Sunday, February 9, 2020

आमंत्रणाच्या प्रतिक्षेत
४६ वर्षापुर्वीचा प्रसंग आठवला. तेव्हा उत्तर मध्यमुंबईचे खासदार प्रा. रा. धों. भंडारे यांची पंतप्रधान इंदिरा गांधींनी बिहारचे राज्यपाल म्हणून नेमणूक केली आणि त्यांना खासदारकीचा राजिनामा द्यावा लागला होता. त्या जागेसाठी मग पोटनिवडणूक व्हायची होती. तेव्हाच दत्ता सामंतपुर्व गिरणी कामगार संप कम्युनिस्ट युनियनने केलेला होता. कॉम्रेड डांगे त्याचे नेतृत्व करीत होते आणि त्यांनी त्या लढतीमध्ये आपली कन्या रोझा देशपांडे यांना उतरवले होते. तर कॉग्रेसने रामराव आदिक यांना उमेदवारी दिलेली होती. वास्तविक शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता. कारण तिथल्या ३० पैकी १९ नगरसेवक शिवसेनेचे होते. पण सेनेने मात्र तिकडे पाठ फ़िरवली होती. त्यावर वैतागलेल्या शिवसैनिक बंडू शिंगरे यांनी बंडखोरी केली व हिंदू महासभेचे तात्कालीन अध्यक्ष विक्रम सावरकर यांना अपक्ष म्हणून मैदानात आणले होते. निदान सेनेने त्यांचे समर्थन करावे असे हिंदूत्ववादी लोकांना वाटत होते. पण सेनेने उघड आदिकांना पाठींबा दिला आणि खळबळ माजली. शिवसेनेचे तसे समर्थक असलेले पुण्याचे ज्येष्ठ सपादक ग. वा. यांनी आपल्या ‘सोबत’ ह्या साप्ताहिकामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर यथेच्छ झोड उठवणारा लेख लिहीला होता. त्यामुळे शिवसैनिकांचे पित्त खवळले तर नवल नाही. त्या लेखाचे शीर्षक होते, ‘सेनापती की शेणपती?’ योगायोग असा, की त्याच आठवड्यात शिवाजीपार्क येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या हॉलमध्ये ‘सोबत’चा वर्धापनदिन सोहळा व्हायचा होता आणि त्यासाठी आलेले बेहरे तिथून नजिकच वास्तव्य करणारे स्तंभलेखक माधव मनोहर यांच्या घरी आलेले होते. संध्याकाळी हे दोघे सोहळ्याला बालमोहनकडे निघालेले असताना शिवाजीपार्क नाक्याच्या सिग्नलपाशी डझनभर शिवसैनिकांनी त्यांना गाठले व मनसोक्त झोडपून काढले. अगदी कपडे फ़ाटले, रक्तबंबाळ झाले. त्यांनीही मार खाल्ला. वयाची साठी उलटुन गेलेले बेहरे वा माधवराव हल्ला रोखण्याच्या शक्तीचेही नव्हते. घटना संपल्यावर दोघे धडपडत घरी परतले आणि डॉक्टरांना बोलावून मलमपट्टी केल्यावर वेगळे कपडे परिधान करून समारंभाच्या स्थानी पोहोचले. पुढे काय झाले?

