Friday, November 3, 2017

ममताची मातोश्री भेट

mamata at matoshree के लिए चित्र परिणाम

मुंबईत उद्योगपतींना भेटायला आलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्याने अनेकांना पोटशूळ उठलेला आहे. प्रामुख्याने भाजपाच्या समर्थकांनी त्यामुळे शिवसेनेच्या हिंदूत्वावर प्रश्नचिन्ह लावण्याचा उतावळेपणा केलेला आहे. हे अर्थात़च अनुयायांचे कामच असते. नेत्यांनी त्यांना हवे तसे वागावे आणि अनुयायांनी मग त्याचे कुठल्याही टोकाला जाऊन समर्थन करावे, हा आता पक्षीय राजकारणाचा परिपाठ झाला आहे. त्यामुळे सेना विरोधकांनी गदारोळ करणे स्वाभाविक आहे आणि त्यापुर्वी शिवसैनिकांनी काश्मिरातील पीडीपी भाजपा युतीवरून शिव्याशाप देणे क्रमप्राप्तच असते. मात्र पडद्यामागे काय चालू आहे, याचा अशा अनुयायांना कधीच पत्ता नसतो. म्हणून अनुयायी वा भक्त कुणाचेही असोत, त्यांनाच बिचार्‍यांना तोंडघशी पडावे लागत असते. आताही ममता मातोश्रीवर कशाला गेल्या, याचा शोध घेण्याची कोणालाही गरज भासलेली नाही. ही त्यातली खरी गंमत असते. तर त्याचे मुख्य कारण २०१९ सालातील लोकसभेचे वेध बहुतांश राजकारण्यांना आतापासून लागलेले आहेत आणि त्याची हाणमारी गुजरात विधानसभेचे निकाल हाती आल्यानंतर तात्काळ सुरू होणार आहे. त्यात ममतांच्या सत्तेला आज तरी धोका नाही. कारण अजून त्यांच्यापाशी तीन वर्षाचा विधानसभेचा कालावधी शिल्लक आहे. पण राष्ट्रीय राजकारणात टिकून रहायला त्यांना आपले लोकसभेतील व राज्यसभेतील बळ टिकवणे भाग आहे. त्यासाठीची जमवाजमव आतापासून करणे गरजेचे आहे. कारण मागल्या सात आठ वर्षात जितके काम सोपे होते, तितके आता बंगालचे लोकमत जिंकणे त्यांच्यासाठी सोपे राहिलेले नाही. त्यांचा एक अतिशय जवळचा विश्वासू सहकारी त्यांना सोडून गेलेला आहे आणि तो शत्रू गोटात म्हणजे भाजपात दाखल होण्याच्या वावड्या उठालेल्या आहेत.

ममता दिदींनी कॉग्रेसला रामराम ठोकून १९९८ सालात तृणमूल कॉग्रेस पक्षाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हापासून त्यांना त्यात पुढाकार घेऊन मदत करणार्‍यात मुकुल रॉय या नेत्याचे अग्रस्थान होते. भलेबुरे दिवस कसेही आले, तरी मुकुलदा दिदींच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले होते. कुठल्या मतदारसंघात उमेदवारी मिळवणे किंवा मंत्रीपदावर दावे करणार्‍यात त्यांचा समावेश होत नाही. त्यापेक्षा पडद्यामागे राहून त्यांनी पक्षाची अतिशय काळजीपुर्वक बांधणी केलेली होती. समोर ममतांचा लोकप्रिय चेहरा असला, तरी पडद्यामागून सुत्रे हलवणारा नेता मुकुलदा होते. विविध जिल्हा तालुका पातळीवरील पदाधिकारी वा पक्षाच्या विविध उपसंघटनांची बांधणी करण्यात मुकुलदांचे श्रेय मोठे आहे. मात्र आपण लोकांची मने जिंकू शकत नाही, याचीही जाणिव त्यांना आहे. असे असतानाही त्यांनी ममताची साथ सोडलेली आहे. कारण दोन वर्षापुर्वी दुसर्‍यांदा विधानसभेत प्रचंड बहूमत मिळाल्यानंतर ममतांनी पद्धतशीरपणे आपला वारस म्हणून भाच्याला पुढे आणलेले आहे. तसे करताना मुकुल रॉय यांना कटाक्षाने बाजूला ठेवले गेलेले होते. तिथून मग दोघातला दुरावा सुरू झालेला होता. मागल्या नवरात्री उत्सवाच्या काळात त्यावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यांनी पक्षाचा राजिनामाच देऊन टाकला. पण इतर नेत्यांच्या बाबतीत होते तसे काही झाले नाही. त्यांनी पक्ष सोडला म्हणून आपल्या जुन्या नेत्यावर किंवा सोडलेल्या पक्षावर दुगाण्या झाडलेल्या नाहीत. अलिकडेच त्यांनी राज्यसभेचाही राजिनामा देऊन टाकला आणि आता त्यांचा तृणमूल कॉग्रेसशी काडीमात्र संबंध राहिलेला नाही. त्यामुळेच मुकुलदा आता कुठल्या पक्षात जाणार, याची कोलकात्यात चर्चा आहे. त्याच बरोबर ममतांनाही यांच्या इतका खंदा सहकारी कुठून मिळणार, याची चिंता भेडसावते आहे. कारण जिथे जातील तिथे मुकुलदा उत्तम संघटना उभारतील, याचीही दिदीला खात्री आहे.

