Friday, September 22, 2017

ममतांची कृपादृष्टी

durga visarjan के लिए चित्र परिणाम

गुन्हा कशामुळे घडू शकतो, त्याचे काही विश्लेषण आहे. एक म्हणजे कोणी गुन्हेगार आहे, म्हणून तो बिनधास्त गुन्हा करू शकत नसतो. त्यासाठी अनेक आवश्यकता असतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या गुन्ह्यात बळी पडू शकणारा कोणी असावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला गुन्हा करण्यासाठी पोषक अशी परिस्थिती असावी लागते. मात्र त्याच्याही पुढे जाऊन आणखी एक अगत्याची बाब असते, गुन्हा करणार्‍याशी बळी पडणार्‍याचे सहकार्य! ज्याचा गुन्ह्यात बळी जात असतो, त्याचे जितके सहकार्य गुन्हेगाराला सहज मिळू शकते, तितका गुन्हा सोपा होऊन जात असतो. म्हणूनच गुन्हेगार आपल्या जाळ्यात बळींना ओढत असतात. आपल्या मायाजालात गुंतवण्यात वेळ घालवित असतात. ही बाब केवळ गुन्ह्यापुरती मर्यादित नाही, साध्या कुठल्या खेळात, सामन्यात किंवा घटनाक्रमातही त्याचीच प्रचिती येत असते. काही माणसे आत्मघाताला इतकी प्रवृत्त झालेली असतात, की त्यांच्या नुकसानाचा दुसर्‍यांना परस्पर लाभ मिळत असतो. त्याला मात्र गुन्हा म्हणता येणार नाही. तुमच्या चुकीचा आयता लाभ कोणाला होत असेल आणि त्याने तसा फ़ायदा उठवला, म्हणून त्याला गुन्हेगार म्हणता येणार नाही. भाजपाच्या बाबतीत मागल्या दोनतीन वर्षात असेच काही घडत आलेले आहे. चार वर्षापुर्वी भाजपाने मोदींना आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार केल्यानंतरचा घटनाक्रम बघितला, तर त्याचीच साक्ष मिळते. मोदी विरोधातले अनेक पक्ष व नेते आपापल्या परीने मोदींना असा आक्रस्ताळी विरोध करत गेले, की त्यांचे नुकसान मोदींच्या पथ्यावर पडत गेलेले आहे. सध्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी ती परंपरा मोठ्या आवेशात पुढे चालवित आहेत. तसे नसते तर त्यांनी बंगालमध्ये भाजपाला मजबूत पक्ष उभारण्य़ासाठी पोषक परिस्थिती कशाला निर्माण केली असती? अधिकाधिक हिंदूंना दुखावण्याचा खुळचट पवित्रा कशाला घेतला असता?

दुर्गापूजा हा बंगालमधील सर्वात मोठा सण मानला जातो. त्याला धर्मपंथाचेही बंधन नाही. प्रत्येक गावात व गल्लीबोळात मंडप घालून दुर्गापूजेचा उत्सव चालतो. त्यात अगदी डाव्या पुरोगामी नेत्यांचाही पुढाकार असतो. राष्ट्रपती असतानाही आठवडाभर प्रणबदा मुखर्जी अगत्याने आपल्या गावी जाऊन त्यात सहभागी होत राहिले. अशा सणामुळे कुठली तेढ बंगालमध्ये निर्माण झाल्याच्या कधी बातम्या आल्या नाहीत. देशातील सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेले राज्य, अशी बंगालची ओळख आहे. पण तरीही तिथे कधी दुर्गापुजेच्या बाबतीत दंगल झाल्याचा अनुभव नाही. त्याचेही कारण आहे. दुर्गापूजेची मुर्ती बनवण्यापासून तिची सजावट करण्यात मुस्लिम कलाकारांचाच व्यवसाय सामावलेला आहे. त्यामुळेच या दरम्यान अनेकदा मोहरम हा मुस्लिमांचा सण आल्यावरही कधी विवाद झालेला नव्हता. मोहरम हा मुळातच शियापंथीय मुस्लिमांचा सोहळा आहे. प्रेषित महंमदाचे दोन पुतणे हुसेन व हसन यांची हालहाल करून हत्या झाल्याचा वेदनासोहळा म्हणून शियापंथीय शोकदिवस साजरा करतात. ही हत्या करणार्‍या पंथाला सुन्नी म्हणून ओळखले जाते. सहाजिकच मोहरमशी सुन्नीपंथाचा संबंध नाही. पण अलिकडल्या काळात भारतामध्ये मोठया संख्येने सुन्नी पंथाचे लोकही मोहरम साजरा करण्यात सहभागी होत असतात. पण त्यांच्यातील धर्मांधांच्या चिथावण्यांमुळे हा शांततापुर्ण सोहळ्याला हाणामारीचे स्वरूप येऊ लागले आहे. बंगालमध्ये प्रामुख्याने सुन्नीपंथीय मुस्लिम असल्याने मोहरम किरकोळ प्रमाणात साजरा होत राहिला. त्याचा दुर्गापूजेत कधी व्यत्यय आला नाही, की त्यात दुर्गापूजेमुळे व्यत्यय आल्याची तक्रार झाली नाही. मग तसे काही होण्याच्या भयापोटी ममता सरकारने दुर्गा विसर्जन सोहळ्यावर निर्बंध घालण्याची गरज काय होती? पण हे लागोपाठ दोन वर्षे झाले आणि म्हणूनच तो वादाचा विषय बनवला गेला.

