Thursday, September 17, 2015

राहुल हे उत्तर नाही, तीच समस्या आहे.



कालपरवाच कॉग्रेस कार्यकारीणीची बैठक झाली आणि त्यात संघटनात्मक निवडणूका आणखी एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. त्याचा अर्थ इतकाच, की आणखी एक वर्ष तरी पक्षाची धुरा राहुल गांधी यांच्या हाती जाऊ नये, हा डाव खेळण्यात पक्षाचे ज्येष्ठ व वयोवृद्ध नेते यशस्वी झाले. तसे कोणी उघड बोलणार नाही. कारण तसे बोलले तर पक्षात रहाताच येत नाही. लोकसभा निवडणूकीचे निकाल लागल्यावर राजस्थान व केरळच्या दोन नेत्यांनी तशी हिंमत केली आणि ते पक्षाबाहेर फ़ेकले गेले. किंबहूना तशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून तीन पिढ्या कॉग्रेसमध्ये घालवलेल्या घराण्याच्या जयंती नटराजन यांनी आधी पक्षाचा राजिनामा दिला होता आणि मगच राहुल यांच्यावर उघड तोफ़ डागण्याचा पवित्रा घेतला होता. पण त्यनंतरही पक्षाच्या अवस्थेला आपण जबाबदार आहोत, याची जाणिव या चाळीशी ओलांडलेल्या राजपुत्राला झालेली नाही. म्हणूनच त्याच्या हाती पक्षाची सुत्रे गेली तर आहे तितकेही संघटन शिल्लक रहाणार नाही, याची जाणत्या नेत्यांना खात्री पटली आहे. पण हे सत्य बोलायचे कोणी व कसे? बोलले तर सुधारणे बाजूला, आपलीच गठडी वळली जाईल याची प्रत्येकाला खात्री आहे. म्हणून मग ज्यांचा अजून काही वकुब आहे, अशा नेत्यांनी राहुलना पक्षाध्यक्ष होण्यापासून रोखण्यात यश मिळवले आहे. एकूणच पक्षाची दुर्दशा एका गोष्टीतून लक्षात येऊ शकते. कॉग्रेस कार्यकारिणीची बैठक हा माध्यमातला एक मथळ्याचा विषय असायचा. पण यावेळी कोणी त्याची फ़ारशी दखलही घेतली नाही. याचा अर्थ आता राष्ट्रीय राजकारणात कॉग्रेसला फ़ारसे स्थान राहिले नाही, असाच होतो. पण त्याच्याही पलिकडे आणखी एक बाब गंभीर अशी, की दोन महिन्यत बिहारच्या निवडणूका होऊन निकाल लागायचे आहेत आणि कॉग्रेस कार्यकारीणीने बिहारविषयी काही भूमिकाच चर्चिली नाही.

