Thursday, November 9, 2017

सौदीतली उलथापालथ



शहाणे वा तथाकथित बुद्धीमंत अभ्यासक वास्तवापेक्षा आपल्या समजुतीत किती रममाण झालेले असतात, त्याची प्रचिती केवळ आपल्याला भारतातच येत असते असे नाही. जगभर त्याची अनुभूती येत असते. तसे नसते तर सध्या सौदी अरेबियामध्ये जे काही रणकंदन माजले आहे, त्याने जगभरच्या माध्यमात खळबळ उडायला हवी होती. पण बारकाईने बघितले तर किरकोळ बातम्या वगळता त्याविषयी कुठे फ़ारसे काही वाचायला मिळत नाही. आपल्याकडे साडेतीन वर्षापुर्वी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर जशी तमाम राजकीय अभ्यासकांची बोलती बंद झालेली होती, तशीच काहीशी अवस्था सध्या जागतिक घडामोडींवर प्रवचन देणार्‍या शहाण्यांची झालेली आहे. कारण सर्वात श्रीमंत तेलसंपन्न मानल्या जाणार्‍या सौदी अरेबियात नेमके काय चालले आहे, त्याचा उलगडाच या अभ्यासकांना होऊ शकलेला नाही. त्यांच्या ठाम समजुती व व्याख्यांमध्ये बसणार नाहीत, अशा घटना तिथे झपाट्याने उलगडत चालल्या आहेत आणि त्यापैकी काहीच अशा शहाण्यांच्या व्याख्येत वा विश्लेषणात बसणारे नाही. मध्य आशिया म्हणजे तेलसंपन्न प्रदेश आणि त्यावर कब्जा मिळाण्यासाठी घडणार्‍या घडामोडी, अशीच व्याख्या ज्यांनी प्रदिर्घकाळ केलेली आहे, त्यापलिकडे काही घडू लागले, मग यांचे डोके चालणार कसे? तेल आणि पॅलेस्टाईन असे दोन विषय म्हणजे मध्य आशिया, हे गेल्या अर्धशतकात अशा शहाण्यांनी आपल्या डोक्यात फ़िट्ट बसवलेले समिकरण आहे. पण सध्याचा घटनाक्रम त्यालाच छेद देत पुढे सरकतो आहे. वरकरणी तो सौदी राजघराण्यातला संघर्ष वाटतो. पण व्यवहारात तो दोनतीन पिढ्यातील समजुती व धारणांचा संघर्ष आहे. माध्ययुगातून बाहेर पडायला उत्सुक असलेल्या नव्या अरबी समाजातील ती उलथापालथ आहे. सौदीच्या राजपुत्राने त्यात पुढाकार घेतल्याने अनेकांना त्याचा आवाकाही येऊ शकलेला नाही.

