Thursday, September 10, 2015

पवार कुठे झोपले? शिर्डीचे बाबा कोपले

vikhe pawar साठी प्रतिमा परिणाम

जगभरचे लोक मोठ्या भक्तीभावाने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घ्यायला येतात. त्यामागे बाबांचा आपल्यावर अनुग्रह व्हावा हीच अपेक्षा असते. कोणी पायी चालत तिथे जातो, तर कोणी रात्रीची बस पकडून पहाटे बाबांच्या आरतीला हजेरी लावतो. प्रत्येकाचे लक्ष्य बाबांची कृपा व्हावी हेच असते. पण कोणी कधी बाबांचा कोप झाला वा बाबा कोपले, असे ऐकलेले नाही. तो मान महाराष्ट्राचे जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे अनुभवी ज्येष्ठ नेता शरद पवार यांनी मिळवला आहे. त्यांच्यावर शिर्डीचे बाबा कोपले आहेत आणि त्यांनी चार खडेबोल साहेबांना ऐकवले आहेत. मात्र साईबाबा आणि हे कोपलेले शिर्डीचे बाबा वेगळे आहेत. हे बाबा म्हणजे अहमदनगरचे ज्येष्ठ राजकारणी बाळासाहेब विखे पाटील होत. दिर्घकाळ ज्यांनी नगर जिल्ह्याचे संसदेत प्रतिनिधीत्व केले आणि ज्यांना शेतीसह पाण्याचे अभ्यासक म्हणून ओळखले जाते, अशी ही व्यक्ती आहे. पण वयाने थोर असल्याने त्यांना बाबा म्हणायला हरकत नसावी. अधिक ते शिर्डी या विधानसभा मतदार संघाचे पालक आहेत. त्यांचेच सुपुत्र राधाकृष्ण विखे सातत्याने या ठिकाणाहून विधानसभेवर निवडून आलेले आहेत. म्हणूनच शिर्डीच्या आमदाराचे बाबा असल्याने बाळासाहेब विख्यांना शिर्डीचे बाबा संबोधणे गैर होऊ नये. तर असे हे शिर्डीचे बाबा अकस्मात परवा आपल्या समाधीतून बाहेर आले आणि त्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीचे रोगनिदान केले. महाराष्ट्रातला दुष्काळ व पाण्याचे दुर्भिक्ष्य किंवा शेतीसह शेतकर्‍यांची दैन्यावस्था, याला सरकारच जबाबदार असल्याचे आपण ऐकत असतो. काही लोक त्यासाठी अपुर्‍या पावसाला दोष देतात. पण ह्या सगळ्या अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्याचाच निर्धार कररून हे शिर्डीचे बाबा बोलले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या व प्रामुख्याने मराठवाड्यातील दुष्काळ व दुर्दशेला शरद पवारच जबाबदार असल्याचे सांगून टाकले आहे.

अर्थात त्याला साहेब उत्तर देतील असे नाही. कारण साहेब काही सर्वांच्याच आरोपांना वा टिकेला उत्तर देत नाहीत. शिवाय प्रत्येकाच्या मताची कदर करण्याची साहेबांना गरजही नाही. मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही साहेबांवर घसरले होते. साहेबांनी त्याची कुठे दखल घेतली? आपण राज ठाकरेंना मनावर घेत नाही, इतकीच साहेबांनी दखल घेतली होती. म्हणजे आपण दखल घेत नाही, असे सांगण्यापुरती दखल घेण्याला दखल न घेणे म्हणतात, हे साहेबांच्या अशा धोरणामुळे महाराष्ट्राला समजू शकले. साहेबांचे धोरण व वर्तन नेहमीच महाराष्ट्राला उदबोधक ठरले आहे. पण राज ठाकरे वा विखे पाटील यांच्यासारख्या काही मोजक्या लोकांना ते समजून घेण्याइतकी बुद्धी नसावी. अन्यथा त्यांनी असे सवाल वा आरोप कशाला केले असते? वर्षभरापुर्वी विधानसभा निवडणूका झाल्या. त्यात स्वबळावर लढताना राष्ट्रवादी कॉग्रेसने केलेली जाहिरात आठवते? महाराष्ट्रात कुठलेही काम वा घटना साहेबांच्याच धोरणामुळे घडते, याची ग्वाही त्यातून दिलेली होती. कोणी महिला घरात भाकरी थापते वा कोणी मुलगी शाळेत जाते, ते केवळ साहेबांच्याच धोरणामुळे. फ़ार कशाला शतकाहून अधिक काळ जगभरच्या घड्याळात दहा वाजत होतेच. पण तसे दहा कोणामुळे वाजतात, ते कुणाला ठाऊक होते काय? साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला म्हणून जगाला उमगले, की घड्याळात साहेबांच्या धोरणामुळे दहा वाजतात. हे लक्षात घेतले तर महाराष्ट्रातला सुकाळ असो की दुष्काळ असो, त्याचे श्रेय साहेबांनाच जाते ही बाब लक्षात येऊ शकते. त्याचा गौप्यस्फ़ोट करायला शिर्डीच्या बाबांनी थेट पत्रकार परिषद घेण्याची काय गरज होती? म्हणून तर साहेब अशा लोकांची दखल घेत नाहीत. त्यापेक्षा ते दुष्काळी भागाला धावत्या भेटी देवून त्याचे राजकारण करण्यात वेळ व्यतित करतात. तेही अशा बाबांना बघवत नाही.