दोन वर्षापुर्वी पक्षाचे एक जाणते व अभ्यासू नेते जयराम रमेश यांनी एक सूचक विधान केलेले होते. तेव्हा लोकसभा निवडणूकीचे वेध लागले नव्हते. चार विधानसभेच्या निवडणूकांचा आखाडा भरलेला होता आणि त्यात पुढाकार घेऊन नरेंद्र मोदी भाजपाचा प्रचार करत होते. लोकसभेची ती पुर्वतयारी होती. त्यात मोदींना मिळणारा प्रतिसाद ओळखून रमेश यांनी सूचक विधान केलेले होते. ते म्हणाले होते की ‘नरेंद्र मोदी हे कॉग्रेस पुढले स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे आव्हान आहे.’ याचा अर्थ कितीजणांना उमजला होता? तो समजून घेण्याचीही गांधी घराण्याच्या निष्ठावंतांना गरज वाटलेली नव्हती. उलट काहीजणांनी त्या इशार्‍याचा विपरीत अर्थ लावून रमेश यांनाच पक्षातून निघून जाण्याचे इशारे दिले होते. सत्यव्रत चतुर्वेदी यांनी तशी संतप्त प्रतिक्रिया दिलेली होती. रमेश यांना कॉग्रेस सोडून भाजपात जाण्याचा सल्ला देण्यापर्यंत चतुर्वेदी यांची मजल गेली होती. ही कॉग्रेसची अवस्था आहे. तिथे सत्य वा वास्तव बोलणेही गुन्हा आहे. खरे तर रमेश यांनी तेव्हाच खर्‍या दुखण्यावर बोट ठेवलेले होते. किंबहूना पक्षाला राहुल पराभवाच्या गर्तेत घेऊन चालले आहेत, हेच रमेश यांनी वेगळ्या शब्दात स्पष्ट केले होते. मोदी व भाजपासाठी २०१४ ची निवडणूक शेवटची संधी आहे. त्यात मोदी हरले तर त्यांचा खेळ खलास होईल आणि राहुल पराभूत झाले, तरी काही फ़रक पडणार नाही. कारण राहुल यांचे वय त्यांच्या बाजूला आहे आणि ते २०१९ च्या संसदीय निवडणूकीसाठी पक्षाला संघटनात्मक पातळीवर पक्ष सज्ज करीत आहेत. मात्र आम्ही कॉग्रेसजन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी चिंतीत आहोत. हे रमेश यांचे शब्द पक्षातल्या जाणकारांना सावध करण्यासाठी होते. राहुल पक्ष बुडवायला निघालेत, असेच रमेश अप्रत्यक्ष सांगत होते आणि त्यांचे शब्द निकालांनी खरे करून दाखवले.

स्वातंत्र्योत्तर काळात कुठलाही नेता वा पक्ष निवडणूकीत एकट्याच्या बळावर कॉग्रेसला जेवढे मोठे आव्हान उभे करू शकला नाही, तितके मोदींनी उभे केले आणि खरेच राहुलनी त्या निवडणूकीत कॉग्रेस रसातळाला घेऊन जाण्यात मोदींना मदत केली. जणू ती लोकसभा निवडणूक दार ठोठावते आहे, याचा थांगपत्ता नसल्यासारखेच राहुल त्या काळात वागत होते आणि इतक्या दारूण पराभवानंतरही त्यांच्या चेहर्‍यावर शब्दात कुठे त्याची खंत दिसत नाही. ही कॉग्रेसची खरी समस्या आहे. कारण आजही भाजपाला आव्हान देवू शकेल अशी विस्तारलेली पक्ष संघटना हाताशी असलेला कॉग्रेस हाच एकमेव पक्ष आहे. पण त्याला उर्जितावस्थेला आणू शकेल असा कोणी नेता त्याच्यापाशी नाही. त्याहीपेक्षा धोकादायक बाब म्हणजे ज्याने पक्षाची अशी दुर्दशा करून दाखवली, त्याच्याचकडे अपेक्षेने बघणार्‍यांच्या हाती पक्षाचे भवितव्य आहे. मग त्याचेच प्रतिबिंब पक्षाच्या कामात व निर्णयात पडले तर नवल नाही. बिहार वा उत्तर प्रदेश या दोन मोठ्या राज्यांच्या बळावर दिर्घकाळ कॉग्रेसने देशात सत्ता गाजवली. मागल्या दोन दशकात त्याच राज्यातून कॉग्रेस पुरती उखडली गेली आहे आणि इतरांच्या मदतीने सत्ता उपभोगताना त्याच महत्वाच्या राज्यात पक्षाची नव्याने उभारणी करण्याचे कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. आताही बिहार विधानसभा निवडणूका जिंकण्याची गरज नाही, पण प्रचाराच्या निमीत्ताने पक्ष संघटनेत नव्याने जान फ़ुंकण्याची संधी घ्यायची असते. त्याचे भान राहुलना दिसत नाही. अजून हा नेता तिकडे फ़िरकलेलाही नाही. उत्तरप्रदेशातही आपल्या मतदारसंघांच्या पलिकडे राहुल किती फ़िरकले आहेत? मध्यंतरी संसद चालू असताना पुण्यात फ़िल्म इन्स्टीट्युट वा जंतरमंतर येथे माजी सैनिकांच्या धरण्यात राहुलनी हजेरी लावली. जिथे गर्दी वा प्रसिद्धी मिळेल तिथे जांण्याने पक्षाची उभारणी होत नसते. १९७८ सालात इंदिराजींनी काय केले त्याचा जरा या नातवाने अभ्यास केला तरी खुप झाले.

