जगात मुक्त अर्थव्यवस्था येऊन आता पाव शतकाचा कालावधी उलटून गेला आहे. १९९१ सालात राजीव गांधी यांची ऐन लोकसभा निवडणूकीत हत्या झाल्यामुळे नरसिंहराव यांच्याकडे कॉग्रेसचे नेतृत्व आले आणि कॉग्रेसला बहूमत मिळालेले नसतानाही त्यांना अल्पमताचे सरकार स्थापन करावे लागलेले होते. अशा स्थितीत त्यांनी मनमोहन सिंग या अर्थशास्त्रातल्या नोकरशहाला सरकारमध्ये आणले. त्यांच्याकडे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचे काम सोपवले होते. त्याचवेळी जगभर आर्थिक सुधारणांचे युग अवतरले होते आणि त्यापासून अलिप्त रहाणे भारताला शक्य नव्हते. गॅट करार व जागतिकीकरणाचे वारे जोरात वाहू लागलेले होते. भारताचे राखीव सोनेही गहाण पडालेले होते, अशा स्थितीत ह्या सुधारणा आल्या आणि पुढल्या काळात देश वा त्यांच्या भौगोलिक सीमा पुसट होत जाणार असे सांगितले जात होते. एकूणच जग जवळ आले आणि आता पृथ्वीला ग्लोबल व्हिलेज असे संबोधन लावले जाऊ लागले होते. मात्र इतकी वर्षे त्याला उलटून गेली असली आणि जागतिक अर्थकारणात भौगोलिक सीमा बाजूला पडल्या असल्या, तरी राजकीय व प्रसासकीय बाबतीत भुगोल कायम आहे. प्रत्येक देश अस्तीत्वात असून भौगोलिक अस्मितांच्या आधारे लढायाही चालू आहेत व हेवेदावेही कायम आहेत. थोडक्यात राजकीय प्रशासकीय बाबतीत जग अजून विसाव्या शतकातच असले, तरी इंटरनेट वा सोशल मीडियाच्या माध्यमातून या सीमा पुसट होऊन गेल्या आहेत. जगाच्या कानाकोपर्यात कोणीही कोणाशीही थेट संपर्क साधण्याची सोपी व स्वस्त सेवा सामान्य माणसाला उपलब्ध झाली असून त्यातून अवघे जग हे एक गाव होऊन गेले आहे. त्याचा एकमेव पुरावा म्हणजे सोशल मीडिया नावाचा एक जगाला व्यापून उरणारा चव्हाटा होय. तो ग्लोबल व्हिलेज अस्तित्वात आल्याचा सज्जड पुरावा आहे.
तसे बघायला गेल्यास इंटरनेट या माध्यमातून ज्ञानाची अनेक दारे कोणालाही खुली झाली आहेत आणि जसजसे दिवस पुढे सरकत गेले, तशी ती सुविधा सामान्य म्हणू अशा कोणालाही उपलब्ध झालेली आहे. भारतातल्या दुर्गम खेड्यातला माणूस आता या सुविधेतून अत्याधुनिक अमेरिकेतल्या कोणाशी संपर्क करू शकतो. किंवा संवादही साधू शकत असतो. आपापल्या पद्धतीने लोक त्याचा सरसकट वापर करू लागलेले आहेत. पण स्वभावानुसार त्याही सुविधेचा चव्हाटा होऊन गेला आहे. हार्दिक पटेल वा अन्य कोणाच्या भानगडी सहजपणे य माध्यमात चघळल्या जातात. त्यावरून तावातावाने वादविवाद रंगवले जातात. ते पुर्वी कुठल्याही गावातल्या चव्हाट्यावर होताना दिसायचे ऐकू यायचे. अशा चव्हाट्यावर प्रामुख्याने उखाळ्यापाखाळ्याच अधिक काढल्या जायच्या आणि आता तेच जागतिक पातळीवर राजरोस चालू असते. हार्दिक पटेलच्या सीडी वा युट्युबवरील भानगडीची मजा घेण्यामागची वृत्ती, तशीच चकाट्या पिटणार्या गावकर्यांची नाही काय? फ़रक इतकच, की आजकाल एकाच गावाच्या नाक्यावर किंवा चव्हाट्यावर एकत्र येण्याची गरज राहिलेली नाही. एका गावातल्या पारावर बसून हजारो मैल दूरच्या कोणालाही अन्य कोणा परिचित व्यक्तीच्या भानगडी वा कुलंगडी सांगता येतात. त्यावर रसभरीत चर्चा करत येते, अफ़वा पसरवता येतात. वावड्या उडवून धमाल करता येते. इतके करूनही आपण नामानिराळे राहू शकतो. थोडक्यात अशा अर्थाने आता पाव शतकानंतर जगाचे ग्लोबल व्हिलेज आपण करून टाकलेले आहे. जे जगभरच्या नेत्यांना मागल्या पंचवीस वर्षात ठरवून करता आले नाही, ते सामान्य माणसाने आपल्या हाती सुविधा व यंत्रणा येताच करून दाखवलेले आहे. अर्थात एकदा चव्हाटा लांबरुंद वा जागतिक झाला मग त्यातून होणारा बोभाटाही तितकाच सर्वव्यापी होणार ना?
आता यातली गंमत बघा. निवडणूका चालू आहेत गुजरातमध्ये आणि त्याचा गदारोळ जगभर चालू आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीला गुजरातमध्ये जाण्याची गरज राहिलेली नाही. अमेरिकेत वा रशियात बसूनही असा कोणी माणूस, गुजरात वा तिथल्या हार्दिकच्या भानगडीत आंबटशौकी उखाळ्यापाखाळ्या करू शकत असतो. अर्थात गावाचा चव्हाटा जसा एकत्र येऊन काही समाजहिताचे काम करावे, चर्चा करावी यासाठी होता, तसाच सोशल माध्यमांच्या निर्मितीमागचा हेतू चांगला होता. पण कुठलीही सुविधा निर्माण करणार्याचा हेतू वापरणार्याला मान्य असतो असे अजिबात नाही. ती वस्तु वा साधन आपल्या हाती आले, मग माणूस आपल्याच मनानुसार त्याचा बेछूट वापर करीत असतो. सोशल माध्यमांचे तेच झाले आहे. ज्याच्या हाती ही सुविधा आलेली आहे, त्याने आपल्या मतानुसार वा इच्छेनुसार त्याचा बेछूट वापर चालविला आहे. त्यामुळे आता सुशिक्षित गावकरी व चाळकरी जगभर तयार झाले आहेत. फ़ेसबुक ट्वीटर वा व्हाटसप अशा साधनांनी मस्तपैकी चहाड्या वा चोंबडेपणा आपण सहजगत्या उजळमाथ्याने करीत असतो. शिवाय यात समोर व्यक्ती म्हणून उभे रहायचे नसल्याने तोतयेगिरीही करण्याची पुर्ण मोकळीक असते. मग काय, गावातल्या वा चव्हाट्यावरच्या चकाट्या परवडल्या; इतक्या थरालाही गोष्टी जात असतात. आपल्याला हवे त्याला बदनाम करता येते, किंवा सूडबुद्धीने अपप्रचारही करण्याची सोय मिळालेली आहे. राईचा पर्वत करण्याची इतरही साधने त्याला जोडलेली असतातच, इवल्याश्या फ़ोनमध्ये छुपा कॅमेरा आणि फ़ोटोशॉपसारखे सॉफ़्टवेअर असल्यावर आणखी काय हवे? आपण आपापले भलेबुरे हेतू साधण्यासाठी सोशल मीडियाचा पार चव्हाटा करून टाकलेला आहे. रोज उठून रिकामटेकडे लोक इतरांना अभिवादन करण्यापेक्षा डिवचण्यासाठीच हजेरी लावत असतात.
