Thursday, November 23, 2017

कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे!

sunanda pushkar के लिए चित्र परिणाम

स्वप्न झरे फूल से,
मीत चुभे शूल से,
लुट गए सिंगार सभी बाग के बबूल से,
और हम खड़े-खड़े बहार देखते रहे।
कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे!

डिसेंबर २०१४ मध्ये एक घटना घडली. मुंबईतल्या एका न्यायाधीशाचा नागपूरला गेला असताना संशयास्पद मूत्यू झाला. त्याविषयीची एक तपशीलवार बातमी आता एका पत्रकाराने शोधून काढलेली आहे आणि त्यावरून शिळ्या कढीला ऊत आणला जातो आहे. तशा अनेक संशयास्पद हत्या व मृत्यू आपल्या देशात कित्येक वर्षापासून चालू आहेत. मग या एका हत्येवरून इतके काहूर कशाला? तर त्यात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे नाव गोवता आलेले आहे. ज्यावेळी ही हत्या वा संशयास्पद मृत्यू झाला, तेव्हा किंवा नंतरच्या तीन वर्षात त्यावर कोणीच कसा आवाज उठवला नाही? याला अमित शहा जबाबदार आहेत, की विरोधी पक्ष व तथाकथित अविष्कार स्वातंत्र्याचे देशभरचे लढवय्ये? त्यापैकी कोणालाही या न्यायाधीशाच्या मृत्यूचे गुढ उकलण्याची इच्छा कशाला झालेली नव्हती? इतक्या उशिरा तरी एका पत्रकाराला तशी इच्छा कशाला व्हावी? तर त्याच न्यायाधीशासमोर अमित शहा यांच्याविरोधातला खटला चालू होता. अशा न्यायाधीशाचा शंकास्पद मृत्यू म्हणजे शहांनीच त्याचा मुडदा पाडला असणार; अशी आवई उठवण्याची उत्तम संधी! सहाजिकच ती शक्यता मिळताच या पत्रकाराची चिकित्सक वृत्ती तीन वर्षांनी जागृत झाली आणि त्याने एका इंग्रजी नियतकालिकात अनेक प्रश्न विचारणारा प्रदिर्घ लेख लिहून काढला. अर्थात जिथे छापला ते नियतकालिक मोदी व भाजपा विरोधातल्याच बातम्या लेख प्रसिद्ध करण्यासाठी निघत असते. सहाजिकच तिथून मग त्या आवईचे वितरण करण्यात आले. मग अशा बातम्यांची मागल्या पंधरा वर्षात ज्यांनी फ़्रानचायसी घेतलेली आहे, त्या सर्वानी आपापल्या कुवतीनुसार त्याचे वितरण व प्रसार सुरू केला. कोणी वाहिनीवर, कोणी सोशल मीडियात तर कोणी नेहमीच्या वर्तमानपत्रातून खळबळजनक वृत्त देऊन टाकले. पण ही सगळी मंडळी तीन वर्षे कशाला गप्प होती?

अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्याशी कुठल्या महिला बोलतात वा ते कुणावर पाळत ठेवतात, त्याविषयी चार वर्षापुर्वी अखंड पाळत ठेवण्यात जे लोक दिवसरात्र एक करीत होते, त्यांना या न्यायाधीशासमोर अमित शहांचा खटला चालू होता, ह्याचा शोध लागायला तीन वर्षे का जावी लागली? अर्थात यांनी आता न्यायासाठी लढणे हे कर्तव्य असल्याचा आव आणलेला आहे आणि तसे कुठल्याही शंकास्पद मृत्यूसाठी तेच करत असतात, असाच लेखातून आव आणलेला आहे. पण ज्या डिसेंबर २०१४च्या एका लपून राहिलेल्या बातमीचा शोध इतक्या मेहनतीने या महाशयांनी घेतला, त्याच वर्षाच्या आरंभी म्हणजे २०१४ च्या जानेवारीत एक गाजलेला संशयास्पद मृत्यू त्यांना अजिबात विचलीत करीत नाही. हा तरी एक सत्र न्यायाधीश होता. त्याच्या अशा शंकास्पद मृत्यूने अनेक संवेदनाशील लोक तात्काळ विव्हळू लागलेले आहेत. पण त्यांना सगळ्या वाहिन्या त्याच वर्षीच्या जानेवारीत एक अत्यंत भयंकर संशयास्पद मृत्यू दाखवत होत्या, त्याची फ़ारशी चिंता कधी वाटली नाही. देशाची राजधानी दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलात आलिशान दालनामध्ये सुनंदा पुष्कर नावाच्या महिलेचा यापेक्षा भयंकर संशयास्पद मृत्यू झालेला होता. तिच्या खोलीचे दार आतून बंद होते आणि ती एका केंद्रीय मंत्र्याची पत्नी होती. तिचा पती तेव्हा कॉग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या सभेला तालकटोरा स्टेडीयममध्ये होता. अकस्मात त्याच्या पत्नीचा शंकास्पद मृत्यू झाला आणि ते प्रकरण सराईतपणे दाबण्यात आले. पण कोणी त्याविषयी शंका काढल्या नाहीत. पंचतारांकित हॉटेलसारख्या वर्दळीच्या जागेत एका मंत्र्याच्या पत्नीचा मृत्यू होतो आणि कोणाची चिकित्सक वृत्ती जागृत होत नाही? कोणाला कसली भिती वाटत नाही? त्या तपासात तिच्या मंत्री पतीने केलेल्या हस्तक्षेपाचे अनेक पुरावे व संदर्भ समोर आल्यावरही ही मंडळी चिडीचुप असतात?

