Saturday, May 9, 2020

जागतिकीकरणाचे भूत

 Journalists Capture Heartbreaking Images of Jobless Migrants ...

साधारण १९९० नंतरच्या काळात जागतिकीकरण व मुक्त अर्थव्यवस्थेने जी व्यवस्था विविध देशात उभी केली, त्यातून सर्वच जगात पुर्वकालीन सामाजिक जाणिवा बोथट होऊन गेल्या आहेत. परिणामी तिथे मुळात जी आर्थिक सामाजिक व्यवस्था उपजत उभी राहिलेली होती, ती क्रमाक्रमाने कोसळून पडलेली आहे. नवेपणा व त्यातले लाभ उपभोगताना आपली पाळेमुळे सर्व समाज व देश हरवून बसले आहेत. देशांतर्गत नव्हेतर परदेशात मोठ्या प्रमाणात आर्थिक कारणाने स्थलांतरीत होण्याला वेग मिळाला. त्यातून कुठल्या समस्या उदभवतील याचा विचारही समाजातील धुरीणांनी केला नव्हता. अशा आर्थिक सुधारणा वा बदलातून सामाजिक समस्या कशाप्रकारे उभ्या रहातील, याचाच गंध नसलेल्या आर्थिक उलथापालथी होत गेल्या. कोरोनाने सर्वच मानव जमातीला थेट आभाळातून जमिनीवर आणुन आदळले आहे. गरीब असो वा श्रीमंत असो, प्रत्येक माणूस आपली पाळेमुळे शोधू लागला आहे. त्याला आपले गाव, आपले घर आणि आपला वारसा आठवू लागला आहे. त्यामुळे परदेशातून अनेकांना मायदेशी येण्याची ओढ लागली आहे आणि देशांतर्गत बहुतेकांना आपल्या राज्यात, जिल्हा गावात जावे म्हणून पुर्वज आठवू लागले आहेत. घर वा आपले लोक, ही कल्पना अतिशय पुरातन आहे. ज्याला जीवनातील सुरक्षा म्हणतात, ती आर्थिक नव्हेतर मानवी भावनांचा आधार असल्याचा नवा साक्षात्कार होऊ लागला आहे. म्हणून तर इतर राज्यात अडकलेले व तिथे सरकार खाण्यापिण्याची सोय देत असलेल्या भागातूनही स्थलांतरीत मजुरांचे घोळके मिळेल त्या साधनांनी वा चक्क पायपीट करीत आपल्या जन्मगावाकडे जाताना दिसत आहेत. आजवर ‘फ़ॉरेनमध्ये’ असल्याचा टेंभा मिरवणारेही मायदेशाच्या सरकारला साद घालत आहेत. ही सर्व कोरोनाचीच कृपा आहे. कारण हे संकट आलेच नसते तर आजही आपण सगळेच मस्तीत जगत राहिलो असतो आणि माणूसकीच्या जाणिवांना झुगारत राहिलो असतो. मग याला जबाबदार कोण?

अर्थातच जगात असे संकट पहिल्यांदाच आलेले नाही, किंवा स्थलांतरीत लोकसंख्या ही नवी बाब नाही. भारतातून परदेशात गेलेले वा परदेशातून भारतात आलेले हजारो लाखो लोक आहेत. जे कित्येक पिढ्यांपासून उगमस्थान सोडून अन्यत्र कायमचे वसलेले आहेत. मात्र अशा स्थलांतरीतांनी स्वेच्छेने मायभूमी सोडलेली होती आणि त्यांच्या तशा स्थलांतरीत होण्यामागे कुठले सरकारी धोरण वा योजना नव्हत्या. १९९० नंतरच्या काळात अर्थव्यवस्थेत जी एका धोरणामुळे उलथापालथ झाली, त्याने जगातल्या बहुतांश समाजांचा व देशांची भूमीत रुजलेली पाळेमुळेच उखडून टाकली. पर्यायाने अशा भूमीत रुजलेल्या व वास्तव्य केलेल्या लाखो करोडो लोकांना इच्छा नसतानाही संसार पाठीवर घेऊन घरगाव सोडावे लागलेले आहे. भारतात बोकाळलेली महानगरे नियोजनबद्ध नाहीत आणि त्यांचा विस्तार एखाद्या आजारासारखा झालेला आहे. मुळच्या बाजाराच्या गावाचे रुपांतर छोट्या शहरामध्ये आणि आणि मुळच्या शहरांचे रुपांतर वाढत्या वस्तीने महानगरात होऊन गेले. आसपासची गावे जवळच्या मोठ्या गावात सहभागी करून ही शहरे विस्तारली. तिथे कसेही उद्योग व्यापार उभे रहात गेले आणि त्यासाठी जमाणार्‍या गर्दीला नागरिक ठरवून विकास होत गेला. थोडक्यात आर्थिक लाभासाठी वा पोटपाण्याच्या सोयीसाठी लोकांनी आपले पिढीजात गाव सोडून अन्यत्र आसरा घेतला आणि त्यांनाच नागरीक ठरवण्यात आले. त्यामध्ये अर्थकारण विचारात घेतले गेले. पण सामाजिक व सांस्कृतिक बाजूंचा विचारही कुठे झाला नाही. भिन्न संस्कार व सामाजिक जीवनशैली असलेल्यांना एकत्र कोंडताना, त्यांच्या मनावर हजारो वर्षापासून असलेला पुर्वजाणिवांचा प्रभाव कोणी विचारत घेतला नाही. विकासात विस्तारात त्याचा अंतर्भावही झाला नाही. आज दिसत आहेत ते त्याच बेशिस्तीचे परिणाम आहेत. असाध्य समस्या येण्याच्या प्रतिक्षेत अवघी व्यवस्था उभी होती आणि कोरोनाने त्या कडेलोटावरून सर्वांना ढकलून दिलेले आहे.