कालपरवाच साहेब माण-खटावचा खास दौरा करून आले. त्यामुळे त्यांची झोप उडाली. मराठवाड्यापेक्षा माण-खटावचा दुष्काळ भयानक आहे, असे साहेबांच्या लक्षात आले. किंबहुना असा काही दुष्काळी प्रदेश सातारा जिल्ह्यात आहे, तेच ह मुळात साहेबांना परवा कळले. अन्यथा त्यांनी कधीच तिथल्या पाण्याची व्यवस्था केली नसती का? साहेब २००९ पासून २०१४ पर्यंत ज्या माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत होते, त्यातच माण-खटावचा समावेश होतो. पण मते मिळवल्यानंतर साहेब तिकडे सहसा फ़िरकले नाहीत. अन्यथा त्यांना मागल्या सलग तीन वर्षे वसलेल्या चारा छावण्या दिसल्या असत्या. तेव्हाही आजच्याच इतका भयंकर दुष्काळ माण खटावला भेडसावत होता. पण साहेबांना त्याची कुठे खबर होती? जे कोणी दुष्काळ म्हणून बोंबलत होते, त्यांची दखल घेण्याची साहेबांना गरज वाटली नाही. कारण तिथे दुष्काळ असावा व रहावा, हेच तर साहेबांचे धोरण होते. युती सरकारच्या काळात जिहे-कटापूर या धरणातील पाणी माण-खटावला नेऊन तिथला दुष्काळ संपवायचे नियोजन कृष्णाखोरे योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेले होते. पण १९९९ सालात साहेबांची सत्ता पुन्हा आली आणि माण-खटावची योजना जी बासनात गुंडाळली गेली, ती अजून उघडली गेलेली नाही. मग त्याला कोणाच्या धोरणाचा परिणाम समजायचे? अगदी २००९ सालात माढा लढवतानाही साहेबांनी त्या कामाला वेग आणायचे आश्वासन दिले होते. पण अजून एक इंच योजना पुढे सरकली नाही. याला साहेबांचे धोरण म्हणतात. आता मात्र सत्ता गेल्यावर साहेब त्याच दुष्काळाचे राजकारण करायला कंबर कसून बाहेर पडले आहेत. तेव्हा शिर्डीच्या बाबांनी त्यावर झोड उठव्ण्यात नवे काहीच नाही. त्यांचे सगळे आरोप व आक्षेप खरेच आहेत. पण त्यात नवे काय आहे? सर्वकाही साहेबांच्या धोरणामुळेच होत असेल, तर दुष्काळाची तरी काय बिशाद साहेबांच्या शब्दाबाहेर जाण्याची?

खरे तर हे खापर आपल्याच डोक्यावर फ़ोडले जाणार, हेही साहेबांना ठाऊक होते. पण सहकार्‍यांच्या आग्रहाखातर त्यांना मराठवाड्याचा दौरा करावा लागला. त्यात काही बोलणे भाग आहे म्हणून ‘सांगा, आता जगायचं कसं’ असा सवालही साहेबांनी केला. आता साहेबांकडे सत्ता नसताना जगायचे कसे आणि करायचे काय? ही केवढी मोठी समस्या असते, त्याचा शिर्डीच्या बाबांना अंदाजही येणार नाही. कारण त्यांना फ़ारकाळ सत्तेत रहाता आलेले नाही. म्हणूनच साहेब स्वत:ची समस्या बोलत होते, सत्तेशिवाय जगायचे कसे? पण समोरच्या लोकांसह अनेकांनी साहेब कर्जबाजारी व दुष्काळी शेतकर्‍याविषयी बोलतात, अशी समजूत करून घेतली. त्यात दोष साहेबांचा कसा? तिकडे छगन भुजबळ चौकश्या व खटल्यात फ़सलेत. इकडे अजितदादा सिंचनात रुतलेत. त्यांच्यासह तटकरेंवर चौकशीची टांगली तलवार आहे. हातातून सर्वच सत्तापदे गेलेली आहेत. अशा परिस्थितीत जगायचे कसे हा किती भयंकर भेडसावणारा प्रश्न असेल ना? शिर्डी्च्या बाबांना तो उमजला नाही, तर नवल नाही. त्यांच्याकडून असे वार होणार याचीही साहेबांना पुर्वकल्पना होती. म्हणूनच त्यांनी लगोलग दुष्काळावर राजकारण नको असे सांगून टाकले होते. त्यांच्या अनुयायी भक्तांमध्ये इतकी श्रद्धा व सबुरी असल्याने फ़िकीर नव्हती. पण शिर्डीच्या या दुसर्‍या बाबांपाशी श्रद्धा नाही की सबुरी नाही. ते आले थेट मैदानात आणि डागली साहेबांवर तोफ़! बाबांनी साहेबांचा पुरता अभ्यास केलेला दिसत नाही. अन्यथा ते अशा फ़ंदात पडले नसते आणि पवारांनीच महाराष्ट्राचे बारा वाजवले अशा आशयाचे आरोप विख्यांनी केले नसते. अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राचे पवारांनीच बारा वाजवले असतील. पण व्यवहारात त्यांनी मागली सोळा वर्षे आपण दहाच वाजवलेत, हे नरेंद्र मोदींना सुद्धा पटवून दाखवले ना? उगाच मोदी दरमहा बारामतीकरांचा सल्ला घेतात? मग आता कोपून काय फ़ायदा?

No comments:

Post a Comment