२०१० सालात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या होत्या. त्यात तामिळनाडूचाही समावेश होता. त्यात जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाला मोठे यश मिळाले, तसेच बंगालमधून डाव्या आघाडीचे बस्तान संपले. त्यामुळेच ते निकाल बघणार्यांपेक्षाही त्याचे विश्लेषण करणार्यांची पुरती तारांबळ उडालेली होती. कारण तेव्हा कुठलीही मतचाचणी असे निकाल लागतील, असे भाकित करू शकलेली नव्हती. राजकीय पंडितांनाही त्याचा अंदाज बांधता आला नव्हता. सहाजिकच निकालाच्या दिवशी जे वाहिन्यांवर विश्लेषण चालू होते, त्यात अनेकांनी शरणागती पत्करली होती. एनडीटीव्हीचा मालक मुख्य संपादक प्रणय रॉय त्यापैकी एक आहे. भारतात मतचाचणी व त्यावर आधारलेले भाकित ही कल्पना त्यानेच आणली. १९८० पासून ह्या गोष्टी भारतात सुरू झाल्या. पुढे राजीव गांधींच्या अपुर्व यशाचे भाकित केल्यामुळे त्यांनीच रॉयला थेट दुरदर्शनवर भाकिते व निकालाचे विश्लेषण करण्याची संधी दिलेली होती. त्यातूनच पुढे रॉय आपल्या मालकीची वाहिनी व नेटवर्क सुरू करू शकला. अशा प्रणय रॉयने २०१० सालात चक्क शरणागती पत्करली होती. कारण त्यालाही बंगाल वा तामिळनाडूतल्या अपुर्व निकालाच्या जवळपास पोहोचू शकणारा अंदाज व्यक्त करता आला नव्हता. त्याचे एक कारण प्रसिद्धी माध्यमांचा अवसानघातकी पक्षपातीपणा होता. बंगालमध्ये डाव्या आघाडीची घसरलेली लोकप्रियता कोणाला दिसू शकलेली नव्हती आणि तामिळनाडूत तमाम माध्यमे एकहाती जयललितांच्या विरोधात झोड उठवित होती. त्यामुळे अम्माने बाजी मारल्यानंतर प्रतिक्रीया देताना रॉय म्हणाला होता, यापुढे भारतीय निवडणूकीच्या राजकारणात वाहिन्या व माध्यमांना कुठलेही महत्व उरलेले नाही. पुढल्या सहासात वर्षात त्याची प्रचिती सातत्याने येतच राहिली आहे आणि मागल्या लोकसभेत अशा राजकीय पंडितांना मोदींनी चक्क धुळ चारली.
सहा महिन्यापुर्वीच उत्तरप्रदेशच्या निवडणूका झाल्या. त्या सोबतच आणखी चार राज्यांच्याही निवडणूका झालेल्या होत्या. त्यात अखेरच्या क्षणी कॉग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी झाली. मग कुठल्याही परिस्थितीत भाजपा साधे बहूमत मिळवू शकत नाही, यावर बहुतांश राजकीय जाणकारांचे एकमत झालेले होते. तेव्हाही अनेक वाहिन्यांनी मतचाचण्या घेतल्या होत्या आणि काहीजणांनी एक्झीट पोलही घेतलेले होते. पण कोणालाही भाजपा ३२५ जागा जिंकू शकेल असे भाकित करता आलेले नव्हते. एनडीटीव्ही वाहिनीवरही विविध चाचण्या व पोल यांचे विश्लेषण प्रणय रॉयने केलेले होते. त्यानेही भाजपाला बहूमत हुकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र निकाल त्यालाही धक्का देणारे ठरले. कारण नुसते बहूमत नाही, तर भाजपाने ८० टक्के जागा जिंकून दाखवल्या होत्या. मग या सर्वांचे गणित किंवा समिकरण कुठे चुकलेले होते? चाचण्या चुकीच्या होत्या की फ़सव्या असतात? नेहमी याची चर्चा होते. पण कुठलेही शास्त्र चुकीचे नसते. ते काही तर्कावर किंवा गृहिते घट्ट पकडून केलेले भाकित असते. म्हणूनच गृहिते चुकीची असतील व तर्कदुष्टतेची त्यात भर पडली, तरच हे अंदाज फ़सतात. अन्यथा निकालाच्या जवळपास जाऊ शकतील इतकी अचुक भाकितेही होऊ शकतात. त्याचाही वारंवार अनुभव येत असतो. तर अशा निकालाच्या विश्लेषणात विविध पक्षाचे प्रवक्ते व राजकीय पंडितही रॉयने सहभागी करून घेतलेले होते. त्याच कार्यक्रमाने त्याने एक गौप्यस्फ़ोट केला. तिथे हजर असलेला भाजपा प्रवक्ता एक्झीट पोलच्याही कार्यक्रमात होता. त्या दिवशी रॉयने त्याला एक घडी घातलेला कागद दिलेला होता. निकालाच्या अखेरीस रॉयने तोच कागद काढण्याची विनंती भाजपा प्रवक्त्याला केली. त्यात चाचणीत कथन केला त्यापेक्षा वेगळाच आकडा लिहून ठेवलेला होता.
