दक्षिणेचा सुपरस्टार कमल हासन याने राजकारणात पदार्पण केले आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस त्याने ‘इंडिया टुडे’च्या दक्षिण भारतीय परिसंवादामध्ये भाग घेताना प्रदिर्घ मुलाखत दिलेली होती. तेव्हा त्याला वारंवार एक प्रश्न विचारला जात होता की तो राजकारणात कधी येणार. तेव्हा त्याने अतिशय मुरब्बीपणाने आपण आताही राजकारणात आहोत, असे उत्तर दिले होते. जेव्हापासून मतदान करू लागलो, तेव्हापासून मी राजकारणात असल्याचेही म्हटले होते. मात्र राजकारणात पडायचे त्याने साफ़ नाकारले होते. कारण राजकारणात राहून कोणी प्रामाणिक येऊन शकत नसल्याचा त्याचा दावा होता. मात्र त्या घटनेला वर्ष पुर्ण होण्याआधीच कमल हासनला थेट राजकीय पक्ष काढण्याची व नेता होण्याची घाई झालेली आहे. खरेतर त्याच्याही आधी रजनीकांत या त्याच्या समकालीन अभिनेत्यानेही राजकारणात येण्याचे संकेत वारंवार दिलेले होते. पण अजून तरी त्याने कुठले पाऊल उचललेले नाही. उलट आरंभी साफ़ नकार देणार्या कमल हासनचा उतावळेपणा लपून राहिलेला नाही. त्याला लौकरात लौकर तामिळनाडूच्या राजकारणाचा अधिपती व्हायचे आहे. म्हणूनच सातत्याने राजकीय भूमिका व वक्तव्ये करण्याचा त्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्यातच त्याने हिंदू दहशतवादाचा मुडदा उकरून काढलेला आहे. याचा अर्थ तो योग्य दिशेने चालला आहे, असेच म्हणायला हवे. कारण असे काही बोलले नाही, तर त्याच्याकडे कोण ढुकून बघणार नाही. माध्यमांना हवे असलेले खाद्य पुरवल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही आणि राजकारणाचा रस्ता खुला होत नसतो. त्यामुळेच वोलण्यात किती तथ्य आहे त्यापेक्षा बोलणे किती सनसनाटी माजवणारे आहे, त्याला प्राधान्य असते. कमल हासन त्याच दिशेने वाटचाल सुरू केल्याची ही दुसरी खूण आहे. यापुर्वी त्याने आपला रंग भगवा नसल्याची कल्पना दिलेलीच होती.
अजून तरी भारतीय माध्यमात हिंदू, भगवा अशा गोष्टींना शिव्याशाप देण्याला बाजारभाव चांगला मिळतो. मग विक्रेता कोणी का असेना? त्यामुळेच राजकारणात यावे असे वाटू लागल्यापासून कमला हासन याने हिंदूत्ववादी दुखावतील किंवा डिवचले जातील, असे पवित्रे घ्यायला आरंभ केलेला आहे. म्हणून तर केरळात जाऊन त्याने अगत्याने मार्क्सवादी मुख्यमंत्री पिनयारी विजयन यांच्यासह भोजनाचा कार्यक्रम साजरा केला. त्याचे काय प्रयोजन होते? त्याचे स्पष्टीकरण कोणी देऊन शकलेला नाही. पण ते निमीत्त धरून आपला आवडाता रंग भगवा नक्कीच नाही, असे वक्तव्य या अभिनेत्याने केले आणि त्याला भरपुर प्रसिद्धी मिळाली. अर्थातच तेवढ्याने भागले नाही. म्हणून असेल कमल हासन याने एका लेखातून भगव्या किंवा हिंदू दहशतवादाची खरूज खाजवलेली आहे. त्यात काही तथ्य नाही, हे त्यालाही कळते. मागल्या तीन वर्षात अनेकांनी ती खरूज खाजवून झालेली आहे. मग आताच त्याने अशा विषयाला हात घालायची काय गरज होती? इतकाच पुळका होता, तर पुरस्कार वापसी झाली तेव्हा कमल हासनलाही आपला पद्म पुरस्कार माघारी पाठवता आला असता. पण तेव्हा त्याने कुठली हालचाल केली नाही. वास्तविक हिंदू दहशतवादाला धडा शिकवण्याची तीच सर्वात योग्य वेळ होती. आज ज्याला कमल हासन हिंदू अतिरेक वा दहशतवाद संबोधतो आहे, त्यालाच विरोध करण्यासाठी पुरस्कार वापसीचे नाटक रंगलेले होते. दिल्ली नजिकच्या दादरी गावात अखलाखच्या हत्याकांडानंतर हे पेव फ़ुटलेले होते आणि त्याचा देशव्यापी गाजावाजा होऊनही कमल हासन बिळात दडी मारून बसलेला होता. मग आताच तसे मुद्दे घेऊन वाचाळता करण्याची काय गरज होती? तर आता त्याला राजकारणाच्या आखाड्यात उतरायचे आहे आणि त्यामध्ये त्याला साथ देऊ शकतील, अशी मंडळी त्याच कंपूतली आहेत ना?
