Friday, November 24, 2017

मोक्षाचा मार्ग ‘दशक्रिया’

dashkriya के लिए चित्र परिणाम

आजच्या पिढीला देवी नावाचा साथीचा रोग फ़ार तर ऐकून माहिती असेल आणि बहुतेकांना तर त्या आजाराचे नावही ठाऊक नसेल. कारण १९७० च्या दशक अखेरीस भारतात शेवटचा देवीचा रोगी आढळला होता आणि त्यानंतर जगभर त्या रोगाचे निर्मूलन झाल्याची जागतिक आरोग्य संघटनेने घोषणा केली होती. मात्र माझ्या बालपणी मी असे रोगी बघितलेत आणि त्या साथीने एकूणच लोकसंख्येची पाचावर बसणारी धारण अनुभवलेली आहे. त्याची इतकी दहशत होती, की अन्य कोणाला देवी आल्यात असे घरत बोलले तरी पालकांकडून कानशीलात बसायची. कारण नुसत्या उच्चारानेही तो आजार आपल्या घरात येईल, अशी समजूत होती. माझ्या सोबत खेळलेली दोन मुले त्यात दगावल्याचे आठवते. त्या आजाराचे गावठी उपचार होते आणि सरकारने त्याचे डोस देण्याची मोहिम नव्याने हाती घेतलेली होती. पण पन्नास वर्षापुर्वी प्रत्येक मुलाला ते दिले जातच होते असे नाही. मग एका बाजुला गावठी व डॉक्टरांचे उपचार होत आणि दुसरीकडे भजने इत्यादी सोपस्कारही चालत. चाळ संस्कृती असल्याने त्याचा अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला येतच असे. मात्र अशा सोपस्काराने तो आजार संपुष्टात आला नाही. तर कित्येक दशकाच्या कुणा शास्त्रज्ञांच्या अविरत संशोधन व सरकारी व सार्वजनिक लसीकरणाच्या प्रयत्नांनी त्यापासून मानवजात मुक्त झाली. तो उपाय सापडूनही अर्धशतकाचा कालावधी त्यात खर्ची पडला. आता सहसा कोणी अशा गावठी वा वैदू उपचाराकडे जात नाही. तशीच आंधळी श्रद्धा आता डॉक्टरी उपायांवर बसलेली आहे आणि त्यातही तितकीच भोंदूगिरी आलेली आहे. कारण सर्वच समाजात व युगात लोकांना चमत्कार व काल्पनिक समजूतींचे आकर्षण असते आणि त्यापासून सुशिक्षित अशिक्षित किंवा बुद्धीमान वर्गही कधी सुटलेला नाही. एकवेळ नाती तोडणे शक्य असते, तितक्या समजुती त्यागणे अशक्य असते.

कालपरवा ‘दशक्रिया’ नावाचा चित्रपट आला आणि त्यावरून खुप काहूर माजलेले होते. अर्थात त्यामध्ये ब्राह्मण वा धार्मिक सोपस्कारावर आसूड ओढलेले असल्यामुळे ब्राह्मण जातीच्या अनेकांच्या भावना दुखावणे स्वाभाविक आहे. त्यातले अनेकजणही आता अशा सोपस्काराच्या पलिकडे पोहोचले आहेत. पण त्यातून आपल्याच जातीला खलनायक म्हणून रंगवले जाते अशी त्यांची वेदना आहे. उलट तशा कथा कादंबर्‍या वा चर्चा वाद रंगवणार्‍यांना आपण सामान्य जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचे महान उदात्त कार्य करीत असल्याचे समाधान मिळत असते. त्यांच्या बाजूने वा विरोधात तावातावाने बोलणार्‍यांना आपणही काही महान योगदान करीत असल्याची एक समजूत पक्की असते. त्याखेरीज अशा वादापर्यंत गोष्टी जाऊ शकत नाहीत. पण बारकाईने बघितले, तर जितके सुधारक समजूतीचे बळी असतात, तितकेच पुराणवादी सुद्धा समजूतीचे गुलाम असतात, हे लक्षात येऊ शकेल. प्रत्येकाच्या समजूतींचे अंधश्रद्धांचे क्षेत्र भिन्न असते इतकेच. उदाहरणार्थ दशक्रिया किंवा तत्सम जे सोपस्कार विधी असतात, ते केल्याने कुणाला कुठला मोक्ष मिळाला आहे? असा सवाल नित्यनेमाने केला जातो. त्याचे उत्तर समोरच्यापाशी नसल्याने त्याला अंधश्रद्ध वा अडाणी ठरवले जात असते. पण अशा बुद्धीमंताच्या समजूतीला हात घातला, मग त्यांच्यापाशीही कुठले सप्रमाण सिद्धांत नसतात. तिथेही तितकाच भोंगळपणा आढळून येईल. दशक्रियेने कुणाला मोक्ष मिळाल्याचा पुरावा नसतो, तसाच कसाब वा अफ़जल गुरूला फ़ासावर लटकवल्याने त्यांच्या हिंसेने मरण पावलेल्याला कुठलाही न्याय मिळाल्याचा पुरावा देता येणार नाही. मग त्या प्रदिर्घ न्यायप्रक्रीयेला न्याय कशाला संबोधले जाते? त्याचे उत्तर कोणापाशी आहे काय? निर्भयाला न्याय देण्याविषयी अशीच तावातावाने चर्चा झाली, त्यातून तिला कुठला न्याय मिळाला आहे?

