Saturday, September 2, 2017

‘कारट्या’कडून पित्याला दगा?

chidambaram cartoon के लिए चित्र परिणाम

महापुरात फ़सलेली माकडीण आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पराकोटीचे प्रयास करते, अशी एक गोष्ट आहे. आधी पोटाशी असलेल्या पिल्लाला कडेवर घेते. पाणी चढले मग उचलून खांद्यावर घेते आणि तिथपर्यंत पाणी पोहोचले मग थेट डोक्यावरही घेते. म्हणजेच पोराला वाचवण्यासाठी ती जन्मदाती सर्वतोपरी प्रयत्न करते व उपाय वापरते. पण जेव्हा पुराचे पाणी वाढून तिच्याच नाकातोंडात पाणी जाऊ लागते, तेव्हा ती काय करते? आपल्याच पिल्लाला पायाखाली घालून स्वत:ला वाचवते. आपले नाकतोंड पाण्यातून वर काढण्यासाठी प्रसिद्ध असलेली ती गोष्टीतली माकडीण, आपण कुठेतरी वाचलेली आहे. पण जन्मदातीला वा जन्मदात्यालाच पायाखाली घालून आपला जीव वाचवणारा कोणी प्राणी तुम्ही बघितला आहे काय? तसा कुठलाही प्राणी जंगलात सापडणार नाही. कारण तितके अन्य प्राणी सुसंस्कृत नसतात.  असे जन्मदाते किंवा पिल्ले माणसातच आढळून येतात. गुरूवारी विविध वाहिन्यांना फ़सलेल्या नोटाबंदीचे प्रवचन ऐकवणार्‍या मुलाखती देणारे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, यांच्या सुपुत्राने तशी कबुलीच शुक्रवारी देशाच्या सुप्रिम कोर्टात प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलेली आहे. योगायोग म्हणजे या सुपुत्राचे नाव ‘कार्टी’ म्हणजे कार्ती आहे. त्याच्या मागे गेले काही महिने सीबीआय व अन्य तपासयंत्रणांचा ससेमिरा लागलेला आहे. एकदा त्याची जबानी घेऊन झालेली होती. त्यानंतर कार्ती परदेशी गेला तेव्हा तो फ़रारी झाल्याचा गवगवा झालेला होता. पण पित्याने तो परतण्याची ग्वाही दिलेली होती. तो परतल्यावरही पित्याने सतत आपल्या पुत्राला वाचवण्याचा प्रयास केलेला आहे. मात्र आता पित्यपेक्षा पुत्राच्याच नाकातोंडात पाणी जाऊ लागलेले दिसते. अन्यथा या कारट्याने पित्यालाच पायाखाली घालून आपली कातडी बचावण्याचा प्रयास केला नसता. आपल्यावरचा आळ त्याने पित्यावर ढकलला आहे.

चिदंबरम अर्थमंत्री असताना देशात अनेकांनी परदेशी भांडवल आणायचा उद्योग केला होता. त्यामध्ये आपल्याच पोटच्या पोरीचा बळी घेणार्‍या इंद्राणी मुखर्जी यांचाही समावेश होता. या मुखर्जी दांपत्याने एक माध्यम कंपनी स्थापन करून त्यासाठी करोडो रुपयांचे भांडवल परदेशातून आणायचा प्रयास चालविला होता. पण त्यासाठीचे कायदे व नियम अतिशय जाचक असल्याने, त्या जंगलातून वाट काढण्यासाठी त्यांनी एका खास कंपनीची सेवा घेतली. बदल्यात त्या कंपनीला भरपूर गलेलठ्ठ सेवामूल्य देणेही मान्य केले. तशी रकम देण्यातही आली. त्याचे धागेदोरे आता तपासयंत्रणांना मिळालेले असून, त्या कंपनीचा चालक चिदंबरम पुत्र होता. म्हणूनच त्याची चौकशी चालू आहे. जे काम कायदे व नियमांच्या कमानीतून पुढे जाऊ शकत नव्हते, ते काम कार्तीने पित्याचा आशीर्वाद मिळवून पुर्ण केलेले होते. नियमानुसार त्या कंपनीला फ़क्त तीनचार कोटी परकीय भांडवल आणायची मुभा होती. पण कार्तीने पित्याच्या मदतीने त्यात कित्येक पटीने वाढ करून सेवा पुरवली आणि बदल्यात कोट्यवधी रुपयांचे सेवामूल्य वसुल केले. योगायोग असा, की तेव्हा त्याचेच पिताश्री देशाचे अर्थमंत्री होते. याखेरीज चिदंबरम यांचा एकूण व्यवहाराशी काहीही संबध नाही. कुठलाही साक्षीदार वा पुरावा नसताना चिदंबरम कर्नल पुरोहितवर नेहमी हिंदू दहशतवादी म्हणून आरोप करीत राहिले. पण आता आपल्याच सुपुत्राच्या कंपनीची कागदपत्रे व सरकारच्या दफ़्तरातील दस्तावेज यातली भानगड उलगडून दाखवित असताना, सत्य बघायला वा बोलायला राजी नाहीत. अर्थखात्यात इतकी मोठी उचापत त्यांचा सुपुत्र करू शकतो आणि अर्थमंत्री असूनही चिदंबरम त्याला रोखू शकत नाहीत? की पित्याच्या खात्यात हा कारटा वाटेल ते निर्णय घेऊन उचापती करीत होता? आपण त्यात फ़सल्याचे लक्षात आल्यावर कार्तीने तपासयंत्रणांच्या समन्सला अक्षता लावायला सुरूवात केली आणि प्रकरण चिघळले.

