Sunday, November 12, 2017

दुधाने तोंड भाजलेला अनुभव

aap in gujarat के लिए चित्र परिणाम

गुजरातमध्ये आता विधानसभेची निवडणूक कॉग्रेस जिंकणार याविषयी कोणाच्या मनात शंका राहिलेली नाही. म्हणजे निदान बातमीदारी करणार्‍यांना तरी त्याबद्दल शंका नाही. कॉग्रेस अर्थातच राहुल गांधींवर विसंबून आहे आणि राहुल गांधींनी एकाही पराभवाचे आजवर तोंड बघितलेले नसल्याने, कॉग्रेसच्या आत्मविश्वासाची कदर केली पाहिजे. पण हळुहळू इतर पक्षांनाही तसे वाटू लागले आहे आणि आम आदमी पक्षाचे गुजरात प्रभारी गोपाल राय यांनी तर कॉग्रेसला विजयी होण्यासाठी सावधान होण्याचा सल्लाही दिलेला आहे. राय यांच्या मते गुजरातमध्ये कॉग्रेस सत्तेवर येऊ शकते. पण त्यांनी गाफ़ील रहाता कामा नये. सावधपणे काम केले आणि मस्तीत गेली नाही, तर कॉग्रेस सत्ता मिळवू शकेल; असा राय यांना विश्वास वाटतो. आता मस्तीत जाणे वा गाफ़ील रहाणे म्हणजे काय, याचा राय यांनी नेमका खुलासा केलेला नाही. पण पंजाबामध्ये आम आदमी पक्ष मस्तीत होता, तसे होऊ नये असे राय म्हणतात. याचा अर्थ साफ़ आहे. आम आदमी पक्षाने लोकसभा मतदानातच मोठी बाजी मारलेली होती. देशभर सर्वाधिक जागा लढवून त्यांनी सर्वाधिक अनामत रकमा गमावण्याचा विक्रम केला होता. त्याला अपवाद एकटा पंजाब होता. त्यांच्या पक्षाचे चार खासदार लोकसभेत निवडून आले आणि ते सर्व पंजाबमधले आहेत. सहाजिकच नंतरच्या काळात पंजाबात हा नवा पक्ष बहूमत मिळवू शकतो, अशी चर्चा झालेली होती. कोणीतरी चाचण्या घेऊन ९५ टक्के जागा तो पक्ष जिंकणार असा निर्वाळा दोन वर्षे आधी़च दिलेला होता. म्हणून असेल, केजरीवाल यांनी एक वर्ष आधीपासूनच पंजाबची प्रचार मोहिम हाती घेतली होती आणि दिल्लीला वार्‍यावर सोडून दिलेले होते. या घाईगर्दीला गोपाल राय मस्ती म्हणतात की आणखी कशाला, हे बघावे लागेल. मात्र आज ते कॉग्रेसला सल्ला देत आहेत. कारण गुजरातमध्ये त्यांना काहीही करणे शक्य राहिलेले नाही.

वास्तविक लोकसभा संपल्यावर केजरीवाल यांनी अन्य राज्यातील पक्षाचा गाशा गुंडाळलेला होता. महाराष्ट्रात सत्ता आणण्याची भाषा विसरून त्यांनी लढतीतून माघार घेतली होती. मात्र पुन्हा दिल्ली काबीज केल्यावर त्यांना हुशारी आली आणि त्यांनी पंजाब गोवा इत्यादी राज्यात विधानसभेची तयारी चालविली होती. त्यातच गुजरात या राज्याचाही समावेश होता. पण सहा महिन्यांपुर्वी आधी त्यांना दिल्लीत धक्का बसला आणि पाठोपाठ त्यांचा भ्रमनिरास झाला. दिल्लीत आधी त्यांनी एक विधानसभा पोटनिवडणूक दणक्यात गमावली आणि नंतर काही आठवड्यात महापालिकांच्या मतदानात त्यांच सुपडा साफ़ झाला. तरीही केजरीवाल वा आम आदमी पक्षाची मस्ती उतरली नव्हती. ती उतरण्यासाठी पंजाबच्या मतदाराला खास प्रयत्न करावा लागला. त्यानंतरच केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांची पोपटपंची बंद झालेली होती. दरम्यान पंजाब व गोव्याचा इतका धसका या मंडळींनी घेतला, की तयारी केलेला गुजरातही त्यांनी लढवायची इच्छा मरून गेली. दोन वर्षापुर्वी याच गोपाल रायनी गुजरातमध्ये सर्वात शक्तीशाली आम आदमी पक्षच असल्याचा निर्वाळा देणारा अहवाल सादर केलेला होता. अर्ध्याहून अधिक मतदारसंघात पक्षाची संघटना बांधून भक्कम झाली आहे आणि उर्वरीत मतदारसंघात बांधणीचे काम चालू असल्याचे त्यांनीच पत्रकारांना सांगितले होते. पण आता प्रत्यक्षात निवडणूक आली असता, या पक्षाने व त्याच्या नेत्यांनी आकस्मिक माघार घेतलेली आहे. नाममात्र ११ जागा लढवायचे ठरवले आहे. त्यामुळे इतकी वर्षे आशाळभूत होऊन तिकीटाच्या प्रतिक्षेत असलेल्या त्यांच्याच अनुयायांनी नेत्यांवर कॉग्रेस वा भाजपाच्या दलालीचे आरोप करून राजिनामे दिलेले आहेत. त्यानंतर गोपाल राय यांना कॉग्रेसला सल्ला देण्याची सदबुद्धी झालेली आहे. मग त्यांच्या सल्ल्याचा कोणता अर्थ लावायचा?

