Tuesday, September 22, 2015

नेताजींच्या वारश्याला नेहरू घाबरले होते?सध्या ममता बानर्जी यांच्या राज्य सरकारने खुल्या केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयीच्या कागदपत्रांनी मोठे रण माजले आहे. त्यात अर्थातच प्रत्येकजण आपल्याला हवे तेच शोधणार आणि सोयीचे तितकेच सांगणार आहे. बहुतेक बाबतीत हाच अनुभव असतो. मात्र आपणच सत्याचे पुजारी आहोत, असा आव युक्तीवादात आणलेला असतो. यात प्रामुख्याने नेहरूवादी किंवा पुरोगामी म्हणवून घेणार्‍यांचे हाल झाले आहेत. कारण आजवर जे पाखंड मनोभावे माजवण्यात धन्यता मानली गेली. त्याची लक्तरे आता चव्हाट्यावर येत असून जागोजागी ठिगळ लावताना अशा मंडळीची तारांबळ उडालेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे नेताजी हयात आहेत, की नाही हा वाद बाजूला ठेवून अन्य मुद्दे तपासता येतील. सुभाषबाबू विमान अपघातात मृत्यूमुखी पडले, ही आजवर भारत सरकारने कथन केलेली सरकारी भूमिका आहे. तिला तडा गेला आहे आणि त्याच स्वातंत्र्याच्या सेनानीला युद्धकैदी ठरवले गेल्याचा बभ्रा झालेला आहे. पण त्यातले तथ्य समोर यायला अजून अनेक पुरावे कागदपत्रे आवश्यक आहेत. भारत सरकारने आपला दफ़्तरखाना उघडून संबंधित कागदपत्रे खुली करावी लागतील. तेव्हाच त्यावरील पडदा उठवला जाऊ शकेल. पण ममतांनी खुल्या केलेल्या दस्तावेजांनी एक गोष्ट स्पष्ट केली, की स्वातंत्र्योत्तर काळातही सुभाषबाबूंच्या आप्तस्वकीयांवर स्वकीय सरकारनेच संशयिताप्रमाणे नजर ठेवली होती. ज्यावेळी अन्य स्वातंत्र्यसैनिकांना व त्यांच्या आप्तांना सन्मानाची वागणूक मिळत होती, त्याचवेळी नेताजींचे नातेवाईक मात्र संशयित गुन्हेगारासारखे वागवले जात होते. सहाजिकच ज्यांचे नेताजींवर प्रेम होते वा आहे, त्यांच्यासाठी ही दुखरी जखम होती. त्यावरची खपली या कागदपत्रांनी उचकटून काढली आहे. सहाजिकच आजवर ज्यांनी त्याची टवाळी केली होती, ते आज आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहिले आहेत.

नेताजींचा मृत्यू शंकास्पद असेल. पण ते स्वातंत्र्यपुर्व राजकारणात नेहरू व गांधीजींना आव्हान म्हणून उभे राहिले होते. सहाजिकच पुढल्या काळात नेताजींच्या आप्त मंडळींना वागणूक मिळाली, त्यात सुडबुद्धी शोधली जाणे स्वाभाविक आहे. अगदी कालपरवा देशात सत्तांतर झाले, त्याच्याही आधीपासून अनेक भानगडी चव्हाट्यावर आल्या होत्या. पण त्यात आपलेच हातपाय अडकलेले असल्याने आधीच्या कॉग्रेस सरकारने व त्यातल्या राज्यकर्त्यांनी त्याची चौकशी होऊ दिली नव्हती, की त्याविषयी तपासही होऊ दिला नव्हता. अगदी पुरावे म्हणावे इतकी माहिती समोर आणुनही सोनियांनी कोणाचा बाल बाका होऊ दिला नव्हता. आता सत्तांतर झाल्यावर तेच पुरावे व माहिती घेउन नव्या सरकारने कारवाई सुरू केल्यावर काय आरोप मोदी सरकारवर झाले? राजकीय सूडबुद्धीने कारवाया होतात, हाच आरोप होतोय ना? म्हणजे तुम्ही सत्तेत असताना भ्रष्टाचार व गैरलागू कृती करणार आणि त्याबद्दल तक्रार केली तरी प्रशासनाला कारवाई करू देणार नाही. सत्ता बदलली आणि त्यांनी आधीच्या पापांचा घडा शोधायला घेतला, मग सुडबुद्धीचा आरोप! हे आता नेहमीचेच झाले आहे. जर हे सोनियांचे जावई रॉबर्ट वाड्रांबाबत होऊ शकते, तर नेहरूंच्या बाबतीत वेगळे काय होईल? इतर खुलासे करत बसण्यापेक्षा नेहरूवादी किंवा कॉग्रेसजनांनी जरा आपल्याच कालपरवाच्या वाड्रा वा नॅशनल हेराल्ड खटल्याविषयीच्या भूमिका तपासून बघाव्यात. मग त्यांच्यावर नेताजींचे पुरस्कर्ते कसला आरोप करीत आहेत, त्याचा खुलासा होऊन जाईल. तुमच्या म्हणजे नेहरूंच्या हाती सत्ता होती, तेव्हा नेताजी सोडा त्यांच्या आप्तस्वकीयांनाही सुडबुद्धीने वागवले, असेच म्हटले जाणार नाही काय? जर आता नेताजींच्या बाबतीत कायद्याची तरतुद हे स्पष्टीकरण द्यायचे असेल, तर वाड्रा प्रकरणी मोदी सरकारचे समर्थन करावे ना?

