Monday, September 21, 2015

सेक्युलॅरीझम म्हणजे ‘सनातन धर्म’?

Nepal has become a Hindu State through the backdoor

शहाण्या वा बुद्धीजिवी लोकांची एक मोठी समस्या अशी असते, की त्यांना प्रत्येक गोष्टीची व्याख्या आवश्यक असते. जी बाब कानाने ऐकता येते, नाकाला येणार्‍या वासाने ओळखता येते, किंवा डोळ्यानेही बघता येते, तिची ओळख व्याख्येत नसली मग विचारवंतांचे हाल सुरू होतात. त्यांना प्रत्येक बाबतीत डॉक्युमेन्ट हवे असते. ज्याचे डॉक्युमेन्ट वा शब्दात केलेले वर्णन वा व्याख्या नाही, ती अस्तित्वातच नाही; अशी ज्यांची ठाम समजूत असते, त्यांना बुद्धीमान म्हणून ओळखले जात असावे. मग अशा शहाण्यांना कोणीही अडाणी कागद व शब्दातली व्याख्या दाखवून हत्तीला मुंगीही ठरवू शकत असतो. नेपाळमध्ये काहीसे तसेच झाले आहे. तिथे माओवाद्यांनी उच्छाद मांडला होता, त्यातून क्रांती झाली आणि राजेशाही व्यवस्था संपुष्टात आली. मग भूमीगत माओवादी नेत्याच्याच हातात सत्ता गेलेली होती. पण उच्छाद मांडणे जितके सोपे, तितके कारभार चालवणे सहजशक्य नसते. कारण सामान्य लोक बुद्धिजिवी नसतात, तर व्यवहारी जीवन जगत असतात. म्हणूनच त्यांच्या समस्या प्रश्नांवर व्यवहारी उपाय योजावे लागतात. त्याच्या अभावी माओवाद्यांचा नेपळमध्ये ‘प्रचंड’ बोजवारा उडाला आणि आता नव्याने तिथे लोकशाही राष्ट्राची घटना बनवली गेलेली आहे. तोपर्यंत पुन्हा जुन्या राजकीय पक्षांच्या हाती सत्ता आलेली होती आणि त्यांनी लोकशाहीला आकार देताना देश सेक्युलर राहिल, याची पुरेपुर काळजी घेतली आहे. मात्र सेक्युलर म्हणजे नेमके काय, त्याचे उत्तर कुठेच मिळत नाही. पण घटना समितीने पुन्हा नेपाळला हिंदूराष्ट्र ठरवण्याचा प्रस्ताव साफ़ फ़ेटाळून लावला आहे. मग काय सगळे पुरोगामी खुश होणार ना? कारण व्याख्येने नेपाळ आता सेक्युलर देश झाला आहे आणि व्यवहाराने मात्र ते हिंदूराष्ट्र ठरणार आहे. म्हणजे नेपाळी सेक्युलर शब्दाची व्याख्याच कुठल्या कुठे बदलून गेली आहे.

