Monday, November 20, 2017

मेरीट लिस्ट आणि निवडणूका



आपण सगळेच डबक्यात लोळणारे किडेमकोडे असतो. एकमेकांचे पाय ओढत रमलेले असतो. पण आपल्यातलाच एखाद दुसरा वर आभाळातल्या चांदण्या न्याहाळत स्वप्ने बघत असतो. असे कुणा विचारवंताने म्हणून ठेवलेले आहे. त्याचा अर्थ असा, की तो एखाद दुसरा त्या डबक्यातून बाहेर पडून नव्या क्षितीजाकडे झेपावण्याची स्वप्ने बघत असतो. त्यासाठी विचार व प्रयत्न करीत असतो. शाळेत सगळीच मुले जात असतात आणि त्यांना एकच शिक्षक प्रत्येक विषय शिकवित असतात. पण त्यातला एखाद दुसराच तो विषय आत्मसात करायला उत्सुक व सज्ज झालेला असतो. ती मुले परिक्षेत नुसती उत्तीर्ण होण्याचे स्वप्न बघत नसतात, तर त्यात प्राविण्य मिळवून आयुष्यात काही बनण्याची महत्वाकांक्षा बाळगून असतात. त्यासाठी मेहनत घेत असतात. तो पल्ला नेहमीचा अभ्यास करून वा नुसतेच आळशी बसून गाठला जाणे शक्य नसते. जितका पल्ला गाठायचा आहे, त्याच्याही पलिकडले उद्दीष्ट राखावे लागते. तरच अपेक्षित ध्येयाच्या जवळपास कुठेतरी पोहोचता येत असते. अशी मुले जी अखेरच्या क्षणापर्यंत मेहनत घेत असतात, त्यांचा इतर मुलांना हेवा वाटतो किंवा त्यांचे जीवन नीरस असल्याची टवाळीही इतरेजन करीत असतात. म्हणून हे मेहनत घेणारे आपले उद्दीष्ट बदलत नाहीत, की नाऊमेद होत नाहीत. ते आपले कष्ट उपसतच रहातात. आजकालचे राजकारण व निवडणूका तशा स्पर्धात्मक झाल्या असून, मेहनत घेईल त्याला मोठा पल्ला गाठता येत असतो. शालेय वा महाविद्यालयीन शिक्षणात जसे अधिकचा अभ्यास ही बाब आता सार्वत्रिक झाली आहे, त्यापेक्षा निवडणूकीची स्पर्धा वेगळी राहिलेली नाही. तिथेही पुर्वीप्रमाणे सहजगत्या उत्तीर्ण होण्याचे दिवस संपलेले आहेत आणि अधिकची मेहनत घेऊन मोठा पल्ला गाठणे, हाच नियम बनू लागला आहे. गुजरातच्या निवडणूकीकडे त्याच निकषाने बघण्याची गरज आहे.