वारंवार बोलावूनही कार्ती हजर होत नाही, असा अनुभव आल्यावर तपास यंत्रणेने कार्तीवर पाळत ठेवण्याचा व त्याला उचलून आणण्याचा फ़तवा जारी केला. त्यानंतर मात्र या कार्ट्याची झोप उडाली. त्याने धावाधाव करून अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला. किंबहूना आपल्यावर असलेली पाळतीची नोटिस हटवण्य़ाचीही कोर्टात मागणी केली. तर त्याला तिथे कानपिचक्या मिळाल्या. निमूट तपासयंत्रणांशी सहकार्य करावे असा आदेश कोर्टानेच दिल्यावर कार्तीच्या लक्षात आले, की आता आपल्याही नाकातोंडात पाणी धुसू लागले आहे. घुसमटून मरायचे की पित्याला पायाखाली घेऊन आपण पाण्याबाहेर डोके ठेवायचे, असा प्रश्न आला? शुक्रवारी याच सुनावणीच्या वेळी कार्तीला सुप्रिम कोर्टात हजेरी लावायची वेळ आली. तेव्हा त्याने आपला बचाव मांडताना पित्यालाच बळी देऊन टाकलेले आहे. तिथे कार्तीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात कार्ती म्हणतो, ‘यात माझा कुठलाही संबंध नाही, चौकशी वा तपास माझा होण्याचे कारणच नाही. ज्या संबंधात तपास चालू आहे, तेव्हा माझे पिताश्री देशाचे अर्थमंत्री होते आणि त्याच काळात संबंधित कंपनीला परदेशी भांडवल आणायला देण्याच्या सवलतीमध्ये गफ़लत झालेली आहे. म्हणूनच माझी नव्हेतर माझ्या पित्याची चौकशी व्हायला हवी आहे. परदेशी गुंतवणूकीच्या संदर्भात असलेल्या शाखेच्या कामकाज व निर्णयाला संमती देण्याचे काम अर्थमंत्र्याचे होते आणि म्हणूनच त्यात माझा नव्हेतर पित्याचा संबंध आहे.’ थोडक्यात कारट्याने पित्याला बुडवले आहे. ज्या पित्याने मागल्या वर्षभरात पुत्राला वाचवण्यासाठी सातत्याने आटापिटा केला व त्या कारवाईला राजकीय सूडबुद्धीने प्रेरीत कृती ठरवण्यासाठी शब्दांच्या कसरती केल्या, तोच कारटा आता पिता यातला गुन्हेगार असल्याची ग्वाही कोर्टात देतो आहे. मग त्या माकडीणीची आठवण होणार नाही काय?