समारंभाला मलमपट्ट्या लावून आलेले पाहुणे व यजमान बघून श्रोतावर्ग हबकून गेला. पण या दोघांनी घटनाक्रम उपस्थितांना कथन केला आणि हल्ल्याच्या निषेधार्थ दोन मिनीटाचे मौन पाळून पुढला कार्यक्रम यथासांग पार पडला. त्या काळात आजच्यासारखी पत्रकारिता पुरोगामी झालेली नव्हती, की अविष्कार स्वातंत्र्याचा लढा वगैरे झालेली नव्हती. त्यामुळे कुठे फ़ार मोठा गवगवा झाला नाही आणि तात्काळ त्याचा बोलबाला होण्याची शक्यताही नव्हती. मोबाईल इंटरनेट वा व्हाट्सअप वगैरे भानगडी आलेल्या नव्हत्या. माधव मनोहर वा त्यांचे बंधू कॉम्रेड प्रभाकर वैद्य तसे पुरोगामी. पण तेही सावरकरवादी बेहर्‍यांच्या ‘सोबत’चे स्तंभलेखक होते आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. टोकाचे वादविवाद त्यांच्यात व्हायचे. पण द्वेष वा हेत्वारोप कधी झालेले नव्हते. हा भेदभाव आजच्या पुरोगामी लढवय्या पत्रकारितेचा आधुनिक अविष्कार आहे. त्यामुळे त्या हल्ल्याचे भांडवल त्यांनी केले नाही किंवा पत्रकार संघटनांनीही त्यावरून काहुर माजवले नव्हते. संध्याकळी आठ नऊ वाजण्याच्या सुमारास तो समारंभ संपला आणि बेहरे माधवराव वगैरे मंडळी घरी पोहोचली. तेव्हा शिवसेना भवन उभे राहिले नव्हते. पण आज जिथे उभे आहे, त्याच्याच नेमक्या समोरच्या नाक्यावर सिग्नलपाशी ही घटना घडलेली होती. तिथूनच मागे सेनापती बापट पुतळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावर ब्राह्मण सहाय्यक संघाची इमारत आहे आणि तिच्या नेमकी समोर जी चाळवजा इमारत आहे, तिथे तळमजल्यावर माधवरावांचे वास्तव्य होते. त्यांचा सुपुत्र जैमिनी माझा वर्गमित्र असल्याने त्यांच्या घरात माझा वावर खुपदा असायचा. त्यामुळे मी त्या घटनाक्रमाचा साक्षीदार होतो. रात्री हे दोघे घरी परतल्यावर माहिम पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस अधिकारी तिथे पोहोचले आणि त्यांनी दोघांना तक्रार देण्यासाठी आग्रह धरला. त्यांना मंत्रालयातून तात्कालीन गृहराज्यमंत्र्यांचा फ़ोनवरून आदेश आलेला होता. इतका मोठा हल्ला पत्रकारांवर झाला तर कठोर कारवाई व्हावी असा आदेश होता. पण कुठल्याही तक्रारीशिवाय कारवाई करणे मुश्कील होते. म्हणून ते अधिकारी माधवराव आणि बेहर्‍यांना तक्रार देण्यासाठी गयावया करीत होते. पण हे दोन्ही महानुभाव तक्रार द्यायलाच राजी नव्हते. ते घाबरले होते का? तक्रार केली तर शिवसैनिकांचा आणखी मार पडेल, अशी भिती त्यांना वाटली होती का?