जगातल्या लोकांची अनेक गटात विभागणी झालेली आहे. त्यांचे आपापले गटतट आहेत आणि त्यात मग समुहाने परस्परांवर टिकाटिप्पणी चालू असते. त्यातून संवाद साधला जावा ही मुळातली अपेक्षा बाजूला पडलेली असून, एकमेकांवर कुरघोडी करणारे आरोप वा शिव्याशापही चाललेले असतात. आपले विचार वा भूमिका मान्य नसलेल्या अन्य कोणाला कसे दुखवायचे, यासाठी बुद्धी पणाला लावली जात असते. एकमेकांना अपमानास्पद वाटावी अशी बिरूदे लावली जातात. हेटाळणीयुक्त त्यांचा सातत्याने वापर चाललेला असतो. जगातली कुठलीही घटना घडलेली असो किंवा कुणा ख्यातनाम व्यक्तीने कुठल्याही विषयावर मतप्रदर्शन केलेले असो, त्याचे समर्थक व विरोधक यांच्यात त्यावरून खडाजंगी होत असते. एक बाजू समर्थपणे त्याचा बचाव मांडत असते तर दुसरी बाजू तितक्याच हिरीरीने त्याला खच्ची करायला तुटून पडलेली दिसेल. त्यामुळे मधल्या मध्ये काही समजूतदारपणा करू इच्छिणार्यांची मात्र तारांबळ उडालेली असते. दुर्दैवाची गोष्ट अशी, की या विभागणीमध्ये आपले काही मत वा विवेक वापरण्याची जागाच उरलेली नाही. एक बाजू घ्या नाहीतर तुमची गणना थेट शत्रू गोटात होत असते. आपली बाजू कायम बरोबर असते आणि समोरच्यांना काहीही अक्कल नसते; याचा निर्वाळा कुठल्याही विषयात तितक्याच आग्रहाने दिला जात असतो. त्यातून मग असे गटबाज अधिक केविलवाणे दिसू लागतात. त्यांच्या बुद्धीलाही न पटलेले युक्तीवाद करण्याची नामुष्की त्यांच्यावर येत असते. आवडलेले असले तरी ते बोलण्याची लिहीण्याची हिंमत त्यांच्यात उरलेली नाही. हळूहळू या चव्हाट्यावर मग आपापल्या कळपांचे कोपरे अड्डे तयार झालेले आहेत. एका कळपातल्या पशूंनी दुसर्या कळपावर तुटून पडल्यासारखे शब्द वापरले जातात आणि आपलीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली जात असते.
कुठल्याही संवादात समोरचा काही सांगत असेल तर ते समजून घेण्याचा संयम आवश्यक असतो. त्याचाच दुष्काळ अशा सोशल माध्यमात जाणवू लागला आहे. आपले तेच खरे करताना चुकीचे मुद्दे उपस्थित करून वाद उकरून काढला जातो. यात थक्क करणारी गोष्ट अशी, की जर तुम्हाला अमूक एका भूमिकेपलिकडे काही ऐकायचे नाही वा वाचायचेच नसेल, तर तशा लिखाण वा विषयाकडे वळण्याची कोणी सक्ती केलेली नाही. तुमच्या आवडीचे लिहीणारे वा तशाच भूमिकेला चिकटून बसणारेही अनेक लेखक मित्र असतात. त्याच गोतावळ्यात रममाण होऊन जावे. बाकीच्या जगाकडे ढुंकून बघण्याची गरज नाही. पण तसेही होत नाही. समोरचा काय म्हणतोय वा समजावू बघतोय, त्याकडे साफ़ पाठ फ़िरवून, कुठल्याही विषयावर मुद्दे सोडून हुज्जतही घातली जात असते. एकूण काय तर सोशल मीडियाने खरोखरच अवघ्या पृथ्वीतलाला एक अगडबंब गावठाण करून टाकलेले आहे. त्या अराजकात कोण कोणाशी काय बोलतोय व कोणाला काय सांगायचे आहे, तेही विरून जाते. अर्थात मोठ्या संख्येने काहीतरी समजून घ्यायला, शिकून घ्यायला व सांगायलाही लोक या चव्हाट्यावर येत असतात. ते आपला दुरचा कोपरा पकडून कोलाहलापासून अलिप्त आपला आनंदही लुटत असतात. अशा लोकांचा मग गटबाजीत रमलेल्यांना हेवा वाटतो. त्यांच्या संवादात घुसून धुमाकुळ घालणारेही महाभाग असतातच. पण कितीही विक्षितपणा असला वा गैरलागू फ़ायदा घेतला जात असला, तरी या माध्यमांनी जग खरोखर जवळ आणले आणि जोडले हे मान्यच करावे लागेल. महापूरात खुप पालापाचोळाही वाहून येत असतो. प्रवाह स्थिरावून मग पाणी स्वच्छ व नितळ व्हायला थोडा वेळ लागणारच. हळुहळू हेही माध्यम या अराजकातून बाहेर पडेल, असे मानायला हरकत नाही. तेव्हा मग खर्या अर्थाने चव्हाट्यावर प्रबोधनात्मक व हितोपयोगी काही घडायला वेग येऊ शकेल.
No comments:
Post a Comment