Thursday, November 2, 2017

झुठाही सही

rahul gandhi selfie के लिए चित्र परिणाम

१९७० च्या दशकात थोराड देवानंद आणि नवखी हेमा मालिनी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘जॉनी मेरा नाम’ असा एक चित्रपट आला होता आणि खुप चालला होता. त्यातले एक गीत खुप गाजले होते. ‘पलभर के लिये कोई हमे प्यार करले, झुठाही सही’. असा त्याचा मुखडा होता आणि किशोरकुमारनेही छान गायले होते. आजकाल फ़ेसबुकच्या जमान्यात सोशल मीडियात वावरणार्‍यांना त्याचा वारंवार अनुभव येत असतो. तिथे आपण काही टाकावे, लिहावे आणि मग विविध प्रतिक्रीय़ा येत असतात. त्यातल्या काही चांगल्या असतात, काही टोकाच्या विरुद्ध असतात. मागल्या आठवड्यात ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका भागात अमिताभ बच्चननेही त्याचीच साक्ष दिली होती. बहुत गालिया खानी पडती है, असेही त्याने सांगितले. पण त्याकडे दुर्लक्ष करून आपले मत प्रदर्शित करावे, अशीही पुस्ती त्याने जोडलेली होती. त्यावरूनच हे देवानंदच्या चित्रपटातले जुने गाणे आठवले. सोशल मीडियात वावरणार्‍यांना इतरांनी काय लिहीले आहे वा म्हटले आहे, ते वाचण्याची कोणी सक्ती केलेली नसते. म्हणूनच एखादी व्यक्ती काय लिहीत असेल, त्याकडे पाठ फ़िरवून विषय निकालात निघू शकत असतो. प्रामुख्याने कोणी सातत्याने आपल्याला नावडतेच म्हणत असेल, तर त्यापासून दुर रहाण्यातच शहाणपणा असतो. पण तसे सहसा होत नाही. जे कोणी अशा माध्यमात वावरत असतात, त्यांना इतरांचे काही समजून घेण्यापेक्षा वा वाचण्यापेक्षाही, त्याने आपल्याला हवे तसेच लिहावे, असे आग्रहाने वाटत असते. म्हणून मग असे लोक कारण नसताना त्या दुसर्‍याच्या खात्यात जाऊन उचापती करीत असतात. विरोधातल्या प्रतिक्रीया नोंदवत असतात. त्याचा त्यांनाच अधिक मनस्ताप होत असतो आणि अनेकदा शिवीगाळीपर्यंत मजल जाते. अशांच्या या उचापती कशासाठी असतात? त्यांना त्यातून काय मिळत असते?