तो धर्मकार्यातील मोक्ष वा पापपुण्य़ आणि आजच्या न्यायप्रकीयेतील न्याय, याचा कुठला वैज्ञानिक पुरावा मिळत नाही. पण दशक्रिया वा श्राद्ध घालणे ही अंधश्रद्धा असते आणि न्यायाचे सव्यापसव्य मात्र पुढारलेपणाचे पुरोगामी लक्षण असते. हा निकष कोणी कधी ठरवला? कुठल्या वैज्ञानिक वा शास्त्रशुद्ध कसोटीवर त्याचे ठोकताळे निश्चीत करण्यात आलेले आहेत? कालपरवा गुजरातमध्ये राहुल गांधींनी प्रचाराचा धुमधडाका लावला आणि त्यांची प्रतिमा उजळ करण्यासाठी निर्भयाच्या आईची मुलाखत अनेक माध्यमात छापली गेली, त्याचे गुणगान सुरू झाले होते. सामुहिक बलात्काराचा अमानुष बळॊ ठरलेल्या या मुलीच्या आईने त्या मुलाखतीमध्ये राहुलचे कोडकौतुक केलेले आहे. राहुलमुळे आपला मुलगा पायलट झाला असा तिचा दावा आहे. पण कशामुळे राहुलची त्या मुलावर कृपा झाली, त्याचा कुठला गोषवारा त्या मुलाखतीत नाही. देशातल्या अशा किती मुलांसाठी राहुलनी डॉक्टर पायलट होण्यासाठी पुढाकार घेतला? याच मुलाच्या बाबतीत घेतला, कारण त्याच्या बहिणीला त्याच राहुलचे सरकार, शासन संरक्षण देऊ शकलेले नव्हते. कायदा न्याय देऊ शकलेला नव्हता आणि त्याची भरपाई म्हणून तिच्या भावाला पायलट करण्याचा खर्च राहुलने उचलला होता. पण त्याची बलात्कारानंतर खुन होण्यापर्यंतची खरी किंमत निर्भयाने मोजलेली नव्हती का? तिच्यावर तशी वेळ आली नसती, तर तिचा भाऊ हे साध्य करू शकला नसता की राहुलनी त्याला मदत केली नसती. पण यातला एक भाग लपवून दुसर्‍याचे उदात्तीकरण करणे, ही पापपुण्याची संकल्पना असते. राहुलने कल्याण केले. हे सत्य आहे की अंधश्रद्धा व भ्रामक समजूत आहे? या समजूती कोणा भोंदू बाबाने फ़कीराने पसरवलेल्या नाहीत. स्वत:ला प्रगत व बुद्धीमान म्हणून पेश करणार्‍यांनी निर्माण केलेली ही दिशाभूल आहे. म्हणजेच एका भ्रमातून समाजाला बाहेर काढून दुसर्‍यात गुंतवण्याची प्रक्रीया व्यवस्थित चालू आहे.