कुठलाही व्यापारी वा व्यवहारी माणूस आपले शेअर वा मालमत्ता चांगली किंमत मिळू शकेल अशाच वेळी विकायला काढत असतो. तसा कमल हासनही पक्का व्यापारी आहे. त्याचे उदात्त विचार वा कृती या बाजारभावाच्या कलानुसार चालतात. तेव्हा पुरस्कार वापसीत सहभागी होऊन काहीही साध्य होणार नसेल, तर त्याने आपल्या तांबड्या रंगाचा व्यापार कशाला करायचा? म्हणून तो गप्प बसला होता आणि आता त्याला राजकीय भांडवल उभे करायचे असल्याने त्याने हे पुरोगामी शेअर्स विकायला काढले आहेत. त्याला कोणी निराशही केले नाही. ना डाव्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, की उजव्या हिंदूत्ववाद्यांनी काणाडोळा केला. हिंदूवादी संघटनेने त्याच्यावर खटला दाखल केला, तर डाव्यांनी तात्काळ त्याच्या पालखीचे भोई होण्यात धन्यता मानलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे द्रविडी राजकारणात त्याला फ़ारसे स्थान असू शकत नाही. तो असली अव्वल तामिळी असला तरी ब्राह्मण आहे आणि द्रविडी राजकारणात ब्राह्मणाला स्थान असू शकत नाही. म्हणूनच अभिनेता लोकप्रिय असला तरी त्याला लोकमत खेळवता येणार नाही. त्यापेक्षा मग लाल सोवळे नेसून पुरोगामी होण्यात शहाणपणा नाही काय? आणि पुरोगामी असल्याचा सर्वात भक्कम पुरावा म्हणजे जिहादी भाषेत बोलणे. ज्या केरळात रोजच्या रोज धर्माच्या नावाने मुडदे पाडले जात आहेत आणि धर्मांतराचा विषय सुप्रिम कोर्टानेही पटलावर आणलेला आहे, तिथे हिंसाचार वा जातीयता असल्याचे कमल बघूही शकत नाही. यापेक्षा त्याच्या पुरोगामीत्वाचा अन्य कुठला पुरावा द्यायला हवा? त्याला देशात कुठे गोरक्षक मुस्लिम गरीबाला ठार मारतात, ते हजारो मैलावरूनही दिसत असते. पण शेजारी केरळ राज्यात संघाच्या कुणा हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचे गळे चिरले जातात ते बघता येत नाहीत., दिसत नाहीत. याला पुरोगामी दुरदृष्टी म्हणतात ना?
थोडक्यात आता अभिनेता कमल हासन राजकीय नेता होऊ घातला आहे आणि त्याने योग्य मार्ग चोखाळला आहे. तामिळनाडूत त्याच्या अभिनयाचे लाखो चहाते आहेत आणि त्यामुळेच त्याला नवखेपणाने मते मागण्याची काही गरज नाही. पण पडद्यावरची लोकप्रियता वा अभिनय, मतांमध्ये परिवर्तित होण्यासाठी तेवढेच पुरेसे नसते. लोकभावनाही समजून घ्यावी लागत असते आणि त्याला पुरक पवित्रेही घ्यावे लागत असतात. त्यात गफ़लत झाली, मग अन्यत्र मिळवलेली लोकप्रियताही मातीमोल होऊन जात असते. जयललिता यांच्यावर अवघी तामिळी माध्यमे रुसलेली होती आणि तरीही त्यांनीच मुख्यमंत्री होण्यापर्यंत मजल मारली. देशात अनेकदा माध्यमांनी वक्रदृष्टी फ़िरवलेले लोकच राजकारणात यशस्वी झाल्याचे आजकालचे दाखले आहेत. कमल हासन याने मात्र लोकांपेक्षाही माध्यमांना जिंकायची तयारी केलेली दिसते. म्हणून की काय, त्याने माध्यमांना वा त्यात दबा धरून बसलेल्या पुरोगाम्यांना चुचकारण्याचे काम हाती घेतले आहे. सहाजिकच त्याचे भवितव्य काय असेल, त्याचा अंदाज करता येऊ शकतो. हिंदू दहशतवादाचा आरोप ही त्याची सुरूवात आहे. एक मात्र नक्कीच होईल. गेल्या दोनतीन दशकात तामिळनाडूतल्या डाव्यांना जनतेमध्ये जाऊन बोलू शकणारा कोणी नेता उपलब्ध नव्हता. कमल हासनच्या निमीत्ताने तो लाभू शकेल. विस्कळीत होऊन गेलेल्या डाव्या पत्रकार व विचारवंतांना ऐकायला गर्दी जमवू शकणारा कोणी मिळून जाईल. पण विधानसभा वा कुठल्या निवडणूका जिंकून तामिळनाडूची सत्ता मिळवण्याचे मनसुबे त्याला बासनात गुंडाळून ठेवावे लागतील. कारण बुद्धीमंतांना भावणारा नेता वा व्यक्ती जनमतापासून दूर जाते, असा भारतीय निवडणूकांचा इतिहास आहे. किमान बोलण्यातून अधिक राजकीय यश मिळवण्याचे जयललितांचे तंत्र या अभिनेत्याला शिकता आलेले नाही.
No comments:
Post a Comment