तसे बिलकुल नव्हते. कारवाई उपयोगाची नाही असा त्यांचा दावा होता. बेहरे म्हणाले, ज्यांनी आपल्याला मारहाण केली, त्यांनी बहुधा आपला लेख वाचलेला नाही. वाचला असेल तर त्यांना त्यातला आशय समजलेला नाही. मग त्यांनी लेखामुळे चिडून हल्ला केला, असे म्हणण्यात काय अर्थ आहे? शिवाय अशा धरपकडीने काय साध्य होणार आहे? आठवडाभरात त्यांना जामिन दिला जाईल आणि खटला चालून शिक्षा जरी फ़र्मावली गेली तरी त्यांच्यावर शिक्षेचा कुठलाही परिणाम होणार नाही. मग सगळ्या उपदव्यापाचा लाभ कुठला? शिवाय जामिनावर सुटताच पुन्हा ते कोणावरही हल्ला करायला मोकळे. मुद्दा त्यांना शिक्षा देण्याचा नसून शिक्षण देण्याचा आहे. विचारांची लढाई त्यांनी गुद्दा वापरून केली, तर त्यांना विचार करायला भाग पाडण्याला मी पत्रकारिता मानतो. त्याकडे पाठ फ़िरवून जखमांसाठी त्यांना पोलिसांच्या जाचामध्ये टाकणे, हा पत्रकारितेचाच पराभव आहे. पर्यायाने माझाही पराभवच आहे. त्यांच्या गुंडगिरीचा त्यात विजय आहे. कारण त्यांच्या गुंडगिरीला पोलिसांच्या बळाने उत्तर देण्यात विचारांची माघार आहे. पत्रकारिता कोणाला शिक्षापात्र ठरवण्यासाठी नसते, तर विचारांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न असतो. त्यात आपण अपेशी ठरलो, म्हणून पोलिसांकडे धाव घेणे, हा पत्रकारितेचा बळी आहे. मला त्यात सहभागी व्हायचे नाही. हा सगळा युक्तीवाद ऐकून सदरहू पोलिस अधिकारी हबकून गेला. तरीही त्याने आग्रह चालविलाच होता. पण बेहर्‍यांनी त्यांना दाद दिली नाही. तेव्हा त्याने निदान माधवरावांनी तक्रार द्यावी, म्हणून आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला. बेहर्‍यांनी निदान तपशीलवार भूमिका मांडलेली होती. पप्पा (माधवरावांना आम्ही जैमिनीचे मित्र त्याच नावाने संबोधत असू) फ़क्त एक वाक्य बोलले आणि तो पोलिस अधिकारी अवाक होऊन गेला.

‘स्वातंत्र्य फ़ुकटात मिळत नाही की भीक म्हणून मिळत नाही, अविष्कार स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीत स्वस्त नाही. अडाण्यांच्या लोकशाहीत स्वातंत्र्याची इतकी किंमत तर मोजावीच लागणार ना?’

माधव मनोहर यांचे ते मोजके शब्द आजही जसेच्या तसे कानात सामावलेले आहेत. किंबहूना माझ्या पत्रकारितेचा वा अविष्कार स्वातंत्र्याचा तो मूलमंत्र होऊन गेला. तो जमाना आज उरलेला नाही. आता पत्रकारितेची लढाई भारतीय दंडविधानाच्या साधनाने लढणारी झालेली आहे. आम्ही त्यामध्ये कालबाह्य पत्रकार झालेलो आहोत. किंबहूना पत्रकारांनीच लेखणीपेक्षा दंडविधानाला आपले शस्त्र बनवल्यानंतर इतरांनी त्याच मार्गाने पत्रकारितेला नामोहरम करायचा विडा उचलला, तर त्यांना दोष कशाला द्यायचा? आजकाल अनेक पत्रकारांना विविध कायदे व पोलिसी कारवाईने नामोहरम केले जाते; अशा तक्रारी असतात. मी त्यातला अजिबात नाही. असो, ह्या ४६ वर्षे जुन्या घटनाक्रमातील एक व्यक्तीची ओळख सांगायचे राहून गेले. ज्या गृहराज्य मंत्र्याच्या आदेशावरून माहिम पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस अधिकारी शिवसैनिकांच्या विरोधातली तक्रार नोदवून घ्यायला आलेले होते, त्यांचे नाव नामदार शरद पवार असे होते. वसंतराव नाईकांच्या मंत्रीमंडळात सहभागी होऊन पवार प्रथमच प्रशासकीय कारभाराचे धडे गिरवित असतानाची ही घटना आहे. आज त्यांच्याच पक्षाच्या काही कार्यकर्ते पदाधिकार्‍यांनी मला व घनश्याम पाटील या पत्रकारांचे हातपाय तोडण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिलेली आहे. लेखणीला आव्हान देण्यासाठी दंडविधान पुढे केले आहे. हिंसेची मदत घेतली आहे. तो त्यांचा मार्ग आहे. पवारांना एका ब्लॉगर वा मासिक काढणार्‍या पत्रकाराची इतकी दहशत वाटत असेल; तर त्यांनी जरूर आपल्या पद्धतीने संस्कारानुसार कृती करावी. ती त्यांची लोकशाही आहे. माझा आदर्श बेहरे व माधव मनोहर आहेत. अडाण्यांच्या लोकशाहीत तितकी किंमत मोजायचा धडा गिरवून आता साडेचार दशके उलटली आहेत. नव्याने अविष्कार स्वातंत्र्याचा कांगावा करणे माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही.