एक गोष्ट साफ़ आहे. त्यांना जितका अशा लिखाणाचा वा विधान मतांचा राग येत असतो, तितकेच त्या लिखाणाविषयी आकर्षणही असते. प्रामुख्याने यात पंतप्रधान मोदींच्या बाजूने लिहीणार्‍यांना लक्ष्य केले जात असते. दुसरीकडे मोदी विरोधात लिहीणार्‍यांनाही तसेच लक्ष्य केले जात असते. या दोन्ही बाजूचे आक्रमक लोक कुठले काही वाचण्यात रस घेत नसतात. त्यांना आपल्या मतावर शिकामोर्तब करणारा मजकूर हवा असतो आणि अधिकाधिक लोकांनी त्यांच्या मनातल्या गोष्टींना दुजोरा देणारे काही लिहीले, मग त्यांना तरतरी येत असते. मग वास्तवात तसे काही घडलेले असो किंवा घडणार नसो. त्यांना आपणच खरे असल्याचा खोटा दिलासा हवासा वाटत असतो. खोटे का असेना, पण एकदा तरी मोदी चुकले म्हणा. एकदा तरी राहुल गांधी जिंकणार म्हणावे, यासाठी यातले बहुतांश आग्रही असतात. म्हणूनच मग मतचाचण्यात मोदी जिंकण्याची आकडेवारी आली, की असे लोक संतप्त होऊन चाचणीकर्त्यांना पगारी भाट म्हणू लागतात. किंवा राहुलच्या नसलेल्या मर्दुमकीचेही हवाले देऊ लागतात. लागोपाठच्या निवडणूकीत राहुलनी कॉग्रेसचा सत्यानाश केलेला असला, तरी तोच कॉग्रेसचे पुनरूज्जीवन करणार, असा त्यांचा आग्रह असतो. मात्र तेवढ्यासाठी असे आग्रही लोक कॉग्रेसवाले आहेत असेही मानायचे कारण नाही. त्यांना राहुल वा कॉग्रेस पक्षाशी काहीही कर्तव्य नसते. त्यापेक्षा असे लोक मोदी विरोधाने प्रवृत्त झालेले असतात. सहाजिकच मोदींना कोणी हरवू शकतो, या कल्पनेने त्यांच्या अंगावर रोमांच उभे रहात असतात. विषय तिथेच संपत नाही. आजवर ज्या विश्लेषकांचे मत खरे ठरलेले आहे, किंवा ज्यांच्या मतचाचण्या नेमक्या निघाल्या आहेत, अशा कोणी तरी मोदी हरण्याचा हवाला द्यावा; अशी या लोकांची आगतिक आकांक्षा असते. ते होत नाही, म्हणून तसे लोक शिवीगाळीपर्यंतही येतात.

उद्या गुजरातचा निकाल कसाही लागो, किंवा तिथे भाजपाला अफ़ाट बहूमत मिळो, या लोकांना त्याची अजिबात फ़िकीर नसते. उत्तरप्रदेशात तेच झालेले होते. मतदान होण्यापुर्वीच अखिलेश व राहुल यांच्या एकत्र येण्याने मोदी व भाजपाची कशी तारांबळ उडालेली आहे; त्याच्या बातम्या व विश्लेषणे वाचून असे लोक कमालीचे सुखावले होते. तशा चाचण्यांनाही त्यांनी उत्तम प्रतिसाद दिलेला होता. पण मग मतमोजणी झाली आणि त्यांचा सुखवटा भंगला. कारण नुसते मोदी जिंकलेले नव्हते त्यांनी अन्य पक्षांचा पुरता धुव्वा उडवलेला होता. सहाजिकच त्यांना मोदींनी काही गफ़लत केली वा मतदान यंत्रात गफ़लत होती, असेच काही ऐकायचेच होते. मायावतींनी त्यांची इच्छा पुर्ण केली आणि मग महिनाभर तरी मतदान यंत्रावर शंका कुशंका घेण्याचा खेळ चालू राहिला. अर्थात हे आजचे नाटक नाही. स्वातंत्रोत्तर कालखंडातही मतपेट्या पळवल्या वा मतपत्रिका बदलल्या,‘ असे आरोप तेव्हाच्या यशस्वी कॉग्रेस पक्षावर होत राहिलेले आहेत. सवाल शंकेखोरांच्या समाधानाचा नसतोच. त्यांना शंका दुर होण्याशी मतलब नसतो. त्यांना हवा तोच निकाल लागला नाही तर निकाल संशयास्पद असतो. प्रश्नाचे उत्तर असते आणि शंकेचा खुलासा असू शकतो. संशयाला मात्र कुठलेच समाधान असू शकत नाही. सहाजिकच त्यांच्यासाठी ‘झुठाही सही’ इतकेच समाधान असू शकते. आपल्या उजाड जमिनीत एक शेतकरी अखंड मशागत व मेहनतीचे भरपूर पीक घेत असेल, तर काय करायचे? उलट एका सुपीक जमिनीत मशागतीशिवाय पीक आले नाही, म्हणून रडणार्‍याला काय म्हणायचे? ज्याचे मेहनत केल्याने अधिक पीक आले, त्याला जादूटोणा वा लबाडी म्हणायचे का? हा काहीसा तसाच प्रकार आहे. आताही मतदान यंत्रात आवश्यक बदल झालेले आहेत. पण उद्या मोदींनी गुजरातमध्ये बाजी मारली, तर पुन्हा यंत्रातील गफ़लतीचा आरोप होणारच आहे.