मुकुलदा व भाजपाचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गिय यांची भेट होणार असल्याच्याही बातम्या होत्या. त्यानंतर ते भाजपात दाखल होतील, अशाही वावड्या उठलेल्या होत्या. तसे झाले तर भाजपाला बंगालमध्ये अतिशय कुशल संघटक मिळू शकेल. सहाजिकच मुकुलदा यांनी बाहेर पडताच ममतांवर तोफ़ा डागाव्यात, अशीही भाजपाच्या काही समर्थकांची अपेक्षा होती. पण तसे अजिबात झालेले नाही व होण्याची शक्यताही नाही. कारण तो मुकुलदांचा स्वभावही नाही., ते मितभाषी व मुरब्बी राजकारणी आहेत. त्यामुळेच लोकप्रिय नेत्याची निंदानालस्ती करून बस्तान बसवता येत नाही, हे त्यांना पक्के कळते. आजही ममता बंगालमध्ये लोकप्रिय असून, त्याच्यावर टिका करून काही साधणार नाही. त्यापेक्षा त्यांच्या दुबळ्या बाजू समोर आणून ममतांना शह देता येईल, हे या नेत्याला पक्के ठाऊक आहे. किंबहूना डाव्या आघाडीला संपवताना हीच रणनिती त्यांनी ममतांच्या माध्यमातून यशस्वी केलेली होती. म्हणूनच त्यांनी आपली भावी दिशा स्पष्ट केलेली नसली, तरी ममतांना शह देण्याचा त्यांचा मनसुबा पक्का आहे. तो यशस्वी करायचा तर त्यांना डावी आघाडी वा कॉग्रेस या थकलेल्या घोड्यांवर स्वार होऊन चालणार नाही. त्यापेक्षा भाजपाचा तजेलदार घोडा उपयुक्त आहे. पण थेट हिंदुत्ववादी भाजपात सहभागी व्हाय़चे, की वेगळा प्रादेशिक पक्ष काढून भाजपाशी हातमिळवणी करायची, याचा निर्णय ते घेऊ शकलेले नाहीत. मात्र मुकुल रॉय आपल्याला धक्का देऊ शकतात, याविषयी ममताच्या मनात शंका नाही. म्हणूनच त्यांनी आताच देशव्यापी राजकारणात पुढाकार घेण्याचा मनसुबा बाळगला आहे. त्यात भाजपा विरोधातली आघाडी उभी करून, तिचे नेतृत्व ममतांना करायचे आहे. त्यात कडव्या भाजपा विरोधकांना जवळ करायचे असेल तर त्यांनी मुंबईत शिवसेना मित्र बनवण्यात गैर काहीच नाही. नाहीतरी सेनेला एनडीएतून बाहेर पडायचे वेध लागलेले आहेतच.