मध्य आशिया म्हणजे पॅलेस्टाईन व त्यांच्यावर इस्त्रायलने लादलेली गुलामी, हे आजवरचे गृहीत आहे. त्याच्यापलिकडे तिथे माणसे वास्तव्य करतात आणि जगभरच्या घटनांचा त्यांच्यावरही प्रभाव पडतो, याची दखलही अनेक अभ्यासकांना घ्यावीशी वाटलेली नाही. खनिज तेलातून आलेली श्रीमंती व त्यातून सौदी वा अरबी जगामध्ये आलेला मानसिक बदल, ह्याची गणती कोणी करायची? तिथे आजवर सतत पाऊणशे वयमान असलेल्यांनीच राज्य केले आणि विद्यमान राजे सलमान त्याच पिढीचे आहेत. पण त्यांचा लाडका सुपुत्र महंमद बिन सलमान पुढल्या पिढीचा असून, तो एकविसाव्या शतकाचे प्रतिनिधीत्व करणारा अरब राजपुत्र आहे. पित्याचा लाडका म्हणून त्याला राज्यकारभारात ढवळाढवळ करण्याची मोकळीक मिळाली आणि त्याने आजवरची चाकोरी सोडून वेगळा विचार करण्याचे धाडस दाखवलेले आहे. बाकीचे राजपुत्र आपापल्या तुंब्ड्या भरण्यात गर्क व मिळालेल्या सुखासिनतेत मशगुल असताना; या तरूणाने नवा इतिहास घडवण्याचा चंग बांधला. वार्धक्याकडे झुकलेल्या मायाळू पित्याकडून अधिक अधिकार मिळवित सौदी सत्तेवर त्याने आपला ठसा उमटवला आहे. त्याची पहिली व साफ़ झलक त्यालाच अभिषिक्त राजपुत्र घोषित करण्यातून मिळाली होती. प्रथेप्रमाणे सलमान यांनी सत्तासुत्रे हाती घेतल्यावर ज्येष्ठता क्रमानुसार नयीफ़ नावाच्या पुतण्याला भावी राजा म्हणून मनोनीत केले होते. पण काही महिन्यापुर्वी तो पायंडा मोडून सलमानपुत्र महंमदाने आपली नेमणूक अभिषिक्त राजपुत्र म्हणून करून घेतली. त्यानंतर क्रमाक्रमाने सत्तेतले बहुतांश निर्नय तो घेत गेला आणि आता त्याने निर्विवाद सत्तेची सुत्रे हाती घेतली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा त्याला पाठींबा असून ट्रंप यांना नको असलेला तलाल नामे राजपुत्र तुरूंगात गेला आहे. मजेची गोष्ट म्हणजे यामागे इस्त्रायलचेही सहकार्य सौदी राजपुत्राला मिळालेले आहे.

मध्य आशियातील संघर्षात इस्त्रायलचा सर्वात मोठा शत्रू पॅलेस्टाईन व त्यांचा प्रमुख आश्रयदाता म्हणून सौदी अरेबियाही मोठा शत्रू राहिलेला आहे. पण आज हे सगळे चित्र एकदम पालटून गेले आहे. त्यात न दिसणारी एक महत्वाची बाब म्हणजे, सौदीच्या उलथापालथीमागे इस्त्रायलाचा मेंदू असल्याची कोणालाही शंका आलेली नाही. पण एका बातमीनुसार मध्यंतरी हा सलमानपुत्र गुपचुप इस्त्रायलला भेट देऊन आला आणि नंतरच घदामोडींना वेग आलेला आहे. इसिसचा बिमोड झाल्यासारखा असून त्यामुळे इराक, सिरीया व त्या भागात सौदीप्रणीत वर्चस्वाला शह दिला गेला आहे. त्याचा लाभ उठवून इराणने म्हणजे शिया मुस्लिम पंथाने, आपले प्रभावक्षेत्र विस्तारीत करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यालाच शह देण्यासाठी सौदीला इस्त्रायलशी हातमिळवणी करावी लागली आहे. ती उघडपणे झालेली नसली, तरी घटनाक्रम बघितला तर त्याची प्रचिती येत आहे. इस्त्रायलशी सतत झुंजणारा शेजारी लॅबानॉनचा पंतप्रधान सौदीचे बाहुले होता आणि त्याने शनिवारी सौदी राजधानीत येऊन आपल्या पदाचा तडकाफ़डकी राजिनामा देऊन टाकला. कुठल्याही देशाच्या पंतप्रधानाने अन्य देशात जाऊन राजिनामा देण्याची ही पहिलीच घटना असावी. त्याने दिलेले कारणही चमत्कारीक आहे. हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेकडून हत्येची भिती असल्याने आपण राजिनामा दिल्याचे हरीरी यांनी म्हटले आहे. परंतु त्यासाठी सौदीला जाण्याची काय गरज होती? तर हिजबुल्ला हे इराणचे हस्तक आहेत आणि त्यांच्या घातपातामुळे इस्त्रायलने वारंवार लेबानॉनवर विनाशक हल्ले केलेले आहेत. आताही इस्त्रायलने भूदलाचे व हवाई दलचे मोठे सराव केले आणि त्याच दरम्यान हा घटनाक्रम सुरू झालेला आहे. याचा अर्थ पहिली संधी मिळताच लेबानॉनवर हल्ला होणार हे उघड आहे. त्याला अर्थाच सौदीचे अघोषित पाठींबा असणार आहे.