ज्यांनी कोणी तक्रार केली त्यांना तसे स्वातंत्र्य व अधिकारही आहे. पण त्यानंतर धमक्या देणारे पवारांच्या पक्षाच्या युवक संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या संघटनेचा तसा अजेंडा असू शकतो. तर त्यात बदल करण्याचा किंवा बदल मागण्याचा मला कुठलाही अधिकार नाही. उलट मी त्यांच्याशी त्यातही सहकार्य करायला तयार आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातपाय तोडायच्या धमक्या दिलेल्या आहेत. त्यांच्याशी सहकार्य करण्यासाठी कधी, कुठे हजर व्हायचे ते त्यांनी अगत्याने कळवावे. घनशाम पाटील, अक्षय बिक्कड आणि भाऊ तोरसेकर तिथे तितक्याच अगत्याने हजर रहातील. जागा व दिवस वेळ त्यांनी ठरवावी. आमची अट एकच आहे. अशा सहिष्णू गांधीवादी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खुद्द शरद पवार बसलेले असावेत.

आम्ही आमंत्रणाच्या प्रतिक्षेत आहोत. साहेब!

48 comments:

 1. परम आदरणीय भाऊ ,
  आमच्या आयुष्यामध्ये एक दिवस असा आला होता की आम्हाला वाटले होते की या देशातील पत्रकारिता आता कायमची संपली झोपली निजली . अशा हताश अवस्थेमध्ये आम्ही असताना अचानक एक दिवस आपला
  पुण्यनगरी दैनिकातला स्तंभ वाचनात आला .त्यानंतर आपला उलटतपासणी नावाचा एक जुना ब्लॉग होता तो वाचायला सुरुवात केली .आणि त्यानंतर जागता पहारा हा आपला ब्लॉग जो वाचायला सुरुवात केला तो आजतागायत दररोज न चुकता नित्यनियम म्हणून वाचत आहे .एक वेळ दात घासायचे विसरतो परंतु आपले लेख वाचले नाहीत असा दिवस सुरू झालेला नाही .आपण आजतागायत कधीही वास्तवाला सोडून लिखाण केलेले नाही हे सांगताना अभिमान वाटतो .आपल्या सर्व भूमिका नेहमी स्फटिकासारखे स्वच्छ स्पष्ट व शुद्ध असतात .आपल्या प्रत्यक्ष जीवनातला साधेपणा सरळपणा आणि थेट पणा आपल्या लिखाणात देखील सहज उतरतो .जगाचे माहिती नाही परंतु निदान माझ्या स्वतःच्या राजकीय जाणिवा अत्यंत समृद्ध आणि काटेकोर करण्याचे काम केवळ आणि केवळ आपण केलेले आहे .आपल्यासारख्या पत्रकाराचा खरेतर पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करणे किमान अपेक्षित आहे .असे असताना आपण ज्यांना सावध करत आहात त्याच लोकांनी आपल्या विरोधात बंड करणे यासारखा मूर्खपणा नाही .खरे तर आपले लिखाण वाचून त्यांना त्यांच्या चुका उमगला पाहिजेत .ज्या पद्धतीने आपला टीकात्मक लेख वाचून बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला विरोधी विचारधारेतील असून देखील आपलेसे केले आणि खुल्या दिलाने त्यांच्या चुका मान्य केल्या त्याच पद्धतीने त्यांचे मित्र म्हणविणार्‍या शरद पवार साहेबांनी आपल्या सर्व चुकांचे पुन्हा एकदा व्यवस्थित परिशीलन करण्याची योग्य संधी केवळ आणि केवळ आपणच त्यांना दिलेली आहे अन्य कुणी दिल्याचे ऐकिवात नाही .शेवटी इतकेच सांगू इच्छितो ही लोकशाही आहे .मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे .न्यायालयीन लढा सुरु झाला तर त्यातदेखील . आणि रस्त्यावर राडा घालायची वेळ आली तर त्यातदेखील .(हे माझे वैयक्तिक मत आहे कृपया ही कमेंट वाचून भाऊंवर गुन्हा दाखल करू नये )

  भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है .
  ज्यांना हे पटले आहे त्यांनी खाली प्रत्युत्तर द्यावे .

  ReplyDelete
 2. भाऊ तुम्ही खरच महान आहे

  ReplyDelete
 3. भाउ
  तुम्हाला आणि तुमच्यातल्या जिवंत पत्रकाराला मानाचा मुजरा गम्मत कशी आहे बघा फक्त तिनच नावे खरे पत्रकार म्हणुन शिल्लक आहेत, यापेक्षा जास्त लोकशाहिची दुरावस्था काय?

  पण भाउ तुमची ताकद सत्याची आहे आणि मम्हणुन तुम्हि ईतके खुपताय. भाउ या महाराष्ट्रावर तुमचे अनंत उपकार आहेत. तुमच्या जागत्या पहार्‍याने जो जागर झालाय त्यात विकाउ पत्रकारितेवर मोठे झालेले पार हादरुन गेलेत.

  सामान्प माणसाला खरं राजकारण जे अत्यंत गलिच्छ आहे ते तुम्हि समजवुन सांगता आणि मग दुकानदारी धोक्यात येते, मग त्या मागचे खरे चेहरे बाहेर येतातच आणि तुम्हि तेच करुन दाखवलय. हा तुमचा दणदणित विजय आहे भाउ.

  देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि तुमच्या लेखणिची आणि वाणिची धार अजुन तेज होउन सत्पाची बाजु तळपत ठेवो हिच देवाला प्रार्थना.

  माझ्यासारखे लाखो आहेत भाउ तुमचे हितचिंतक आणि प्रशंसक. लगे रहो भाउ.

  ReplyDelete
 4. भाऊ, ह्या लेखावरून एक जुनी घटना आठवली. ह्या घटनेचा खुसखुशित उहापोह कै. जयवंत दळवींनी त्यांच्या ठणठणपाळ ह्या ललित मध्ये येणार्या सदरात फार सुंदरित्या घेतला आहे. घटना होती, घाशिराम कोतवाल हे नितांतसुंदर नाटक परदेशी पाठवावे का नाही ह्यावरून झालेली वादावादी. गंमत म्हणजे नाटक पाठवू नये म्हणणार्या पक्षात सेतूमाधवराव पगडी व बाळासाहेब ठाकरे ह्याच्या बरोबर कोण असावे: कॉंग्रेसचे नेते वसंतराव साठे व चक्क कॉ. डांगे.
  मला सांगायची अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हे पुरोगामी नेते नाना फडणविस ब्राम्हण असुन कोठेही जात न आणता केवळ नाना ही ह्या देशाच्या इतिहासातली महत्वाची व्यक्ती असून पुराव्याशिवाय त्यांचे चारित्र्यहनन करु नये असे त्यांचे म्हणणे होते.
  समाजात असलेली ही वैचारिक प्रगल्भता आता दिसत नाही ह्याबद्दल वाईट वाटते.
  ग.वा.बेहेरे व माधव मनोहर ह्यांना शतश: प्रणाम.