चाचणी व एक्झीट पोलचे विश्लेषण करताना रॉयने भाजपाला बहूमतापासून वंचित ठेवणारे भाकित केले होते. ते त्याच्या अभ्यास व समिकरणानुसार खरे होते काय? तर त्याचे उत्तर नकारार्थी आहे. त्याला मनापासून भाजपा किती जागा जिंकणार असे वाटत होते, ते रॉयने आधी सांगितले नव्हते, तर दडपून ठेवलेले होते. पण त्याने मनातला हा आकडा भाजपा प्रवक्त्याला घडी केलेल्या कागदावर लिहून दिलेला होता. तो ३०९ इतका होता. पण विश्लेषणात रॉय भाजपा २०० हून कमी जागा मिळणार असे कथन करत होता. आपली तीच बनवेगिरी त्याने निकालाच्या दिवशी खुलेपणाने कबुल केली. चुक मान्य केली आणि त्याचे कारणही कथन केले. चाचणीचा अंदाज ३०९ असला तरी तितके भाजपाला यश मिळेल, असे जाहिरपणे सांगण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. त्याला कोणी धमकावले होते काय? जे निकाल येतील असे त्याला अभ्यासानंतर वाटलेले होते, ते रॉयचे मत होते आणि ते सांगण्याचा घटनात्मक अधिकार त्याला मिळालेला आहे. मग त्याला कुणाची भिती वाटलेली होती? सरकारने त्याची गळचेपी केली होती काय? तशीही शक्यता नाही. कारण देशात मोदींचे भाजपा सरकार असून, त्याच पक्षाच्या विजयाचे भाकित करण्याच्या विरोधात तशी गळपेपी होऊ शकत नाही. भाजपाच्या यशाच्या वा गुणगानाच्या बातम्या दडपण्याचे काही प्रयोजन सरकाराला असू शकत नाही. मग रॉयने कोणाला घाबरून त्याच्या अभ्यासाने सिद्ध झालेला आकडा लपवलेला होता? उत्तर सोपे आहे, प्रणय रॉय वा तत्सम संपादक ज्या बुद्धीजिवी वर्गात घुटमळत असतात, त्याचा रोष पत्करायला रॉय घाबरला होता. तमाम राजकीय पंडितांनी भाजपाच्या उत्तरप्रदेशातील दारूण पराभवाचे हवाले दिले असताना, भाजपाच्या इतक्या मोठ्या विजयाचा आकडा चाचणी दाखवत असली तरी बोलायचे कोणी? ही मुस्कटदाबी तथाकथित सेक्युपर बुद्धीवादी वर्गाकडून होत असते.
हा जो तथाकथित बुद्धीवादी वर्ग आहे, त्याने एकदा ठरवले मग त्याला आडवे जाण्याची हिंमत करणार्याला त्या वर्गाचा रोष पत्करावा लागत असतो. म्हणूनच रॉयने तो घडी घातलेला कागद भाजपा प्रवक्त्याला चारपाच दिवस आधीच देऊन ठेवला होता व निकालाच्या दिवशी तशी कबुलीही देऊन टाकली. याचे कारणही समजून घेतले पाहिजे. प्रणय रॉयला बुद्धीवादी वर्गातही नांदायचे आहे आणि जगासमोर मुर्खही ठराय़चे नाही. ज्या मतचाचण्यांमुळे त्याला इतकी ख्याती व प्रसिद्धी मिळाली, ती धुळीला मिळू नये याचीही चिंता त्याला सतावत होती. म्हणून त्याने पळवाट काढली. आपण आजही खरे वंदाज व्यक्त करू शकतो, ही प्रतिष्ठा कायम राखण्यासाठीच त्याने हा मार्ग पत्करला. आधीच खरा आकडा जाहिर करून पुरोगामी विचारवंतांचे शिव्याशाप घेतले नाहीत. पण निकाल समोर आल्यावर आपण भाजपाने जिंकायच्या जागा आधीच शोधून काढल्याचे श्रेयही त्याला हवे होते. हा सगळा उहापोह इतक्यासाठी करायचा, की वास्तवात विचार वा अविष्कार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी कोणाकडून होत असते, त्याचा खुलासा व्हावा. समाजातल्या नैतिकतेचा व वैचारिकतेचा मक्ता आपल्यापाशी़च असल्याच्या थाटात जगणार्या वर्गाकडून प्रत्यक्षात विविध स्वातंत्र्याची गळचेपी होत असते. त्याखाली प्रणय रॉय याच्यासारखे भले भले संपादक अभ्यासकही भरडले जात असतात. मनात नसताना त्यांना खोटे बोलावे लागत असते, त्याचा दाखला देण्यासाठी हा सविस्तर खुलासा करावा लागलेला आहे. पण बहुधा आता अशा मुस्कटदाबीला अनेकजण दाद देत नसावेत. अन्यथा गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभांच्या मतचाचण्यात भाजपाच्या इतक्या मोठ्या यशाची भाकिते झाली नसती. कारण राजकीय पंडित आताही भाजपाच्या गुजरातच्या पराभवाचे हवाले देतच आहेत. पण मतचाचण्या करणार्यांनी त्यातला प्रणय रॉय व्हायचे नाकारले असेल, तर त्यांचे स्वागतच करायला हवे.
वाह भाऊ!पुरोगामी हेच खरे असहिष्णु आहेत आणि त्यांना परस्परांंचेच किती द्डपण आहे,हेच ह्यातून स्पष्ट झाले आहे.ज़बरदस्त विश्लेषण!धन्यवाद!
ReplyDelete