दिर्घकाळानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आपले चिंतन शिबीर रायगड जिल्ह्यात कर्जत येथे योजले होते. तिथे पक्षाची भावी वाटचाल कशी होईल, याचा उहापोह होण्याची अपेक्षा होतीच. पण देशातील व राज्यातील एकूण राजकारणाची उकल त्यातून प्रमुख कार्यकर्त्यांसमोर व्हावी, अशीही अपेक्षा होती. पण तसे काही फ़ारसे झालेले दिसले नाही. प्रफ़ुल्ल पटेल हे शरद पवारांचा अंतर्यामीचा आवाज म्हणून ओळखले जातात. कुठलीही गोष्ट साहेबांना थेट बोलायची नसते, तेव्हा ती गोष्ट पटेलांच्या तोडातून वदवून घेतली जात असते. त्याचे अनेक फ़ायदे असू शकतात. प्रसंग उलटला तर प्रफ़ुल्ल पटेल यांचे ते व्यक्तीगत मत असल्याचे सांगून हात झटकण्याची मोकळीक असते आणि तशी वेळ आली नाही, तर सामान्य कार्यकर्ते व सहकार्यांना त्यातून योग्य संदेश दिला जात असतो. २०१४ च्या अखेरीस महाराष्ट्रातल्या विधानसभा मतमोजणीचे निकाल स्पष्ट झालेले नव्हते, त्यावेळी घाईघाईने प्रतिक्रीया देताना प्रफ़ुल्ल पटेल यांनीच आधी भाजपाला बिनशर्त पाठींब्याची घोषणा करून टाकलेली होती. त्यावर तिखट प्रतिक्रीया आल्या नाहीत तेव्हा नंतर सवडीने साहेबांनी तात्काळ मध्यवधी निवडणूका नकोत म्हणून तशी तयारी असल्याचे सुचित केलेले होते. त्यातून चतुराईने शिवसेनेला सौदेबाजी करण्यापासून वंचित ठेवले आणि भाजपाला आपणच सत्तेच्या मार्ग मोकळा करून दिल्याचाही देखावा साहेबांनी निर्माण केलेला होता. म्हणूनच प्रफ़ुल्ल पटेल काय बोलतात, ते गंभीरपणे तपासून बघावे लागते. आता त्यांनी कर्जतच्या चिंतन शिबीरात आगामी लोकसभा निवडणूकीनंतर पवारसाहेब पंतप्रधान होऊ शकतात, अशी माहिती दिलेली आहे. तर खुद्द साहेबांनी मात्र आपल्या पंतप्रधानपदाचे स्वप्न सोडून द्या, असेही सांगून टाकलेले आहे. मग यात कोणाचे शब्द खरे मानायचे? खुद्द साहेबांचे की पटेलांचे?
शरद पवार यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न आजचे नाही. पाव शतकापुर्वी त्यांनी तशी झेपही घेतलेली होती. महाराष्ट्रात ते मुख्यमंत्री असताना राजीव गांधी यांचे हत्याकांड झाले आणि तेव्हा लोकसभा निवडणूकीचे मतदानही चालू होते. त्यानंतर स्थिती अशी आली, की संसदेत कॉग्रेसला बहूमत मिळाले नाही, तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून जागा मिळाल्या होत्या आणि त्याच पक्षाचा पंतप्रधान व्हायचे निश्चीत होते. पक्षाचे अध्यक्षपद रिकामी झाले म्हणून तिथे अडगळीत पडलेल्या नरसिंहराव यांची नियुक्ती झालेली होती. पण त्यांना उतारवयात पंतप्रधान होऊ द्यायला अनेकजण राजी नव्हते. तीच संधी साधून शरद पवार यांनी दिल्लीला झेप घेतली होती. पण दिल्लीच्या राजकारणात पडण्यासाठी राज्यातला पाया मजबूत हवा आणि सर्वस्व पणाला लावण्याची हिंमत हवी. पवार तिथे तोकडे पडले. नरसिंहराव यांची पंतप्रधान पदासाठी निवड झाली आणि पवारही त्यात महत्वाचे सहकारी होणार हे ठरले होते. पण मुंबई सोडायला त्यांनी इतका वेळ लावला, की त्या तेनालीरामाने शंकरराव चव्हाण नावाची पाचर आधीच मारून घेतली. गृहखाते शंकररावांना देऊन राव यांनी पवारांना दुसरा क्रमांक मिळू नये, याची पुरेपुर तजवीज केली. दिल्लीत जाण्यापुर्वीच पवारांनी मुंबईचा मोह सोडून कुणाही आपल्या सहकार्याला मुख्यमंत्रीपदी बसवले असते, तर पहिल्या फ़टक्यात त्यांना गृहमंत्री करण्याला पर्याय राहिला नसता. तसे झाले नाही आणि नंतरच्या काळात पवारांच्याच मर्जीतले सुधाकरराव नाईक यांनाही राव यांनी पवार विरोधात उभे केले. अतिशय मुरब्बीपणा वा धुर्तपणा मनातले डाव खेळतानाही मनाला शंकाकुल करून टाकतो. ही पवारांची खरी समस्या आहे. त्यामुळेच स्वप्ने खुप बघितली, पण ती पुर्ततेपर्यंत घेऊन जाण्यात पवार यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यातही आणखी मोठी अडचण म्हणजे धुर्तपणाचा खेळ खेळत बसण्याचा हव्यास होय.
शरद पवार हा महाराष्ट्रात दिल्लीला गवसणी घालू शकणारा यशवंतरावांच्या नंतरचा एकमेव नेता होय. पण त्यांनी आपल्या वाटचालीला उपयुक्त असे राजकारण कमी व धुर्तपणाचा खेळ अधिक केला. त्यातून प्रत्येकवेळी त्यांची अनेक पत्रकारांनी पाठ थोपटली असली, तरी विश्वासार्हता मात्र घटत गेली. नरसिंहराव यांनी सत्ता गमावली आणि जे काही कडबोळे सरकार पुढल्या दोन वर्षात सत्तेत होते, त्याचे नेतॄत्व करायला इंद्रकुमार गुजराल वा देवेगौडा यांची नावे पुढे आली व मान्य झाली. पण शरद पवार या नावाचा विचारही झाला नाही. दिल्लीत झेप घेऊन पाच वर्षे उलटल्यावर पवारांची ही विश्वासार्हता होती. १९९० सालात चंद्रशेखर यांना पंतप्रधान पदी बसवायला पवार यांची शिफ़ारस कारणी लागली होती. त्यांना १९९६ नंतर दिल्लीच्या समिकरणात कोणी हिशोबात धरत नव्हते. वाजपेयी सरकार आल्यानंतरही विरोधकांच्या अनेक बैठका झाल्या. त्यात कॉग्रेसचे विरोधी नेता असून पवारांना कोणी हिशोबात घेत नव्हते, की राष्ट्रवादीची वेगळी चुल मांडून झाल्यावरही विरोधकांच्या बैठकीत पवारांना स्थान नव्हते. याचा अर्थ त्यांची पात्रता नव्हती वा कुवत नव्हती, असे अजिबात नाही. किंबहूना अन्य कोणापेक्षाही पवारच पंतप्रधान पदाला लायक नेता होते. पण एक त्रुटी होती, ती विश्वासार्हतेची! कॉग्रेसमध्ये असताना सोनियांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता आणि युपीए झाल्यावरही सोनियांनी कधी पवारांवर विश्वास ठेवला नाही. ही या नेत्याची शोकांतिका आहे. आज उतारवयात त्यांना पंतप्रधानपद मिळू शकते, अशी भाषा करणारे प्रत्यक्षात आपल्या नेत्याचा गौरव करीत नसतात, तर त्याची टवाळी करीत असतात. एका अनुभवी नेत्याला केविलवाणा असल्यासारखे पेश करीत असतात. यापुढे निवडणूक लढवणार नाही म्हणत मागली लोकसभा पवारांनी टाळली, हे प्रफ़ुल्ल पटेल यांना माहितीच नाही काय? मग त्यांनी असली भाषा कशाला बोलावी?
मागे एका कार्यक्रमात मोठे उद्योगपती व पवारांचे ज्येष्ठ मित्र राहुल बजाज यांनी नेमक्या शब्दात साहेबांचा गौरव केलेला आहे, भारताला न लाभलेले पंतप्रधान असे ते शब्द होते. मोदींचा उदय राष्ट्रीय राजकारणात होण्यापुर्वी दिल्लीत पंतप्रधान व्हायच्या गुणवत्तेचा पवार सोडून कोण नेता होता? चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे किंवा शिवराज पाटिल, अन्थोनी असे नेते महत्वाच्या पदावर आरुढ झालेले होते. पण त्यांच्यापेक्षाही कमकुवत अशा मनमोहन यांना पंतप्रधानपद दहा वर्षे उपभोगता आले. हे अपयश पवारांचे आहे. कारण युपीएमध्ये त्यांच्याइतका योग्य उमेदवार पंतप्रधान होण्यासाठी अन्य कोणी नव्हता. पण सोनिया कधीही पवारांना संधी देणार नाहीत, हेही तितकेच सत्य होते. म्हणून त्यांनी वेगळी चुल मांडली व प्रादेशिक नेता होण्याच्या वास्तवाशी तडजोड केली. त्यांनीच स्वत:विषयी निर्माण केलेल्या समजुती व भ्रम जपण्यासाठी त्यांना भाजपाकडे वा तत्सम आघाड्यांमध्ये सहभागी होणे शक्य झाले नाही. त्यातच खोडकर मुलासारख्या टिवल्याबावल्या करण्याचा छंद सोडता आलेला नाही. त्यातून या गुणी राजकारण्याची हयात वाया गेलेली आहे. एका कार्यक्षम राजकीय नेत्याला टाळून देवेगौडा वा गुजराल अशा दुबळ्यांना पंतप्रधान म्हणून देशाला सहन करावे लागले. हे केवळ पवारांचे वा त्यांच्या पक्षाचे नुकसान नसते. तर एकूण समाजाचा तोटा असतो. पवारांविषयी अनेक आक्षेप घेता येतील वा तक्रारी करता येतील. पण त्या कालखंडात म्हणजे युपीएच्या कारकिर्दीत मनमोहन सिंग यांच्यापेक्षाही चांगला कारभार पवार करू शकले असते. इतके अराजक त्यांनी माजू दिलेच नसते. पण त्यांच्यापाशी बहूमत गाठू शकेल असा पक्ष नाही आणि आता तसा पल्ला मोदी व भाजपाने गाठलेला असल्याने, नजिकच्या काळात तशी राजकीय पोकळीही शिल्लक नाही. हे पवारांनाही कळते. म्हणूनच त्यांनी आपल्या सहकार्यांना अशी स्वप्ने बघायचे सोडून देण्याचा सल्ला दिलेला असावा.
भाऊ पवारांच्या क्षमता बद्दल आपण केलेले लिखाण थोडेसे अतिरंजित व अवास्तव वाटते. या माणसामध्ये येवढीच क्षमता असते तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सर्वांच्या कायम स्मरणात राहील अशी त्यांनी घडविली असते परंतु सर्वजण पवारांना ओळखतात ते भ्रष्टाचाराचे भीष्मपितामह म्हणूनच.
ReplyDeleteअगदी बरोबर. पवार म्हणजे खोडकर मुलगा, पंतप्रधान होण्याची लायकी नाही.
Deleteदिल्लीला कधीही शह न देऊ शकलेला मराठी नेता अशीच शरद पवारांची आजपर्यंतची ओळख आहे. काही प्रमाणात वरच्या कमेंटशि मी सहमत आहे.
ReplyDelete