आगामी लोकसभेत भाजपा-सेना युती अशक्य आहे. पण भाजपाला बाजूला ठेवून ममता नव्हेतरी त्यांच्या पुढाकाराने कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशी सेना हातमिळवणी करू शकते. हे तीन घटक किंवा फ़क्त कॉग्रेस व सेना एकत्र आले, तरी भाजपाला मोठा धक्का निदान महाराष्ट्रात देऊ शकतात. ममतांच्या डोक्यात तेच गणित असू शकते. शिवसेनेलाही त्यातून नुकसान कुठलेच नाही. हिंदूत्वाच्या भूमिकेला आता अर्थ राहिलेला नाही. कुठूनही आपले लोकसभेतील बळ टिकवणे व विधानसभेतही बळ वाढवून मिळण्याची गणिते सेनेने मांडण्यात गैर काहीच नाही. मागल्या तीन वर्षात युती व सत्ता यांच्या बाबतीत शिवसेनेने ज्या भूमिका घेतलेल्या आहेत, त्यानंतर त्यांनी आगामी लोकसभेत भाजपा सोबत रहाण्यात कुठलाही कार्यभाग साधला जाण्याची शक्यता नाही. मग निदान सूडबुद्धीने भाजपाला अपशकून करण्यात काय गैर आहे? जितक्या जागा भाजपा महाराष्ट्रात गमावेल, तितकी त्याची लोकसभेतील संख्या कमी होऊ शकते. त्यातून कॉग्रेसचे बळ वाढले तर आपल्यामुळे वाढल्याचा दावा शिवसेना करू शकते. किंबहूना विधानसभेच्या वेळी मोडलेल्या युतीची किंमत वसुल झाल्याचा आनंद सेना मिळवू शकते. त्यात हिंदूत्व आडवे येण्याचा काहीही संबंध नाही. तसेही आता भाजपा वा सेनेला हिंदूत्वाशी कर्तव्य उरलेले नाही. त्याच दिशेने किती पुढे जाता येईल, त्याची कॉग्रेसप्रणित आघाडीच्या बाजूने चाचपणी करायला ममता बहुधा मातोश्रीवर गेलेल्या असाव्यात. त्या इथे महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याची शक्यता नाही, किंवा शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढणार नाही. म्हणूनच दोन्हीकडल्या अनुयायी भक्तांनी नाके मुरडण्यात काही अर्थ नाही. वरकरणी ही सदिच्छा भेट असते आणि त्यात भविष्यातील डावपेचांची समिकरणे मांडली जात असतात. सेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस लोकसभेसाठी एकत्र आले तर काय होईल, याची नुसती कल्पना करा. मग या भेटीतले ‘ममत्व’ लक्षात येऊ शकेल.


========================

मुद्दा कुठे भेट झाली हा नसून दोघे भेटले व त्यांच्यातून काय राजकारण होऊ शकते असा आहे.
तरीही लेखातला चुकीचा उल्लेख दाखवणार्‍यांचे मनपुर्वक आभार.


14 comments:

  1. 25 वर्ष जुन्या मित्राला चांगले दिवस आल्यावर बाजूला सारले .... पदोपदी अपमान केला ... तेव्हा ही प्रतिक्रिया साहजिकच आहे ..... NDA आणि देशातील सर्व पक्ष संपवण्याचा घाट घातला जात आहे .

    ReplyDelete
  2. भाऊ लेख छान लिहलात, पण एक सुचवावे वाटलं... ममता भेटायला गेल्या नाहीत,ABP माझा यांचे बातमी नुसार त्यांची मुंबईतील ट्रायडंट येथे भेट झाली.

    ReplyDelete
  3. bhau ek prashna... CBI, ED chaukashi chalu aslele sarv nete achanak BJP madhe kase jatat? na khunga na khane dunga che kay jhale?

    ReplyDelete
  4. भाऊ ममता मातोश्री वर नव्हत्या गेल्या... त्यांची भेट ही हॉटेल रॅडिसन मध्ये झाली होती..

    ReplyDelete
  5. हा लेख भाऊंनी लिहिलाय? वाटत नाही। आणि ममता मातोश्रीवर गेल्या नव्हत्या। ट्रायडंट हॉटेलवर त्यांची भेट झाली। कशाला चुकीची माहिती द्यायची?

