Wednesday, January 28, 2015

देशाच्या सुरक्षेशी तडजोड कोणी केली?



देशाच्या सुरक्षेविषयी एखादा संरक्षणमंत्री काही बोलतो, तेव्हा त्यातले गांभिर्य ओळखण्यात पत्रकाराची कसोटी लागत असते. कारण सरकारचा जबाबदार मंत्री कधीच उथळ बोलत नसतो. आणि बोलत असेल, तर पत्रकारांनीच त्याला फ़ैलावर घेऊन जाब विचारायला हवा. आधीच्या म्हणजे युपीए सरकारमध्ये ए. के अंथोनी नावाचे संरक्षणमंत्री होते. तसा हा नेता अतिशय जबाबदार म्हणून ओळखला जातो. पण पाकिस्तानी सेनेने वा त्यांच्या हस्तकांनी सीमेवरील दोन जवानांची मुंडकी कापून नेली, तेव्हा त्याने अत्यंत बेजबाबदार विधाने थेट संसदेत केल्याने कल्लोळ माजला होता. ज्यांनी असे हिडीस कृत्य केले, ते हल्लेखोर पाकिस्तानी सेनेच्या गणवेशातले होते, असे विधान अंथोनी यांनी केलेले होते. त्यावरून संसदेत गदारोळ माजला होता. कारण एकप्रकारे भारताचा संरक्षणमंत्री पाकिस्तानच्या कांगाव्याचे समर्थन करत होता. पाकिस्तान नेहमीच सीमेवर कुठली गडबड झाली, मग त्यात त्यांची सेना गुंतलेली नसून बंडखोर असंतुष्ट काश्मिरी अतिरेकी असल्याचा दावा करीत असते. ही मुंडकी कापायची घटना घडली, तेव्हाही पाकिस्तानने तसेच हात झटकले होते. त्यावेळी अंथोनी यांचे विधान एकप्रकारे पाक भूमिकेला दुजोरा देणारे होते. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त झालेला होता. कारण त्यातून पाक सैनिक नव्हेतर कुणा जिहादींनी अशी मुंडकी कापल्याचा पाकचा दावा खरा ठरत होता. त्यमुळेच अखेर आपले शब्द मागे घेत अंथोनी यांना संसदेची माफ़ी मागावी लागली होती. आजच्या संरक्षणमंत्र्यांनी असे कुठले बेजबाबदार विधान केले आहे काय? पहिली गोष्ट म्हणजे मनोहर पर्रीकर यांनी असे कुठलेही विधान संसदेत केलेले नाही किंवा भारत पाकच्या विषयात त्यांनी गोंधळ माजवणारे विधान केलेले नाही. त्यांनी एका समारंभात बोलताना व्यापक सुरक्षा सज्जतेविषयी मूलभूत सत्य सांगणारे विधान केलेले आहे.

पर्रीकर यांच्या विधानात जितका युद्धसंज्जता हा विषय गुंतला आहे, तितकाच सुरक्षा सज्जतेचाही भाग समाविष्ट आहे. आज भारताकडे इतकी सज्ज सेना असतानाही किरकोळ घातपाती व जिहादी यांचा बंदोबस्त करताना नाकी दम येतोय. त्याच्याशी पर्रीकरांचे विधान संबंधित आहे. पाकिस्तानातून समुद्रमार्गे दहा संशयित मुंबईत येतात आणि नौदलाच्या तळाजवळून शहरात घुसतात. तिथे मनसोक्त हिंसाचार करतात आणि किडामुंगीप्रमाणे निरपराध नागरिकांची कत्तल करतात, हा भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला पाकिस्तानने लावलेला सुरुंग आहे. देशाच्या शत्रूंना आपल्या सुरक्षा व्यवस्थेत कुठे भेगा व भगदाडे पडलीत, त्याचा थांगपत्ता लागला असल्यानेच असले भीषण हल्ले होऊ शकतात. कारण नागरी प्रशासनापासून सुरक्षा यंत्रणांपर्यंत कुठेही कडेकोट दक्षता नाही. दुसरीक्डे शत्रू गोटात काय हालचाली चालू आहेत, त्याची तमाम इत्थंभूत बातमी भारताला कळवणारी भेदक हेरयंत्रणा आपल्यापाशी नाही. तर अशी यंत्रणा कशाला नसावी? ज्या सज्ज यंत्रणेमुळे चार दशकापुर्वी भारताने जगाला थक्क करून सोडणारे बांगला युद्ध जिंकून पाकिस्तानचे दोन तुकडे करून दाखवले होते. इतकी भेदक व तिक्ष्ण हेरगिरी, तेव्हा भारताकडून होऊ शकायची म्हणून ते शक्य झाले होते. कारण नुसते देशांतर्गत भारतीय हेरांचे सुसज्ज जाळे नव्हते, तर शत्रू देशातही मोक्याच्या जागी चालू असलेल्या हालचालींची माहिती भारतापर्यत पोहोचत होती. आज त्याचाच थांगपत्ता घटना घडून गेल्यावरही लागलेला नसतो. पर्रीकर त्याच त्रुटीबद्दल बोलले आहेत. आणि त्यांनी कुणा ऐ‍र्‍यागैर्‍यावर आरोप केलेले नाहीत, की नुसतीच खळबळ माजवण्यासाठी विधान केलेले नाही. ज्यांना अशा पंतप्रधानांची नावे हवी असतील, त्यांच्यासाठी ती नावे कित्येक वर्षापासून उपलब्ध आहेत. केवळ जुन्या बातम्या नव्हेत, तर पुस्तकातूनही त्याचे तपशील प्रसिद्ध झालेले आहेत,