उदाहरणार्थ हुशार वा गुणवत्ता यादीत जाऊ बघणारी मुले वर्षभर आधी उन्हाळी सुट्टीतही शालांत परिक्षेच्या तयारीला लागलेली असतात. जुन महिन्यात शाळा सुरू होण्यापुर्वी त्यांनी आरंभीचा अभ्यासक्रम उरकून घेतलेला असतो. आता तर अशा मुलांसाठी सुट्टीतले क्लासेसही सगळीकडे झालेले आहेत. त्यामुळे अशी मुले शाळेचा आरंभ होण्यापुर्वीच अभ्यासात उत्तीर्ण होण्याइतकी पुढे गेलेली असतात. मग सहासात महिने त्यांचे परिश्रम हे गुणवत्ता यादी गाठण्यासाठीचे असतात. आता शालांत परिक्षेत सर्वसाधारण हुशार मुलांना ८०-९० टक्के गुण मिळवणे अवघड राहिलेले नाही, त्यामुळेच गुणवत्ता यादी गाठायची तर ९५ पासून पुढे झेप घेण्याची तयारी करावी लागत असते. नुसता कोणी हुशार वा स्कॉलर आहे, म्हणून त्याची वर्णी गुणवत्ता यादीत लागत नसते. त्या यादीतील ४०-५० मुलांच्या टक्केवारीत एकदोन टक्के इतका किरकोळ फ़रक असतो. एकूण गुणांच्या बेरजेत एक गुण कमी पडला म्हणून पहिला क्रमांक हुकतो आणि तो विद्यार्थी दहा पंधराव्या क्रमांकावर फ़ेकला जात असतो. तेच आता निवडणूकांच्या बाबतीत झालेले आहे. एकूण मतदान होते, त्यात प्रत्येक पक्षाला मिळणारी मते आजवरच्या राजकीय पुण्याईवर अवलंबून असतात. ती मते तुम्हाला मिळणार यात शंका नाही. पण टक्केवारी वाढली आणि त्यात तुमचा हिस्सा वाढला; तर सगळी गणितेच बदलून जात असतात, थोडक्यात तुमच्या पक्षाची संघटनात्मक ताकद, किती अधिकचा मतदार बाहेर काढून आपला हिस्सा वाढवून घेते, यावर निवडणूकीचा निकाल फ़िरत असतो. म्हणूनच जो पक्ष तशी तयारी करून आखाड्यात उतरू शकतो, त्याला बहूमताचा वा त्याहूनही मोठा पल्ला गाठणे शक्य होत असते. बाकीचे पक्ष त्या बाबतीत गाफ़ील राहिले तर मेहनती पक्षाचे उखळ पांढरे होण्याला पर्यायच नसतो. मागल्या तीन वर्षात मोदी-शहा जोडीने तिथेच निवडणूकांचा रागरंग बदलून टाकला आहे. त्यांची गुजरात निती काय आहे?




मागल्या तीन वर्षात बहुतेक ओपिनियन पोल वा एक्झीट पोल कशामुळे फ़सलेले आहेत? त्यांना पुर्वी जयपराजयाची भाकिते नेमकी ताडता येत होती आणि आजकालच ती का फ़सू लागली आहेत? त्याचे कारण मोदी-शहांनी बदलून टाकलेले निवडणूक नियम आहेत. हे नियम कुठल्या कायद्यात नाहीत की आयोगानेही लागू केलेले नाहीत. सर्व शालेय विद्यार्थ्यांना मेहनत सक्तीची नसते, तसेच हे मोदी-शहांचे नियमही सर्व पक्षांना स्वेच्छेने स्विकारले तर घेता येतील. त्याची सक्ती नाही. परंतु त्यामुळेच मोदी-शहा मोठी बाजी मारत असतील, तर इतरांनाही त्याच मार्गाने जाण्याखेरीज पर्यायही राहिलेला नाही. ते नियम आहेत आपला म्हणून अधिकचा मतदार घराबाहेर काढण्याचे व उदासिन मतदाराला आपल्या पारड्यात आणून बसवण्याचे आहे. त्यावरच गुजरातची भाजपा निती विसंबलेली आहे. गेल्या आठवड्यात एका जाणत्या गुजराती पत्रकाराने मला एक कोष्टक पाठवले आणि त्याचा अभ्यास करायला सांगितले. ती मतचाचणी कुठल्या माध्यमसमुहाने घेतलेली नाही वा वाहिनीवर जाहिरपणे समोर आणली गेलेली नाही. भाजपाच्या अंतर्गत प्रचाराचे नियोजन करण्यासाठी मांडलेले ते समिकरण आहे. त्यात कुठेही भाजपाला इतक्या जागा हमखास मिळतीलच, असा दावा अजिबात केलेला नाही. तर किती टक्के मतदान झाल्यास त्यात भाजपाचा हिस्सा किती असेल आणि त्यामुळे भाजपाला किती जागा लाभू शकतील, त्याचे विवरण दिलेले आहे. किमान ६० टक्के मतदान गुजरातमध्ये झाले तरी भाजपाला बहूमताचा म्हणजे ९५ जागांचा पल्ला गाठता येतो. आजवरचा इतिहास असा आहे, की गुजरातमध्ये नेहमी ६० टक्केच्या आसपास मतदान झालेले आहे. म्हणजेच सरसकट मतदान झाले तरी भाजपाच्या गुजरातमधील सत्तेला धोका नाहीच. पण सवाल असलेली सत्ता टिकवण्याचा नसून, मोदींची पंतप्रधान म्हणून किमया सिद्ध करण्याचे आव्हान भाजपा समोर आहे.