  ReplyDelete
 5. आजकाल कार्यकर्ते भलतेच नेत्यांच्या आंधळ्या प्रेमात पडले आहेत मग ते कोणत्याही पातळीवर नेत्यासाने प्रेम व्यक्त करायला तयार होतात अगदी हल्ला करणे ,पण या असल्या कार्यकर्त्याची कळकळ जणतेपेक्षा नेत्याविषयी उजवी असते,पण पक्षापलिकडेपण सामान्य जनतेची एक भावना असते ती ते व्यक्त करु शकतात याचाच या लोकांना विसर पडलेला असतो

  ReplyDelete
 6. भाऊ, ते जुने शरद पवार आणि आताचे शरद पवार यांच्यात काडीमात्र फरक नाही. बेहेरेंच्या वेळी जर शिवसेनेच्या ऐवजी पवारांचे कार्यकर्ते असते तर पवारांनी लक्ष पण दिले नसते.
  देशातच काय तर महाराष्ट्रातसुद्धा पावसात भिजून, चाणक्य, जाणता राजा, कुलदैवत, विठ्ठल अशा जाहिराती करुन संबोधून सुद्धा मिडिया सोडल्यास सामान्य मतदार भीक घालत नाही हे गेल्या राज्यातील निवडणुकीत लक्षात आले आहे. भाऊ, आपले ब्लॉग व युट्युबवरची भाषणे पाहून मतदार पवारांच्या विरोधात जातात असा त्यांचा व त्यांंच्या अनुयायांचा समज झाला आहे. पण सध्या सोशल मिडियावर पवारांना ज्या पद्धतीने ट्रोल केले जातेय ते पाहूनच बहुतेक त्यांचा तोल जातोय, त्यासाठी मग पवारांचा खुनाचा कट ही संकल्पना आली असेल पण सोशलमिडियावर ही कल्पना सुद्धा इतक्या वाईट पद्धतीने ट्रोल झाली की पुछो मत.
  भाऊ, तुमच्यावर जे हे खोटेपणाने पोलीस कंप्लेंट झालेली आहे त्याची चीरफाड कोर्टात होईलच पण आम्हा जनतेच्या कोर्टात तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही सर्व एकदिलाने तुमच्या पाठीशी आहोत.

  ReplyDelete
 7. Thanks for highlighting history. The whole matter indicates that present MH Government is not far different from Mamta Banerjee Govt.And all leftist and Congress media is silent

  ReplyDelete
 8. भाऊ एक नंबर याला म्हणतात उत्तर

  ReplyDelete
 9. नमस्भाकार भाऊ!
  सुमारे 4/5 वर्षापूर्वी मी जेव्हा पहिल्यांदाच तुमचा लेख वाचला होता
  तेव्हापासूनच मला एक मानसिक समाधान वाटत आले आहे की ह्या अशा काळात आपले लिहीणे सुरू आहे आणि ते माझ्यापर्यंत नियमीत पोहोचते आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुमच्या लेखणीचा माझ्या बुद्धीपटलावर प्रभाव तर टाकलेलाच होता परंतु आजच्या आपल्या ह्या लेखाने तर माझं ह्रदय सुद्धा जिंकलं.
  एवढी निखालस आणि निर्भिड पत्रकारिता करणारे पत्रकार कुठेही दिसून येत नाहीत.
  आपण लिहित रहा. भगवंत आपणांस उदंड आयुष्य देवो हीच सदगुरु चरणी प्रार्थना.

  ReplyDelete
 10. Sir, Great, No word to say anything. We are with you. Thanks

  ReplyDelete
 11. आदरणीय भाऊ आपणांस वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, भगवन्त आपणांस निरागस आरोग्य व दीर्घायु देवो ही प्रार्थना.

  ReplyDelete
 12. भाऊ, हि गोष्ट चांगली झाली कि तुम्ही भारतीय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कायद्याच्या आधारावर तुम्ही बोललेलं सत्य काही जणांना कडू लागायला लागला आहे...त्यामुळे अशी फालतू पब्लिसिटी करत आहेत....
  अशी लोक देशाच्या पंतप्रधानांना, मोदींना घाणेरड्या शिव्या देतात त्या "पुरोगामी" होऊन जातात... आणि तुम्ही सभ्य शब्दात टीका केली कि सगळं गवगवा करतात...
  तुम्ही अजिबात भीक घालू नका....

