येत्या जानेवारी महिन्यात दिल्लीतून राज्यसभेवर निवडून जाणार्या तीन जागा रिकाम्या व्हायच्या आहेत आणि त्या तिन्ही जागा आजच्या स्थितीत आम आदमी पक्ष जिंकणार, ही वस्तुस्थिती आहे. कारण त्यांच्यापाशी विधानसभेत ७० पैकी ६६ आमदार आहेत. भाजपाकडे चार असले तरी त्यांना कुठल्याही मार्गाने एकही जागा जिंकता येणार नाही. सहाजिकच या तीनपैकी एक जागा आपल्याला मिळावी, म्हणून या नव्या पक्षातले अनेकजण उत्सुक असल्यास नवल नाही. त्यापैकी कुमार विश्वास हे कवि आरंभापासून आपचे प्रमुख नेता राहिलेले आहेत आणि अलिकडल्या काळात त्यांचे केजरीवाल यांच्याशी संबंध दुरावलेले आहेत. पण त्यांची पक्षातून हाकालपट्टी झालेली नाही. तेही या जागेसाठी इच्छुक असून, त्यांना तिथपर्यंत पोहिचू द्यायचे नाही, अशी खुणगाठ केजरीवाल यांनी बांधलेली आहे. पण विश्वास हेच एकटे इच्छुक नाहीत. नंतरच्या काळात पक्षात येऊन शिरजोर झालेल्या अनेकांचा त्या जागांवर डोळा आहे. त्यात पत्रकारितेचा मुखवटा फ़ेकून आलेले आशुतोष व आशिष खेतान यांचाही समावेश आहे. सहाजिकच अशा कोणाला खुश करावे आणि कोणाला नाराज करावे, अशी समस्या केजरीवाल यांना भेडसावत असली तर अजिबात नवल नाही. त्यामुळेच मग त्यांनी नवा डाव खेळलेला असावा. अन्यथा अकस्मात आपतर्फ़े रघुराम राजन यांचे भजन सुरू झाले नसते. या आठवड्याच्या आरंभी अकस्मात आपतर्फ़े रघुराम राजन यांना राज्यसभेत पाठवण्याची बातमी झळकली आणि दोन दिवसातच अमेरिकेतून राजन यांनी आपला नकार कळवला. तेही स्वाभाविक आहे. कालपर्यंत ज्यांचे नाव अनोबेल पारितोषिकासाठी घेतले गेले, ते गृहस्थ केजरीवाल समजतात, तितके भोळसट नाहीत. किंवा आपला वापर अन्य कुणाच्या राजकारणासाठी मोहरा म्हणून करून देण्याइतके बुद्दू नाहीत.
अर्थात रघुराम राजन हे नकार देतील याची केजरीवाल यांनाही खात्री होतीच. किंबहूना तशी खात्री असल्याने जाणिवपुर्वक राजन यांच्या नावाची केजरीवाल गोटातून पुडी सोडून देण्यात आली होती. सहाजिकच राजन यांच्या नकाराला महत्व नाही. त्यापेक्षाही त्यांच्या नावाची वावडी उडवण्यात आलेल्या बातमीतला अन्य तपशील महत्वाचा आहे. त्यात म्हटले आहे, की पक्षाच्या कोणाही विद्यमान नेत्याला राज्यसभेत पाठवायचे नाही, अशी आपची भूमिका आहे. त्यापेक्षा विविध विषयाचे जाणकार अभ्यासक निवडून त्यांना राज्यसभेत पाठवावे ही भूमिका आहे. त्यातून मग सरकारला धारेवर धरणारे आवाज संसदेत घुमू लागतील, वगैरे युक्तीवाद करण्यात आलेले आहेत. तसे बघितले तर लोकसभेत आजही आम आदमी पक्षाचे चार सदस्य असून, त्यातील भगवंत मान यांनी केलेली नाटके व तमाशे आधीच सर्वश्रूत आहेत. ज्या पक्षाला असले्ल्या संसद सदस्याला पोरकटपणा करण्यापासून रोखता येत नाही, त्यांनी राज्यसभेत अभ्यासपुर्ण बोलणार्यांची तळी उचलून धरावी, हा विनोद म्हणावा लागेल. म्हणूनच त्यातला तपशील समजून घ्यावा लागतो. तो असा आहे, की कोणाही विद्यमान आप नेत्याला राज्यसभेत पाठवायचे नाही, ही भूमिका खरा मुद्दा आहे. आपल्या नेतृत्वाला आव्हान देण्याइतक्या कुवतीच्या कोणालाही पक्षात टिकू द्यायचे नाही, किंवा मोठे होऊ द्यायचे नाही, अशी केजरीवाल यांची आरंभापासूनची भूमिका राहिलेली आहे. सहाजिकच राज्यसभेत मुद्देदूद बोलणारा कोणी सहकारी गेलाच आणि त्याने जनमानस वा कार्यकर्त्यांवर प्रभाव निर्माण केला, तर तो केजरीवाल यांना नको आहे. त्यामुळेच कुठल्याही स्थितीत आपला कोणीही विद्यमान सहकारी त्यांना सत्तस्थानी वा चमकण्याच्या जागी नको आहे. त्यापेक्षा भगवंत मान यांच्यासारखे विदुषक केव्हाही चांगले. त्यामुळेच राजन यांचे नाव फ़क्त फ़ोडणी देण्यासाठी वापरले गेले आहे.
रघुराम राजन हे भारतीय रिझर्व्ह बॅन्केचे गव्हर्नर होते आणि अमेरिकेतही त्यांना अर्थशास्त्राचे जाणकार म्हणून मान्यता आहे. पण त्यांची कार्यकर्ता वा चळवळीचा भाग अशी कधीही ओळख नव्हती. म्हणूनच केजरीवाल किंवा तत्सम लोकांच्या गोतावळ्यात त्यांना स्थान असू शकत नाही. त्यांच्यासाठी राज्यसभेची जागा केजरीवालनी देऊ करणेही मोठा अपमान असू शकतो. म्हणूनच ते भारतीय नागरिक आहेत काय? किंवा परदेशी नागरिकत्व घेतलेल्याला संसदेचे सदस्य होता येईल काय, असली चर्चा निरर्थक आहे. वास्तवात त्यातून या नव्या पक्षातील आपल्या ज्येष्ठ व इच्छुक सहकार्यांना एक संदेश केजरीवालना पाठवायचा होता. तो हेतू साध्य झाला आहे. वास्तव समस्या वेगळीच आहे. कुठल्याही राजकीय पक्षात जशी नेतानिहाय गटबाजी असते, तशीच ती आम आदमी पक्षातही आहे. तिथेही सगळेच केजरीवाल यांच्याही निष्ठावान कार्यकर्ते नाहीत, की आमदारही एकनिष्ठ नाहीत. सहाजिकच पक्षातल्या प्रमुख नेत्यात राज्यसभेच्या जागेवरून हाणामारी सुरू झाली, तर त्याचा विपरीत परिणाम पक्षाच्या संघटनेवर व आमदारांवर होण्याची भिती केजरीवाल यांना सतावते आहे. तसे झाल्यास आमदारांची फ़ाटाफ़ुट तिसरी जागा गमावण्याचेही कारण होऊ शकते. गुजरातमध्ये अहमद पटेल यांना पक्षाच्या आमदारांची हक्काची मते मिळवताना कशी मारामार करावी लागली, ते जगाने बघितले आहे. त्याच कारणास्तव राज्यसभेच्या तीन जागा केजरीवाल यांची झोप उडवून बसल्या आहेत. तिन्ही जागा हक्काच्या आहेत. पण त्यासाठी इतके हक्कदार पुढे सरसावलेले आहेत, की त्यातून कोणाला संधी द्यावी आणि कोणाचा रोष पत्करावा, त्याचा निर्णय केजरीवालना करता आलेला नाही. प्रामुख्याने आशुतोष व खेतान अशा उपटसुंभांना पक्षात घेताना गंमत वाटली होती. तेच आता गळ्यात अडकलेले हाडुक बनु लागलेले आहेत.
