतोल नसतात.  (अपुर्ण)

3 comments:

  1. भाऊ जबरदस्त... एकदम सही.. क्या मारा है...
    सिनेमा या तरुण पिढीवर अत्यंत महत्वाचे संस्कार करत असतात..
    आपले याबद्दल ची उदाहरणे एकदम चपखल आहेत व काळाच्या परिसावर परखलेली आहेत..
    आपण उल्लेख केलेल्या पुढची पिढीतील काहींनी मनोज कुमार चे शेवट शेवटचे काही चित्रपट व अमिताभ चे अँग्री यंग मॅनचे चित्रपट यामुळे एका बाजुने देशप्रेम व दुसर्या बाजुने अत्यंत प्रतीकुल परिस्थितीत कशी फाईट द्यायची व पुरुर्षार्थ गाजवायचा अन्याया विरुध्द लढा द्यायचा हे शिकवले.. हे 1987 पर्यंत चालले.. पुढे अमिर खानच्या कयामतसे कयामत पासुन देशासाठी नाही तर आपल्या प्रियसी साठी कसा जिव द्यायचा हे शिकवले.. संस्कार केले.. पुढे पुढे ते आणखीनच वाढत गेले..
    काय विचीत्र आहे बघा हाच अमिर आता सत्यमेव जयते म्हणत / शेतात बंधारे घालण्याचे शिकवतोय.. जणु याला गेल्या 20 आणि युपीए च्या 10 वर्षांत ही बुद्धी का झाली नाही? का फडणीस सरकारचे यातील प्रयत्नांना कमी करण्यासाठी कुणी सुपारी दिली आहे सामान्यांना समजत नाही... मिडियावाले याला कव्हरेज देतात... किती घट्ट आणि दुरगामी विचार करून रणनीती आखली जाते आहे नाही.. या गोष्टी दिसायला सरळ दिसतात परंतु याची शंका ना देशवासियांना (लाॅजवासियांना) येते ना बुद्धीवंत पुरोगामी ना येते...
    तसेच मागील पीढी खुशाल राजकारण्यांवर देश सोपऊन अपला स्वार्थ, कुटुंब, दिलीप कुमार, राजकपुर, लता, पुलं, वपु, भिमसेनजी, बालगंधर्व, सुधिर फडके यांच्यात नुसतीच मश्गुल राहिली.. नाही तर राजकारण म्हणजे गजकर्ण हे बोलुन देशाचे वाटोळे होऊ दिले.. आज हि ठणठणीत प्रक्रुतीचे रिटायर्ड तरुण मस्त बेफिकिरीने फिरतात तर नातवंडं साभाळत टिव्ही सिरियल मॅच बघत देशाटन करत फिरतात.. यांचा कसा देश सेवे साठी देशातील अशिक्षीत जनतेच्या पुढील पिढीवर संस्कार करण्यासाठी, नागरि /खेड्यातील समाजासाठी उपयोग ( कम्पलसरी करुन) घेता येईल.. व हे अमिर अमिताभ लता, साठे, इत्यादी च्या मदतीने करता येईल का? यातील ठणठणीत सिनियर सिटिझनना विविध कस्नसेशन फायदे देण्या पुर्वी नियमित (फ्रिलान्सिंग) काही सामाजिक देशकार्य करणे कम्पलसरी करणे आवश्यक आहे..
    भाऊ आपल्या लेखातील अनेक वाक्ये अनेक सामाजिक, देशाच्या व कुटुंबाच्या समस्यांची उकल व ऊपाय करणारी असतात.. अशा वाक्यांचा एक अल्बम केला तर तो निश्र्चीतच एक दिपस्तंभ होईल... धन्यवाद
    एकेएस

    ReplyDelete
  2. श्री भाऊ तोरसेकर, राष्ट्र हे भावनांवर चालवणे योग्य नाही. गोष्टी सुरळीत चालाव्यात यासाठी लोकशाहीमध्ये काही संस्था तयार केल्या आहेत. त्या संस्थांनी तथ्यांना तपासून निर्णय देणे अपेक्षित असते आणि त्या संस्था ते कार्य योग्य रीतीने करतात. जर एखादी गोष्ट त्या संस्थेच्या पुढे नाही आली, तर ती आणून दिल्यावर संस्था आपला निर्णय बदलतात. बाबरी मशिदी ला सन्माननीय न्यायालयाने संरक्षण द्यावे असे सांगून सुद्धा उत्तरप्रदेश सरकारने ते दिले नव्हते. हि चुकीची गोष्ट होती, प्रश्न पडक्या मशिदीचा नव्हता. न्यायालयाचा निर्णय न जुमानण्याच्या बेमुर्वतखोरपणाचा होता, त्यामुळे तो प्रश्न विचारणे आणि अश्या वृत्तीला विरोध करणेही गरजेचे होते आणि आताही आहे. त्याचप्रमाणे, सेन्सॉर बोर्ड ने चित्रपट संमत केला कि त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणे चुकीचे आहे. "पद्मावती" अजून सेन्सॉर संमत नाहीये, सेन्सॉर बोर्ड ला तुमचा श्रद्धांचा सिद्धांत द्यायला अजूनही तुम्हाला वेळ आहे. उगाच श्रद्धांच्या आधारावर भावना भडकावणे चुकीचे आहे. - निखिल लावंड

    ReplyDelete