आज जवळपास अर्धा कोटी स्थलांतरीत परप्रांतिय महाराष्ट्रात होते आणि त्यांना कधीतरी असे संकट येऊन परत पाठवण्याची वेळ येऊ शकते; याचा विचार तरी महाराष्ट्राच्या नियोजनात झाला होता काय? उलट उत्तरप्रदेश किंवा बिहार बंगालच्या सरकारांनी आपल्या प्रदेशातून गुजरात महाराष्ट्रात जाणार्‍या दोनचार कोटी स्थलांतरीत मजुरांना पुन्हा आणायचा आटापिटा करावा लागेल, याची पुर्वकल्पना तरी केली होती काय? कारण तेव्हा माणसांचा विचारही झाला नाही. आर्थिक औद्योगिक धोरणांना प्राधान्य देताना त्यातला मानवी घटक पुर्णपणे विसरला गेला होता. म्हणूनच कोरोनाने मानवी घटक महत्वाचा झाल्यावर सगळ्यांचेच डोके चालेनासे झालेले आहे. म्हणून तर ही समस्या कोणालाही कशी सोडवावी, तेच लक्षात येत नाही. कारण आजवरच्या नियोजनात कुठेही माणूस नावाच्या घटकाला भावना असतात, याचा विचार नव्हता. त्याच्या भावनिक गरजा कुठल्याही तत्वज्ञान विचारधारेच्या हिशोबात नव्हत्या. सहाजिकच जसा कोरोना सगळ्याच सरकार धोरणकर्त्यांसाठी नवा आहे, तसाच हा मानवी घटकही नव्याने सरकारे बघू लागलेली आहेत. त्याच्या गरजा, त्याला असलेली घराची किंवा आपल्या पाळामुळांची ओढ, सत्ताधार्‍यांना चकीत करीत आहेत. इथे खायलाप्यायला देऊनही त्यांना घरी-गावी कशाला जायचे आहे, तेच सत्ताधारी नेत्यांना व पक्षांना समजेनासे झाले आहे. किंबहूना सामान्य जनता आणि पाळीव जनावरे यातला फ़रक राजकारण्यांना व अंमलदारांना नव्याने कळत असावा. मात्र तोच मोठी समस्या म्हणून दारात उभा राहिलेला आहे. कायदा वा पोलिसी दंडुका उगारला, मग जमाव मुठीत ठेवता येत होता. पण हाताला काम नाही आणि संपुर्ण वेळ मोकळा मिळाल्यावर त्याच मानव समुहामध्ये कळपाची मानसिकता आकार घेऊ लागलेली आहे. अशा कळपाला नुसते कायदे, आदेश वा धमक्या शस्त्रास्त्रे रोखू शकत नसतात. रिकामी मने व रिकामे हात, पाशवी रौद्ररुप धारण करतात, तेव्हा आधुनिक व्यवस्था कोसळून पडत असतात. कोरोनाने तेच सत्य समोर आणलेले आहे.

