राहुल गांधी यांनी आपली सर्व शक्ती गुजरातमध्ये पणाला लावली आहे. अनेकांना तरीही गुजरातमध्ये मोदी भाजपाचा पराभव अशक्य वाटतो आहे. तेही खरेच आहे. कारण गुजरात हा मोदींचा बालेकिल्ला असून तिथेच पाय जमवून त्यांनी दिल्लीचे तख्त काबीज केलेले आहे. पण म्हणून तिथे भाजपाला सहजासहजी निवडणूका जिंकू देणे, हे राजकारण असू शकत नाही. कुठल्याही सामन्यात उडी घेतलेला खेळाडू वा संघ, कधी निकालापुर्वीच हार मान्य करीत नसतो. तसे करण्याला अर्थही नसतो. मग दुबळ्या संघाच्या कर्णधारालाही जोशपुर्ण बोलावेच लागते. अन्यथा त्याच्या सहकारी व अनुयायांना लढायचे बळ कुठून येणार? सहाजिकच गुजरातमध्ये राहुलनी आघाडी उघडली हे योग्यच आहे. पण त्याहीपेक्षा राहुलनी खेळलेला खरा डावपेच अजून भाजपाच्या लक्षात आलेला दिसत नाही, की माध्यमातील राजकीय पंडितांनी ओळखलेला दिसला नाही. कारण त्याची कोणी चर्चाही करत नाही. गुजरातच्या आधी आणखी एका राज्यात निवडणुका व्हायच्या असून, येत्या गुरूवारी तिथे मतदान एकाच दिवसात पुर्ण व्हायचे आहे. मंगळवारी तिथला प्रचार संपणार आहे. पण अजून तरी राहुल गांधी तिथे प्रचाराला फ़िरकलेले नाहीत. याचा अर्थ कसा लावायचा? की कोणाला त्या राज्यात कोण जिंकतो, हरतो याची फ़िकीरच नाही? किंवा तिथे असलेली कॉग्रेसची सत्ता टिकणार याविषयी राहुलना पुर्ण आत्मविश्वास आहे? आपले तिथले नेते प्रचार संभाळू शकतात आणि आपण तिथे लुडबुडण्याची गरज नाही, असे राहुलचे मत आहे काय? कोणी त्याविषयी बोलत नाही किंवा त्याची चर्चाही होत नाही,. हाच तर खराखुरा डावपेच आहे. राहुलनितीच्या अनुसार कॉग्रेसला हिमाचल विनासायास जिंकायचा आहे आणि तो कसा जिंकणार, ते भाजपाच्या चाणक्यांना अजून लक्षातही आलेले नाही. मग काय आहे राहुलनितीचा हिमाचली डावपेच?
राहुल राजकारणात आल्यापासूनचा इतिहास एक सांगतो, की जिथे राहुलनी प्रचारात पुढाकार घेतला नाही, तिथे त्यांच्या पक्षाने चांगले वा दैदिप्यमान यश मिळवले आहे. अगदी अलिकडल्या काळात पंजाब हे दणदणित उदाहरण आहे. अमरींदर सिंग यांनी पंजाब जिंकण्यासाठी प्रशांत किशोर या रणनितीकाराला आमंत्रित केले आणि त्याच्यावर निवडणूकांचे डावपेच योजण्याची कामगिरी सोपवली. तर राहुलनीही त्यालाच उत्तरप्रदेशचेही काम सोपवले. त्याला पंजाबात जायला वेळच मिळू दिला नाही. पंजाबमध्ये राहुल गांधीही फ़ारसे फ़िरकले नाहीत. तो किल्ला त्यांनी एकहाती अमरींदरसिंग यांना लढायला सोपावला आणि भाजपासह आम आदमी पक्षाला धुळ चारून कॉग्रेस तिथे जिंकली. याला म्हणतात डावपेच! त्या निवडणूकीचे वेध लागल्यापासून पंजाबात आम आदमी पक्ष बहूमताने जिंकणार असे मतचा़चण्यांचे अहवाल आलेले होते आणि दिल्लीकडे पाठ फ़िरवून केजरीवाल आपला सगळा वेळ पंजाबात तळ ठोकून बसलेले होते. बिचारे अमरींदरसिंग एकाकी लढत होते आणि त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवारही घोषित करण्यात राहुलनी टाळाटाळ चालविली होती. स्वत: राहुल तिकडे फ़िरकत नव्हते, हाच त्यातला डावपेच होता. कारण राहुलनी पक्षाच्या प्रचाराची धुरा संभाळणे म्हणजे अन्य प्रतिस्पर्ध्याला शुभेच्छा असतात. हे मागल्या चारपाच वर्षात सिद्ध झालेले आहे. म्हणूनच हिमाचलकडे राहुलनी पाठ फ़िरवणे, हा भाजपाला अपशकून ठरण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक हातात असलेली हिमाचलची सत्ता टिकवण्याला कॉग्रेस व राहुलनी प्राधान्य द्यायला हवे होते. त्यापेक्षा गुजरातची निवडणूक अधिक कष्टाचा मामला आहे. पण राहुलनी आपला सर्व वेळ गुजरातला दिला. कारण त्यांना हिमाचल गमवायचा नाही. राहुलच्या तिकडे न जाण्याने हिमाचल जिंकणे शक्य असेल, तर त्याला डावपेच नाही तर काय म्हणायचे?