या कोष्टकात ६४ ते ७६ टक्के मतदान होत गेले, तर प्रत्येक दोन टक्केवाढीने भाजपाला किती टक्के हिस्सा वाढणार आणि त्याचे जागांच्या संख्येत कशी वाढ होणार याचे गणित मांडलेले आहे. यापैकी आजच ज्या चाचण्या आलेल्या आहेत, त्यानुसार कोणीही भाजपाचे बहूमत हुकण्याचा संकेतही दिलेला नाही. कितीही अटापिटा केला तरी कॉग्रेसला कुठल्याही चाचणीने ६० हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्याची हिंमत दाखवलेली नाही. इतके असूनही मग मोदी-शहा ही जोडगोळी इतके श्रम कशाला घेते आहे, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. तर त्याचे कारण शहा यांनी १५० पुढे जागा मिळवण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे. तो कसा गाठता येईल त्याचे उत्तर इतरांना सापडत नसले, तरी मला मिळालेल्या कोष्टकात त्याचा खुलासा करण्यात आलेला आहे. मतदानाची टक्केवारी वाढत जाते तसतसा भाजपाच्या त्यात असलेला हिस्साही वाढत जातो आणि तो ६८ टक्केवारी ओलांडली गेल्यावर अतिशय वेगाने भाजपाच्या जागा वाढवू लागतो. मतदान ६० ते ६८ होईपर्यंत एकदोन जागांनी संख्या वाढते. पण ६८ च्या पुढे मतदानाची टक्केवारी सरकू लागली की भाजपाच्या जागांमध्ये ५-६ जागांची भर पडू लागते. टक्केवारी ७६ पर्यंत गेली म्हणजे भाजपाला दिडशेहून अधिक जागा जिंकणे शक्य होते. त्यासाठी अल्पेश व हार्दिक अशा तरूण नेत्यांना भाजपाने हाताशी धरलेले नाही. कारण त्यांच्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढत नाही किंवा त्यातला हिस्साही कमिअधिक होत नाही. असे लोक वातावरण निर्मिती करून नक्की देतात. पण त्यांच्यामुळे प्रभावित झालेला मतदार केंद्रापाशी येऊन मतदान करणार नसेल तर वातावरण निर्मितीचा काहीही उपयोग नसतो. म्हणूनच जो टक्केवारी वाढवत जाण्यासाठी मेहनत घेईल, तोच बाजी मारून जाणार हे आजच्या काळातील निखळ सत्य आहे.

राहुल गांधी महिनाभर आधी गुजरातला पोहोचले व त्यांनी प्रसार माध्यमातून धमाल उडवून दिलेली आहे. त्यामुळे गुजरातचे वातावरण तापलेले आहे, यात शंकाच नाही. पण तापलेल्या वातावरणाचा लाभ उठवित नाराज प्रत्येक मतदाराला केंद्रापाशी ठरलेल्या दिवशी आणुन व्यक्त व्हायला भाग पाडणारी यंत्रणा वा सज्जता कॉग्रेसपाशी नाही. ती मागल्या तीनचार दशकापासून नाही. म्हणूनच २००९ सालात गुजरातच्या २६ पैकी १२ लोकसभा जागा कॉग्रेस सहजगत्या जिंकू शकली होती व मोदीही कॉग्रेसला रोखू शकलेले नव्हते. कारण मतदानाच्या एकूण टक्केवारीत जितका कॉग्रेसचा हिस्सा आपोआप येत होता, त्याला कुठेही बाधा आणली जात नव्हती. हे गणित २०१४ च्या लोकसभा मतदानापासून बदलले आहे. गुजराती पंतप्रधान म्हणून उत्साहाने जे मतदान वाढले व भाजपाच्या प्रयत्नांनी वाढले, त्यापैकी ६० टक्के हिस्सा भाजपाच्या वाट्याला आला आणि सर्वच्या सर्व जागा भाजपाला मिळून गेल्या. कॉग्रेसला गुजरातमध्ये भोपळाही फ़ोडता आला नाही. अन्यथा विधानसभा किंवा लोकसभा मतदानात भाजपाने कायम ४५ टक्केहून अधिकचा हिस्सा राखलेला होता आणि बहूमतही सहज मिळवलेले होते. मोदींच्या काळात ते १२० जागांच्या आसपास घोटाळू लागले. तरी कॉग्रेसच्या ३०+ टक्केवारीत भर घालण्याचा कुठलाही प्रयास त्या पक्षाच्या नेतृत्वाने केला नाही, किंवा त्यासाठी कधी मेहनत घेतली नाही. म्हणून मोदी वा भाजपाचे काम सोपे होऊन गेलेले होते. यावेळी तर शहांनी एकूण मतदान ७६-७८ इतक्या टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याची जय्यत तयारी सहा महिने आधीपासून चालविली आहे. त्याचा कॉग्रेस वा राहुल गांधींना थांगपत्ता नव्हता आणि अजूनही ते लोक आपोआप होणार्‍या मतातल्या हिश्यावरच विसंबून विजयाची स्वप्ने बघत आहेत. म्हणून त्यांचा उत्साह अभ्यासात हलगर्जीपणा करणार्‍या मुलांसारखा केविलवाणा वाटतो.