याचेही कारण आहे. ज्यांचे समाधान होत नाही, त्यांना सत्याशी वा समाधानाची कर्तव्य नसते. त्यांची जी समजूत आहे, तिला होकार हवा असतो. तो नकार येत असेल, तर तुम्ही चुकीचे असता. चॅम्पियन स्पर्धेत भारताला पाकिस्तानने हरवले आणि ते जगाने बघितले. पण त्याही बाबतीत असे लोक सहजासहजी निकाल मान्य करत नसतात. विराट आणि भारतीय संघ इतका बलिष्ठ असताना पाकिस्तान जिंकतोच कसा? काहीतरी फ़िक्सींग असले पाहिजे, असा दावा हे लोक करतात. विराटचा संघ हरताना दिसला, तरी त्यांना तोच संघ जिंकतोय व पाकिस्तान हरतोय, असे ऐकायचे असते. क्षणभर का होईना विराटचा संघ जिंकतोय म्हणावे, असा त्यांचा आग्रह असतो. तो जिंकण्याची अजिबात गरज नसते. ‘झुठाही सही’, इतकीच अपेक्षा असते. राहुल वा अन्य कॉग्रेसवालेही त्यावरच खुश असतात आणि लोकसभेपासून सतत मार खात आलेले आहेत. पण त्यांना राजकारण बदलण्याची किंचीतही गरज वाटलेली नाही. वाहिन्या वा चाचण्या किंवा विविध माध्यमातून राहुलने भाजपाच्या तंबूत घबराट पसरवली, हे ऐकून असे लोक सुखावत असतात आणि शेवटी त्यांचा हिरमोड होत असतो. आताही सोशल मीडियात राहुलनी आघाडी घेतलीय, म्हणून असे लोक खुश आहेत आणि त्यांनी खुश होण्याने काही बिघडत नाही. त्याबद्दल कोणी तक्रार करू नये. त्यांना खुश करणारे ‘झुठाही सही’ विवेचन लिहीणारे वा तशी भाकिते करणारे बाजारात कमी नाहीत. पण त्यावर असे लोक खुश नसतात. कारण हा नुसता देखावा आहे, याचीही पक्की जाणिव त्यांच्यापाशी असते. म्हणूऩच जे सत्य बोलतात वा वास्तव लिहीतात, त्यांनी मोदींच्या पराभवाचे भाकित करावे, असा आग्रह असतो. तो भले खरा ठरणार नाही, पण अशा आशाळभूतांना तात्पुरता दिलासा तर मिळणार असतो ना? म्हणून बिचार्‍यांची ओढाताण चालू असते. म्हणून असे लोक नावडत्यांच्या दारावर जाऊन धुमशान घालत असतात.

5 comments:

  1. bhau kal don mudyavar congress pravaktyanchi pratikriya vegalya paddhtichi hoti .
    1.NTPC raibarrely cha ghatnevar ali anwar chi pratikriya tyavar spasht shabdat aakshep ghetala ( Randeep Surjewala cha reply)
    Kahitari congress antargat badal zalet asa vattay deshhitache mudde astil tar pratikriya savadh hotey.

    ReplyDelete
  2. You are marvellous. You should have been at a different place.

    ReplyDelete
  3. wa ekadam satya lihilat,atach modi virodhi lok mhnatayat ki evm set kelay, tynana mahit ahe pan man manat nahi mhanun hi samjut.

    ReplyDelete
  4. भाऊ गुजरात निवडणुकीत काँग्रेस ची फक्त वरवरची वाटत आहे.
    राहुल गांधी फक्त हार्दिक पटेल , जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर या तीन तरुणांवर अवलंबून आहेत असे दिसत आहे

    ReplyDelete