Sunday, February 4, 2018

अर्थसंकल्पाची गोष्ट

jetley 2018 के लिए इमेज परिणाम

गुरूवारी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प मांडला आणि सर्व माध्यमात त्याचीच चर्चा रंगलेली होती. अशा चर्चेत त्या विषयातले जाणकार अभ्यासक नेमके काय सांगत असतात, ते बहुतांश सामान्य माणसाला कधीच समजत नाही. कारण त्यातले काहीजण जनतेचे कल्याण त्यातून होत असल्याची ग्वाही देत असतात आणि उरलेले देशाचा सत्यनाश होणार असल्याची भाकिते करत असतात. आकड्यांचा मोठा खेळ चालतो. पण ज्याच्या आयुष्याशी तो खेळ निगडीत असतो, त्याला त्याबाबत काहीही उमजू नये, असाच एकूण चर्चेचा थाट असतो. अमूकाला तमूक मिळणार आणि अन्य कोणाला लॉटरी लागली, असली भाषा ऐकून सामान्य माणूस सुखावतो. पण प्रत्यक्षात त्यातले त्या जनतेच्या वाट्याला किती आले वा कुठे गायब झाले, त्याची उत्तरे कधीच दिली जात नाहीत. खरे तर त्याविषयी कधी प्रश्नच विचारले जात नाहीत. मग उत्तरे कुठून मिळायची? एक गोष्ट खरी असते. अशा ज्या मोठमोठ्या रकमा या अर्थसंकल्पात सांगितलेल्या असतात, त्या सरकारी तिजोरीतून उचलल्या जातात. पण पुढे कुठे गेल्या, त्याचा कोणाला थांगपत्ता लागत नाही. तो लागला असता, तर लालूप्रसाद यादव कुठल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यात कशाला फ़सले असते? तेही एक आदर्श राजकारणी म्हणून देशाच्या इतिहासात नोंदले गेलेच असते. कोट्यवधी रुपये गरीब शेतकरी पशूपालकाला मदत म्हणून देण्याची तरतुद अर्थसंकल्पात झालेली होती. त्यानुसार सामान्य लोकांच्या गुरांना अडचणीच्या प्रसंगी सरकारी खर्चाने चारा पुरवला जायचा होता. पण तो कधी पोहोचला नाही. पण सरकारी तिजोरीतून वेळोवेळी कमीअधिक रकमा काढल्या गेल्या. त्यांची तरतुदच केली नसती, तर लालूच काय, इतरही कोणाला तितक्या रकमा उचलता आल्या नसत्या ना? अर्थसंकल्पाचा इतकाच अर्थ सामान्य लोकांना कळतो. कारण तितकी रक्कम गायब झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत येत असते.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून व संसदीय लोकशाही अस्तित्वात आल्यापासून प्रतिवर्षी देशाच्या संसदेत अर्थसंकल्प मांडला गेला आहे आणि त्यातून प्रतिवर्षी गरीबाचे भले करण्याची आश्वासने दिली गेली आहेत. पण आजवर त्यापैकी किती रक्कम वा तिचे लाभ त्या गरीबाच्या वाट्याला आलेले आहेत? एकाट्या महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपये पाटबंधारे उभारण्यासाठी निश्चीत करण्यात आले व खर्चही झालेले आहेत. पण किती धरणे व बंधारे उभे राहिले? त्यातून किती शेतकर्‍यांना व गावकर्‍यांना तिथे अडवलेल्या पाण्याचा लाभ होऊ शकला? इतकी मोठी रक्कम अर्थसंकल्पात बाजूला ठेवली गेली आणि तिजोरीतून उचलली सुद्धा गेली. पण त्यातून एक टक्काही सिंचन जमिनीत वाढ झाली नाही, असा आक्षेप चार वर्षापुर्वी तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच घेतला होता. खुद्द मुख्यमंत्रीच असे म्हणत असेल, तर अन्य बाबतीत किती रकमांची तरतुद झाली आणि त्या खर्च होऊनही गरीबाची गरीबी तशीच का राहिली? असा प्रश्न कोणी विचारणार नाही की त्याचे उत्तर कोणी देणार नाही. कारण अर्थसंकल्पात तरतुद झाली म्हणजेच लोकांचे कल्याण होत असते. पर्यायाने गरीबीही दूर होत असते असा सिद्धांत आहे. त्यामुळे वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे व मांडणे हा एक उपचार होऊन गेला आहे. सत्ता कुठल्याही पक्षाची असो, त्याच्याकडून असा अर्थसंकल्प बनवला व मांडला जात असतो. आताही त्याची मांडणी झालेली आहे आणि उलटसुलट चर्चा चालली आहे. पण सामान्य माणसाचा त्यातला सहभाग किती आहे? तर सरकारने जे काही खर्च ठरवले आहेत, त्यात आपल्या खिशातून व पाकिटातून किती रक्कम जाणार आहे, त्याचीच चिंता लोकांना भेडसावत असते. पगारदार असो किंवा सामान्य कष्टकरी असोत, त्याला हा अर्थसंकल्प भोगावा लागत असतो. पण त्याचे मत कोणी कधी विचारात घेत नाही.