नोटाबंदी व जीएसटी अशा कारणांनी आपल्याबद्दल काही प्रमाणात नाराजी असणार, हे शहा मोदी ओळखून आहेत आणि होते. म्हणूनच त्यांनी घटणार्‍या मतदाराची बेगमी करणारी रणनिती आखून एकूण मतदानात उदासिन मतदाराला ओढून घट भरून काढण्याची रणनिती आधीपासून योजलेली होती. त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा व मनुष्यबळही उभे केलेले आहे. तीन आठवड्यापुर्वी अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिविशाल सभा योजलेली होती. त्यात गर्दी तोकडी पडली वा किती खुर्च्या रिकाम्या होत्या, याची वर्णने छापण्यात अनेक पत्रकार गर्क होते. भाजपाच्या दाव्याप्रमाणे तिथे दहा लाख उपस्थिती नसेल कदाचित. पण इथे श्रोत्यांची गर्दी जमवलेली नव्हती. ते सामान्य नागरिक नव्हते की नुसतीच गर्दी नव्हती. आपल्या भाषणात मोदींनी त्यांचा उल्लेख पन्नाप्रमुख असा केलेला होता. खरी बातमी तिथेच होती. पण त्याचा कुठलाही उहापोह अजून माध्यमातून झालेला नाही. पन्नाप्रमुख याचा अर्थ मतदार यादीच्या एका पृष्ठावर जितकी नावे छापलेली असतात, त्या मर्यादित लोकसंख्येला नियंत्रित करणारा एक भक्कम कार्यकर्ता! या कार्यकर्त्याने तितक्या ६०-७० मतदारांशी महिनाभर संपर्कात राहून प्रचार करायचा आणि अखेरच्या दिवशी मतदानात त्यातला कोणी उदासिन राहू नये याची काळजी घ्यायची. शेवटच्या दोनतीन तासात राहिलेल्या प्रत्येकाला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचे काम पार पाडणारा तो पन्नाप्रमुख होय. असे सात लाख सभेत आलेले असतील तर त्याला प्रत्येकी पन्नासने गुणले तरी संख्या किती होते? सहज ही संख्या साडेतीन कोटीच्या पलिकडे जाते. तो प्रत्येक कार्यकर्ता सर्वच मतदारांना बाहेर काढण्यात यशस्वी होणार नाही. पण आळसाने मतदान टाळणार्‍या निदान ७०-८० लाखाहून जास्ती मतदाराला बाहेर काढले गेले, तरी त्यातला मोठा हिस्सा आपोआप भाजपाच्या पारड्यात जाणार असतो.