सलमानपुत्राने इस्त्रायलला आवडणारे सर्व निर्णय घ्यावे, ही बाब लक्षणिय आहे. ट्रंप इस्त्रायलचे समर्थक तर राजपुत्र तलाल ट्रंप यांचा कडवा विरोधक. पहिल्या फ़ेरीतच तो तुरूंगात डांबला गेला आहे आणि त्याच्या बहुतेक समर्थक पाठीराख्यांनाही अटक झालेली आहे. त्याचवेळी अनेक कडव्या धर्ममार्तंडांनाही गजाआड टाकण्यात आले आहे. इराण व त्याच्या शिया आघाडीला शह देण्यासाठी या सलमानपुत्राने आधीच आखाती देशांची सुन्नी आघाडी उभी केली होती आणि आता तर इराण विरोधात इस्त्रायलही सहकारी म्हणून स्विकारण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठीच सौदीतील कडव्या इस्त्रायल विरोधकांची मुस्कटदाबी करण्यात आलेली आहे. आणखी दोन दशकात तेल संपणार आहे किंवा त्यातून येणारा पैसा आटणार आहे. त्यामुळेच अरबी प्रदेशात शांतता व व्यावसायिक औद्योगिक पाया उभारण्याचे आधुनिक स्वप्न सलमान पुत्राने बघितले आहे. सहाजिकच त्यात आडवे येऊ शकणार्‍यांना निर्दयपणे बाजूला करण्याची पावले तो उचलतो आहे. त्यानुसार मित्र व शत्रूंना वेगळे काढून नवे संबंध प्रस्थापित करतो आहे. या ताज्या धरपकडीत दोन राजपुत्रही मारले गेले आहेत, हे विसरता कामा नये. राजघराण्यातच उठाव वा बेबनाव निर्माण होण्याचा धोका या राजपुत्राने पत्करलेला आहे. एकविसाव्या शतकात चौदाशे वर्षे जुन्या भांडण वा द्वेषमूलक धर्मांध धोरणांनी आपला टिकाव लागणार नाही, याची जाणिव त्यामागे आहे. त्याचवेळी अरबी समाज व मानसिकता तलवारीने व मनगटी शक्तीनेच लादलेले बदल स्विकारते, ह्याचीही कल्पना त्याला पक्की असावी. अन्यथा त्याने इतके धाडस केले नसते. अशी तडकाफ़डकी त्याच्या अंमलाची घाई केली नसती. अर्धशतकापुर्वीची गृहीते उराशी कवटाळून बसलेल्या व गाझापट्टीतच अडकून बसलेल्या, राजकीय अभ्यासकांना त्याचा अंदाज यायला अजून दोनचार वर्षे लागतील.
  

5 comments:

  1. वा भाऊ ! अगदी अपेक्षेप्रमाणे या विषयावर परखड लिहणारे अभ्यासपूर्ण लिहिणारे तुम्हीच पहिले ठरलात

    ReplyDelete
  2. भाऊराव, लेख रोचक आहे. फक्त मध्य आशिया न म्हणता मध्यपूर्व म्हणा. कारण मध्यपूर्व म्हणजे मिडल ईस्ट, तर मध्य आशिया म्हणजे सेन्ट्रल एशिया.
    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  3. कतारशी संबंध ही तणावाचे आहेत सध्या ISIS वरून. सौदी ISIS चा पत्ता कापायला पाहतेय तर कतार वहाबी इस्लाम चा ताज स्वत:च्या डोक्यावर घालून घ्यायला पाहतोय. त्याने कतार डोईजड होईल म्हणून सौदी वाले त्यांची आर्थिक नाकेबंदी करत होते .

    ReplyDelete
  4. भाऊ, सखोल माहिती मिळाली..

    ReplyDelete
  5. जबरदस्त भाऊ, आखाती प्रदेशाचा अभ्यास ही चांगला आहे तुमचा.

    ReplyDelete