Wednesday, September 30, 2015

पाकिस्तान कशाला रडकुंडीला आलाय?



प्रत्येक व्यक्ती वा व्यक्तीसमुह आपापल्या हेतूनुसार एखादी गोष्ट बघत वा करत असतो. त्यातून आपले हेतू साध्य करायचे त्याचे उद्दीष्ट असते. सहाजिकच त्या कृतीमागच्या हेतूला समजून घेतले नाही, तर त्यावरचे आपले विवेचन फ़सणारे असते. कारण दिसणार्‍या हालचाली वा कृतीचा आपल्या डोक्यात साठलेल्या संदर्भानुसार आपण विचार करीत असतो आणि प्रत्यक्ष कृती करणारा वेगळ्या संदर्भाने तशी कृती करत असतो. सहाजिकच त्यातून कृतीवीराला अपेक्षित असलेले परिणाम आपल्याला ठाऊक नसतात. म्हणूनच तो चुकतोय असेही आपले मत बनू शकते. पण पुढल्या काळात ते परिणाम दिसतात, तेव्हा आपल्यावरच चकित व्हायची पाळी येत असते. नुकतेच अमेरिकेत गेलेले भारताचे पंतप्रधान मोदी कोणाला भेटले वा त्यांचे कुठे कोणी स्वागत केले, त्याचा अर्थ आपण आपल्या समजूतीनुसार लावत असतो. पण त्यातून मोदींना काय साधायचे आहे, त्याचा आपल्याला थांगपत्ता नसतो. म्हणूनच मग त्याच काळात आपला शेजारी पाकिस्तानात मोदींबद्दल काय बोलले जात आहे, त्याकडे आपल्याला ढुंकूनही बघावेसे वाटत नाही. ‘द नेशन’ या पाकिस्तानच्या एका प्रमुख इंग्रजी दैनिकाने खास अग्रलेख लिहून मोदींनी अमेरिकेत कसा प्रभाव पाडला, त्याची चर्चा केली आहे. उलट भारतातील माध्यमे मात्र मोदींविषयी नेहमीप्रमाणे हेटाळणीचा सुर लावून बसली आहेत. अमेरिकेतील मोठे उद्योग व माध्यम समुह मोदींसाठी एकत्र येऊन संवाद साधतात आणि पाकिस्तानी पंतप्रधानाला कोणी विचारतही नाही, अशी टिका या संपादकीयाने केलेली आहे. पण त्यातले मोदीविषयक कौतुक नेमके आहे. मोदी अत्यंत धुर्त राजकारणी असून आपल्याला हवे ते समोरच्याकडून करून घेण्यात वाकबगार आहेत, असे नेशनच्या संपादकांनी आपले मत नोंदवले आहे. पाकच्या कुणा संपादकाने अशी भूमिका कशाला मांडावी?

आपला पंतप्रधान जागतिक व्यासपीठावर हास्यास्पद ठरला व शेजारी शत्रूदेशाचा पंतप्रधान जागतिक समुदायाला प्रभावित करतो आहे, याची ती पाकिस्तानी पोटदुखी आहे. पण तेवढ्यासाठी आपणही मोदींचे अवास्तव कौतुक करायला हवे काय? नुसते जगातील मोठ्या महत्वाच्या व्यक्तींना प्रभावित केल्याने भारताचा कुठलाही लाभ होऊ शकेल असे नाही. म्हणूनच मोदी जगासमोर किती चमकतात, त्याला काही अर्थ नाही. तर त्यातून काय साध्य करतात व काय साध्य होते, याला प्राधान्य असले पाहिजे. आपण कितीही बढाया मारल्या तरी आजही आपण खर्‍या अर्थाने महाशक्ती नाही. म्हणूनच आजही जे मान्यवर पुढारलेले देश आहेत, त्यांना आपल्या बाजूला ओढूनच परिसरातील राजकारण खेळणे भाग आहे. भारताला आपल्या शेजार्‍यांशी संबंध ठेवताना वा बिघडवताना, जगातल्या मोठ्या देशांचा कल बघावा लागतो. तिथे पाकिस्तानने आजवर बाजी मारलेली आहे. चीन असो किंवा अमेरिका असो, त्यांना जागतिक पटावरच्या खेळीत पाकिस्तान मोहर्‍यासारखा वापरता येत होता. तीच पाकिस्तानची किंमत होती. पण त्यापेक्षा अधिक महत्व पाकिस्तान वाढवून घेऊ शकला नाही. अशा स्थितीत त्याची ताकद भारताला सतावण्यापुरतीच होती. आता तेवढीही पाकिस्तानची उपयुक्तता उरलेली नाही, ही दाखवून देणे भारताच्या लाभाची गोष्ट असू शकते. त्यासाठी जगभरच्या मोठ्या देशांना त्यांच्यासाठी अर्थकारणात भारताचे महत्व पटवून देणे व म्हणूनच भारताची सुबत्ता त्यांच्या भल्याची असल्याचे सिद्ध करणे अगत्याचे आहे. पण त्याचवेळी पाकिस्तान निरूपयोगी व त्रासदायक असल्याचेही सिद्ध करण्याला महत्व आहे. जागतिक पटलावर श्रेष्ठ ठरण्याइतकी ताकद नसताना असलेल्या कुवतीचा धुर्तपणे स्थानिक संबंधात उपयोग करून घेण्यातच मुत्सद्देगिरी सामावेलेली असते. ज्याला इथे भपकेबाजी म्हटले जाते आहे, त्यामागचा हेतू तोच असू शकतो.

