Tuesday, November 7, 2017

आनंदाचे डोही दु:खाचे तरंग (उत्तरार्ध)

demonitisation के लिए चित्र परिणाम

सत्तरी ओलांडलेला एक गृहस्थ मला आठवतो. दहा वर्षापुर्वी एका अशा पुनर्वसन बैठकीला मी हजर होतो आणि विकासकाने ५०० चौरस फ़ुटाचे घर देण्याचे मान्य केलेले होते. काही रहिवासी ६०० चा आकडा धरून बसलेले होते. तर हे गृहस्थ मला खाजगीत म्हणाले, ७०० चौरस फ़ुटाचे घर मिळायला काही अडचण नाही. अजून त्यांच्या त्या चाळीचे काहीही होऊ शकलेले नाही. पण एका सकाळी खुर्चीत बसल्या जागी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तर मुलानेही त्यांच्यासाठी धावपळ केली नाही, म्हणून त्यांची इहलोकीची यात्रा संपली. नंतर त्यांचे शेजारी म्हणाले. पोराला प्रॉपर्टी हवी म्हणून त्याने पित्याला वाचवले नाही. ७०० फ़ुटांचा हव्यास करणार्‍याला फ़क्त ७ फ़ुटात इहलोकीचा निरोप घ्यावा लागला. मुद्दा इतकाच, की निवारा म्हणून घर जगण्यासाठी हवे, हे आपण विसरूनच गेलो आहोत. किंबहूना आनंदाने जगणे हे आयुष्याचे ध्येय आहे, त्याचाही बहुतांश लोकांना विसर पडत चालला आहे. दु:ख काल्पनिक, सुखाच्या कल्पनाही चमत्कारीक झाल्या आहेत. आपल्याला कशाचे समाधान वाटते वा भेडसावणार्‍या समस्या कोणत्या आहेत, त्याचीही जाणिव बोथट होत गेली आहे. मुक्त अर्थव्यवस्थेने जगाला नाही तरी जगण्याला बाजाराचे स्वरूप आलेले आहे. हल्ली आपला आनंद कशात आहे आणि जगण्यातले समाधान कोणते, ते आपल्याला ठरवताच येत नाही. एकीकडे राजकारणी त्याची दिशा ठरवत असतात. दुसरीकडे कार्यकर्ता वा परिवर्तनवादी नावाची एक जमात आहे. ती आपल्या वतीने न्यायाच्या गमजा करीत बसलेली असते आणि सरकार नावाच्या यंत्रणेला आव्हान देत असते. उरलीसुरली जागा कंपन्या व जाहिरातींनी व्यापलेली आहे. तुमच्या घरातला टिव्ही वा टुथपेस्ट कोणती असावी, त्याचेही निर्णय जाहिरातीतून होत असतात. पेट्रोल इंधन महागले म्हणून गदारोळ माजवला जातो, पण त्यापेक्षाही अनावश्यक असलेल्या किती गोष्टी वाळवीसारख्या आपल्या कमाईला पोखरत असतात. त्याविषयी अवाक्षरही कोणी चुकून बोलत नाही. कुपोषणाने वा कुठल्या आजाराने मुले मेली, मग हलकल्लोळ माजवला जातो. पण परिसरात कचरा व उकिरडे कोणी निर्माण केले त्याबद्दल कोणी चकार शब्द बोलणार नाही. परदेशी दर्जाचा स्मार्ट फ़ोन हातात घेऊन खेड्यापाड्यातले लोक फ़िरताना दिसतील. पण आपली आरोग्यविषयक गरज म्हणून घरातले शौचालय मात्र सरकारने बांधावे, हे त्या गरीबाच्या मनात कोणी ठसवले आहे? खरेच घर बांधणार्‍याला शौचालय बांधणे परवडत नसते का?