मागल्या काही महिन्यापासून नेपाळला पुन्हा हिंदूराष्ट्र घोषित करण्यासाठी आंदोलने सुरू होती. शांततेने जशी आंदोलने चालू होती, तशीच हिंसकही संघर्ष पेटलेला होता. मजेची गोष्ट म्हणजे तिथल्या मुस्लिमांनाही नेपाळ पुन्हा हिंदूराष्ट्र व्हावे असेच वाटत होते. त्यासाठी नेपाळी मुस्लिम संघटनांनी एकत्रितपणे तशी मागणीही केली होती. बाकी हिंदू पक्ष व संघटनांनी तशी मागणी करण्यात फ़ारसे नाविन्य नव्हते. पण मुस्लिमांना हिंदूराष्ट्र कशासाठी हवे होते? भारतातले मुस्लिम नेते किंवा संघटना सातत्याने सेक्युलर भाषा बोलत असतात. कारण आपल्या धर्माला सेक्युलर कवच वाचवू शकते अशी त्यांची खात्री आहे आणि हिंदुत्वाचा इस्लामला धोका आहे, असेच वाटत असते. मग नेपाळी मुस्लिमांना हिंदू राष्ट्राविषयी इतके प्रेम कशाला असावे? तर तिथे त्यांना सेक्युलर व्यवस्थेत मुस्लिमांवर ख्रिश्चन धर्मसंस्था कुरघोडी करतात अशी भिती सतावत होती. किंबहूना सेक्युलर राजकारण म्हणजे ख्रिस्ती धर्मप्रसाराची राजकीय मोहिमच, असे मुस्लिम नेपाळी संघटनांचे मत झालेले होते. त्याच कारणास्तव त्यांनी हिंदूराष्ट्र मागितले होते. नेपाळ जोपर्यंत हिंदू राष्ट्र होते तोपर्यंत तिथे इस्लामला कुठला धोका नव्हता, पण सेक्युलर राजकारण सुरू झाल्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांनी इस्लामवर संकट आणले, असा या संघटनांचा आरोप होता. म्हणूनच हिंदू संघटनांच्या खांद्याला खांदा लावून नेपाळी मुस्लिम संघटना हिंदूराष्ट्राची मागणी राष्ट्राची मागणी करायला मैदानात आलेल्या होत्या. इतक्या टोकाच्य प्रतिक्रीया नेपाळी राज्यघटनेच्या निमीत्ताने समोर आलेल्या होत्या. लोकशाहीतील राज्यकर्ते नेहमीच लोकमताच्या दबावाखाली असतात आणि म्हणूनच अशा मागण्यांकडे पाठ फ़िरवणे त्यांना शक्य नव्हते. मग त्यातून पर्याय काढावा लागतो आणि नेपाळच्या नेत्यांनी एक अजब चमत्कार करून दाखवला आहे. खरे तर तो भारतातल्या पुरोगाम्यांसाठी इशाराही मानायला हरकत नाही.

कितीही आंदोलने झाली व उलटसुलट मागण्या झाल्या, तरी घटना समितीने शेवटी नेपाळच्या हंगामी घटनेचा धागा पकडून ते हिंदूराष्ट्र होणार नाही याची ग्वाही दिली आणि सेक्युलर नेपाळची घोषणा राज्यघटनेतूनच केलेली आहे. मात्र भारतातले पुरोगामी सेक्युलर म्हणून जी व्याख्या करतात, त्यापेक्षा नेपाळी सेक्युलर शब्दाची व्याख्या भलतीच भिन्न आहे. त्याचा धर्मनिरपेक्षतेशी काहीही संबंध नाही, तसाच भारतीय सेक्युलॅरीझम जसा हिंदू शब्दाचा कट्टर विरोधक असतो, तसेही नेपाळमध्ये होणार नाही. त्यांच्या घटनेत हिंदू शब्दाला स्थान नाही. मात्र सेक्युलर म्हणजे सनातन धर्माला संरक्षण व त्या धर्माची पाठराखण, अशी पुस्ती घटनेत जोडण्यात आली आहे. तसे बघायला गेल्यास हिंदू नावाचा कुठला धर्म नाही. तर भारतीय उपखंडातील विविध धर्मप्रथांचे सामुदायिक अनुकरण करणार्‍या कोट्यवधीच्या जनसमुदायाला पाश्चात्यांनी दिलेले समायिक नाव म्हणजे हिंदूधर्म! वास्तवात ज्याला हिंदूधर्म संबोधले जाते तो व्याख्येनुसार सनातन वैदिक धर्म आहे. म्हणूनच जोवर राजेशाही होती तोवर नेपाळही सनातन धर्माचेच राष्ट्र होते आणि आताही सेक्युलर घोषित झाल्यावर तिथे सनातन धर्माचाच वरचष्मा रहाणार आहे. थोडक्यात नेपाळ हे सनातन धर्माचे राष्ट्र असेल. मात्र त्याला कायदेशीररित्या हिंदूराष्ट्र संबोधता येणार नाही. तर सेक्युलर राष्ट्र मानले जाईल आणि तिथे प्राधान्य सनातन धर्माला असेल. इतरही धर्म तिथे गुण्यागोविंदाने नांदू शकतील. पण व्यवहारी अर्थ असा, की नेपाळची सत्ता ही सनातन धर्माच्या आधीन असेल. थोडक्यात भारतीय सेक्युलॅरीझमच्या नेमक्या उलट्या टोकाची अशीच ही व्याख्या झाली. इथे हिंदू असणे वा सनातन शब्दाचा उपयोग करणे, सेक्युलॅरीझमला बाधक असते. तर नेपाळमध्ये सनातन असणे म्हणजेच सेक्युलर असणे ठरवले गेले आहे. पण अजून तरी कुणा भारतीय पुरोगाम्यांनी तक्रार केलेली दिसली नाही.