गोपाल राय पंजाबातील आम आदमी पक्षाची मस्ती म्हणतात, त्याचा अर्थ काय होतो? तर तिथे त्यांच्या पक्षाने मतदानापुर्वीच बहूमत मिळवल्याचा दावा केला जात होता. दिल्लीचे उपमुख्यमंत्री व केजरीवालांचे निकटवर्तिय मनिष शिसोदियांनी तर केजरीवालच मुख्यमंत्री होतील, असे मानुन मतदान करण्याचे आवाहन केलेले होते. म्हणजे मतदानापुर्वीच त्यांनी स्वपक्षाचा पंजाबातील मुख्यमंत्री घोषित करून टाकलेला होता. अशा पार्श्वभूमीवर त्यांचा गुजरात कॉग्रेसचा सल्ला तपासून बघितला पाहिजे. तेव्हा शिसोदिया वा केजरीवाल जी भाषा बोलत होते, तशीच भाषा आज कॉग्रेस बोलते आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच तेव्हा आम आदमी पक्षाच्या डरकाळ्या जितक्या पोकळ होत्या, त्यापेक्षा आज कॉग्रेसने गुजरातमध्ये आणलेला आवेश वेगळा नाही, असे़च राय यांना सुचवायचे आहे. त्यांनी असे कशाच्या आधारावर असे म्हटले आहे? तर त्यांना जो अनुभव गुजरातमध्ये फ़िरताना आला, त्यानुसार त्यांनी दिलेला सल्ला आहे. राय म्हणतात पक्षाच्या प्रचारासाठी सर्वत्र फ़िरत असताना जाईन तिथे भाजपाचे कार्यकर्ते गल्लीबोळात दिसतात. पण त्याबाबतीत कॉग्रेसची बोंब आहे. कुठेही लोकवस्तीत व जनतेमध्ये कॉग्रेसवाल्यांचा मागमूस दिसत नाही. मतदार भलेही भाजपावर नाराज असेल, पण अशा मतदाराला आकर्षित करून घेणारा कॉग्रेसवाला कुठे जनतेमध्ये फ़िरताना दिसत नाही. थोडक्यात गुजरातमध्ये भाजपाच्या विरोधात जनमानस असले, तरी त्याची मशागत कॉग्रेसकडून होताना दिसत नाही, असे़च त्यांना म्हणायचे आहे. सहाजिकच माध्यमातून राहुल गांधींच्या आरत्या ओवाळल्या तर मते मिळतीलच असे नाही, हे राय सांगत आहेत. कारण नेमका हाच त्यांचा पंजाबचा अनुभव आहे. तळागाळापर्यंत तिथे कॉग्रेस व अमरिंदर सिंग जाऊन मतदाराला भिडलेले होते आणि माध्यमाच्या बातम्यातून मात्र केजरीवाल व आम आदमी पक्षाचा दबदबा होता.

थोडक्यात सामान्य माध्यमातून जी चर्चा जोरात चालू आहे, त्याची तुलना राय पंजाबच्या निवडणूकीशी करीत आहेत. तिथेही अकालींच्या बरोबरच कॉग्रेसला कंटाळलेली जनता आम आदमी पक्षालाच कौल देणार असल्याच्या हवाला तमाम बातमीदार व माध्यमे देत होती. केजरीवाल मंडळी त्यावर विसंबून मस्तीत राहिली होती. पण तिथे पर्याय म्हणून उभे असलेले अमरिंदर सिंग यांनी कॉग्रेसी थाटात मस्ती करण्यापेक्षा वास्तविक मतदारापर्यंत पोहोचून आपली बाजू पटवण्याची मेहनत घेतलेली होती. शिवाय गावा घरापर्यंत कॉग्रेसचे कार्यकर्ते जाऊन भिडलेले होते. त्या मेहनतीतून त्यांनी अकाली विरोधातल्या नाराजीला आपल्या बाजूने ओढण्यासाठी मतदाराला जवळ घेत चुचकारलेले होते. नेमका त्याचाच गुजरातमध्ये अभाव असल्याचे दुधाने तोंड भाजलेले गोपाल राय अनुभव सांगत आहेत. भाजपावर लोक नाराज असतील. पण अशा मतदारापर्यंत पोहोचून, त्याला कॉग्रेसकडे वळवण्याची मेहनत घेतली नाही, तर त्या नाराजीचा कुठलाही लाभ कॉग्रेसला मिळू शकणार नाही, इतकाच त्याचा अर्थ आहे. जे काम अमरिंदर सिंग यांनी पंजाबात केले, ते संघटनेअभावी गुजरातमध्ये होताना दिसत नाही, असा त्यातला मतितार्थ आहे. पण त्याची पर्वा कोणा कॉग्रेसच्या कार्यकर्ता वा नेत्याला दिसत नाही. मोदींवर वा भाजपा्वर नाराज असलेला गुजराती मतदार नाईलाजाने आपल्या पारड्यात मते टाकणार, इतकेच कॉग्रेसचे गणित आहे. किंबहूना तेच तमाम विश्लेषकांचेही मत आहे. मात्र असे ‘मत’ मोजणीच्या वेळी मोजले जात नसल्यामुळे केजरीवालांचा पंजाबात पराभव झाला आणि गुजरातमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ घातली आहे. हे अर्थात गोपाल राय यांचे मत असून, त्याला कॉग्रेसने काडीमात्र किंमत देण्याचे कारण नाही. कारण राहुलच्या करिष्म्यावर सत्ता मिळणार, अशी कॉग्रेसजनांना खात्रीच आहे. त्यांना गोपाल राय यांच्या सल्ल्याची काय गरज?

No comments:

Post a Comment