Tuesday, January 31, 2012

चला तुतारी फ़ुंकूया


मराठी भाषेत तीन वृत्तवाहिन्या आहेत. निदान मला तरी तेवढ्याच बघायला मिळतात. या तिघांची आपापली घोषवाक्ये सुद्धा आहेत. स्टार माझाचे घोषवाक्य आहे ’उघडा डोळे बघा नीट’ तर झी २४ तासचे आहे ’एक पाऊल पुढे’ आणि कायबीइन लोकमतचे घोषवाक्य आहे ’चला जग जिंकू या’. चटकन त्यातली सलगता लक्षात येत नाही. ज्या क्रमाने मी ती घोषवाक्ये लिहिली आहेत तशीच बारकाईने वाचली तरी त्यातली गम्मत लक्षात येऊ शकेल.

यातला पहिला म्हणतो डोळे उघडे ठेवा आणि नीट बघा. याचा अर्थ त्यांना आपला प्रेक्षक नीट कार्यक्रम बघत नाही तर नुसतेच चॅनेल लावून त्याकडे दुर्लक्ष करतो याची पक्की खात्री दिसते. ती असायला हरकत नाही. पण निदान त्यांनी तरी लोकांना बातम्या दाखवण्याआधी जगाकडे डोळे उघडून नीट बघावे अशी अपेक्षा करणे चुक ठरेल काय? पण मराठी भाषिकांचे तेवढे नशीब कुठले? ’खांडेकर प्रसन्न’ झालेले सगळेच कार्यक्रम डोळे मिटून प्रक्षेपित होत असतात. मग बिचाऱ्या आसबे सरांना आपला प्रताप दाखवून प्रसन्नाचे डोळे उघडावे लागतात. आणि त्यासाठी त्यांना स्वत:लाही कसेबसे आपले डोळे उघडे ठेवावे लागतात. ’नीट समोर कॅमेराकडे’ पहावे लागते. अर्थात त्यामुळे आसबे सर प्रेक्षकांना नीट दिसत असले तरी त्यांना जग नीट दिसत असतेच असे बिलकुल नाही. अधुनमधुन हाका मारून प्रसन्नाला या सरांनाच प्रसन्न करून घ्यावे लागते. कधीकधी तर आसबेना जागे व त्यांचे डोळे उघडे ठेवण्यासाठी खुद्द खांडेकरांनाच हजर रहावे लागते. त्यामुळे हे घोषवाक्य आसबे सरांसाठीच आहे काय अशी शंका येते.

दुसरा चॅनेल आहे झी २४ तास. त्यांचे घोषवाक्य आहे ’एक पाऊल पुढे’. ते असायला हरकत नाही पण त्यासाठी आधी पहिले पाऊल तरी उचलायला हवे ना? कालपरवापर्यंत यांची साधी वेबसाईट सुद्धा तयार नव्हती. चार वर्षे वाहिनी सुरु होऊन उलटली त्यानंतर वेबसाईट; याला पाऊल पुढे म्हणायचे असेल तर पाऊल म्हणजे काय असते? एक मात्र खरे की बाकीच्या चॅनेल इतका आगावूपणा या वाहिनीवर अनुभवास येत नाही. त्यात त्यांचे पाऊल अगदी मागेच असते. आणि त्यातल्यात्यात त्यांचे कुठल्या बाबतीत ठाम मत सुद्धा नसते. बाकी वाहिन्यांएवढा गोंगाट गोंधळ सुद्धा नसतो. थोडक्यात इलेक्ट्रोनिक माध्यमात एक पाऊल मागे अशीच त्यांची स्थिती आहे.

तिसरी आणि शेवटची आहे कायबीइन लोकमत वाहिनी. त्यांची गोष्टच जगावेगळी. हातवारे हावभाव करीत देहाला हेलकावे दिल्याशिवाय त्यांना बातमी प्रेक्षकाला दिसत नाही असेच वाटत असावे. जगात काही घडो ना घडो त्यावर यांचे ठाम मत तयार असते. जणुकाही लोकमतवर बातमी दिसावी म्हणुन जगात सर्व घडत असते, नाहीतर काही घडलेच नसते अशा थाटात या वाहिनीचे लोक वहावत असतात. माणुस किती प्रकारे हात हलवू शकतो, याचे प्रात्यक्षिकच त्यावर बघायला मिळत असते. मला तर वाटते, निखिलचे हात बांधून ठेवले तर ’आजचा सवाल’ ऐकूच येणार नाही. कुलकर्णी हिचे नाव आरती का आहे ते तिच्या हात ओवाळण्यावरुन लक्षात येते. आधी पाच बोटांवर बोटे, मग डावा हात दोनदा पुढे मग पुन्हा बोटावर बोटे आणि मग उजवा हात पुढे. आणि असे देहाला हेलकावे दिल्याशिवाय बघणऱ्याला बातमी ऐकूच येत नाही असे त्यांचे ठाम मत असावे बहुधा. नकलाकार जसे जागच्याजागी उभे राहून हातवारे करीत चालल्याचा आभास निर्माण करतात तसाच एकूण अविर्भाव असतो. त्यातुन त्यांना जग जिंकायचे आहे.