यात डावपेच कुठला? असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. डाव असा, की मोदींच्या बालेकिल्ल्याला वेढा दिल्याने सगळ्यांचे लक्ष गुजरातकडे वळते आणि हिमाचल बाबतीत सर्वांचेच दुर्लक्ष होते. सहाजिकच कोणी हिमाचलची चर्चा करीत नाही, की राहुल तिकडे फ़िरकले नाहीत, यावर बोलणे होत नाही. पण आपल्या अनुपस्थितीने राहुल गांधी पक्षाच्या विजयाची शक्यता वाढवतात. म्हणून त्याला डावपेच म्हटले पाहिजे. हेच बिहारमध्येही झालेले होते. राहुलना महागठबंधन मान्य नव्हते. तर सोनिया गांधींनी त्यांना बाजूला ठेवून नितीश लालूंशी बोलणी केली होती आणि महागठबंधनाच्या प्रचारापासून राहुल अगदी वेगळे अलिप्त राहिले होते. त्यांनी कॉग्रेसचे मोजके उमेदवार सोडल्यास अन्य महागठबंधन पक्षांचा वा उमेदवारांचा प्रचारही केला नव्हता. काय निकाल लागले होते बिहारचे? मोदी-शहा जोडगोळीला तिथे महागठबंधनाने धुळ चारली होती ना? याला म्हणतात डावपेच! राहुलनी अलिप्त राहुन कॉग्रेस वा मोदी विरोधी पक्षांच्या विजयाला जितका हातभार लावला आहे, तितका त्यांचा सहभाग घातक ठरला आहे. नेमका तोच डाव त्यांनी आता हिमाचलच्या बाबतीत खेळलेला नाही काय? तिथल्या निवडणूकीची घोषणा सर्वात आधी होऊनही राहुल तिकडे गेले नाहीत, की प्रचार संपत आला तरी तिकडे जाणे टाळलेले आहे. त्याकडे कुणाचे लक्ष जाऊ नये, म्हणून गुजरातमध्ये रणधुमाळी उडवून दिलेली आहे. त्यामुळे वीरभद्रसिंग किती खुश असतील ना? मतचाचण्यांचे आकडे काहीही असोत, वीरभद्रसिंग यांचा आत्मविश्वास मोठा आहे. राहुल आपल्या राज्यात फ़िरकले नाहीत, म्हणून आत्मविश्वास अधिकच वाढलेला आहे. कोणा कॉग्रेसवाल्यानेही राहुलना त्या राज्यात येण्याचा व प्रचार करण्याचा आग्रह धरलेला नाही. ह्यातला डावपेच कुणा राजकीय विश्लेषकाच्याही लक्षात आलेला नाही. मग तिथे काय निकाल लागतील?
उलट स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. त्यांना गुजरातसोबतच हिमाचलमध्ये धावपळ करावी लागते आहे. आतापर्यंत दोनतीन मोठ्या सभा मोदींनी हिमाचलमध्येच घेतल्या आहेत. त्यातील अस्वस्थता साफ़ होऊन जाते. राहुलची हिमाचल प्रदेशातील रणनिती बहुधा एकट्या मोदींनीच ओळखलेली असावी. अन्यथा त्यांनी या इवल्या राज्यात दोनतीन सभा कशाला घेतल्या असत्या? चाचण्या प्रचंड यश सांगत असताना मोदी हिमाचलला धावतात, तो त्यांचा गमावलेला आत्मविश्वासच आहे. उलट राहुलचा आत्मविश्वास किती भक्कम आहे. प्रचार संपत आला तरी त्यांनी हिमाचलकडे मोर्चा वळवलेला नाही. आता तर प्रचाराची मुदतही संपत आलेली आहे. त्यामुळे त्या राज्यातूल कॉग्रेसच्या ‘दिग्विजयाचा’ मार्ग खुला झाला, असे मानायला अजिबात हरकत नसावी. गुजरातचे काय व्हायचे ते होवो, पण हिमाचलमध्ये कॉग्रेस मोदींना पराभवाची चव चाखवणार, याविषयी निश्चींत रहायला हरकत नसावी. राहुलच्या या रणनितीने पंतप्रधान मोदी किती हादरून गेलेत, त्याची प्रचिती त्यांच्या कर्नाटकच्या दौर्याने आली. अजून त्या विधानसभेच्या निवडणूकांना सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पण कालपरवाच मोदींनी तिथेही आतापासून प्रचारसभेचा मुहूर्त केला आहे. न जाणो उद्या राहुलनी कर्नाटककडेही पाठ फ़िरवली, तर तेही राज्य कॉग्रेसच्याच कब्जात राहिल. म्हणून मोदी आतापासून भयभीत झालेले आहेत. असे डावपेच राहुल खेळत राहिले, तर मोदींना पराभूत करणे व केंद्रातील भाजपाची सत्ता उलथून पाडण्याला वेळ लागणार नाही. आता प्रतिक्षा १८ डिसेंबरची आहे. त्याच दिवशी गुजरात व हिमाचलची मतमोजणी व्हायची आहे. त्यानंतर राहुल कॉग्रेसचे अध्यक्ष होतील आणि पुढल्या काळात मोदी व भाजपाला उतरती कळा लागलेली बघायचे ‘अच्छे दिन’ अनेकांना येतील.
Surgical Strike of Congress and Rahul Gandhi on BJP, Central Government & Prime Minister Narendraji Modi.
ReplyDeleteThe result of Himachal Pradesh Vidhanshabha shows how great is Rahul Gandhi.
मस्त उपहास
ReplyDeleteCongressmen happy, Bjp in Panic. Sarcasm @it's Best Bhau!!
ReplyDelete