भाजपा हा नव्याने बंगालामध्ये आपले पाय रोवत असून, त्याला अर्थातच मुस्लिमांचा पाठींबा सहसा मिळत नाही. बंगालमध्ये भाजपा वा रा. स्व. संघाला मोठा प्रतिसाद यापुर्वी मिळालेला नाही. मागल्या लोकसभेत मोदीलाटेत भाजपाला तिथे प्रथमच थोडे यश मिळाले. तरी त्याला हिंदू मतांचा प्रभाव मानता येणार नाही. कॉग्रेसचा र्‍हास होत असताना राष्ट्रीय पक्षाकडे ओढा असलेला हिंदू मतदार भाजपाकडे वळल्याचा तो परिणाम होता. पण त्यामुळे ममता कमालीच्या भयभीत झाल्या असून, भाजपाला रोखण्याच्या नादात त्यांनी हिंदूंही उघड वैर पत्करण्याचा पवित्रा घेतलेला आहे. पश्चीमेला उत्तरप्रदेशही मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेला प्रांत आहे. तिथेही मुस्लिमांच्या मतावर सत्तेचे राजकारण दिर्घकाळ खेळले गेले आहे. तिथे २३ टक्के मुस्लिम लोकसंख्या असतानाही भाजपा अलिकडेच मोठे यश मिळवून गेला आहे. एकही मुस्लिम उमेदवार मैदानात न आणता भाजपाने ८० टक्के जागा जिंकल्या. हा खरे तर ममतांना इशारा होता. यापुढे मुस्लिम व्होटबॅन्केवर विसंबून रहाण्याची गरज नसून, आपले हिंदू मतदार जपण्याला प्राधान्य असल्याचा तो इशारा होता. पण धडा समजून घेतला तर धडा असतो. अन्यथा दिवाळखोरी असते. उतरप्रदेशात कॉग्रेस व समाजवादी पक्ष एकत्र येऊनही त्यांना मुस्लिम व्होटबॅन्क वाचवू शकली नाही. किंवा भाजपाची घोडदौड रोखू शकली नाही, तर यापुढे तमाम पुरोगामी पक्षांनी मुस्लिम व्होटबॅन्क या संकल्पनेचा नव्याने विचार करणे क्रमप्राप्त होते व आहे. समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेशात आझमखान या मुस्लिम नेत्याला आगावूपणा करायला मोकळीक देऊन हिंदूंना नाराज केले. त्याचाच पद्धतशीर फ़ायदा भाजपाला मिळाला होता. मग बंगालची स्थिती कशी असेल? ममतांनी हा विचार केला असता, तर त्यांना हायकोर्टाकडून थप्पड खाण्याची वेळ आली नसती. त्यांनी भाजपाला पोषक परिस्थिती निर्माण करण्याचा मुर्खपणा आरंभला नसता.

मागल्या वर्षभरात ममता इतक्या टोकाला जाऊन भाजपा विरोधासाठी हिंदूंच्या विरोधात पक्षपात करीत आहेत, की मोठ्या संख्येने हिंदूंना भाजपाच्या गोटात जमा होणे अपरिहार्य करून टाकत आहेत. ममताचे सरकार मुस्लिम धर्मांधतेची पाठराखण करणारे असल्याचा प्रचार भाजपाने सातत्याने चालविला आहेच. किंबहूना पुरोगामी म्हणजे मुस्लिम धर्मांधता, हा मुद्दा भारतीय जनमानसात ठसवण्याचा एक कलमी कार्यक्रम भाजपाने हाती घेतला आहे. त्यात किती तथ्य आहे, ते नंतर तपासता येईल. पण तो मुद्दा सामान्य भारतीयाला वा हिंदू जनमानसाला पटावा, असा पवित्रा सर्वच पुरोगामी पक्ष अगत्याने घेताना दिसतात. सहाजिकच त्त्यातून भाजपाला व संघाला विस्तार करण्यासाठी पोषक भूमी निर्माण करून देण्याची खरी मेहनत पुरोगामी पक्षच करीत आहेत. त्यात ममतांनी मोठी आघाडी मारलेली आहे. मुस्लिम नेते व मौलवी यांच्या हिंसक व चिथावणीखोर भाषणांना मोकाट रान देणार्‍या ममता, प्रत्यक्षात हिंदूंच्या विरोधातील हिंसेलाच प्रोत्साहन देत चालल्या आहेत. तशा घटना बशिरहाट, मालदा, कालीचक येथे घडल्याही आहेत. पण त्याला पायबंद घालण्यासाठी ममता सरकारने कुठलेही पाऊल उचलले नाही. उलट संघाचा कुठला मेळावा किंवा भाजपाच्या जाहिरसभा यांना जागा नाकारण्यापासून विविध व्यत्यय सरकारी यंत्रणेकडून आणण्याचा अट्टाहास नित्यनेमाने चाललेला असतो. गेल्या वर्षी दुर्गापूजा व मुर्ती विसर्जनाचा विषय असाच कोर्टात गेला होता. तरीही तोच मुर्खपणा याही वर्षी ममतांनी केला आणि थेट कोर्टानेच त्यांच्या निर्णयाला मुस्लिमांचे लांगुलचालन ठरवण्यापर्यंत ताशेरे झाडलेले आहेत. ममताच धर्माच्या आधारे समाजात दुफ़ळी माजवत असल्याचे ताशेरे, अधिक हिंदूंना भयभीत करून भाजपाच्या गोटात पाठवणारे ठरले तर नवल नाही. उद्या खरेच भाजपा बंगालचा मोठा पक्ष झाला, तर त्याचे श्रेय म्हणूनच ममतांना द्यावे लागेल.

2 comments: