Monday, November 6, 2017

पप्पू पास झाला ना?

pappu pass ho gaya ads amitabh के लिए चित्र परिणाम

साधारण पावणे चार वर्षे झाली असतील आता त्या घटनेला! तेव्हा लोकसभा निवडणूक ऐनभरात आलेली होती आणि इतकी रणधुमाळी माजलेली असतानाही भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही मोठ्या वर्तमानपत्र वा वाहिनीला कुठलीही मुलाखत दिलेली नव्हती. त्याविषयी खुपच विचारणा व्हायला लागली म्हणून त्यांनी पहिली मुलाखत दिली ती एका वृत्तसंस्थेला. ए एन आय नावाच्या या वृत्तसंस्थेच्या स्मिता प्रकाश यांनी घेतलेली ती मुलाखत मग बहुतांश वृत्तवाहिन्यांनी प्रक्षेपित केली होती आणि वर्तमानपत्रांनीही बातमी म्हणून प्रसिद्ध केलेली होती. त्यानंतर एक एक करून इतरही वाहिन्या व नेटवर्कना मोदींनी मुलाखती दिल्या होत्या व त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. पण मोदी हा माणूसच अतिशय कुटील व व्यवहारी असल्याने त्याने त्यातून प्रसिद्धीपेक्षाही आपल्या कुटील हेतूला प्राधान्य दिलेले होते. आपल्या मुलाखती बघायला प्रेक्षकांची झुंबड उडत असेल, तर मुलाखत घेणार्‍याला त्यात प्राधान्य असू शकत नाही. किंबहूना त्याला अशा मुलाखतीतून महत्व मिळू नये, याचीही काळजी मोदी धुर्तपणे घेत होते. म्हणूनच त्या कालखंडात नावाजलेल्या कुणाही पत्रकार वा मुलाखतकाराला मोदींनी अजिबात मुलाखत दिलेली नव्हती. शिवाय दुबळ्या वा नगण्य मानल्या जाणार्‍या वाहिन्यांना प्राधान्याने मुलाखती दिलेल्या होत्या. त्यामुळे स्वत:ला या क्षेत्रातील म्होरके समजणार्‍यांची कमालीची घुसमट होऊन गेलेली होती. नंतरच्या काळात असे लोक छोट्या पडद्यावरून अस्तंगतही होऊन गेलेले आहेत. अशा कालखंडात एबीपी या नेटवर्कच्या मुलाखतीत मराठी संपादक राजीव खांडेकर यांनी मोदींना एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला होता. तुमच्यावर कितीकाळ टिका व आसुड ओढले जातील, अशी तुमची कल्पना आहे? त्यावर मोदींनी दिलेले उत्तर मागल्या तीन वर्षात उलगडू लागलेले आहे.

‘ज्यांना माझ्यावर टिका करण्यापलिकडे काहीच करायचे नाही, त्यांच्या प्रश्नांना मी उत्तरे देऊ शकत नाही. ज्यांना समाधान करून घ्यायचेच नाही, त्यांचे कोणी समाधान करू शकत नाही. आणि शिव्याशाप टिकेचाच विषय असेल, तर मोदीचा पराभव होईपर्यंत ते चालूच राहिल. तो त्यांचा अधिकारच आहे. जबतक मोदी हारता नही, तबतक ये सिलसिला चालूच रहेगा’ अशा आशयाचे काहीसे उत्तर मोदींनी तेव्हा दिलेले होते. पण त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी जोडलेली एक पुस्ती आठवते. अशी टिका व शिव्याशाप देणार्‍यांना दुसरे काही करणे वा मोदीला पराभूत करणे शक्य नसेल, तर त्यांना तितकाही अधिकार व सुख नाकारायचे काय? बिचार्‍यांना तितके सुख मिळू द्यावे ना? हे उत्तर तेव्हा थोडे उर्मट वाटले असते. कारण तोपर्यंत एकदोन मतदानाच्या फ़ेर्‍याच पुर्ण झाल्या होत्या आणि अजून खुप मोठे मतदान शिल्लक होते. पण आपण हरणार नाही वा भारतीय मतदार आपल्याला विजयी करणार, याचा आत्मविश्वास त्यातून मोदींनी व्यक्त केला होता. पण ज्यांना आशयापेक्षाही शब्द प्रिय असतात, त्यांना कितीही सोपे करून सांगितले म्हणून समजण्याची हमी कोणी देऊ शकत नाही. ते शक्य असते तर सोशल मीडियाचा वापर करून मोदींनी गेली निवडणूक जिंकली, असे निष्कर्ष काढले गेले नसते. पप्पू म्हणून राहुल गांधींची हेटाळणी त्याच सार्वजनिक माध्यमामुळे झाली, असा अर्थही सोयीसाठी लावला गेला नसता. कुठलाही सेनापती सर्व बाजू बघून व प्रतिस्पर्ध्याचे दुबळे अंग बघूनच हल्ले करत असतो. राहुल गांधी यांनी सोशल मीडियाकडे झालेले दुर्लक्ष थांबवून अलिकडे आघाडी उघडली आहे. त्यामुळे आता त्यांनी मोदींवर मात केली असा निष्कर्ष काढण्याची घाई म्हणूनच ‘संतालाही असंत’ बनवू शकते. कारण मोदींचे दोष वा चुका हे राहुल गांधींचे गुण होऊ शकत नाहीत, याचे भान परिक्षकाला ठेवायला हवे ना?

गुजरातच्या निवडणूका जिंकताना किंवा पुढे लोकसभेच्या आखाड्यात उतरताना, मोदींनी अतिशय धुर्तपणे सोशल मीडियाचा वापर करून घेतला, हे कोणी नाकारणार नाही. पण ते करताना मोदी त्यावरच अवलंबून राहिलेले नव्हते. सोशल मीडियाचा वापर त्यांनी मुख्यप्रवाहातील माध्यमात आपल्या विरोधात आघाडी लढवणार्‍या छुप्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करून घेतला होता. पण तेवढ्याने लोकसभा जिंकता येते, असल्या भ्रमात मोदी कधीच नव्हते. आपला संदेश थेट सामान्य लोकांपर्यंत पोहोचता करण्यात माध्यमे व पत्रकार गफ़लत करत असतील, तर त्यांची विश्वासार्हता निकालात काढण्यासाठी मोदींनी सोशल माध्यमाचा बायपास म्हणून वापर केला. नंतर त्यासाठी आपले पुरस्कर्ते व अनुयायी यांची तिकडेही एक फ़ौज बनवली. त्यापैकीच एक असलेला प्रशांत किशोर मग राहुल यांच्याही मदतीला गेला. राहुलनी त्यालाही मातीमोल करून दाखवले, याला पप्पू पास झाला असे कोणी म्हणायचे असेल, तर त्यांची बौद्धीक श्रीमंती कुबेरालाही लाजवू शकेल. सोशल मीडिया एका मर्यादेपर्यंत उपयोगी असतो. त्याचा आता मोदींना तितकासा उपयोग राहिलेला नाही. कारण त्याहीपेक्षा ‘मनकी बात’ या थेट संवादातून त्यांनी लोकसंपर्क साधलेला आहे. साधन कुठले ते दुय्यम असते, ते वापरण्याची कुशलता व कुवत निर्णायक ठरत असते. अशा प्रत्येक बाबतीत राहुलनी आपला नाकर्तेपणा सिद्ध केला आहे. मग नुसत्या सोशल मीडियात मुसंडी मारल्याने कोणाला उकळ्या फ़ुटत असतील, म्हणून विचलीत होण्याइतका मोदी म्हणजे वाजपेयी नव्हे. तशा समजूतीत वावरतात, त्यांना आपण पप्पू कशाला होऊन गेलो, त्याचा अजून थांग लागलेला नाही. मोदींसाठी सोशल मीडीया त्या कालखंडात महत्वाचा होता. त्याने मुख्यप्रवाहातील माध्यमांना नामशेष करून टाकले. त्याला मुख्य माध्यमांचा पप्पू होणे म्हणतात.

दुसर्‍या कोणी कसले अहवाल चाचण्या घेऊन तयार करायचे आणि मग त्यावर आपली मते व विश्लेषण आधारलेल्या शहाण्यांनी भाकित करायची, अशा विद्वानांची सद्दी आता संपलेली आहे. किंबहूना सोशल मीडियानेच ती संपवलेली आहे. त्याचा प्रत्यय वारंवार येत असतो. शेवटी या नव्या माध्यमांचा वापर करणारे सामान्य लोक व त्याच समाजातले बुद्धीजिवी संपादक पत्रकार एकाच माळेचे मणी असतात. त्यांच्यातले गुणदोष सारखेच असतात. जर मुख्यप्रवाहातील माध्यमांचा प्रामाणिक वापर होत नसेल व त्याचाही पक्षपाती उपयोग केला जाऊ शकत असेल; तर सोशल मीडिया त्याला अपवाद कसा राहू शकेल? माध्यमे पेडन्युज पुरवण्या काढून लबाडी करीत असतील, तर सोशल माध्यमातही तो आजार येणार व फ़ोफ़ावणारच. त्याचा उपयोग केव्हा व किती करावा, याचे तारतम्य असायला हवे. तसे तारतम्य मुख्यप्रवाहातील संपादक पत्रकारांना राखता आलेले नसेल, तर हौशी म्हणून आपली मते मांडणार्‍या सोशल मीडियातील उतावळ्यांवर दुगाण्या झाडण्यात अर्थ नाही. त्यांच्या वा इतरही कुणाच्या आक्रोशाने कोणी पप्पू होऊ शकत नाही वा नापास होऊ शकत नाही. प्रत्येक परिक्षेत स्कॉलर म्हणून दाखल होऊन हमखास नापास होण्याची अपुर्व क्षमताच कुणाला पप्पू बनवू शकत असते. एकलव्याला शिकवायचे द्रोणाचार्याने नाकारले, म्हणून तो उत्तम धनुर्धर व्हायचे रोखता आले नाही. तसेच शिखंडीला पुढे केल्याने त्याला उत्तम योद्धा म्हणूनही मान्यता मिळवता आली नाही. पण दुर्योधनाची चाकरी करताना त्याला गुणी राजा ठरवण्याच्या हव्यासी शहाण्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती. दुर्योधनाचा पप्पू व्हायचे त्यांना थांबवता आले नाही. कारण क्षुल्लक दर्जाची कारणमिमांसा करण्यातून कोणाचा पप्पू होतो, ते ज्यांच्या लक्षात येत नाही, त्यांना पप्पूला वरच्या वर्गात ढकलण्याच्याही कसरती कराव्याच लागणार ना?

No comments:

Post a Comment