कालपरवा म्हणजे दोनतीन दशकांपर्यंत धर्ममार्तंड हेच समाजातले बुद्धीजिवी व शहाणे समजले जायचे आणि त्यांच्या पोथीपुराणात जगण्यातले सत्य सामावलेले असे. त्यालाच नियम निती वा कायदा मानले जात होते. राजे व सत्ताही त्यांच्या इच्छा आज्ञेबाहेर जाण्याचे धाडस करीत नव्हती. त्यांनी अमूक एक पाप ठरवावे आणि मग तीच कृती अन्य प्रसंगी पुण्यही घोषित करावी. त्याला कोणी आव्हान देऊ शकत नव्हता. कारण समाजात असा एक वर्ग असतो, जो अभिजन असतो आणि त्याचा शब्द प्रमाण असतो. त्याला आपल्याकडे ब्राह्मणवाद म्हणून हेटाळले जाते. अन्य देशात ते पौरोहित्य करणार्‍यांचे काम होते. जगाने कितीही वैज्ञानिक क्रांती केली असो, समजूतीतून कुठलाच समाज बाहेर पडू शकलेला नाही. एका दांभिकपणाला कालबाह्य ठरवून नाकारले जात असताना, दुसरी दांभिकता पुढे येत असते आणि आपले बस्तान बसवित असते, किंबहूना आधीच्या प्रस्थापितांना विस्थापित करणार्‍यांना आपले नवे थोतांड समाजाच्या गळी मारूनच पुढे यावे लागत असते. कालची अंधश्रद्धा पुसून काढताना नव्या अंधश्रद्धा लोकांच्या गळी उतरवाव्या लागत असतात. त्याचा स्विकार लोक कशाला करतात, तर त्यातून सामान्य लोकांना पुढारलेले म्हणून मान्यता हवी असते. त्यात कुठे विवेक वा विचारांचा संबंध येत नाही. नऊ वर्षे पुरोहित व साध्वी यांना कशासाठी तुरूंगात ठेवले, त्याचे उत्तर आजही न्यायालयाला देता आलेले नाही. त्यांच्यासारखेच हजारो निरपराध कुठल्याही गुन्ह्याशिवाय तुरूंगात खितपत पडलेले आहेत. त्यांना कुठल्या गुन्ह्याची वा पापाची किंमत मोजावी लागते आहे? त्याचे उत्तर न्यायाची पोपटपंची करणार्‍यांपाशी नाही. पण तेच लोक अमुकतमूकासाठी न्याय म्हणून अखंड पोपटपंची करीत असतात. तरीही निर्भयाला न्यायाला वंचित रहावे लागते आणि तिच्या आईला मुलीच्या यातना विसरून राहुलचे कौतुक करावे लागते. यात दशक्रिया वा धार्मिक सोपस्कारापेक्षा वेगळे काय आहे?

कणकेचे वा भाताचे गोळे मांडून कसले मंत्र बडबडल्यामुळे कोणाला मोक्ष मिळत असल्याचा पुरावा नाही म्हणणारे शहाणे असतात आणि तसे काही करणारे मुर्ख असतात. पण दुसरीकडे असाच पोरकट तमाशा मांडणारे परस्पर विरोधी भूमिकांमध्ये येत असतात. पंचवीस वर्षापुर्वी अयोध्येत बाबरी मशीद पाडली म्हणून आजही श्राद्ध घातल्यासारखे सोहळे साजरा करणारे शहाणे असतात. पण खुद्द प्रेषित महंमदाने जिथे नमाज पढला अल्लाही आराधना केली, तीच मशिद उध्वस्त करून सौदी राजाने नवी मशीद उभारली. त्यात कुठलेही पाप नसते. जिर्णोद्धार म्हणून विधीवत एका मंदीराला पाडून नव्याची उभारणी केली जाते, तेव्हा धर्म बुडत नसतो. परंतु कोणा टोळक्याने मंदिरावर चिखल फ़ेकला तर मात्र जगबुडी येत असते. हे सांगणारे व जगाच्या माथी थोपणारे असतात तरी कोण? त्यांना पापपुण्य ठरवण्याचा किंवा त्यात कधीही बदल करण्याचा अधिकार कोणी दिलेला असतो? तर त्यांना सुटसुटीत बोलता येत असते, ते शब्दप्रभू असतात. शब्दांच्या कसरती करून लोकांना झुलवू शकत असतात. शब्दांची भुरळ घालून लोकांच्या भावनांशी मनाशी खेळू शकत असतात. कालपर्यंत एका गटाची चलती असते, आज दुसर्‍यांचा बाजार तेजीत आलेला असतो. बाकी सामान्य लोकांची दिशाभूल तशीच व तितक्याच कुशलतेने चालू असते. पुरोहित साध्वीला कुठल्याही पुराव्याशिवाय तुरूंगात डांबून छळ करण्यात मानवता असते आणि सर्व कायदे पुराव्यानिशी न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊनही कसाब वा अफ़जल गुरूला झालेली शिक्षा रोखून धरण्यातही मानवधिकार असतात. अशा गोष्टी केल्याने जगातला हिंसाचार कमी झाला वा अमानुषता कमी झाल्याचा कुठला पुरावा कोणी समोर आणला आहे काय? पण म्हणून त्याविषयी अगत्याने आग्रहाने बोलून डोके खाणारे माघार घेतात काय? त्यांचे हे थोतांड संपलेले आहे काय?