मुद्दा इतकाच आहे की नेताजींच्या मृत्यूनंतर तब्बल दोन दशके बोस कुटुंबावर पाळत ठेवली गेली आहे आणि नेहरूंच्या निधनानंतरही तो ससेमिरा चालूच होता. असा कुठला धोका नेताजींच्या कुटुंब वा वारसांकडून नेहरू कुटुंबाला भेडसावत होता? १९७० सालापर्यंत ही पाळत चालू होती किंवा अगदी १९६५ पर्यंत चालू असेल, तर त्याचा नेमका खुलासा करता आला पाहिजे ना? नेताजी हा भारतासाठी धोका होता काय? त्यांचे आप्तस्वकीय भारताच्या स्वातंत्र्यासाठी कुठल्या कारणाने धोका ठरणार होते? आजवरच्या इतिहासाची तपासणी केली, तर केवळ कुणावर नुसती पाळत ठेवणे कॉग्रेसने सर्वात मोठे पाप मानलेले आहे. कॉग्रेसजनांची स्मृती भ्रष्ट झालेली नसेल तर त्यांना दिडदोन वर्षापुर्वीचे स्नुपगेट आठवायला हरकत नसावी. गुजरातमधल्या कुणा एका तरुण मुलीवर तिच्याच पालकांच्या सूचनेवरून गुजरात पोलिसांनी नजर ठेवली असल्याचा निवडणूक प्रचारात कॉग्रेससह तमाम पुरोगाम्यांनी किती तमाशा मांडला होता? एका व्यक्तीचे स्वातंत्र्य बाधीत झाल्याचा गाजावाजा होऊन खुप दिवस लोटलेले नाहीत. कॉग्रेसच्या महिला आघाडीने त्यासाठी महिला आयोगाकडे धाव घेतली होती ना? मग दोन दशके बोस कुटुंबावर पाळत ठेवणे गंमत म्हणायची काय? त्याच्याही थोडे मागे गेल्यास १९९१ सालात राजीव गांधींच्या पाठींब्यावर चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते. त्यांच्या निवासस्थानी दोन साध्या वेशातले हरयाणा पोलिस घोटाळताना दिसल्याचा आक्षेप घेत सरकार बरखास्त होण्याचा प्रसंग आणला गेला होता. तेव्हा एका दिवसाच्या पाळतीने कोण आकाशपाताळ एक करीत होता? ते नेहरूंचे नातू व इंदिराजींचे सुपुत्रच होते ना? गदारोळ करणार्‍या पक्षाचे नाव कॉग्रेसच होते ना? या प्रत्येकवेळी कशाला पाळत? काय धोका होता? असले प्रश्न विचारले गेले होते ना? मग तेच प्रश्न आज बोस कुटुंब आणि नेताजीप्रेमी विचारत आहेत.

सगळा युक्तीवाद वा तर्कबुद्धी कशी मर्कटलिला करू लागते ना? जेव्हा अन्य कु्णावर पाळत ठेवली तर ती प्रशासनिक बाब असते. सुरक्षेचा विषय असतो. दुसर्‍या कुणी असा उद्योग केला, मग घोर पाप असते. पण तेच नेहरूंनी वा कॉग्रेसच्या सत्तेने केले, मग देशहिताचा मामला होऊन जातो. सवाल सोपा आहे. नेताजींच्या मृत्यूचा विषय बाजूला ठेवून पुढल्या दोन दशकातील घडामोडींचा मुद्दा कळीचा आहे. कुठल्या कारणास्तव आणि काय हेतूने बोस कुटुंबावर दोन दशके पाळत ठेवली गेली? त्यांना नजरकैदेत असल्यासारखे कशाला वागवले गेले? नेहरू जितके स्वातंत्र्योत्तर काळात लोकप्रिय होते, तितकेच नेताजीही लोकप्रियतेच्या शिखरावर होते. अगदी त्यांचा मृत्यू झालेला असला तरी त्यांच्या बलिदानाचा वारसा घेऊन कोणी आप्तस्वकीय राजकीय आखाड्यात उरतले असते, तरी नेहरूंच्या लोकप्रियतेला आव्हान उभे राहू शकले असते. त्याच भयाने व आपल्या मागे आपल्याच वारसाला देशाच्या गादीवर विनासायास विराजमान होता यावे हा हेतू असेल का? यासाठी नेहरू बोस कुटुंबाला लोकांमध्ये येण्यापासून प्रतिबंध घालण्याचे डाव खेळत होते काय? नसतील तर मग पाळत कशाला? एका बाजूला नेताजींच्या आझाद हिंद सेनेतील नेते सैनिकांना कॉग्रेसमध्ये समाविष्ट करून सत्तापदे द्यायची आणि दुसरीकडे नेताजींच्या कौटुंबिक वारसांना खच्ची करायचा राजकीय डाव त्यातून खेळला जात होता काय? त्यासाठी मग युद्धकैदी वा मित्रराष्ट्रांचे आरोपी भासवून बोस कुटुंबाला जेरबंद करण्याचा पद्धतशीर खेळ झाला होता काय? ममतांनी मुक्त केलेल्या कागदपत्रातून हे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत आणि त्याची चर्चा कोणी करीत नाही. किंबहूना ती करायची नाही. कोणी ते प्रश्न विचारू नयेत म्हणून मग चर्चा युद्धकैदी वा अन्य युद्धगुन्ह्यांच्या दिशेने भरकटवली जाते आहे काय असा संशय येतो. नेताजीप्रेमीही त्यातच भरकटलेले दिसतात.