अगदी अलिकडेच रिपब्लिक या वाहिनीने पुष्कर प्रकरणाचे अनेक नवे किंवा दडपून ठेवलेले धागेदोरे चव्हाट्यावर आणलेले आहेत. पण कारवान नावाच्या मासिकाने त्याची किती दखल घेतली? का नाही घेतली? कुठल्याही अन्य वाहिन्यांना वा वर्तमानपत्रांना त्या शंकास्पद मृत्यूवर झालेल्या नव्या खुलाशाचा पाठपुरावा करावा अशी इच्छा कशाला झाली नाही? या विषयात नुसता प्रश्न विचारला तरी सुनंदा पुष्करचा पती व माजी मंत्री शशी थरूर पळ काढतो. तसा प्रश्न विचारला जाऊ नये म्हणून कॉग्रेस पक्ष त्या वाहिनीच्या पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत येऊ देत नाही. यामुळे तमाम चिकित्सक पत्रकार व जाणत्यांना भयभीत व्हायला काय अडचण होती? कारण तिथे तर मंत्र्याची पत्नी मारली गेली होती व त्यावर एकामागून एक पांघरूणे घातली जात होती. कागदपत्रे नष्ट करण्यात आली, नोंदी बदलण्यात आल्या. पण त्याबद्दल सगळीकडे मौन राहिले. ह्याला नुसता पक्षपातीपणा म्हणत नाहीत. ज्या उत्साहात न्यायाधीश लोया यांच्या जुन्या मृत्यूचे उत्खनन करण्यात आले आणि संधी मिळताच तमाम वाहिन्या व पत्रकार त्याचा पाठपुरावा करू लागले; तो उत्साह पुष्करच्या बाबतीत कसा बेपत्ता असतो? त्यातून पत्रकारिता होत नाही, तर एक अजेंडा राबवला जात असतो आणि यात आता काहीही नवे राहिलेले नाही. मोदी व शहांना मागल्या पंधरा वर्षात त्याची सवय जडलेली आहे. कोणीतरी अफ़वा पसरून द्यायची आणि मग बाकीच्या दबा धरून बसलेल्यांनी गदारोळ करून टाकायचा; ही एक मोडस ऑपरेन्डी झालेली आहे. २००२ च्या गुजरात दंगलीत मोदींनीच वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना बोलावून हिंदू दंगलखोरांना अभय देण्याचे आदेश दिलेले होते, असा गौप्यस्फ़ोट संजीव भट नामक पोलिस अधिकार्‍याने केलेला होता आणि त्याच सुतावरून मग स्वर्ग गाठला गेला. बारा वर्ष मोदींनी तो छळवाद सोसलेला आहे आणि अखेरीस त्याला सुप्रिम कोर्टातच विराम मिळालेला आहे.