येत्या गुजरात विधानसभेचे हे गणित वा समिकरण अमित शहांनी मांडलेले आहे आणि त्याचा पहिला प्रयोग त्यांनी उत्तरप्रदेश यासारख्या तिपटीने मोठ्या राज्यामध्ये यशस्वी करून दाखवला आहे. मेरीट वा गुणात्ता यादी गाठण्यासाठी उत्सुक मुले लोकांना दिसणारा वा पालकांचे डोळे दिपवण्यासाठी अभ्यास करीत नसतात. कुठेही कमी पडू नये म्हणून आधीच्या वर्षात झालेल्या परिक्षांच्या प्रश्नपत्रिका एकामागून एक सोडवून उत्तम सराव करीत असतात. एका एका प्रश्नात मिळू शकणारे मार्क जाता कामा नयेत, म्हणून बारीकसारीक काळजी घेत असतात. मोदी-शहांची जोडगोळी अशीच निवडणूकांमध्ये अधिकाधिक पल्ला गाठण्याच्या इर्षेने कामाला लागलेली असते. अमूक ठिकाणी आपली स्थिती चांगली आहे वा सहज जागा जिंकणे शक्य आहे, यासाठीही गाफ़ील रहायला ते तयार नसतात. याची उलटी बाजू त्यांच्या विरोधी गोटातील लोकांची बघता येईल. राहुलनी उत्तरप्रदेशात अखेरच्या क्षणी अखिलेशला सोबत घेतले आणि बोर्‍या वाजला होता. आता अल्पेश, हार्दिक वा जिग्नेश अशा काही किरकोळ प्रभावी तरूणांना हाताशी धरून मेरीट गाठण्याच्या गमजा केल्या जात आहेत. त्यातून देखावा छान निर्माण होतो. पण परिक्षेचा निकाल त्यामुळे बदलत नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. कारण परिक्षेच्या प्रश्नपत्रिका, प्रश्नांचे स्वरूप व त्यात कुठे किती मार्क्स मिळवणे सोपे वा कठीण आहे; त्याची संगतवार मांडणी हुशार विद्यार्थी करतो. नेमके तेच मोदी-शहांचे तंत्र आहे. राहुल होईल तितक्या मतदानातील आपल्या हिश्श्यावर विसंबून आहेत आणि मोदी-शहा मतांची टक्केवारीच आणखी दोनपाच टक्क्यांनी वाढवून त्यातला आपला हिस्सा वाढवण्याच्या तयारीत मग्न आहेत. मग यातून कोण कसा व कोणत्या कारणांनी बाजी मारून जाईल, ते वेगळे समजावून सांगण्याची गरज आहे काय? आणखी बरोबर एक महिन्याने गुजरातचा निकाल लागलेला असेल, तेव्हा ह्या लेखातील तपशील तपासून बघता येईल.

6 comments:

  1. वा,भाऊ....

    अत्यंत अभ्यासू असे विश्लेषण आहे...

    हिमाचल चा धडा गिरवला गेला तर 76 % मतदान व्हायला हरकत नाही

    ReplyDelete
  2. नक्कीच!!
    हा लेख 18 डिसेंबर ला परत एकदा वाचवा लागणार!
    बघूयात किती खरी ठरते भाऊ तुमची ही भविष्यवाणी...
    वाट पाहतोय.....

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    लेख मनापासून पटला. काळजीपूर्वक नियोजन ही मोदी-शहा जोडगोळीची प्रमुख ताकद आहे. आता हेच बघा ना, जर पन्नाप्रमुखांची सभा होती तर तिची अतिविशाल म्हणून कशासाठी जाहिरात केली? इथेही चतुर नियोजन दिसून येतं. समजा जर हे पन्नाप्रमुख उत्साहाने आपापल्या पन्नेदारांना घेऊन सभेला आले असते तर पुरेशी जागा हवी ना? नाहीतर हक्काचा मतदार नाराज होईल. एकवेळ रिकाम्या खुर्च्या दिसल्या तरी चालतील पण हातचा मतदार कोण सोडेल? अशा बारीकसारीक गोष्टींतून मोदी-शहा आपल्या मतदारांची काळजी घेत असतात. पण हे सगळं बघणार कोण, आणि बघितलं तरी उलगडून सांगणार कोण ? तुमचे खरंच आभार मानले पाहिजेत.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. भाऊ काय सटीक विश्लेषण केलाय, मोदी शाह ज्या गंभीरतेने राजकारण करतात त्याच्या एक टक्का हि राजकारण पप्पूला कळले तरी खूप आहे

    ReplyDelete
  5. भाऊ पत्रकार व लेखक म्हणून लेख ठीक आहे पण गुजरात मधे बदलाचे वातावरण दिसते चंद्रावर बटाटा पिकवुन गुजरात मधे फप्पू यंत्र वापरून त्याचे सोने कांगी करणार आहे मग bjp ला कोण मत देणार ???

    ReplyDelete