सामान्य लोकांसाठी वा जनतेसाठी जो अर्थसंकल्प सादर केला जातो, त्यातली भलीथोरली दिसणारी अब्जावधी रुपयांची रक्कम, कोणा मंत्र्याच्या खिशातून वा घरातून येत नसते. ती लाखो कोटी रुपयांची रक्कम विविध करांच्या आकारणीतून सरकारी तिजोरीत जमा होत असते. त्यापैकी किती भरावी किंवा किती नाकारावी, अशी काही निवड सामान्य माणूस करू शकत नसतो. त्याच्या नावावर दाखवलेली रक्कम सक्तीने व त्याच्या नकळत त्याच्याकडून वसुल केली जात असते. त्यालाच प्रशासकीय भाषेमध्ये महसुल म्हणतात. म्हणूनच सामान्य जनतेसाठी सरकारी तिजोरीत पैसे कुठून येणार, यापुरता संबंध येत असतो. आपण सिगरेट पित असू तर त्यात किती करवाढ झाली? अन्य कुठल्या वस्तु आपण खरेदी केल्याने आपल्याला किती अधिक वा कमी कर भरावा लागणार, हे प्रश्न लोकांसाठी महत्वाचे असतात. पगारदार असे लोक असतात, की त्यांच्या पगारातून थेट कर कापला जात असतो. सहाजिकच त्यात काही सवलत मिळाली आहे काय, इतकेच त्याचे अर्थसंकल्पाकडे लक्ष असते. बाकी उद्योगपती वा व्यापारी लोक अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेले असतात. कारण खरा नफ़ातोटा त्यांच्या वाट्याला येत असतो. चैनीच्या वस्तुंवर कर लादला म्हणजे सरकार समाजवादी वा गरीबांचे झाले, असाही एक भ्रम निर्माण करून ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमती वाढल्या किंवा अन्य कुठल्या चैनीच्या वस्तुंचे दर वाढले, मग गरीबाला उगाच समाधान वाटते. आपली लूट झाली नाही अशा भ्रमात तो सुखावतो. पण ज्याच्यासाठी किंमती वाढतात, त्याला असल्या वाढीची फ़िकीर नसते. कारण वाढलेल्या किंमती वा दरांची भरपाई असा वर्ग तळागाळावर ढकलून सहीसलामत निसटत असतो. कधी त्याचाही हिशोब व तपशील जनतेला उलगडून सांगण्याचे कष्ट कोणी घेतो काय? नुसतीच उडवाउडवी चालत असते.