    ReplyDelete
  6. भाऊ, पेपर मधल्या बातम्यां प्रमाणे ही भेट मातोश्रीवर नाही तर हे हाॅटेल मध्ये ट्रायडंट मध्ये झाली. याचा अर्थ बाळासाहेबांचा पायंडा मोडून ऊध्धव भेटीला गेले होते.

    ReplyDelete
  7. Meeting was not at Matoshree , but at a Hotel. Request you to kindly correct the same. Would also like to know your view about how Matoshree itself came out for meeting this time. A rare occasion indeed.

    So we can now assume that next time Amit Shah / Modi are in Mumbai, they can ask for meeting outside of Matoshree and Thackerays can oblige :p

    ReplyDelete
  8. shivsena congress sobat gelyas tyancha hakkaachaa matdar ghatanyachi shakyata aahe. tasech congress, ncp doghe ekatra alyas te ugich shivsenenche lodhane galyat adakavnaar naahee. tyamule shivsena ekati padanyacha dhoka ahe.

    ReplyDelete
  9. भाऊ खरी बातमी नक्की काय आहे ?एका वृत्तपत्राने असे छापले आहे की मातोश्रीवर ममता बॅनर्जी यांना न बोलवता त्या ज्या triend हॉटेलमध्ये उतरल्या होत्या तिकडे हे ठाकरे पितापुत्र त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते

    ReplyDelete
  10. modi viruddha itar asa "samna" 2019 la honar asun, sena ek prakare modinna madat karat ahe. bapane kashta karun gamavaleli estate kartavyashunya mulga vyasani mitranchya nadi lagun udhalato tasech ahe. senela development che kahi ghene dene nahi, nusti dalali ani khandani vasul karaychi ahe. he 1980, 1990 madhe chalat hote, pan yacha ant hone javal ale ahe. marathi marathi karat mate senela milat rahtil pan balasahebanchi sena 2019 la virun jayil ani kamkuvat (b)Uddhu sena shillak rahil.

    ReplyDelete
  11. भाउ, वर्तमानपत्रातील बातम्यांप्रमाणे ही भेट मातोश्रीवर झालेली नाही. सेनाप्रमुख त्यांनाभेटायला त्रयस्थ ठिकाणी गेले होते. राष्ट्रीय मित्रपक्षाचे नेते मातोश्रीवर आले नाहीतर अपमान समजणार्यांनी नवी समीकरणे साधण्यासाठी शत्रुचा शत्रु तो आपला मित्र ह्यानात्याने ममतांना भेटले आहेत,
    ममता जे राजकारण करतात त्यात शिवसेना पक्षाला जवळ करण म्हणजे, त्यांच्या मतपेढीचे नुकसान आहे, त्यामुळे ही भेट ममतांनी घेतलेली नसुन ममतांची भेट घेतली आहे. त्यामुळे भुवया उंचावल्या आहेत.
    आनंदीबेन पटेल, गुजराथमधील औद्योगिक मेळाव्यासाठी उद्योगपतींना भेटायला मुंबईत आल्यातर त्यावर टिका करणार्यांनी आता का मुग गिळावे ?
    कारण स्वार्थ, शत्रुचे नुकसान तर आपला फायदा, भाजपच्या नेत्यांना विचलीत करुन ते काही राजकीय चुका करतील याचा फायदा उठवता येईल या अपेक्षेने हे चालु आहे.
    त्यामुळेच राहुलमधील नेतृत्वगुणांचाही झालेला आहेसाक्षात्कार

    ReplyDelete
  12. Bhau Kolkata madhe ek Shivsena nawacha paksh aahe...kon chalavta aani tyacha mumbai shivsenesi kay sambandh mahit nahi pan zenda aani dhanushya baan same aahet

    ReplyDelete
  13. भाऊ ही तुमची भाषाशैली वाटत नाही...लेख तुम्ही लिहिललाय असे वाचताना वाटलेच नाही....क़ाय गौड़'बंगाल'आहे हे नेमके?

    ReplyDelete
  14. वैधानिक इशारा, काही तरी चुकतंय

    ReplyDelete