आता अशा या घोषवाक्याचे एकत्रित वाचन करुन त्यातला अर्थ काय लावायचा? "उघडा डोळे बघा नीट" समोर खड्डा आहे याची खात्री करुन घ्या आणि मगच "एक पाऊल पुढे" टाका. मनात शंका आणू नका. "अचूक बातमी ठाम मत" याची मनाशी खात्री बाळगा. बाहेरच्या जगाशी आपला काडीमात्र संबंध नाही. छान आपल्या कल्पनाविश्वात रमायचे. लढे काल्पनिक आणि शत्रू काल्पनिक, मग चिंता कसली? सर्व काही सोपे आहे. "चला जग जिंकू या". जगाला वाटेल आपण खड्ड्यात पडलो आहोत. त्यांची फ़िकीर आपण कशाला करायची? सत्य व वास्तवावर बहिष्कार घातला मग आविष्कार स्वातंत्र्याचे जग आकारास येते आणि तेच वास्तव जग आहे याबद्दल ठाम मत असले मग कसली चिंता? चला तुतारी फ़ुंकूया आणि चला जग जिंकू या.

6 comments:

  1. Bhau ekdam mastach,yanchi asliyat tumhi aamchya samor anli.

    ReplyDelete
  2. Bhau , I take IBN Lokmat as entertainment channel , it is a stress buster.

    ReplyDelete
  3. प्रिय भाऊ,

    सप्रेम नमस्कार 🙏🏻

    खुप दिवसांपासून आपणाशी संपर्क करायचा होता पण कुठे ? कसा करायचा? हे कळत नव्हते. वाढदिवसाच्या निमित्याने शुभेच्छा देऊ म्हणले तर फेसबुक वर तारीख मिळाली नाही , अगदी गुगलुनही बघितलं तरी काही मिळालं नाही म्हणून आज तुमच्या अनुदिनीतील (ब्लॉगला अनुदिनी हा शब्द पहिल्यांदा आमच्या देव काकांकडून आम्हाला कळाला.) पहिल्या लेखनावर हे प्रतिक्रिया या सदरात लिहीत आहे.
    हे नक्कीच तुमच्या पर्यत पोहोचेल अशी आशा आहे.

    ३१ जानेवारी २०१२ ला प्रकाशित झालेले "चला तुतारी फुंकूया" हा तुमचा सध्या अनुदिनीत दिसत असलेला पहिला लेख ( यापूर्वी ही तुम्ही लिहिले असणारच मात्र ते इथे तरी दिसत नाही) .

    म्हणजे अजून दोन दिवसांनी आपण लेखनाचे 'अष्टक' वर्ष पुर्ण करीत आहात. याचेच औचित्य साधून आज तुमच्याशी संपर्क करत आहे.
    २०१२ ते २०२० . तब्ब्ल आठ वर्षे मराठी अनुदिनी ( ब्लॉग ) विश्वातील मानाचे स्थान मिळवणारे " जागता पहारा " हे संकेतस्थळ आज तब्बल- *२९१८ लेख*( ३१ जानेवारी २०१२ ते २८ जानेवारी २०२०) अभिमानाने मिरवत आहेत. ३१ जानेवारी २०१२ ला सुरु झालेली तुमची 'तुतारी एक्स्प्रेस' वेगवेगळी वळणे घेत अशीच सुसाट धावो या तुम्हाला यानिमित्याने शुभेच्छा

    मराठी ब्लॉग विश्वात 'वर्ड प्रेस' का 'ब्लॉगस्पाॅट' यात ही तुम्ही पण आमच्या सारखे ब्लॉगवालेच आहात हा आणखी एक तुमच्याधी जवळीक करणारा धागा .

    सुरवातीच्या काही ब्लॉग पोस्ट मध्ये तुमची उत्तमोत्तम "बिडंबन" वाचायला मिळतात. तेव्हा *भाऊ म्हणजे फक्त राजकीय विश्लेषक नसून विसंगती शोधणारे एक कवी आहेत* याची प्रचीती येते आणि हे फार थोड्याना माहीत आहे .