दोन वर्षापुर्वीपासून केजरीवाल यांनी दिल्लीबाहेर आपल्या राजकीय महत्वाकांक्षेचे पंख फ़ैलावण्याचा खुप प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचे दिल्लीतील सिंहासन धोक्यात आले होते. महापालिका मतदानात त्यांना सपाटून मार खावा लागलेला आहे. त्यातून सावरण्याची कसरत सध्या त्यांना करावी लागते आहे. अशा स्थितीत राज्यसभेच्या जागेवरून त्यांना पक्षात बेदिली अजिबात नको आहे. पण ज्येष्ठ सहकार्यांच्या हव्यासाला आवर घालू शकणारा अन्य कुठलाही लगाम त्यांच्या हाती नाही. प्रशांत भूषण वा योगेंद्र यादव असे बुद्धीमान सहकारी पुर्वी सत्तेपासून दुर राहुन तो समतोल राखत होते. पण त्यांना हवा तितका स्वच्छ कारभार केजरीवालना शक्य नसल्याने त्या दोघांना पिटाळून लावणे भाग झालेले होते. त्यांची जागा भरून काढायला वाचाळवीर व उथळ बुद्धीचे अन्य सहकारी कामी आलेले असले, तरी पक्षातील बेबनावाला आवर घालण्याची कुवत त्यांच्यापाशी नाही. उलट तेच सत्तापदासाठी पक्षात उचापती निर्माण करण्याचे भय आहे. त्यामुळेच मग केजरीवालना भूषण वा यादव अशांची टंचाई जाणवत असावी. तशा लोकांना राज्यसभेत पाठवून पक्षात समतोल आणण्याचा विचार म्हणूनच पुढे आलेला असावा. पण त्यासाठी आशुतोष वा खेतान अशांना थेट नकार देण्याची हिंमतही केजरीवाल गमावून बसलेले आहेत. पंजाबमध्ये हरल्यापासून कासवाप्रमाणे केजरीवाल यांनी डोके व पाय आत ओढून घेतले आहेत. म्हणून तर मोदींना गुजरातमध्ये हरवण्याची स्वप्ने राहुलकडे सोपवून, त्यांनी थेट काढता पाय घेतला आहे. दिल्लीबाहेर मुलूखगिरी करण्यासाठी आधी दिल्लीतले बस्तान पक्के करण्याचा मनसुबा त्यातून दिसून येतो. ते काम चालू असताना पक्षात आणखी नवी बेदिली निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी रघुरामाचे भजन सुरू केले असल्यास नवल नाही. हळुहळू हा नवा नेता जोश विसरून राजकारणाच्या खाचाखोचा शिकू लागला असे मात्र म्हणता येईल.
भाऊ, सध्या या महाभागाचे काय चालले आहे, कळत नाही. पण बातम्यामध्ये नाहीत.युपी निवडणुकीनंतर एकदम शांत आहेत. काही सांगू शकाल का ?
ReplyDeleteकाही प्राण्यांमध्ये भविष्यातील अस्तित्वासाठी सुप्तावस्था हा प्रकार असतो. पण योग्य ती तरतूद न झाल्यामुळे त्यांचे सुप्तावस्थेतून पुनश्च जागे होणे होत नाही. किंबहुना त्यातच त्यांचा दुःखद अंत होतो.
ReplyDeleteआप ची ही सुप्तावस्था त्यांना चैतन्य प्राप्त करून देते की अंत हे पाहण्यासारखे ठरेल.