  ReplyDelete
 13. ‘स्वातंत्र्य फ़ुकटात मिळत नाही की भीक म्हणून मिळत नाही, अविष्कार स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीत स्वस्त नाही. अडाण्यांच्या लोकशाहीत स्वातंत्र्याची इतकी किंमत तर मोजावीच लागणार ना?’अगदी त्रिकालाबाधित सत्य ।। दोन्ही काळात जाणत्या राजामध्ये केवळ शारिरीक बदल झाला नाही , बौद्धिक आणि वैचारिक बदल देखील झाला आहे हे नक्की ।

  ReplyDelete
 14. पोलीसात तक्रार करणार्या एका मूर्ख कार्यकर्त्यामुळे "खुप दुखतय पण बोंबलता येत नाही", अशी अवस्था झाली आहे खाष्टवादीची.

  ReplyDelete
 15. थोबाड रंगवले... बरे झाले... पण त्यांना अक्कल येणार नाही. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून असणार

  ReplyDelete
 16. भाऊ काळजी घ्या..

  ReplyDelete
 17. भाऊ मी सुध्दा येईन सोबत

  ReplyDelete
 18. कदाचित त्यांनी आपल्या ब्लॉगचा वैधानिक इशारा न वाचताच ब्लॉग वाचला असेल ...

  ReplyDelete
 19. भाऊ,
  निःशब्द केलेत तुम्ही आज .................!

  - पुष्कराज पोफळीकर

  ReplyDelete
 20. Keep it up Bhau
  We are with you. For these people
  "Freedom of speech is like a Fart .They always enjoy there's and have problem with others!!!"

  ReplyDelete
 21. One tight slap.
  Tarikh wel ani jaga post kara.

  ReplyDelete
 22. अत्यंत संयत आणि मोजक्या शब्दात केलेला प्रतिवाद हे प्रा.माधव मनोहर यांच्या आठवणीचे आणि या लेखाचेही वैशिष्ट्य.

  ReplyDelete
 23. वाह!
  भाऊ तुम्ही असं काहीतरी लिहिता तेव्हा वाटतं नाही अजून पत्रकारिता आहे जिवंत..
  सध्याच्या परिस्थितीत जे पत्रकार तयार झाले आहेत..त्यांनी एकदा स्वतःला विचारून बघावं आपण जे करतोय ते खरच प्रामाणिक काम आहे का?

  भाऊ तुम्ही लढत रहा... आणि ह्या पुरोगामी लोकांचा बुरखा असाच फडात रहा
  खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 24. भाऊ तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबर काम केले आहे भिणार नाहीत हे खुले आवहान देत प्रुव्ह केले आहेत... भिजत्या राजा आणि त्याची घराणेशाही वरसदार व प्रजा काय म्हणते हे पण लीहा.. पण आता ती फोन करणार नाही.. आता अशा नी त्याची वैचारिक शक्ती नाही हे एक प्रकारे मान्य करुन मारेकरी वापरले आहेत नाहीतर लगेचच अशांच्या मुसक्या आवळल्या असत्या.. आता यात पण राजकारण करतील मागाऊन अशा लोकांना माघार घ्यायला लाऊन.. आपण तक्रार करणार नाहीत पण मोदी शहा जर राजकारण सोडून यांना आवाहन देतील तर छप्पन इंच सिना वाले मानले जातील...

  ReplyDelete
 25. We are with you bhau. Thousands and thousands of youngsters started taking interest in politics due to your blogs and speeches. All are with you.