ज्यांना आजवर खाऊपिऊ घालून वा पैशाचे आमिष दाखवून पाळीव जनावरासारखेच नियोजनात वागवलेले आहे, त्याच्यातला पशू जागा होतो आहे आणि त्याला कागदी कायद्यांनी पायबंद घालणे जगातल्या बहुतेक देशात नव्याने अनुभवास येते आहे. त्याचे मुख्य कारण त्यांना आजवर माणूस म्हणून प्रगल्भ करण्यात जगातल्या बहुतेक राज्य व्यवस्था तोकड्या पडल्या आहेत. कोरोनाने त्या सर्व राज्यव्यवस्था किती तकलादू आहेत, त्याचीच प्रचिती आणून दिलेली आहे. पोलिसांचे दंडुके रस्ते रोखतात, तेव्हा रेल्वेच्या रुळावरून लोक अन्य प्रांतात जायला निघतात. किंवा थेट पोलिसांवरही हल्ले करण्यापर्यंत जातात. याला अन्य कुठलेही कारण नसून चुकीचा विकास वा आर्थिक बाजूचाच विचार करून झालेली वाटचाल जबाबदार आहे. संपुर्ण देशाचा समतोल विकास किंवा राज्यवार योजनांचा विचार झालाच नाही. जिथे रोजगार मिळेल तिथे लोक स्थलांतरीत होत राहिले. नसेल तर नवनव्या जागा प्रदेश शोधत राहिले. कसेही पाशवी जीवन जगताना त्यांना नव्या जागी बस्तानही बसवता आलेले नाही. त्यामुळे अशी काही कोटींची लोकसंख्या समस्या बनलेली आहे. ती समस्या होऊ शकते आणि अक्राळविक्राळ होऊन जबडा पसरू शकते, हे कधी विचारात घेतले नव्हते ना? कशीही व कुठूनही आर्थिक उलाढाल महत्वाची मानली गेली. मग माणूस कोंडला गेला वा कोंडीत सापडला तर पशू होईल, हे समजूच शकले नाही. त्यावरचे उपाय योजलेच गेलेले नाहीत. तो आता समोर येऊन डरकाळ्या फ़ोडू लागला आहे. कदाचित आतापर्यंत पोटापुरते मिळाल्यावर सुखी होणारा व आपल्या भावनांना गुंडाळून जगण्याच्या कडेकोटावर जीवन कंठणारा माणुस जागा होतोय. नव्याने याचा विचार करावा लागणार आहे. खरेतर कोरोनाचे संकट येण्यापुर्वीच त्याचा विचार झाला असता, तर आजच्या परिस्थितीवर सहज मात करता आली असती. निदान इतकी तारांबळ उडाली नसती. जगाच्या चिंता करताना व उपाय योजताना माणूस हा प्राणी असला तरी बुद्धीच्या विकासाअभावी त्याच्यातला पशूच शिल्लक राहिल, असा विचारही केला नाही. त्याचे हे दुष्परिणाम असावेत. की जागतिकीकरणाचे भूत म्हणावे याला?

19 comments:

  1. सत्य ! निखळ सत्य!

    ReplyDelete
  2. अगदी योग्य लिखाण आहे. झटपट धावाधाव, मूळ चालणं विसरून गेली आहे. असो आपण सगळेच भारतीय बदललेल्या परिस्थितीत ही नक्की तरून जावू.

    ReplyDelete
  3. भाऊ, खरं आहे आपले म्हणणं. मुळात वारेमाप वाढलेली की जाणूनबुजून वाढवलेली आपली लोकसंख्या हा अत्यंत मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्य मिळताना 35कोटी असणारे आपण सत्तर वर्षात 130 कोटी झालो आहोत त्याचा ताण केंव्हातरी पडणारच होता. दुसरे शेतीप्रधान देशात शेतीला दिलेले दुय्यम नव्हे तर तिय्यम स्थान. अजूनही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग दुष्काळी असू शकतो हेच पटत नाही. मग मोठमोठी धरणे बांधून काय केले? ज्यांच्याकडे भरपूर पाणी ते उसासारख्या नगदी पिकाकडे वळले आणि ज्याच्याकडे नाही ते पण त्याचसाठी आटापिटा करतात. आज शेती जर फायदेशीर असती तर उत्तरप्रदेश, बिहार सारखी संम्रुद्ध शेती असलेले लोक मुंबई, किंवा पूर्ण देशात रोजगारासाठी भटकले नसते. कोकणात तर घरेच्या घरे माणसांशिवाय बंद आहेत. कोकणचा कँलिफोर्निया करणार हे मी लहानपणापासून ऐकतोय पण सध्या सहारा वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्यामुळे देशाचा विकास भलत्याच मार्गाने गेला व नागरिक भरकटत गेला.

    ReplyDelete
  4. अतिशय मार्मिक

    ReplyDelete
  5. भाऊ,
    अत्यंत नेमके आणि योग्य विश्लेषण!!! इंग्रजी भाषेत एक म्हण आहे: 'Life is simple, but we complicate it.'

    बुध्दीच्या विकासाला आपल्या सामाजिक राजकीय जीवनात स्थानच दिलेले नाही. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाचे प्रयोजन आणि स्वरूप हे जीवनाचे आणि जगताचे स्वरूप समजून उमजून जीवन जगण्याची कला आत्मसात करणे असे नसून केवळ येन केन प्रकारेण धन प्राप्ती एवढेच उरलेले आहे. शिक्षण घेऊन पुढे त्याच्या आधाराने अर्थार्जना साठी काहीतरी व्यवसाय करणे एवढेच सर्वांच्या ध्यानी मनी आहे. एक खोटा तर्क प्रामाण्यवाद सर्वांना शिरोधार्य झालेला आहे. मनुष्याला तर्कबुद्धी बरोबरच भावबुद्धी सुद्धा असते याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून सर्वजण जगू पाहत आहेत. याचे अत्यंत धोकादायक परिणाम भोगुनच आम्ही जागे होऊ असे ब्रीद घेऊन जणू सर्वजण अनभिज्ञ राहिलेले आहेत. आपल्या कृतीच्या परिणामांचे ती कृती करण्या अगोदरच अनुदर्शन घेऊन शहाणे होणे म्हणजेच खरा मूर्खपणा आहे असे समजून सर्वांचे वर्तन होत आहे.

    बाह्य आकार मनुष्याचा मिळाला असला तरी मनुष्यत्व हे बुध्दीच्या काही एक विकासा अंतीच प्राप्त होते, या विचाराचा कुठे मागमूस जाणवत नाही. त्यामुळेच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बाह्य आकार मनुष्याचा असला तरी वृत्ती पाशवीच रहात आहे. क्षुधा तृषा भय निद्रा मैथुन या पलीकडे अजून काही जीवन आहे असे भान निर्माण होवूच नये अशीच सोय करून ठेवण्यात आली आहे.

    पण भाऊ तुमच्या सारखे कोणी असे विचार मांडते तेव्हा खरेच फार बरे वाटते.

    - पुष्कराज पोफळीकर






    ReplyDelete
    Replies
    1. मनुष्याला तर्कबुद्धी बरोबरच भावबुद्धी सुद्धा असते याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून सर्वजण जगू पाहत आहेत. सत्य!!

      Delete
  6. सगळ्या लेखांच्या खाली शेअर चे बटन द्या जिथून लेख थेट व्हाट्सअप्प ट्विटर किंवा तत्सम ठिकाणी शेअर करता येईल. ही सुविधा बहुतेक सर्व न्यूज वेबसाईटवर असते. याने योग्य माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे होईल.

    ReplyDelete
  7. १९९२ नंतर मुक्त अर्थ व्यवस्थेने खेडेगावातील माणूस शहराकडे ओढला जावू लागला.

    कोरोनाने त्या माणसाला पुन्हा मागे खेचले आहे.

    ReplyDelete
  8. वाह जगतिकरणाची एक वेगळी बाजू दाखवली. 🙏🙏

    ReplyDelete
  9. Excellent explanation from very different but from a very valid view point.

    ReplyDelete
  10. Ekdum nemka mudda ahe. Anek Tarun aplya gavat kiwa agdi gava javal sheti made rojgar na karta kiwa apla pidhijat mag to kuthlahi aso to rojgar na karta shahrat hamali karun zopadpattit rahato. To tithe manane Ramat nahi pan khorta sukhachya odhine jagat Jagat rahato.yane gav osad zali ani shahra bakal zali. Aaj khedyat shetar kamala majur milat nahi ani shahrat bekaranche londhe. Yala saglyana ek saman shikshan javabdar ahe ani mulat shramachi pratishtha kami hone karan ahe.
    Deshane Gandhi chya navane nust rajkaran kel khare Gandhi anusarle nahi. Gandhi khedya kade chala mhanat hote pan sarkar chi niti khede barbad karnyachi hoti. Gandhi kuthlyahi kamachi laj nako mhanat hote pan shikshan padhati lokana shramache kam mhanje haram hech shikvat hoti. Shikun kamgar zala kashtakari zala mhanje to murkh hich Bhavna vadhavli.
    Tya mule lok kashta nako kiwa mag aplya gava pasun dur jaun hamali kiwa majuri karun shahrat bakal jivan jagu laglet.

    ReplyDelete
  11. अप्रतिम......👌👌👌

    ReplyDelete
  12. We need new law under
    Covid 19
    To control
    Population and Slum, Clean cities and villages

    ReplyDelete
  13. श्री भाऊ अतिशय सुंदर लेख, खरोखरच आपण हया बाजूने कधीही विचार केला नाही,

    ReplyDelete
  14. किती चपखल वर्णन केलेत भाऊ. या लोकांपर्यंत जेंव्हा विकास पोहोचेल तेंव्हाच खरं. मोदींचे स्वप्न याच लोकांना आत्मनिर्भर करण्याचे असावे. आणि तसे झाले तर स्वप्नवत भारताची उभारणी होईल.

    ReplyDelete
  15. सत्व गेलं आणि स्वत्व सुद्धा गेलं की असं होतं...

    ReplyDelete
  16. वा, खूपच वेगळा पण विचारांना प्रवृत्त करणारा दृष्टीकोन...

    ReplyDelete