Saturday, November 4, 2017

गाढव आणि शहाणे

Image result for gujrat donkeys

कुठल्याही खेड्यात वा तालुक्याच्या गावी गेलात, तर तिथे कचर्‍याचा ढिग असलेल्या जागी काही गाढवे काहीतरी शोधून भूक भागवताना दिसतील. तसे अनेक प्राणिमात्र त्या कचर्‍यावर आपली गुजराण करीत असतात. पण इथे गाढवाचे स्मरण कशासाठी? तर गाढव हा मंदबुद्धी वा मुर्ख प्राणी मानला जातो. किंबहूना म्हणूनच गाढव म्हणजे उकिरडे फ़ुंकणारा, म्हणूनही हिणवले जात असते. पण म्हणून कधी गाढवाने ते मनावर घेतले नाही. कारण शहाण्यांच्या नादी लागला तर गाढवावर उपासमारीची वेळ येऊ शकते ना? सहाजिकच शहाण्या लोकांनी काय फ़ेकून दिले आहे, त्या कचर्‍यातही थोडेफ़ार उपयुक्त मिळू शकते, इतकी अक्कल गाढवालाही असते. ते बिचारे आपल्याला उपयुक्त काही शोधून त्यावर गुजराण करते. पण काही शहाणे असे असतात, की गाढवाला मुर्ख ठरवल्याशिवाय यांना आपल्या शहाणपणाची खात्री मिळत नसते. म्हणून असे लोक सातत्याने गाढवाला नाके मुरडत असतात. जेव्हा ते गाढवही त्यांच्याकडे ढुंकून बघत नाही, तेव्हा अशा शहाण्यांची मोठी कुचंबणा होते आणि गाढव कसे मुर्ख आहे, ते सिद्ध करण्याची या शहाण्यांना उबळ येते. तेवढ्यासाठी असे मोजके शहाणे मग स्वत:च उकिरडे फ़ुंकायला बाहेर पडतात. प्रत्येक उकिरयापाशी जाऊन नाके मुरडू लागतात. जेव्हा सामान्य माणसे अशा शहाण्यांना उकिरडे फ़ुंकताना बघतात, तेव्हा त्यांना कोण मुर्ख आहे, त्याची आपोआप जाणिव होते. कारण गाढवे उकिरड्यातले काही तरी उपयुक्त म्हणून खात तरी असतात. पण गाढवाची नक्कल करणारे मात्र कचरा हुंगून तो दुर्गंधीयुक्त कचरा असल्याचे ओरडून सांगत असतात. हे कळते आहे, तर उकिरड्यात गेलासच कशाला, असा प्रश्न मग बघणार्‍यांच्या चेहर्‍यावर उमटत असतो. सांगायचा मुद्दा इतकाच, की शहाण्याने गाढवाला गाढव ठरवणे शहाणपणाचे लक्षण नसते. त्यासाठी उकिरडे फ़ुंकायला जाणेही गैरलागू असते.

एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही, म्हणून सर्वांनाच नावडली पाहिजे, असा हट्ट चुकीचा असतो. तुम्हाला नावडणार्‍या गोष्टीतही इतरांसाठी काही उपयुक्त असू शकते. म्हणूनच दिसेल त्याला नाके मुरडण्याला अर्थ नसतो. पण जगातले सर्व शहाणपण आपल्यातच साचलेले आहे, अशा समजूतीत जगणार्‍यांना गाढवपणा केल्याखेरीज जगता येत नाही. सहाजिकच त्यांना जग उकिरडा भासू लागते. आठवते? सहा महिन्यांपुर्वी उत्तरप्रदेशच्या निवडणूका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि त्यात भाषण करताना तात्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही गाढवाचे स्मरण केले होते. त्या काळात गुजरात पर्यटन मंत्रालयाच्या जाहिराती टिव्हीवर झळकत होत्या. अमिताभ बच्चन यांचा समावेश असलेल्या त्या जाहिरातीमध्ये गुजरातच्या जंगली गाढवांचे कळप कच्छच्या वाळवंटात फ़िरताना दर्शवलेले होते आणि त्यांनाच बघायला गुजरातला भेट द्यावी, असे आवाहन अमिताभ करीत होता. तर त्या जाहिरातीचा संदर्भ घेऊन अखिलेशने भारताचे पंतप्रधान व भाजपाचे अध्यक्ष असलेल्या दोन नेत्यांना गाढव संबोधण्याचा उद्दामपणा केलेला होता. शतकाच्या महानायकाने गुजरातच्या गाढवांचा प्रचार थांबवावा, असे आवाहन अखिलेशने केलेले होते. त्याची दखल नरेंद्र मोदींनी घेण्याचे काहीही कारण नव्हते. आपली हेटाळणी त्यांनी दुर्लक्षित केली म्हणून बिघडले नसते. पण आपल्याला गाढव संबोधण्यातही मोदींनी आपलाच गौरव शोधला. याला म्हणतात, ‘खरा गाढवपणा’! अखिलेशच्या विधानाला उकिरडा किंवा गलिच्छ भाषा म्हणूनही मोदी आरोप करू शकले असते. पण त्यांनी उकिरड्यातही उपयुक्त गोष्टीचा शोध घेतला. त्या गलिच्छ आरोपातली घाण बघण्यापेक्षाही मोदींनी त्यातला गुणगौरव शोधला आणि अखिलेशला चोख उत्तरे दिलेले होते. काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