उदाहारणार्थ मोठमोठी पंचतारांकित हॉटेल वा चैनीच्या जागा निर्माण झालेल्या आहेत. तिथे किती सामान्य माणसे जात असतात? बहुतांश श्रीमंत वा प्रतिष्ठीत वर्गच त्याचा उपभोग घेत असतो. अशा हॉटेल वा सुविधांचा उपयोग बहुधा मोठमोठ्या कंपन्यांसाठी राखून ठेवलेला असतो. उदाहरणार्थ गुरूवारी जो अर्थसंकल्प मांडला जात होता, तेव्हा अनेक वाहिन्यांनी आपल्या चर्चा अशाच हॉटेलात योजलेल्या होत्या. दिवसभरासाठी तिथे बसून चर्चा चालल्या आणि त्याचा खर्च किती झाला? काही लाखांची किंमत त्यासाठी मोजावी लागत असते. त्याचे एक दिवसांचे थेट प्रक्षेपण होते, उरलेल्या दिवशी अशा सुविधा ओस पडलेल्या नसतात. तिथे प्रक्षेपित होत नसलेले अनेक समारंभ किंवा सोहळे चालूच असतात. कंपन्या, संस्था वा तत्सम लोकांचे पंचतारांकित विचारविनियम तिथेच होतात. त्यात कुपोषित मुलांपासून देशातील गरिबीविषयी उहापोह चालत असतो. मोठे उद्योग कसे उभारावेत आणि गरीबांसाठी रोजगार कसा उपलब्ध करून द्यावा, याचीही माथेफ़ोड तिथेच होत असते. त्यावर वर्षाकाठी देशात किमान काही हजार कोटी रुपये खर्च होत असतात. अशा आलिशान सुविधांचा वापर कोणी सामान्य माणूस करीत नाहीच. पण जे त्याचा उपभोग घेतात, त्यापैकी काही थोडेच लोक त्याची किंमत आपल्या खिशातून मोजत असतात. बहुतांश असल्या सुविधांची किंमत कंपन्या वा सरकारी खात्यातून भरली जाते. मग तो खर्च आपोआप कंपनीच्या उत्पादन खर्चात किंवा सरकारी खर्चात येऊन जमा होत असतो. ती रक्कम सामान्य माणसाला वस्तु वा सेवांच्या किंमतीतून मोजावी लागत असते. म्हणजे त्या सेवा वस्तूंची किंमत वाढवून हा ऐषारामाचा खर्च वसूल होतो. मग तो श्रीमंतांवर लादलेला कर वा खर्च कसा म्हणता येईल? थोडक्यात श्रीमंतांवर करवाढ दरवाढ लादली हाच फ़सवा देखावा असतो आणि त्याला आपल्या देशात समाजवाद मानले जाते.

एकूण गंमत अशी आहे, की अर्थसंकल्प म्हणजे जे या देशातले मुठभर सुखवस्तु लोक आहेत, त्यांच्या चंगळीचे व्यवस्थापन असे त्याचे स्वरूप आहे. त्यातून कुठूनतरी थेंबथेब गळणार्‍या लाभावर सामान्य माणसाने खुश असावे अशी अपेक्षा असते. कारण एकूण खर्च वा तरतुदीमध्ये जितक्या पायाभूत सुविधांच्या योजना असतात, त्याच सामान्य माणसाच्या वाट्याला येणारे लाभ असतात. भव्य महामार्ग, शाळा, आरोग्य, सिंचन वा संशोधन अशा गोष्टींवरचा खर्च सामान्य माणसाला लाभ देत असतो. आज देशाच्या कानाकोपर्‍यात बांधल्या जाणार्‍या रस्त्यांनी गरीबाला जितके स्वयंभू बनवले आहे, तितके कुठल्याही आजवरच्या अनुदानाने सुखी केलेले नाही. पण त्याची कोणी दखल घेत नाही की त्यावर चर्चा करत नाही. मग सामान्य माणसाला आपल्या किरकोळ खरेदीविक्रीत किती दरवाढ करवाढ झाली, त्यावरच समाधान मानावे लागत असते. अलिकडे निदान नेहमीच्या जीवनावश्यक वस्तुंची वाढ अशा अर्थसंकल्पावर अवलंबून राहिलेली नाही. ती वाढ किंवा घट केव्हाही होत असते. म्हणून अशा अर्थसंकल्पाला केवळ चर्चेतले महत्व उरलेले आहे. त्याचे परिणाम आपल्या वाट्याला येण्यातूनच लोकांना त्याची महत्ता उमजू शकते. गरीब महिलांना मिळाणारा सिलींडर वा असाध्य आजारासाठी जाहिर झालेल्या आरोग्य अनुदानाची प्रचिती येईल, तेव्हाच लोक अर्थसंकल्प वा त्याचे फ़ायदेतोटे यांची गंभीरपणे दखल घेऊ लागतील. अन्यथा हा केवळ मुठभर अभ्यासक व तत्सम लोकांच्या विरंगुळ्याचा विषय होऊन राहिल. कुठल्याही योजना व धोरणाचे कौतुक त्याच्या अनुभूतीतून सुरू होत असते आणि तेच टिकावू असते. त्यावरील चर्चा वा युक्तीवाद खर्‍याखुर्‍या आयुष्यात उपयोगी नसतात. संकल्पात अर्थ तेव्हाच असू शकतो. त्या अनुभूतीनंतरच सामान्य लोकांना या शब्द व त्यावरील चर्चेविषयी आत्मियता निर्माण होऊ शकेल.

