Saturday, November 11, 2017

षंढ पुरूषार्थाची नीरसकथा

 rape के लिए चित्र परिणाम

 घटना आहे 13 ऑगस्ट 2002 रात्रीची. त्या घटनेला आता पंधरा वर्षे पुर्ण झालीत. मात्र ती घटना घडली तरी मुंबईसह अवघ्या जगाला त्याचा पत्ता पुढले पस्तीस तास तरी लागला नव्हता. पण त्यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनीचा ‘टाईम्स ऑफ़ इंडीया" प्रसिद्ध झाला आणि पहिल्या पानावरच्या त्या बातमीने एकच खळबळ माजली. ती एका बलात्काराची बातमी होती. पण तो बलात्कार कुठे अज्ञातस्थळी झालेला नव्हता, की कुणा मुलीला पळवून नेऊन निर्जन स्थळी केलेला बलात्कार नव्हता. तो मुंबईतील लोकल रेल्वेच्या धावत्या गाडीत पाच प्रवाश्यांच्या साक्षीने झालेला बलात्कार होता. आणि तशी अफ़वा किंवा ऐकीव बातमी नव्हती. ज्याने ती बातमी टाईम्सला दिली होती, तो स्वत:च त्या वृत्तपत्राचा बातमीदार पत्रकार होता. तो त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षिदार होता. त्याचे नाव अंबरीश मिश्र. एकप्रकारे आपल्या नाकर्तेपणाचा तो कबूलीजबाबच त्याने त्या बातमीतून दिला होता. समोर बलात्कार होत असताना आपण त्या मुलीला अत्याचारातून वाचवू शकलो नाही याचे वैषम्य व खंत त्या बातमीतून लपत नव्हती. अंबरीशने कुठेही आपल्या नाकर्तेपणाचे समर्थन केले नव्हते. पण तरीही त्याच्यावर जवळपास सगळे शहाणे तुटून पडले होते. घटना किंवा ती बातमी साधारणपणे पुढीलप्रमाणे होती.

13 ऑगस्टच्या रात्री शेवटची गाडी नेहमीप्रमाणे चर्चगेटहून सुटली आणि बोरिवलीला पोहोचली. त्यात एका डब्यात पाच प्रवासी होते. त्यातच अंबरीश हा पत्रकार होता. एका दालनात हे पाच प्रवासी बसले होते आणि बाजूच्या दालनात एक मतिमंद अल्पवयीन मुलगी मळक्या वस्त्रात बसली होती. अंधेरीच्या पुढे केव्हातरी त्याच डब्यात सलीम खान नावाचा एक बेवडा शिरला आणि ती मुलगी असलेल्या दालनाकडेच वळला. गोरेगावच्या पुढे त्याने काहीतरी गडबड केल्याने कालवा झाला, म्हणून इथले प्रवासी उठून डोकावले, तर त्यांच्या अंगावर शहारे आले. त्या मुलीला खाली पाडून तो बेवडा तिच्यावर चक्क बलात्कार करत होता. थोडा धीर करून अंबरीशने त्याला हटकले. तर तो सैतान फ़ुत्कारला, "गप्प बस तिकडे, नाहीतर धावत्या गाडीतून बाहेर फ़ेकून देईन तुला." पुढे काहीच घडले नाही. म्हणजे प्रवाश्यांकडून कुठलाही व्यत्यय त्या बेवड्याला आला नाही. त्या मुलीच्या ओरड्याने वा टाहोने त्यापैकी एकाच्याही काळजाला पाझर फ़ुटला नाही. प्रवाश्यांपैकी कुणाचीही पुढे जाऊन बलात्कार थांबवण्याची हिंमत झाली नाही. मध्यंतरी मालाड व कांदिवली स्थानके येऊन गेली. बोरिवली स्थानक येईपर्यंत त्याने आपला कार्यभाग उरकला होता. तो शांतपणे उतरून गेला. मग या प्रवाशांनी व अंबरीशने पोलिसांना शोधून त्याला पकडण्यासाठी धावपळ केली. त्याच्या विरोधात तक्रार देण्याचीही हिंमत दाखवली. पण दरम्यान व्हायचे ते होऊन गेले होते. धावत्या लोकलमध्ये एका मतीमंद मुलीवर सैतानी बलात्कार झाला होता. मी त्याला पाशवी म्हणणार नाही. कारण बलात्कार पशूंमध्ये होत नसतात, पशूसुद्धा माणसापेक्षा खुप सभ्य प्राणीमात्र आहे. तो बलात्कार करत नाही आणि करायला गेल्यास त्यातली मादी त्याच्यापेक्षा क्रूरपणे त्याला पिटाळून लावते, असे मी ऐकले आहे. म्हणूनच मी नेहमी बलात्काराचे वर्णन सैतानी असे करतो. तर सांगायचा मुद्दा इतकाच, की त्या धावत्या गाडीत व पाच प्रवासी व पत्रकाराच्या साक्षीने हा सैतानी बलात्कार त्या दारूड्याने कुठल्याही पुर्वयोजनेशिवाय पार पाडला.