पण तसे होण्याची अजिबात शक्यता नाही आणि अन्य काही व्यवस्था होईपर्यंत त्याच्या हाती पक्षाची सर्व सुत्रे जाऊ नयेत, याची ज्येष्ठांनी काळजी घेतलेली दिस्ते. अन्यथा पक्षाध्यक्ष व्हायची सर्व तयारी झालेली होती. पण तसे करायचे धाडस मातोश्रींनाही झाले नाही, यातच वास्तवाचा दाखला मिळतो. पण सवाल तिथेच संपणारा नाही. कारण तो एका व्यक्ती वा कुटुंबाचा विषय नाही. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला आव्हान देवू शकेल, अशा सशक्त पक्षाचीही गरज असते. ती समोर नव्हती म्हणून दिर्घकाळ कॉग्रेस सत्ता भोगू शकली. माग्ल्या दोन दशकात भाजपाच्या रुपाने नवा पर्याय उभा रहात गेला तरी कॉग्रेस पुन्हा सत्ता मिळवू शकली होती. आता तो पर्याय निर्माण झाला असताना, पुन्हा त्यानेच मक्तेदार व्हावे हे लोकशाहीला पोषक नाही. म्हणूनच कॉग्रेसला या गाळातून व घराणेशाहीच्या जंजाळातून बाहेर काढणारा कोणी नेता पुढे येणे आवश्यक आहे. जसे मोदींनी व नव्या पिढीतल्या भाजपा नेत्यांनी अडवाणी-वाजपेयी यांच्या युगातून भाजपाला बाहेर काढले; तसे कॉग्रेसला नेहरू गांधी घराण्यापासून मुक्ती देणारा कोणी धाडसी नेता पक्षात उभा रहाणे अगत्याचे आहे. तरच कॉग्रेसला भवितव्य असेल. अन्यथा पुन्हा भाजपाला पर्याय नाही अशीच स्थिती येऊ शकेल. कारण कॉग्रेस सोडल्यास पुन्हा अन्य कुठला राष्ट्रव्यापी पर्याय जनतेपाशी नाही. राहुल वा गांधी घराण्याचा वारस ही कॉग्रेसची व देशाची गरज नसून पर्यायी राष्ट्रव्यापी पक्ष ही लोकशाहीची गरज असल्याचा पवित्रा घेऊन कोणा कॉग्रेसजनाला त्यात पुढाकार घेणे अगत्याचे आहे. इथे जयराम रमेश यांच्या विधानाचा अर्थ नेमका लक्षात येऊ शकतो, स्वातंत्र्योत्तर काळात कॉग्रेसला कोणी पर्याय नव्हता म्हणूनच कुठले आव्हान नव्हते. मोदी तसे आव्हान होऊन समोर आलेत, हे ओळखणारा रमेश हाच एकमेव नेता होता. पण त्यालाही गप्प बसवण्यात आले. राहुल हे या समस्येवरचे उत्तर नसून तीच कॉग्रेसची खरी समस्या आहे.

2 comments:

  1. भाऊ! त्या बिचार्‍या राहुल बाळावर इतके शरसंधान करू नका हो. त्याला राजकारण कळत नाही त्यात त्याची काय चूक? असते एखाद्याला कमी बुद्धी म्हणून काय मारून मुटकून त्याला शिकवत राहणे संयुक्तिक नाही.

    ReplyDelete
  2. Hahahahaha Ramdas Bhau barobar bolalat pan Bhaunchya Najerutun kontihi Gost sutnar nahi

    ReplyDelete