तिथे अमेरिकेत पाकच्या पंतप्रधानाची दखल कोणी घेत नाही म्हणून पाकचा एक मोठा संपादक अश्रू ढाळतो आहे आणि त्याचवेळी पाकव्याप्त काश्मिरात हजारो लोक रस्त्यावर येऊन हिंदूस्तान झिंदाबादच्या घोषणा देतात, याला योगायोग म्हणता येत नाही. आजवर अशा बातम्या कधी आल्या नाहीत. मोदींचा अमेरिकन दौरा चाललेला असताना व्याप्त काश्मिरात उठलेला हा गदारोळ नवाज शरीफ़ यांना अधिकच गोत्यात आणणारा आहे. कारण तिथे अमेरिकेत जगापुढे शरीफ़ नेमके काश्मिर हाच भारत-पाक यांच्यातला वाद असल्याचे प्रतिपादन करत होते. भारतात काश्मिरींवर अन्याय होत असल्याचा दावा पेश करत होते आणि त्याचवेळी त्यांनी व्यापलेल्या काश्मिरातच पाकविरोधी निदर्शने उफ़ाळून आलेली होती. मात्र खुद्द मोदी त्यापासून संपुर्ण अलिप्त होते. त्यांनी काश्मिरचा विषयसुद्धा मांडला नाही, ती कामगिरी सीएनएन या अमेरिकन वृत्तवाहिनीने पर पाडली. पाकिस्तानात काश्मिरी खुश नाहीत व त्यांच्यावर तिथे अत्याचार होतात, हे मोक्याच्या वेळी घडवून आणले गेलेले नाट्य नाही काय? अर्थात तसे एकट्या पाकव्याप्त काश्मिरातच घडलेले नाही. महिनाभरापुर्वी पाकचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानातही पाकविरोधी घोषणा देत भारताचा तिरंगा फ़डकवण्याचा उद्योग झालेला आहे. दोन्ही ठिकाणी पाकला पोलिस बाजूला ठेवून लष्कराचा बडगा उगारावा लागला, इतकी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. मागल्या वर्षभरात हे प्रकरण इतके चिघळले, की घाईगर्दीने प्रथमच पाकने व्याप्त काश्मिरात मतदान घेऊन आपण तिथल्या काश्मिरींना नागरी अधिकार दिल्याचा देखावा उभा करण्याची पाळी आली. पण त्याचा उपयोग झाला नाही आणि आता पाकचे पंतप्रधान जगाच्या व्यासपीठावर काश्मिरींच्या भारतविरोधी व्यथा मांडण्याचा आव आणत असतानाच, त्यांना तोंडघशी पडायची वेळ आली.