तक्रार कशाला करायची? त्यांना सेक्युलर शब्द प्यारा आहे आणि नेपाळने त्या शब्दाला जसेच्या तसे ठेवलेले आहे. मात्र नेपाळमध्ये सेक्युलर शब्दाची व्याख्या भारत वा अन्य जगभर असते तशी नाही. अर्थात हा प्रकार प्रथमच घडतो आहे, असेही मानायचे कारण नाही. जोवर सिंगापूर हा मलेशियाचा भाग होता, तोवर तिथेही सेक्युलर घटना होती आणि वेगळा झाल्यावरही मलेशियाची घटना बदललेली नाही. तिथे सेक्युलर घटनाच आहे. मात्र शब्दाचा अर्थ तसाच नाही. म्हणजे बहुसंख्य ख्रिश्चन असलेली सिंगापूरची संख्या वेगळी झाल्यावर उर्वरीत मलेशियात मुस्लिम बहुसंख्य झाले आणि त्यांनी घटनेत काही किरकोळ बदल करून तिथे इस्लामची शरियत लागू करून घेतली. त्यानुसार मुस्लिमांना सेक्युलर सत्तेत व कारभारात झुकते माप मिळते इतकेच! बाकी मलेशिया सेक्युलर आहे. आताही नेपाळ सेक्युलर असेल मात्र तिथे सनातन धर्माचा वरचष्मा असेल. कारण सेक्युलर शब्दाचा अर्थच सनातन धर्माला संरक्षण देणे, असा करण्यात आला आहे. थोडक्यात सनातन धर्माला धक्का बसणार नाही याची प्रत्येक धर्माच्या नागरिकाने काळजी घेतली पाहिजे. सेक्युलॅरीझम असा सोपा व व्यवहारी होणार असेल, तर भारतातल्या हिंदूत्ववाद्यांना तरी हिंदूराष्ट्राची खुमखुमी कशाला राहिल? शब्द वा व्याख्येत कुठल्याच धर्माचे लोक बुद्धीजिवींप्रमाणे अडकून रहात नाहीत. त्यांना व्याख्येपेक्षा व्यवहाराची व कारभाराची फ़िकीर असते. म्हणूनच पुढल्या काळात सेक्युलर भारताला नेपाळच्या पद्धतीने सेक्युलर करण्याच्या हालचाली सुरू होण्याचा धोका पुरोगाम्यांनी ओळखायला हवा आहे. निदान नेपाळ येथील ताज्या घटनांबद्दल पुरोगामी आक्रोश एव्हाना सुरू व्हायला हवा होता. पण दोन दिवस उलटून गेले तरी फ़ारशी कुठे नेपाळी ‘सेक्युलॅरीझम’ विषयी पुरोगामी नाराजी असल्याचा सूर कानी आलेला नाही. नवलच आहे ना?

6 comments:

  1. Ase vishleshan tv aani news paper la ka yet nahi? Superb bhau...

    ReplyDelete
  2. उलटपक्षी त्यांना आनंद झालाय ! कारण कसलाही अभ्यास करायचा नाही, नुसतं वरवरचं वाचायचं, सोयीचे तेवढं घ्यायचं आणि नाचायचं! बरं आहे मी तर म्हणतो, असेच भ्रमात राहू दे त्यांना.

    ReplyDelete
  3. आपल्या पुरोगाम्यांचे बोलविते धनी सध्या येमेन वर हवाई हल्ले किंवा आयसिस च्या आडून सीरिया मधील शिया राज्य नष्ट करण्यात गुंतल्यानी त्यांना अजून गोंधळ माजवा असा निर्देश आला नसणार किंवा असा निर्देश दिल्यास त्यांच्या खनिज तेलाची मोठी बाजारपेठ भारत अन्यत्र (शिया इराण) तेल खरेदी करेल अशीही आर्थिक किळजी असेल!

    ReplyDelete
  4. हिंदू राष्ट्र बनवण्याचा हा एकदम जलद मार्ग वाटतो ….सही हा हा हा … !

    ReplyDelete
  5. कोणताही देश असो . धर्म हा राज्यघटनेत असूच नये. धर्म हि वैयक्तिक बाब आहे आणि तीचा वापर हा घराच्या आतच मर्यादित ठेवावा . सामुदायिक व सामाजिक आचरणात फकत देशाचा कायदा व नियम सर्वांना समान असले पाहिजेत.

    ReplyDelete