  ReplyDelete
 26. भाऊ एकदम सही असेच लिहित रहा

  ReplyDelete
 27. नमस्भाकार भाऊ!
  सुमारे 4/5 वर्षापूर्वी मी जेव्हा पहिल्यांदाच तुमचा लेख वाचला होता
  तेव्हापासूनच मला एक मानसिक समाधान वाटत आले आहे की ह्या अशा काळात आपले लिहीणे सुरू आहे आणि ते माझ्यापर्यंत नियमीत पोहोचते आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुमच्या लेखणीचा माझ्या बुद्धीपटलावर प्रभाव तर टाकलेलाच होता परंतु आजच्या आपल्या ह्या लेखाने तर माझं ह्रदय सुद्धा जिंकलं.
  एवढी निखालस आणि निर्भिड पत्रकारिता करणारे पत्रकार कुठेही दिसून येत नाहीत.
  आपण लिहित रहा. भगवंत आपणांस उदंड आयुष्य देवो हीच सदगुरु चरणी प्रार्थना.

  ReplyDelete
 28. लोकशाही च्या नावाने गळे काढणारे हेच पवार साहेब होते का हो? म्हणजे रोज सकाळी उठून मोदींना यथेच्छ शिव्या हासडायच्या आणि कोणी यांचे वाभाडे काढू लागले कि मग यांना राग येणार, मारामारी करणार, म्हणजे पुन्हा एकदा सिद्ध झाले कि मोदी साहेब खरंच किती महान आहेत. ह्या लोकल भ्रष्टाचारी पुढाऱ्यांना त्यांची सर नाही येणार. आणि कोण हा तक्रार दाखल करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यावरच नजर ठेवायला पाहिजे पोलिसांनी, याच्याच मनात काही काळंबेरं असू शकत.

  ReplyDelete
 29. भाऊ तुमच्या निर्भिड पत्रकारितेला मानाचा मुजरा!

  आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा��

  ReplyDelete
 30. आदरणीय भाऊ...
  आपली लेखनी काळजाला भिडते. अशा उपटसुंभ कार्यकर्ते साहेबांचेच वाटोळं करीत आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी अथवा लोकांना लेखणीनूत निर्माण होणारे सत्य आशय कळत नाही हेच ह्या भारतीय लोकशाही चं दुर्दैव होय. अशा लोकांची काल्पनिक दादागिरी चालणार नाही. आपण लिहीत राहावे आणि youtube वर मत मांडीत राहावे. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अशा राजकीय पक्ष ,नेते, आणि कार्यकर्ते यांना दिगंबर करून सोडावे. आपणास उदंड आयुष्य लाभो.

  ReplyDelete
 31. भाऊ आपण जे लिहिले आहे ते वास्तव आहे त्यामुळे मागे बघण्याची काही गरज मला वाटतं नाही शरद पवारांनी जातीचे राजकारण नेहमी केले आहे हे जास्त दिवस चालणार नाही

  ReplyDelete
 32. भाऊ , वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!!!

  ReplyDelete
 33. बऱ्याच दिवसांनी शब्दांची धार अन् मार काय असतो ते जाणवले...विचार जन्मतात...पण त्याचा विखार न होऊ देता योग्य निरोप

  ReplyDelete
 34. आदरणीय भाऊ,
  सदैव आपल्या पाठीशी आहेत सर्व समविचारी.आपणा सारख्या दुर्मिळ नितीमान व तत्त्वनिष्ठ पत्रकारांमुळेच अजूनही आशेला जागा आहे.शेवटी जरी होत असला तरी शाश्वत विजय सत्याचाच असतो.

  ReplyDelete
 35. कदाचित त्यांनी आपल्या ब्लॉगचा वैधानिक इशारा न वाचताच ब्लॉग वाचला असेल

  ReplyDelete
 36. भाऊ....
  यालाच म्हणतात "चपराक"...
  👍👍👍

  ReplyDelete
 37. भाऊ,
  FREEDOM OF SPEECH च्या नावाने गळे काढणारे अशा भ्रमात आहेत कि, सगळे FREEDOM OF SPEECH हे फक्त त्यांना साठवून ठेवायचे आहे...

  ReplyDelete