पवारांचा हल्ला हो अखबार

pawar iftar party के लिए इमेज परिणाम

मोदी सरकारच्या तिहेरी तलाकला प्रतिबंध घालणार्‍या विधेयकामुळे कुणा मुस्लिम मुल्ला मौलवीपेक्षाही राष्ट्रावादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कमालीचे विचलीत झाले आहेत. कारण त्यांना या विधेयकाने वा तशा निर्णयाने इस्लामच्या पवित्र धर्मग्रंथामध्ये हस्तक्षेप असल्याचे जाणवले आहे. तलाक ही कुराणातली तरतुद असून त्यात कोणीही राजकीय सत्ताधारी ढवळाढवळ करू शकत नाही, असा निर्वाळा पवारांनी आपल्या औरंगाबाद येथील प्रवचनातून देऊन टाकला आहे. औरंगाबाद शहर व परिसर मुस्लिमबहुल असल्यामुळे असे बोलणे हा राजकीय भाग झाला. मुस्लिम मतांचे राजकारण करण्यासाठी पवारांनी तसे काही मतप्रदर्शन करण्यालाही कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. पण इस्लामच्या पवित्र कुराणात अन्य कोणी हस्तक्षेप करू नये सांगताना, मतांसाठी तसा हस्तक्षेप करण्याचा अधिकार खुद्द पवारांना कोणी दिलेला आहे? पवार एका पक्षाचे सर्वेसर्वा असल्याने कुठल्याही धर्मात वा त्यांच्या कुठल्याही धर्मशिकवणीत ढवळाढवळ करू शकतात काय? इतरांचे अधिकार तपासून बघण्याची घाई करण्यापेक्षा पवारांनी निदान आपले अधिकार कोणते व त्याच्या मर्यादा कोणत्या, त्याची चाचपणी करावी. इतकीही आता अपेक्षा बाळगायची नाही काय? कारण पवार ज्या विषयावर बोलत आहेत आणि कुराणाचे निर्वाळे देत आहेत, त्यांनी कधी सवड काढून कुराण वाचले तरी आहे काय? नुसती लोकरी वा विणलेली टोपी घालून इफ़्तार पार्ट्या योजल्या म्हणजे इस्लाम समजत नाही, किंवा त्याच्याविषयी जगाला मार्गदर्शन करता येत नाही. कुराणात सरकारने ढवळाढवळ करू नये तर कोणी करावी? कुराण प्रेषित पैगंबराच्या माध्यमातून सामान्य मुस्लिमांपर्यंत पोहोचत असते आणि कुठल्याही निकषावर शरद पवार इस्लामचे पैगंबर असू शकत नाहीत. हा पहिला नियम आहे, कारण हजरत महंमद हा इस्लामचा शेवटचा प्रेषित आहे. त्याने कथन केलेल्या कुराणाची पवार प्रतारणा करीत आहेत.