पुराणातल्या गोष्टी थोतांड असतात आणि आधुनिक पुस्तकातून समोर आणल्या गेलेल्या गोष्टी खर्‍या असतात, हा दावा आहे. पण पुरावे कशाचेही नसतात. दोन्हीकडून थोतांड व दांभिकतेचा वावर कायम असतो. शेकडो वर्षे समाजातील गरीबी हटवली जाते आहे आणि तरीही गरीबी संपलेली नाही. पण येणारा प्रत्येक नवा सत्ताधीश वा त्याला आव्हान देणारा राजकारणी, पुन्हा तशीच लालूच आमिष दाखवत असतो आणि लोकांनाही कोणी चमत्कारी बाबा हवाच असतो. नोटाबंदीचे उदाहरण घ्या, त्यामुळे कोट्यवधी लोकांना पन्नास दिवस रांगेत उभे रहावे लागले आणि चलनाची चणचण झाली. त्यापैकी कोणी दंगल केली नाही की हाणमारीचे प्रसंग उदभवले नाहीत. पण त्यामुळे देश बुडाला किंवा दिवाळखोर झाल्याचा कांगावा कोण करीत होता? हे काम रिझर्व्ह बॅन्केचे असताना पंतप्रधान निर्णय घेणारा कोण? नियम कायदे काय आहेत ना या देशात? दशक्रिय़ा कुणा ब्राह्मणानेच उरकली पाहिजे. तुम्ही आपले आपले कसे विधी उरकू शकता? नियम कायदे काही आहेत की नाही? नोटाबंदी व दशक्रिया यात काही फ़रक आहे की नाही? परिणामांचे सोडून द्या! दहशतवादाला धर्म नसतो आणि लव्हजिहाद नावाची गोष्टच नाही. न्यायालयाने गुजरात दंगलीच्या आरोपातून मोदींना निर्दोष मुक्त केले. त्यांच्याविरोधात कुठलाही पुरावा नाही. तो पुरावा नको असलेल्यांनाच दशक्रियेतून मिळणार्‍या मोक्षाचा मात्र पुरावा हवा असतो. असे हे एकूण चक्र आहे. ही दोन तीन चार थोतांडांमधली लढाई आहे. त्याचा सामान्य लोकांशी कुठलाही संबंध नाही. सामान्य लोकांच्या मनावर आपापल्या समजुती व दांभिकतेचा पगडा बसवण्याची स्पर्धा, इतकेच याचे स्वरूप आहे. त्याचा लोकशिक्षण वा प्रबोधनाशी काडीमात्र संबंध नाही. बाजारातल्या विक्रेत्यांनी आपला माल खपवण्यासाठी एकमेकांवर केलेले हेत्वारोप, यापेक्षा अशा वादविवादात आरोप प्रत्यारोपात काडीमात्र तथ्य नसते.