   या बातमीने प्रचंड खळबळ माजवली. कारण पाच लोक गाडीत समोर असताना त्यांनी तो बलात्कार होऊ दिला, या वास्तवानेच लोकांमध्ये चीड निर्माण झाली होती. पाचजण त्याला रोखू का शकले नाहीत? एवढीही हिंमत आपल्यात राहिली नाही काय, अशा अपराधी भावनेने मुंबईकरांना सतावून सोडले होते. पण तीच तर आजची वस्तुस्थिती आहे. अंबरीश वा त्या पाच प्रवाश्यांच्या जागी अन्य कुणी असते तर त्यांनी त्यात हस्तक्षेप केला असता काय? म्हणजे अंबरीशच्या बातमीनंतर त्याच्यावर षंढ वा नपूंसक वा नामर्द असल्याच्या आरोप करणारे जेवढे शहाणे, संपादक वा पत्रकार होते, मध्यमवर्गिय सुखवस्तू होते, त्यापैकी कितीजण तशा परिस्थितीत त्या मुलीच्या मदतीला धावून गेले असते? सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमात आमिरखानने मुलांना अशा प्रसंगी ओरडून मदतीचा धावा करायला शिकवले. पण तसा ओरडा तर त्या मतिमंद मुलीने सुद्धा केला होता. तिच्या किंकाळ्या शेजारीच बसलेल्या प्रवाश्यांना ऐकू आल्याही होत्या. त्यांनी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही केला होता. पण त्याच्या पुढले पाऊल उचलून प्रत्यक्ष बलात्कार थांबवण्यापर्यंत त्यांची मजल गेली नाही. त्या बेवड्याच्या एका धमकीने त्यांना गप्प व निष्क्रिय करून टाकले होते. धावत्या गाडीतून फ़ेकून देईन या नुसत्या धमकीला ते घाबरले होते. त्यांच्यातली हिंमत तेवढ्या धमकीने मारून टाकली होती. मग ओरडून काय होणार आहे? काय झाले? ती हिंमत त्या एका धमकीने संपली, की त्याचे काही भलतेच कारण आहे? अंबरीशने आपल्या त्या षंढपणाचे स्पष्ट कारण त्या बातमीतच सांगून टाकले आहे. बातमीत टाईम्सचा पत्रकार अंबरीश म्हणतो, Burdened with our middle-class sensibilities, we remained silent.

"आम्ही जे बघितले त्याने आम्ही बधीर होऊन गेलो. सलीमने त्या मुलीला खाली खेचले होते आणि तो तिच्यावर बलात्कार करीत होता. आपल्या मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणाच्या बोजाखाली दबलेले आम्ही शांत राहिलो, काहीही करू शकलो नाही."

   हा मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा किंवा शहाणपणा काय असतो? तर आपण दुसर्‍याच्या भानगडीत पडायचे कारण नाही. आपले जग आपल्यापुरते, बाकी कुठे कुणाचे काय होते, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नसते. अगदी कत्तलखान्यातल्या बोकडासारखे आपले मध्यमवर्गिय शहाणपण असते. तिथे एका बोकडाच्या मानेवरून सुरी फ़िरवली जात असते आणि बाजूचा दुसरा बोकड शांतपणे चरत असतो. मरणार्‍याचे पाय झाडणे, रक्ताने माखणे चरणार्‍याला अजिबात विचलीत करत नसते. आजकाल समाज व त्यातले सुखवस्तू व मध्यमवर्गिय इतके आत्मकेंद्रित झाले आहेत, की त्यांना शेजारच्या घरातल्या नवविवाहितेच्या किंकाळ्यासुद्धा ऐकू येत नाहीत. आणि ऐकू आल्या, तरी त्यात पडायची इच्छा व हिंमत ते गमावून बसले आहेत. अंबरीश त्यालाच मध्यमवर्गिय जाणतेपणाचा बोजा म्हणतो. त्या बोजाखाली दबलेले लोक कुठले आव्हान पेलणार आहेत? ते बघत बसतात. कधी ते रिंकू पाटिल या शाळकरी मुलीला जाळू देतात. कधी ते सांगलीच्या रस्त्यावर अमृता देशपांडेवरचा सुरीहल्ला होताना निमूटपणे बघतात. कधी बॉम्बे सेंट्रलला विद्या पटवर्धनवर रॉकेल ओतून तिला पेटवले जात असताना, स्तब्ध होऊन बघत रहातात. त्याला मध्यमवर्गिय जाणतेपणा किंवा व्यवहारी शहाणपणा म्हणतात. मात्र हेच लोक मोठ्या तावातावाने देशातला भ्रष्टाचार, वाढती असुरक्षितता, गुंडगिरी, काहीतरी करायला हवे; अशी चर्चा छान रंगवत असतात. पण हे सर्व शहाणपण, जाणतेपण प्रत्यक्ष संकटापासून मैलोगणती दुर असतानाचे असते. नेट प्रॅक्टीस म्हणतात तसे हे शहाणपण असते. ते कधीच खर्‍या कसोटी सामन्यात उतरत नाही. लोक टीव्हीसमोर बसून किंवा स्टेडीयमच्या गॅलरीत बसून, सचिन कुठे चुकला त्यावर बोलत असतात. त्यालाच अंबरीश मध्यमवर्गिय शहाणपणा म्हणतो.