रॉ नामक भारताची परदेशातील हालचालीवर नजर ठेवणारी यंत्रणा आहे. अशाच यंत्रणेने भारतावर याह्याखान हवाई हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे गोपनीय वृत्त १९७१ सालात दिलेले होते. ती विमाने उडण्यापुर्वीच भारतीय लढाऊ विमानांनी त्यांच्यावर बॉम्ब टाकून त्यांची राखरांगोळी केलेली होती. मग पाक सेनेला हवाई सुरक्षाच उरली नव्हती आणि महिन्याभरात पाकिस्तानला भारतीय सेनेपुढे शरणागती पत्करावी लागली होती. इतकी प्रभावी भारतीय हेरयंत्रणा पुढल्या काळात कोणी मोडून टाकली, त्याचे संदर्भ विविध पु्स्तकातून आलेले आहेत. बांगला युद्धानंतरच्या काळात इंदिराजी हुकूमशहा बनल्या आणि त्यांनी देशात आणिबाणी लागू करून विरोधी नेत्यांना गजाआड टाकले होते. त्यानंतर जे सत्तांतर झाले, त्यात मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान झाले आणि इंदिराजींचे हस्तक अशी त्यांनी रॉ संस्थेविषयी समजूत करून घेतली. त्यामुळेच पंतप्रधान झाल्यावर त्यांनी आपल्या अधिकारात रॉ संस्थेचे पंख छाटले आणि तिच्यावर अनेक निर्बंध लावले. या संस्थेतर्फ़े जगभर चाललेल्या कृतीना मर्यादा घातल्या. त्यानंतर दिर्घकाळ या हेरसंस्थेला आपले जगभरातील हस्तकांचे जाळे नव्याने विणणे अवघड होऊन बसले. जे हस्तक परदेशात काम करतात, त्यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत असते. त्यांना अकस्मात निकालात काढणे किंवा वार्‍या्वर सोडणे, म्हणजे अशा क्षेत्रातील विश्वासार्हता गमावणे असते. जे कोणी अशा कामात फ़सतात, त्यांच्या अनुभवानंतर दुसरे कोणी तुमचे हस्तक व्हायचा धोका पत्करायला सहजासहजी तयार होत नाहीत. कित्येक वर्षाच्या प्रयत्नातून असे हस्तक निर्माण केले जात असतात. त्या त्या देशात मोक्याच्या जागी जाऊन माहिती संकलीत करण्याची त्यांची क्षमताच त्यांना असेट म्हणजे मोलाचे हस्तक बनवत असते. त्यालाच मोरारजींच्या कारकिर्दीत मोडीत काढले गेले.

ज्यांना कोणाला याविषयी माहिती हवी असेल, त्यांनी बी. रामन यांच्या पुस्तक व लेखातून ती शोधून मुद्दाम वाचावी. मग भारतीय हेरखात्याच्या नासाडीचा तपशील त्यांना नेमका मिळू शकेल. त्यात त्या कालखंडातील घडामोडींचे बारकावेही मिळू शकतील. बी. रामन त्या काळात राजनैतिक अधिकारी म्हणून पॅरीसच्या भारतीय वकीलातीत कार्यरत होतो. व्यवहारत: रॉ संघटनेचे अधिकारी म्हणून तिथे रामन असेट बनवणे व हाताळणे असलेच काम करीत होते. पण मोरारजींच्या कालखंडात त्या कामाला वेसण घातली गेल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेले आहे. थोडक्यात पर्रीकर सुरक्षा सज्जतेच्या संदर्भात कोणाकडे अंगुलीनिर्देश करतात, ते आणखी उलगडून सांगण्याची गरज आहे काय? बी. रामन यांच्या त्याच पुस्तकाचा आधार घ्यायचा, तर जनता दलाच्याच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याही कारकिर्दीत हेरखात्याची अशीच हेळ्सांड झाल्याचाही अनुभव आहे. योगायोग असा, की आज काश्मिरमध्ये जो हिंसाचाराचा व घातपाताचा आगडोंब उसळला आहे, त्याची सुरूवातच सिंग यांच्या कारकिर्दीत झाली. सिंग यांचे गृहमंत्री मुफ़्ती महंमद सईद हे होते आणि त्यांचीच मुलगी रुबाया हीचे अपहरण झाले. तिच्या सुटकेसाठी चार जिहादी तुरूंगातून सोडले गेले आणि पुढल्या काळात क्रमाक्रमाने काश्मिर जिहादी हिंसाचाराची रणभूमीच होऊन गेला. काश्मिरमध्ये जिहादी अतिरेक व घातपाताला वेसण घालू शकणार्‍या रॉ संस्थेच्या कारवायांनाच सिंग यांनी लगाम लावला होता. तेव्हा पर्रीकर कुठल्या पंतप्रधानांवर दोषारोप करीत आहेत, त्यांची नावे त्यांनीच उघडपणे सांगण्याची गरज नाही. त्यापेक्षा आज देशाच्या सुरक्षेला भेडसावणार्‍या जिहादी घातपाताला रोखण्यात आपण कमी कुठे व कशामुळे पडतोय, त्याची दखल गांभिर्याने घेतली जायला हवी. मग अप्रत्यक्षपणे संरक्षणमंत्री काय सांगत आहेत, त्याला शहाण्याला शब्दाचा पार असे म्हणतात. पण जे शहाणेच मुर्खपणाच्या आहारी जातात, त्यांचे काय?

1 comment:

  1. भाऊ, आज याचं मुफ्ती महंमद सईद बरोबर भाजप सरकार बनवू पहात आहे, हे कितपत योग्य आहे?

    ReplyDelete