मोठमोठ्या उद्योगपतींना भेटण्यातून काय साधले गेले, हा नंतरचा विषय आहे. त्याचे परिणाम उशिरा दिसणारे आहेत. पण त्या भपकेबाज कार्यक्रमात मोदी गर्क असताना अन्य काही गोष्टी घडवून आणल्या गेल्यात. त्यातून पाकिस्तान व त्याचा राष्ट्रीय नेता जगासमोर केविलवाणा होऊन पेश करायची वेळ आणली गेली. याकडे पाकिस्तानी जाणत्यांचे नेमके लक्ष आहे. म्हणून तर आपली वेदना ‘द नेशन’च्या संपादकाने स्पष्ट शब्दात व्यक्त केली. त्यांनी भारताच्या पंतप्रधानाचे गुणगान करताना पाकिस्तान कसा दिवसेदिवस कोंडीत आणला जातो आहे, त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयास केला आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ़ अली झरदारी यांनी एकदा स्पष्टपणे दहशतवाद हे पाकचे परराष्ट्र धोरण राहिले असे मान्य केले होते. तर अफ़गाण जिहादनंतर पाकने जिहादपासून फ़ारकत घ्यायला हवी होती, अशी कबुली पाकचे न्युयॉर्कमधील माजी राजदूत हक्कानी यांनी बोलून दाखवलेले आहे. पण त्यापासून बाजुला व्हायला तयार नसलेल्या पाक राज्यकर्त्यांना शहाण्या शब्दात समजावणे अवघड अशक्य होते. त्यांना समजणारी त्यांचीच भाषा मोदी सरकारने मागल्या वर्षभरात वापरायला सुरूवात केली आहे. सहाजिकच काश्मिरातला गदरोळ कमी होऊन पलिकडे व्याप्त काश्मिर व बलुचिस्तानात हादरे बसू लागले आहेत. त्याविषयी भारताचा पंतप्रधानही फ़ुशारक्या मारू शकतो. पण त्यापेक्षा नामानिराळे राहुनच आपापले डावपेच खेळण्याला मुत्सद्देगिरी म्हणतात. अमेरिकेच्या दौर्‍यात पाकिस्तान, काश्मिर याविषयी अवाक्षरही मोदी बोलले नाहीत. उलट त्यांनी भपकेबाज कार्यक्रम करण्यात धन्यता मानली. त्यासाठी आपल्या ठेवणीतल्या घरगुती टिकाकारांची बोचरी टिकाही नेहमीप्रमाणे ओढवून घेतली आहे. पण बदल्यात पाकिस्तान रडकुंडीला आला असेल. तर त्यांचे हेतू यशस्वी झाले ना? बाकी टिंगल, टवाळी, टिका याची मोदींना सवय जडली आहे. त्यात नवे काहीच नाही.

17 comments:

  1. भाऊ, मला असे वाटते आहे कि बर्याच भारतीय पत्रकारांना निगेटिव्ह मनोवृत्तीची लागण झाली आहे. मोदींच्या दौऱ्यामधून चांगले काही बघण्याऐवजी या मूर्ख लोकांनी मोदींची आई आणि तशा प्रकारच्या फालतू गोष्टीवरती जास्त लक्ष केंद्रित केले आहे. अर्थात मोदींच्या साठी हे चांगलेच आहे. जितके #AdarshLiberals त्यांच्या विरोधात असतात तितका त्यांना राजकीयदृष्ट्या फायदाच होतो असे इतिहासावरून दिसते.

    ReplyDelete
  2. मोदी म्हणावे अशा वाघराला...

    ReplyDelete
  3. खर तर मोदींना मोठे करण्यात या तथाकथित पूरोगामी माध्यमांचा मोलाचा (बिगरमोलाचा) वाटा आहे. ते जितकी त्यांची प्रतिमा काळी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांची लोकप्रियता अधिकच वाढत जाते.

    ReplyDelete
  4. भाऊ नेहमी प्रमाणे मुद्दे सुद विश्लेषण ..आवडले

    ReplyDelete
  5. Our PM is great & Media is negative. Don't pay attention to cats & dogs.

    ReplyDelete
  6. Hath kangan ko aarsi kya aur padhe likhe ko pharsi kya.Aage aage dekhiye hota hain kya.Hum hone kamyab not ek din but jaldi hi.Bhau nehami pramane class.

    ReplyDelete
  7. Nehami pramane class Bhau.Hath kangan ko aarsi kya aur padhe likhe ko pharsi kya.Aage aage dekhiye hota hain kya.Hum honge kamyab not ek di but jaldi hi.

    ReplyDelete
  8. NARENDRA MODI - AJIT DOBHAL ZINDABAD. काट्याने काटा काढावा!

    ReplyDelete
  9. NARENDRA MODI - AJIT DHOBAL ZINDABAD! काट्याने काटा काढावा. . . . शेर अपनी चाल चले - कुत्री भुंकतीलच!

    ReplyDelete
  10. तुमचे म्हणणे खरे आहे. मागील काही महिन्यांत हे खास जाणवते आहे.
    हे खास घडवून आणलेले आहे असे म्हणण्यासही वाव आहे [डोवाल!!]. अर्थात्‌ अजून बरेच घडावे लागेल तेव्हाच सगळ्याचा अर्थ लागू शकेल.

    ReplyDelete
  11. निन्दकाचे घर असावे शेजारी

    ReplyDelete
  12. संजीव लिमयेOctober 2, 2015 at 6:56 PM

    काल तर "आधी पाकव्याप्त काश्मीर सोडा" असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आला.इतके स्पष्टपणे पहिल्यांदाच सुनावले गेले असावे.ही ताकद,ही आक्रमकता मोदी व सहका-यांमुळेच दिसून येत्येय.

    ReplyDelete
  13. म्हणूनतर आजपर्यंतचे रशिया धार्जिणे धोरण सोडून अमेरिकेची कास धरली आहे

    ReplyDelete
  14. पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत नं कि पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे

    ReplyDelete