इंद्राणी व पीटर मुखर्जी यांच्या कंपनीने केलेल्या आर्थिक गफ़लतीचा मामला उजेडात आल्यानंतर हा तपास सुरू झालेला होता. त्यात घालून दिलेल्या मर्यादा ओलांडून बेकायदा परदेशी भांडवल भारतात आणले गेले, असा आरोप आहे. त्यात संबंधित विभागाने घातलेल्या मर्यादा ओलांडल्या गेल्याचे पुरावे आहेत आणि अशा गंभीर बाबीत अर्थमंत्री म्हणून चिदंबरम यांनी काणाडोळा केला व त्याचा सर्व लाभ पुत्राच्या कंपनीला मिळालेला आहे. की पुत्राच्या नावाने कंपनी दाखवून पिताच सेवामूल्य मिळवत होता? काहीही असो, पण चिदंबरम यांच्या सूडबुद्धीची राजकीय हेतूने केलेली कारवाई म्हणून ज्या विषयावर पांघरूण घातलेले होते, त्याचा मुखवटा पुत्रानेच टराटरा फ़ाडून टाकला आहे. ही कारवाई गैर किंवा अन्यायकारक सूडबुद्धीची असल्याचा कुठलाही खुलासा कार्ती चिदंबरम याने आपल्या बचावासाठी मांडलेला नाही. उलट त्यात गुन्हेगार असलाच तर आपला जन्मदाता आरोपी असल्याचा गौप्यस्फ़ोट केला आहे. अर्थात तो गौप्यस्फ़ोट अजिबात नाही. ती उघड गोष्ट आहे. सत्तेत बसलेली मंडळी असेच गैरव्यवहार करीत असतात. मित्र, परिचित वा आप्तस्वकीयांच्या नावाने कंपन्या स्थापन करून लाचखोरीचे पैसे फ़िरवले जात असतात. भुजबळांपासून लालूंपर्यंत सर्व नेते तशाच गुंत्यात फ़सलेले आहेत आणि आता कार्तीने त्यात आपल्या पित्याचा नंबर लावला आहे. चौकशीच करायची तर आपल्या पित्याची करा. जाब विचारणार असाल तर तो आपल्या बापाला विचारा; असेच या प्रतिज्ञापत्रातून हा कारटा सांगत नाही काय? यातले राजकारणही स्पष्ट आहे. कारट्याला गुंतवले की तोच पित्याला गुंतवून देणार आणि त्याला माफ़ीचा साक्षीदार बनवले, तर पिता चिदंबरम आपली कातडी वाचवण्यासाठी युपीएच्या म्होरक्यांना गुंतवून देऊ शकेल. असे यातले खरेखुरे राजकारण असणार आहे. सत्तेत बसलेले साधूसंत नसतात, तेही आपल्या हातातील यंत्रणा राजकीय सूडासाठी वापरणारच ना?

5 comments:

  1. मला आता नीटसे आठवत नाही पण मागे हर्षद मेहताचे वेळीही कूठल्या तरी एका पडिक कंपनीच्या शेअर बाबत चिदंबरम ह्यांचे नाव आलेले होते, ज्याची बाजारातील दहा रुपयाची किंमत तीन रुपया पेक्षाही कमी होती व हर्षद मेहताचा हात लागल्या बरोबर तिच किंमत तीन हजाराचे आसपस गेलि होती ! चिदंबरमच्या नातेवाईकात ह्या कंपनीचे खूपसे शेअर होतेत. पुढे ही बातमीच गायब झाली होती व हर्षद मेहताचीही गठडी वळली गेली होती ! ह्यातली सत्यता मला आज तपासून पहाता येत नाहीये पण भाऊ, आपण ती पाहू शकता !

    ReplyDelete
  2. भाऊ, मला असे वाटते की नाका तोंडात पाणी जायला लागल्यावर चिदु पुत्र सत्य बोलला. अर्थमंत्री या नात्याने खरं तर चिदंबरम नी यावर अंकुश ठेवायला हवा होता. अनेक जण स्वत:वर थेट बालंट येऊ नये म्हणून व्यवहार मुलगा, मुलगी, बायको यांच्या नावे असलेल्या कंपन्यांमार्फत करत असतात. चिदंबरम यांनी गेले वर्षभर मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला नसून मुलाला समोर करून स्वत:लाच वाचविण्याचा प्रयत्न केलेला असावा. यात चिदंबरम यांनीच भ्रष्टाचार केलेला असणे हे अधिक तर्कसंगत वाटते आहे.

    ReplyDelete
  3. सत्तेत बसलेले साधूसंत नसतात

    ReplyDelete
  4. भाऊ कार्ति बापाचा बळी देतोय का चिदंबरम स्वतःला अडकवुन घेऊन हायकमांडला बरोबर घतोय अस नाही केल तर त्याचा सहाराश्री व्हायला वेळ लागणार नाही

    ReplyDelete
  5. Karti Chidambaram his father P .Chidambaram ex minister must be punished along with Niraj Modi.All these criminals looted People of India for years together. They will face court trials but if public anger exploded nobody will be safe anywhere in the world. Farmers are commuting suicides but politicians trying to encasing the same for saving their own skin.

    ReplyDelete