अन्न वस्त्र निवारा ह्या दिर्घकाळ मानवी आयुष्यातल्या मूलभूत गरजा मानल्या गेल्या. कालपरवा उत्तरप्रदेशात गोरखपूर येथे डझनावारी मुलांचे मेंदूज्वराच्या आजाराने सामुहिक मृत्यू झाल्यावर तमाशा चालला होता. त्यात सुसज्ज इस्पितळ नाही व आहे तिथे कुठली उपयुक्त व्यवस्था नाही; म्हणून सरकारला जबाबदार धरण्याची स्पर्धा चालली होती. प्रत्येक शहाणा व सर्व माध्यमे सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून मोकळी झाली. जणू तो आजार ज्याच्या दंशाने होतो, त्या डासाचे नाव सरकार असावे, असाच आवेश प्रत्येक बोलणार्‍यात दिसत होता. उपचाराची व्यवस्था नाही म्हणून ओरडण्याने सामान्य माणसाचे जीवन निरोगी वा आरोग्यदायी कसे व्हायचे? माणसाने निरोगी असण्याला आरोग्य म्हणतात, की आजारी पडल्यानंतर गुण देणारे उपचार उपलब्ध असण्याला सुखी जीवन म्हणतात? कधीतरी याचा साकल्याने विचार होणार आहे की नाही? आपला परिसर स्वच्छ असावा आणि निरोगी वातावरणात आपण जगावे, यासाठी आपण व्यक्तीगत वा कौटुंबिक पातळीवर काय करू शकतो, हे कधी बोलले तरी जाणार आहे काय? प्रत्येक बाबतीत सरकार, प्रशासन, महापालिका वा सार्वजनिक व्यवस्था गुन्हेगार व नाकर्ती आहे. उकिरडे माजवण्याचा लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आरोग्य, सफ़ाई वा अन्य सुविधा देण्यास सरकार बांधील नक्कीच आहे. पण आपला परिसर शक्य तितका स्वच्छ व निरोगी राखावा, याची सामान्य नागरिकावर कुठलीच जबाबदारी नाही काय? नागरिक म्हणून जी लोकसंख्या एकत्र येऊन जगते व त्याला राष्ट्र संबोधले जाते, त्या लोकसंख्येचीही काही जबाबदारी असते. एकमेकांना वा इतरांना आपला त्रास होऊ नये वा आपल्यामुळे अन्य कोणाला अपाय होऊ नये, याचे भान प्रत्येकाला जबाबदार म्हणून अधिक सुखी बनवू शकेल. पण त्याची शिकवण कोणी देतो आहे काय? सगळे खापर सरकार वा अन्य कोणावर फ़ोडले, म्हणजे आपले कर्तव्य संपले अशी एक सार्वजनिक धारणा करून देण्यात आली आहे. कर्जमाफ़ीपासून शेतकरी आत्महत्येपर्यंत आणि गरीबी हटावपासून अच्छे दिनापर्यंत, सामान्य माणसाची कुठली कर्तव्ये नाहीतच काय? अन्य कोणी आपल्या सुखासमाधानाच्या कल्पना माथी मारायच्या आणि आपण वास्तवाचे भान सोडून त्यामागे पळायचे; हे किती दिवस चालणार आहे? आपण आपल्यासाठी काय करू शकतो? आपला आनंद, आपले सुख वा आपले समाधान आपण कधी शोधणार आहोत; असा प्रश्न मग भेडसावू लागतो. कारण आता घरातला टिव्ही सुद्धा कुठल्या कंपनीचा वा बनावटीचा असावा, याची निवड करण्याचे स्वातंत्र्य आपण गमावून बसलेलो आहोत.

घरात एचडी म्हणजे हाय डेफ़ीनेशनचा टिव्ही नसला तर आपण जगायच्या लायकीचे नाही, असे जाहिराती करून आपल्या माथी मारले जात असते. झोपडपट्टीत किंवा मोडकळीला आलेल्या इमारतीत केव्हाही मरायचा सापळा लागलेला असतो. त्यातही मस्त मौला म्हणून आपण अशा चंगळवादी वस्तु खरेदी करून जगतो आणि ग्रासू शकणार्‍या रोगराईविषयी बेफ़िकीर असतो. दारापर्यंत माजलेल्या कचराघाणीची आपल्याला चिंता नसते. पण हात मात्र डेटॉलने धुवायची रसायने लोक अगत्याने खरेदी करत असतात. अन्य कुणाच्या झगमग जगण्याने भारावलेली आपली मने, तशा वस्तु वा सुविधांसाठी आसुसलेली असतात. त्यात आपले समाधान सुख आजकाल सामावलेले आहे. पण आपल्या गरजा, इच्छा व समाधानाचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. वस्तु, सुविधा त्यांचे स्वामीत्व हे आपल्यासाठी सुखाचे निकष झालेले आहेत. महागड्या शाळांमध्ये मुलांचे शिक्षण करण्यात सुख शोधताना त्याच मुलांवर कोणते अत्याचार होतात वा त्यांची घुसमट होत असते, त्याची फ़िकीर करण्याचे आपण कधीच सोडून दिलेले आहे. मग एक रायन स्कुलची घटना घडते आणि आपल्याला अकस्मात बालमनाची व त्याच्या निरोगी वाढीची आठवण होते. अशा नावाजलेल्या शाळेतच उत्तम शिक्षण मिळते, हे आपल्या मनात कोणी भरवलेले आहे? मुलांना शिकवायचे काय व कशाला, तेही आपण पुरते विसरून गेलो आहोत. मुलाचे शिक्षण दुय्यम आणि नावाजलेली शाळा मोलाची झाली आहे. एक उत्तम नागरिक होणे व समाजरचनेत उपयुक्त सदस्य म्हणून मुलांना घडवणे; म्हणजे शिक्षण याचाच विसर आपल्याला पडला आहे. ९९ टक्के लोकांनी आपले सुखसमाधान व आनंद कशात आहे, ते शोधून काढण्याचे काम इतरांवर सोपवले आहे आणि उरलेला तो एक टक्का त्याचाच बाजार मांडून आपले शोषण करतो आहे. बैलासारखे राबून वा भ्रष्टाचार करून कुठूनही पैसे जमा करणे मिळवणे; आपल्या सुखी जगण्याचे ध्येय झालेले आहे. ते पैसे उरलेल्या एक टक्का बाजारवाल्यांच्या हाती सोपवले की आपण सुखी झालो; अशा नशेत अवघा समाज आपल्या पद्धतीने वा मार्गाने नुसते पैसे जमवण्याच्या स्पर्धेत उतरला आहे. त्यातून मग भ्रष्टाचार, गुन्हेगारी, काळापैसा, भामटेगिरी, विषमता वा विविध सामाजिक आजाराची आपण शिकार होऊन गेलेलो आहोत. त्यासाठी अन्य कोणावर आरोप करण्याची गरज नाही. यातले खरे गुन्हेगार आपण आहोत. आपणच आपल्याला वेळ आणि न्याय देऊ शकणार नसू, तर ती जबाबदारी ज्यांना सोपवून बसलोय, त्यांनी दगाबाजी केली तर आपणच नाकर्ते असतो.   

परिणामी आज संपुर्ण भारतीय समाज जीवनमान उंचावलेले असले तरी दु:खी दिसतो. कारण आपले सुख वा आनंद कशात सामावलेला आहे, त्याची जाणिवच बोथटलेली आहे. त्या कथेतल्या गोट्यांप्रमाणे अधिकाधिक संपत्ती गोळा करण्यात दमछाक होते आणि जिथे तो पल्ला गाठला जातो, तिथे त्याची उपयुक्तता नसल्याचे एक नैराश्य जीवनाला व्यापून टाकते. पैसा, संपत्ती वा सुविधा ह्या माणसासाठी असतात. त्या समाधानाचे संपादन करण्यासाठी असतात. जे कमावले ते उपभोग घेण्य़ासाठी असते आणि त्या उपभोगातून समाधान लाभत असते; त्याचे भान राखायला हवे. इतर कुणापाशी काय आहे वा त्याने ते कमावल्याने तो सुखी झाल्याच्या भ्रमातून बाहेर पडल्यास त्याचा अर्थ लागू शकतो. हव्यास आणि समाधान यात मोठा फ़रक असतो. हव्यासातून आनंद मिळत नाही की मिळवल्याचे समाधानी मिळत नाही. काहीतरी मिळवायचे मिळायचे राहूनच जाते. जाहिरातीच्या मोहजालात भरकटले, मग घरातला उपयुक्त टिव्हीही भिकारपणाचे लक्षण वाटू लागतो. आपल्या मनात अशी न्युनगंडाची धारणा जिथून निर्माण होते वा केली जाते; तिथून मग सुखातल्या दु:खाचा आरंभ होत असतो. त्यातून मग सुटका नसते. मिळवलेली प्रत्येक गोष्ट समाधानापेक्षा असमाधानी करण्यास हातभार लावू लागते. ज्याच्यापाशी एकच गोटा होता किंवा दहा गोटे होते, तेही त्या गोष्टीत दु:खी होतात, तशी आजकाल एकूण समाजाची दुर्गती झाली आहे. कारण आपण समाधान मिळवायचे विसरून गेलो आहोत आणि जगण्याची मजा घेण्यापेक्षा ‘एन्जॉय’ करण्याच्या आहारी गेलेले आहोत. किंबहूना प्रत्येक बाबतीत दु:ख शोधण्यात आपण पुरते गढून गेलो आहोत. त्यातून मुक्त होऊ तेव्हाच अच्छे दिन सुरू होतील. कारण जे टोचतबोचत असते, अडलेनडले असते, त्यातून बाहेर पडण्यालाच सुखाची अनुभूती म्हणतात. तो अनुभव येतो, तोच अच्छा दिन असतो. सुगंधाची अनुभूती घेण्य़ासाठी अत्तर नव्हेतर नाक अगत्याचे असते ना?   (समाप्त)

अर्थपुर्ण   दिवाळी अंक २०१७ 

10 comments:

  1. भाऊ अगदी मनातला बोललात. आजकाल समाजाला फक्त आपले अधिकार माहित आहेत कर्तव्य नाहीत त्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही कमी असेल त्यासाठी दुसऱ्याला दोष देऊन मोकळे होतात. हा विषय फार मोठा आणि महत्वाचा आहे, भाऊ, तुम्ही यावर आजून लिहिले तर फार आवडेल बघा.

    ReplyDelete
  2. Wah bhau, ek ek vakya cha vichar karat zopato aaj...apratim Hote donhi lekh...nehmicha tech rajkaran sodun jara vichar karayla lavanare !!

    ReplyDelete
  3. जबरदस्त हं भाऊ

    ReplyDelete
  4. भाऊ काय डोळसपणे भिडता हो तुम्ही वास्तवाला....

    ReplyDelete
  5. Eye opener article. if I share this article Unfortunately I will get no response positive or negative as those will not read it completely. However, your article is thought provoking and insightful.

    ReplyDelete
  6. "मुक्त अर्थव्यवस्थेने जगाला नाही तरी जगण्याला बाजाराचे स्वरूप आलेले आहे" - कटू सत्य !!

    ReplyDelete
  7. भाऊ खरच हो गावा गावात हे प्रबोधन करण्याची गरज आहे

    ReplyDelete
  8. भाऊ,
    अतिशय महत्वाचे आणि नितान्त गरजेचे खूप सुरेखरित्या सांगितले तुम्ही
    धन्यवाद !

    ReplyDelete
  9. २०१३ पासूनचा नियमित वाचक आहे. आत्तापर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला लेख. ऐन उमेदीच्या वयात आत्मपरिक्षणाची आज गरज आहे.

    ReplyDelete
  10. khupch chhan, Agdi Wichar karnya sarkha aahe..

    ReplyDelete