6 comments:

 1. भाऊराव,

  जर नेताजी भारतात परत आले असते तर त्यांना युद्धगुन्हेगार म्हणून इंग्रज सरकारच्या ताब्यात द्यायचे नेहरू/पटेल/गांधींनी ठरवले होते. याच धोरणाच्या आधारे आझाद हिंद सेनेच्या सर्व सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ केले गेले. महत्त्वाच्या जागी तोंडपुज्यांची वर्णी लागली. यामुळे उर्वरित भारतीय सैन्याचे मनोधैर्य खच्ची झाले. याचाच विपरीत परिणाम म्हणून १९६२ साली भारताला चीनकडून दारुण पराभव पत्करावा लागला.

  नेताजी १९४५ नंतर जिवंत होते आणि त्यांना स्टालिनने कैदेत ठेवले होते असे ऐकिवात आहे. १९६५ च्या भारत पाक युद्धानंतर ताश्कंदमध्ये तह झाला. तेव्हा लालबहादूर शास्त्री तिथे असतांना त्यांना नेताजी हयात असल्याची कुणकुण लागली होती. नेहरू नसल्यामुळे विरोध होण्याचा प्रश्न निकालात निघाला होता. मात्र तरीही काही जागतिक सत्तांना नेताजींचे परतणे अतिशय धोकादायक वाटले. म्हणून शास्त्रीजींचा काटा काढण्यात आला.

  आता ही सारी लफडी उघड्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून काँग्रेसवासी जनांचा थयथयाट चाललाय.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 2. If it is so clear why since 1977 so many non congress govts came to power including nda for more than one term but nobody opened files. Even modi is in power for over a year but repeatedly refusing to open files. It is because they know there is nothing in that so if it opens controversy will be over and its benefits cannot be reaped. If it remains suspense for years in future Nehru's image can be maligned using this as a tool. Read recent London observer report and lot of literature available on Nehru Bose relations. Mama pahilvan should become a film producer he can produce suspence thrillers like ramse brothers with his imagination and conspiracy theory mind. Which powers were opposed to netaji's release and hence killed shastriji?

  ReplyDelete
 3. भाऊ जशा ममता बॅनर्जी सरकारने फायली खुल्या केल्या आहेत. तशा केंद्र सरकारने सुद्धा त्यांच्या कडे असलेल्या फाईली खुल्या केल्या तर यावर जास्त प्रकाश पडेल असे मला वाटते

  ReplyDelete
 4. Mediaperson,

  मी चित्रपट निर्माता व्हायची कल्पना नामी आहे. पण सावरकर, शास्त्रीजी, नेताजी ही व्यक्तिमत्वे सस्पेन्स थ्रिलरच्या पलीकडली आहेत. तुमचे आकलन काय ते कळले. सरड्याची धाव कुंपणापर्यंत.

  आणि हो, रामसे बंधू सस्पेन्स थ्रिलर बनवतात हे नव्याने कळले! या मौलिक माहितीबद्दल तुमचा शनिवारवाड्यावर जाहीर सत्कार केला पाहिजे!

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  टीप : माझं नाव मामा पैलवान नसून गामा पैलवान आहे. त्यामुळे तुम्ही घोड्यावर मांड ठोकल्याचं कोणाला सांगू नका. लोकं चुकून आदलाबदल झाल्याचं धरून चालतील.

  ReplyDelete
  Replies
  1. वा पहिलवान! याला कुस्तीत आस्मान दाखविणे असे म्हणतात!

   ~वस्ताद (गामाचा मरहूम मामा पहिलवान)

   Delete
  2. You said it Sir.

   Delete