कारवान वा अन्य असे पत्रकारितेचे मुखवटे लावलेले लोक, कसे मोदींची बदनामी व अफ़वाबाजी करण्यासाठीच राबत असतात, त्याचा तितका सज्जड पुरावा दुसरा कुठला असू शकत नाही. मोदींनी दंगलखोरांना अभय देण्याचे आदेश दिल्याच्या बैठकीला आपण हजर असल्याचे शपथपत्रावर संजीव भट यांनी सांगितले होते आणि हा माणुस धडधडीत खोटे बोलत असल्याचा निर्वाळा अखेर सुप्रिम कोर्टाने दिलेला आहे. मोदीद्वेषाने भारावलेली माणसे व बुद्धीमंत पत्रकार किती खालच्या थराला जाऊन खोटेपणा करू शकतात, त्याचा तो एक दस्तावेजच आहे. त्यामुळे ह्याला एक मोडस ऑपरेन्डी म्हणावे लागते. गुन्हेगारांची एक कार्यशैली असते, त्यालाच मोडस ऑपरेन्डी संबोधले जाते. आज मोदी विरोधात पत्राकरिता किती गुन्हेगारी पातळीवर येऊन पोहोचली आहे, त्याचे तो निकाल म्हणजे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे आता न्यायाधीश लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या निमीत्ताने आलेला व गावभर फ़िरवला जाणारा लेख, संजीव भट याच्या अफ़वेसारखाच नुसता संशयाचे बुदबुडे उडवणारा असल्यास नवल नाही. त्यात एकच फ़रक आहे. ‘द वायर’ नावाच्या वेबसाईटने अशीच अफ़वा सोडल्यावर अमित शहांच्या पुत्राने त्यांना शंभर कोटींची भरपाईची नोटिस धाडल्याने इतरांची पाचावर धारण बसलेली आहे. त्यामुळे़च कारवानच्या लेखामध्ये थेट कुठला व्यक्तीगत आरोप अमित शहांवर केलेला नाही. परंतु त्यातून तसा आशय निघावा, अशी मांडणी मात्र केलेली आहे. थोडक्यात माकडांच्या हाती कोलित देण्याचा उद्योग केला आहे. म्हणूनच दोन प्रश्न आहेत. पहिला म्हणजे हेच लोक मंत्र्याच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूविषयी गप्प कशाला? दुसरा प्रश्न लोयांच्या बाबतीत तीन वर्षे कुठल्याच पुरोगामी पत्रकाराला याची माहिती कशी नव्हती? तेवढा काळ चिकित्सकवृत्ती कुठे दारू झोकून लोळत पडली होती काय?

4 comments:

  1. वायर साम्यवाद्यांचे मुखपत्र आहे.

    ReplyDelete
  2. भाऊ आपण कुठल्या विषयावर बोलायचं आणि कुठल्या नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
    आता काही लोकांना वाटतं ह्या न्यायाधीशांच्या हत्येमागे अमित शाह आहेत...
    तर ह्या घटनेचं समर्थन असं कसं होऊ शकतं की 'तुम्हाला आमचं दिसतं त्यांचं नाही!'

    काय माहीत खरच केला असेल अमित शाह ने खून??
    तसं ही बघायला गेलं तर तो माणूस अस काही नक्कीच करू शकतो...
    तुमचा हा पवित्रा नाही पटला बुआ

    ReplyDelete
  3. न्या.लोयांच्या मृत्यूमध्ये काही काळेबेरे आहे आणि त्याची चौकशी व्हावी असेल असे वाटत असेल तर पुरोगाम्यांनी याविषयी अधिक काही न बोलणेच योग्य होईल. कारण या मंडळींनी आतापर्यंत जे प्रकार केले आहेत त्यातून त्यांची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली आहे असे म्हटले तरी हरकत नसावी. आतापर्यंत मोदींविरूध्द इतके आकाशपाताळ एक केले आणि गुजरात दंगलींच्या चौकशीसाठी एस.आय.टी नेमावी ही मागणी न्यायालयात जाऊन केली. न्यायालयाने यांची मागणी मान्य केली, एस.आय.टी नेमली. पण त्या एस.आय.टी ने मोदी निर्दोष आहेत हे प्रमाणपत्र दिल्यावर त्याच एस.आय.टी वर प्रश्नचिन्ह उभे करणारे पुरोगामी लोक सगळ्यात पहिले होते.आजही हे लोक एस.आय.टी चा अहवाल मान्य करतात का? या मंडळींनी मोदी दोषीच हेच गृहित धरलेले होते. लोकशाही आहे. कोणाला काहीही वाटू शकते. पण त्यातून झाले असे की यांची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली आहे. त्यामुळे यांनी आकाशपाताळ एक केले तर तो मुद्दा गुजरात दंगलींप्रमाणेच असणार आणि त्यात काहीही अर्थ नसणार असे वाटून पुरोगाम्यांच्या या मागणीला लोकांनी फार पाठिंबा दिला नाही तर पुरोगाम्यांनी वाईट वाटून घेऊ नये.

    ReplyDelete