एकूण बुद्धीवाद किंवा असल्या चर्चा आपापले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चालतात. त्याद्वारे समाजमनावर आपली हुकूमत सिद्ध करण्याची ही लढाई असते. त्यातून जी शक्ती प्राप्त होते, तिच्या माध्यमातून मग राजकीय सत्तेलाही आपले आश्रीत बनवता येत असते. म्हणून जे दशक्रियेतील मोक्षाचे पुरावे मागतात, त्यांनाच पानसरे, दाभोळकर वा कलबुर्गी यांच्या हत्येतले पुरावे नसतानाही बेछूट आरोप करताना तारतम्य राखण्याची गरज वाटत नाही. पण तेच लोक तावातावाने दशक्रिया करणार्‍या लोकांकडे मोक्षाचा पुरावा मागताना दिसतील. कारण तेही सामान्य लोकांसारखेच समजूतींचे बळी असतात. बहुतांश समाज चालिरितीमध्ये गुंतलेला असतो आणि त्याच समजुतीने जगत असतो. स्वत:ला बुद्धीमंत म्हणून पेश करणारे आणि मिरवणारेही आपल्या वेगळ्या समजुतीतच जगत असतात. त्यांना शांतपणे त्यांच्याच विधानांचे खुलासे मागितले, तर बुद्धीला पटतील असे काही सांगता येत नाही. मग ते कुठल्या तरी पुराण पोथीतल्या ओव्या श्लोक सांगावे, तसे कोणा पाश्चात्य विचारवंताची सुभाषिते आपल्या तोंडावर फ़ेकू लागतात. कारण विचार विवेक त्यांच्याहीपाशी नसतो. तेही कुणाच्या तरी ऐकलेल्या वाचलेल्या कथनाचीच पोपटपंची करीत असतात. ज्या भक्तीभावाने सामान्य माणूस कुणा बाबा बुवाचे बोलणे अंतिम सत्य म्हणून स्विकारत असतो. तितकाच भक्तीभाव अशा बुद्धीवादी वर्गामध्ये आढळून येईल. तेही आपल्या पद्धतीचे दशक्रिया वा अन्य सव्यापसव्य करण्यात रमलेले दिसतील. त्याच्या परिणाम वा लाभाशी त्यांनाही कर्तव्य नसते. जगातला कम्युनिझम साम्यवाद निकालात निघालेला असला, म्हणून इथल्या डाव्यांनी त्याची कास सोडली आहे काय? मग शेकडो वर्षाच्या दशक्रिया श्राद्धे वा अन्य धार्मिक सोपस्कार समाज कसा सोडून देईल? नुसता गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्याला आपण संसदीय कार्य म्हणतोच ना? त्याशिवाय कुठल्या नव्या कायद्याला तरी ‘मोक्ष’ मिळतो काय?

9 comments:

  1. Too Good Bhau. Tumche vichar lakkh ahet.

    ReplyDelete
  2. काही दिवसांपूर्वी मी एक छोटीशी पोस्ट टाकली होती. त्याच्याशी आजचे भाऊंचे लेखन एकदम जुळते
    जुनी पोस्ट --
    धर्म ही अफूची गोळी आहे असं साम्यवादी धर्माच्या मार्क्सस्मृतीमध्ये लिहिलंय ;-)

    ReplyDelete
  3. उत्तम विश्लेषण

    ReplyDelete
  4. भाऊ खऱ्या दशक्रिएला विरोध करणारे सरकारचे श्राद्ध घालतायत यापेक्षा मोठा विनोद कोणता असू शकतो

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी अस्सल पुणेरी शालजोडी.

      Delete
  5. चौफेर फटकेबाजी!अप्रतिम!

    ReplyDelete
  6. या प्रकरणी आपण केलेला विचार विचार काहीसा एककल्ली वाटतो बऱ्याच वेळेला तथाकथित पुरोगामी लोकांच्या बरोबर प्रतिवाद करताना आपल्या लेखांचा संदर्भ घेताना आम्हाला अभिमान वाटत होता मात्र आजचा हा लेख ना दशक्रिया चित्रपटांबाबत आपली प्रतिक्रिया देतो वा र्र्माण झालेल्या वादांना समर्थपणे उत्तर देतो नेमका दशक्रिया चित्रपट काय आहे आपल्या परंपरांच्या मध्ये काही चुका आहेत का असल्या तर त्या दूर करण्याचा मार्ग कोणता त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट समुदायाचं वर्चस्व हिंदू समाजाने का मान्य करावे त्यासंदर्भात कोणी लिहिलं किंवा त्या संदर्भात आपली भावना व्यक्त केली तर तो भंपक पुरोगामी ठरतो का का स्वतंत्र बुद्धीचा माणूस असतो याचा याचा उपापोह अपले चर्चेतून झाला असता तर आनंद वाटला असता पुण्यात खोलेबाई प्रकरणात घडलेल्या प्रकारामुळे समाजातील सूज्ञ लोकांना नाईलाजास्तव पुरोगामी लोकांना आपलं म्हणावं लागतं संदर्भाने यासंदर्भाने आपण चर्चा करावी तसेच आपले विचार प्रकट करावे ही नम्र विनंती

    ReplyDelete