   आमिरच्या कार्यक्रमाने अस्वस्थ होऊन एसएमएस करणारे त्यातलेच नाहीत काय? कार्यक्रमात त्याने आवाहन केलेल्या संस्थेला देणग्यांचे चेक पाठवणार्‍यात किती असे मध्यमवर्गिय जाणतेपण संभाळणारे आहेत? तिथे प्रवाश्यांनी थोडा धीर व हिंमत करून त्या बेवड्या सलीमला रोखले असते, तर तो बलात्कार रोखला गेला असता. पण तसे झाले नाही. त्यांनी तेवढेच केले नाही. पण तो बलात्कार होऊन गेल्यावर मात्र पोलिसांकडे धाव घेतली. त्यासंबंधी एक खळबळ माजवणारी बातमी लिहून त्या विषयाला वाचा फ़ोडली. अगदी त्याच स्टाईलने आज कित्येक लोक सोशल मीडियातून इतरांना सल्ले देत नाहीत काय? त्यापैकी किती लोक असा एखादा कसोटीचा प्रसंग ओढवला तर समर्थपणे त्या सलीमला रोखायला पुढे येतील? सलीमला रोखण्यासाठी हिंमत लागते, इच्छा लागते. आस्था व आपुलकी आवश्यक असते. आपण जे बोलतो वा सांगतो, त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावण्याची प्रामाणिक कुवत हवी असते. आज आपल्या समाजातील किती लोकांपाशी तेवढी कुवत व इच्छा आहे? आमिरच्या कार्यक्रमाचे गोडवे वाहिन्यांवरून गाणारे, त्यावर भाष्य करणारे व याला देणग्या व एसएमएस पाठवून आपले ’कर्तव्य’ पार पाडणारे, कितीजण असा प्रसंग ओढवला तर हस्तक्षेप करायला पुढे सरसावतील? ते काम सोपे नाही ना?? देणगी वा एसएमएस हा त्यापेक्षा खुप सोपा मार्ग आहे. ‘आम्ही सारे’चे फ़लक मिरवणे वा मेणबत्त्या पेटवणे ही सोपी पळवाट आहे. सत्य खुप कटू असते ना? जे पचवणे इतके कठीण आहे, त्याला विजयी करायचे तर किती कष्टाचे काम असेल ना? सत्यमेव जयते बोलणे खुप सोपे आहे, तेवढेच त्याच्या विजयासाठी झटणे अवघड आहे ना? 

संदर्भासाठी-

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Paralysed-with-fear-we-couldnt-stop-him/articleshow/19092325.cms

3 comments:

  1. खरंय भाऊ.. देशभक्ती,माणुसकी हे शब्द आपण आपल्या सोयीनुसार वापरतो...!
    बदलायला हवं.. बदलेल नक्कीच बदलेल... तुमच्या सारखे लोक जोपर्यंत ह्या समाजात आहेत तो पर्यंत अशी निदान आशा तरी ठेवता येईल..

    ReplyDelete
  2. मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणाच्या बोजाखाली दबलेले आम्ही शांत राहिलो, काहीही करू शकलो नाही."
    यालाच माध्यमातले मूर्ख, मुंबई स्पिरीट वगैरे म्हणून बोंबलतात.

    ReplyDelete
  3. Agadi army che shikshan nahi mhananar me pan ek tari maidani khel compulsory kara shale pasun! Ekhada dusraa vishay kami kara. Asha velela lagnari jigar wada pav khaun aani ganitat changle marks milavun yet nahi. 911 che chauthe viman sarva samannya mansan cha jigarbaz pratikara mule dusari kade padale.

    ReplyDelete