    आजकाल प्रत्यक्ष ब्लॉग ला भेट देणा-यांपेक्षा इतर सोशल माध्यमातून पुढे ढकलले जाणारे तुमचे राजकीय लेख वाचणारेच खूप जण आहेत . पण आजतागायत साधारण मी हे लिहीत असे पर्यत तब्ब्ल १ करोड ६० लाखांच्या वर वाचकाचा टप्पा तुमच्या अनुदिनीने ओलांडला आहे हे खासच ( वरची हजारातली संख्या पकडली काय नाही पकडली काय, तसा काही फरक पडत नाही) . आणि मुख्य म्हणजे हे सगळं लेखन तुम्ही मराठीत लिहिल असून ही एवढं वाचलं गेलं हे अधिक महत्वाचे

    आपण लिहिलेले आपल्या मित्रां पर्यत पोहोचावे म्हणून ( ज्याचे शिक्षण मराठी या मातृभाषेत झाले आहे ) आपला ब्लॉग इंगजीत लिहिणारे भले भले थोडं तरी तुमच्याकडून शिकतील इतकी माफक आशा.

    राजकीय विश्लेषक म्हणून मी तुमच्या बद्दल काय लिहणार ? अफाट वाचन , अफाट माहिती , अभ्यास आणि अभंग, काव्य, उपमा योग्य रितीने गुंफून अगदी कुणालाही समजेल असा मजकूर , लेखनातील सहजता हे सगळंच वाखाण्यासारखे. म्हणूनच एखाद्या पक्षाने / नेत्याने एखादी भूमिका जाहीर केल्यावर गडबडलेले त्यांचे कार्यकर्ते / किंवा विरोधक तुमच्या लेखनाची अगदी चातकाप्रमाणे वाट बघतात आणि तसा लेख आल्यावरच त्यातील मुद्दे घेऊन त्याना आपण प्रतिस्पर्ध्यांवर गुद्दे मारण्यास समर्थ झालो याचा साक्षात्कार होतो.

    आणि याला कुठल्याच पक्षाचा कार्यकर्ता अपवाद नाही . आपल्या पक्षाच्या बाजूने आलेला लेख केंव्हा एकदा पुढे पाठवतो असे होणे हे आपल्या लेखन शैलीचे , आपल्या व्यासंगाचे यश.

    आजकाल नवीन धोरण ठरवताना हे कोअर कमिटी / समिती / थीक टॅंक वाले / समन्वय वाले ही एकदा तरी तुमच्या अनुदिनीचा अभ्यास करून आले असणार असे वाटत राहते

    राजकारण हा न संपणारा विषय आहे. अनुदिनीतील कुठला ही एक लेख राज्यशास्त्राच्या विषयात अभ्यास करणा-यांना केस स्टडी म्हणून देण्यासारखा आहे . हे झाले तुमच्या विषयासंबंधी पण आमच्या सारख्या अराजकीय ब्लॉगवाल्याना उत्तम ब्लॉग कसा लिहावा, ब्लाॅग कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे " जागता पहारा " .

    मध्यतंरी पुण्यात ' ब्लॉग लेखन ' कसे करावे या विषयी एका कार्य शाळेचे आयोजन केले होते आणि केवळ शिकवायला भाऊ आहेत म्हणून येणार होतो पण योग आला नाही . नशिबात असेल तर नक्की भेटू

    एका ब्लॉग वाल्या कडून दुस-या ब्लॉगवाल्याला ब्लॉगलेखनातील अष्टक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

    पुढील "ब्लाॅग दशा" ही समस्त राजकीय प्रेमींना तुमच्यामुळे सुसह्य जावो ही प्रार्थना 🙏🏻

    शेवटी ८ वर्षानिमित्य रामदास स्वामींच्या करुणाष्टकातील काही अोळी वेगळ्या स्वरुपात लिहून मनोगत आवरत घेतो

    अनुदिनी रोज पाहे वाचतो "जागता पहारा"
    परम मुद्दे कळाया, भाऊंचा एक सहारा
    अटळ घडलेले, 'राज' ते न उमगता
    वाचण्या लेख मग, त्वरित तू धाव आता

    जय जय रघुवीर समर्थ. 🙏🏻🌺

    ( ब्लॉगवाला ) अमोल केळकर 📝
    २९/०१/२०२०
    a.kelkar9@gmail.com

    ReplyDelete