मोदींनी आपल्या अनेक सभांमध्ये तेव्हा त्या गुजरातच्या गाढवांचा गौरव सांगताना म्हटले, ‘मी आहेच गाढव! अन्यथा अठरा वीस तास राबलो नसतो. गाढव इमानदार प्राणी असतो आणि मालकाने खाऊपिऊ घातले नाही तरी अखंड राबत असतो.’ याला म्हणतात गाढवपणा. त्या गाढवपणाचे बक्षिस उत्तरप्रदेशी मतदाराने भाजपा आणि मोदींना भरभरून दिले ना? उलट अखिलेशला त्याच्या शहाणपणाची किंमत त्याच उत्तरप्रदेशात मोजावी लागली होती ना? तुमच्यापाशी किती बुद्धी आहे, यापेक्षा किती अक्कल आहे, ते महत्वाचे असते. बुद्धीचे अपचन झाले की मेंदूचा उकिरडा होऊन जातो आणि भोवताल उकिरडा भासू लागतो. मागला पंधरा वर्षात मोदींनी आपल्या गाढवपणाने अवघ्या जगाला चकीत करून टाकलेले आहे. सहाजिकच प्रत्येकवेळी अत्यंत बुद्धीमान व कुशाग्र बुद्धीचे लोक त्यांच्यासमोर हात टेकून मोकळे झालेले आहेत. कारण जगण्यासाठी व अडचणीतून मर्ग काढण्यासाठी कुशाग्र बुद्धी नव्हेतर प्रसंगावधान व किमान अक्कल असावी लागते. माणुस स्वत:ला शहाणा समजू लागला, मग त्याच्या अकलेचे दिवाळे वाजत असते. कारण त्याला अकलेचे प्रदर्शन मांडण्याची उबळ रोखता येत नाही. आपल्या बुद्धीची उंची सिद्ध करण्यासाठी अशा शहाण्यांना इतरांना निर्बुद्ध वा गाढव ठरवण्याचे व्रत घ्यावे लागते. त्यातून त्याची बुद्धी अधिकाधिक भ्रष्ट होत जाते आणि तुलनेत गाढवांना जिंकताना बघणे भाग पडत जाते. जिथे अकलेची स्पर्धा असते तिथे बुद्धीचे बळ महत्वाचे असते आणि जिथे कष्टांना पर्याय नसतो, तिथे ढोरमेहनत अपरिहार्य असते. मोदींनी कधीही आपण महान बुद्धीमान व प्रतिभावंत असल्याचा दावा केलेला नाही. आयुष्यात अपार कष्ट उपसत हा नेता देशाच्या सर्वोच्चपदी पोहोचला आहे. मात्र तिथे पोहोचल्यावर देखील त्याने मेहनत करण्यात कुठली कुचराई केलेली नाही.

मोदींच्या गाढवपणाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. शहाण्या बुद्धीमंतांच्या कुटील खेळात आपण पासंगाला पुरणार नाही, याची मोदींना पक्की खात्री आहे. म्हणून तर त्यांनी कुठलीही लढाई वा सामना बुद्धीबळाच्या पटावर होणार नाही, याची काळजी घेतलेली आहे. जगाने फ़ेकून दिलेल्या कचर्‍याला प्रतिष्ठा देऊन त्याचीच उपयुक्तता सिद्ध करण्यात मोदींनी स्वत:ला गुंतवून ठेवलेले आहे. बाकी शहाणे राजकीय पक्ष वा त्यांचे रणनितीकार ज्या सुबुद्ध नागरिक मतदाराला चुचकारण्यासाटही वेळ दवडतात, तिकडे मोदी अजिबात फ़िरकत नाहीत. कुठले सेमिनार वा परिसंवाद आणि पत्रकार परिषदात मोदींनी बाजी मारण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट अशा शहाण्यांना आपल्याशी लढायला उकिरड्यात किंवा आखाड्यात यायला भाग पाडण्याची कला मोदींनी साध्य केलेली आहे. बुद्धीमत्तेचा आव आणणार्‍याला आपली अक्कल वा शहाणपण सिद्ध करण्याची खाज अनावर असते. त्यामुळे असे शहाणे मोदींच्या आखाड्यात जातातच. पण कष्ट उपसण्याची कुवत त्यांच्यापाशी नसल्याने त्यांचीच गोची होऊन जाते. आखाड्यातल्या धुरळ्याने घुसमट होते किंवा उकिरड्याच्या दुर्गंधीने बेचैनी येते. नाक मुठीत धरून त्यांना तिथून पळ काढावा लागतो. हे आता नेहमीचे झाले आहे. गाढवाला गाढव ठरवण्याची ही स्पर्धा बहुधा २०१९ च्या लोकसभा निवडणूकीपर्यंत रंगत जाणार आहे. त्यात पुन्हा गाढवाचाच विजय होईल तेव्हा शहाणे रडकुंडीला आलेले असतील. पण म्हणून शहाणपणा येईल असे अजिबात नाही. कारण गाढवाला हरवण्य़ासाठी गाढव व्हावे लागेल. नुसता गाढव झाल्याचा आव आणून भागत नाही. सोंग करून भागत नाही. तितके कष्ट उपसणे भाग असते. नुसत्या लाथा झाडत बसल्याने कोणी गाढव होत नसतो, की गाढवांच्या शर्यतीत जिंकत नसतो. त्यासाठी शहाणपणा गुंडाळून गाढव व्हायची तयारी असायला हवी.

लोकसभेच्या आखाड्यात उतरल्यापासून मागल्या चार वर्षात मोदींनी शहाण्यांना कसे गाढव बनवले आहे, त्याचाही थोडा आढावा घ्यायला हरकत नसावी. गाढवामध्ये इतर प्राणिमात्रांप्रमाणे काही गुणदोष असतात. गाढव कितीही ओझे उचलून निमूट वाहून नेत असते आणि किमान खाण्यावरही इमानदारीने काम करते. पण चिडलेले गाढव कुणावर थेट चाल करून जात नाही, ते मागच्या लाथा झाडून राग व्यक्त करीत असते. आपल्याला सतावणार्‍यांना किंवा गाढवपणाचे सोंग आणणार्‍यांना मोदींनी मागल्या चार वर्षात तसे गाढव मात्र नक्कीचे बनवले आहे. कोणीही कितीही डिवचले तरी मोदी त्यांना ‘लाथाडत’ नाहीत. पण मोदींच्या अंगावर जाणार्‍या वा शिंगावर घ्यायला निघालेल्या शूरविरांना आपली बुद्धी गुंडाळून नित्यनेमाने लाथा झाडण्याच्या कामाला मोदींनी जुंपलेले आहे. कशी मजा आहे ना? जो माणूस पंतप्रधान पदावर आरुढ जोऊनही आपण गाढव असल्याचे मान्य करतो, पण त्याने कुठल्या शहाण्याला लाथा मारल्याचे दिसलेले नाही. मात्र तमाम शहाणे बुद्धीमंत राजकारणी व संपादक अहोरात्र मोदींवर लत्ताप्रहार करताना दिसत असतात. पण आपली अशी दुर्दशा कशामुळे झाली त्याचा विचारही करण्याची बुद्धी त्यांना होत नाही. मोदींना गाढव ठरवण्याच्या नादात आपण कधी गाढवापेक्षाही निर्बुद्ध होऊन गेलोत, याचे भान अशा लोकांना येत नाही. सहाजिकच अधिक चिरडीला येऊन असे लोक आपणच शहाणे असल्याचा दावा करू लागतात आणि अधिकच दयनीय होऊन जातात. मोदी गाढव असणे ही त्यांची समस्या नसून, असे लोक गरजेपेक्षा अधिक शहाणे असण्यात त्यांची समस्या सामावलेली आहे. त्यांच्यापाशी गाढवाइतकी जरी अक्कल असती व ती त्यांनी जपून वापरली असती, तर मोदींना हरवणे इतके अवघड होऊन बसले नसते. म्हणून म्हणायचे शहाण्याला उकिरड्याची चव काय?

7 comments:

  1. Apratim visleshan ahe Bhau. Ani pratyek vakyat dynamite takun spoat kela ahe tumhi. Hats off to you. God bless you with a long healthy life.

    ReplyDelete
  2. mastach bhau,ajach yogendra yadav ne bjp chya gujrat parabhavache bhakit kelay,karane tich ati shahanyanchi

    ReplyDelete
  3. Bhau..Here well Define Why Modi!!!..Different between Him & Other s..How success he got than other..Important of Hard work with proper way!!!

    ReplyDelete
  4. आशावादी माणसाला अडचणीतही संधी दिसतात तर निराशावादी माणसाला संधीताहि अडचणी, म्हणुनच मोदींनी अखिलेश यादव यांनी संबोधलेल्या गाढवाची संधी साधून सर्व विरोधकांना उकिरडा दाखवला

    ReplyDelete