मागले सहाआठ महिने तिहेरी तलाक हा विषय भारतात गाजत असून त्यावर वाहिन्या व वर्तमानपत्रातून हजारो चर्चा झालेल्या आहेत. अगदी ज्या मौलवींशी मसलत करावी असे पवार सांगतात, त्यातल्या डझनावारी मौलवींनीही अशा चर्चांमध्ये भरपूर सहभाग दिलेला आहे. पण त्यापैकी एकानेही कोणी कुराणात तलाकचे नियम किंवा आदेश असल्याचा दावा केलेला नाही. किंबहूना तिथेच अशा चर्चेत मौलवींची प्रत्येकवेळी बोबडी वळलेली अवघ्या जगाने बघितलेली आहे. या चर्चांमध्ये सहभागी होणार्‍या अनेक जाणत्या मुस्लिम महिलांनी मौलवींना फ़ैलावर घेत कुराणात तिहेरी तलाकचा उल्लेख कुठे आहे, ते दाखवण्याचे खुले आव्हान वारंवार देऊन झालेले आहे. म्हणजे अशा चर्चा रंगलेल्या होत्या आणि उहापोह चालू होता, त्यापैकी अवाक्षरही पवारांनी कधी ऐकलेले नाही वा तशी तसदी घेतलेली नाही. जेव्हा त्यावर सुप्रिम कोर्टात विषय आला होता आणि खडाजंगी माजलेली होती, तेव्हाही पवारांनी तिकडे ढुंकून बघितले नाही. तो विषय समजून घेतला नाही की त्यावर भाष्य केले नाही. तेवढे कष्ट घेतले असते तर पवारांनी औरंगाबादच्या हल्लाबोल सभेत पवित्र कुराणावरच ‘हल्ला’ केला नसता. या रंगलेल्या प्रदीर्घ वादात उतरलेल्या मुस्लिम महिलांनी प्रत्येक मौलवीला कुराणात तिहेरी तलाक कुठे सांगितला आहे, प्रश्न सातत्याने विचारला होता आणि एकाही मौलवीला त्याचे उत्तर देता आलेले नव्हते. कारण तिहेरी तलाक हा कुराणातला विषयच नाही. तो कुराणबाह्य विषय आहे. मात्र पवार राजकीय आवेशात धर्मगुरू होऊन कुराणाचे हवाले देण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. कुराणात नसलेले आदेश घुसवून स्वत:च नवे कुराण सांगू लागलेले आहेत. मग प्रश्न इतकाच पडतो की शरद पवार हे इस्लामचे नवे प्रेषित झालेले आहेत काय? नसेल तर कुराणात नवे आदेश व सल्ले घुसवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? तिहेरी तलाक कुठून आला, त्याचाही गंध या नेत्याला नसल्याची साक्ष त्यानेच दिलेली आहे.

तलाक हा विषय कुराणात कुठेच नाही, म्हणून तर त्याविषयी सुप्रिम कोर्टात बाजू मांडताना मौलवींची गोची झाली. कुराणात कुठेही तिहेरी तलाकचा उल्लेख नाही की त्याचे समर्थन झालेले नाही. म्हणून व्यक्तीगत कायदा मंडळालाही शेपूट घालावी लागली होती. बहुधा ह्या मंडळाने सुप्रिम कोर्टात बाजू मांडण्यापुर्वी पैगंबर असल्याचा आव आणणार्‍या पवारांना भेटून सल्लामसलत केली नाही, ही मोठी चुक झाली असावी. किंबहूना पवारसाहेब इस्लामचे जगातले सर्वात मोठे अभ्यासक असू शकतील. कारण त्यांना कुराण व शरीयत यातला फ़रक ओळखता आलेला नाही. तिहेरी तलाक हा कुराणाचा विषय नसुन इस्लामी धार्मिक कायदा गणल्या गेलेल्या शरीयतचा भाग आहे. पण ती शरीयत अल्लाच्या इच्छा वा आदेशाबरहुकूम नसून पैगंबराच्या निर्वाणानंतर काही धर्मगुरूंनी तयार केलेली धर्मसंहिता आहे. त्यामुळे तिला कुराण मानले जात नाही. तसे असते तर जगातल्या बहुतांश मुस्लिम देशात तिहेरी तलाक बाद होऊ शकला नसता. इस्लामी देशात कुराण हाच पायाभूत कायदा असून, त्याला छेद देणारा कुठला कायदा वा न्याय होऊ शकत नाही. म्हणूनच तिहेरी तलाक कुराणात समविष्ट असता तर याही देशांनी त्यात हस्तक्षेप केला नसता किंवा त्तिहेरी तलाकला आपापल्या राज्यात प्रतिबंध घातला नसता. त्या देशातले मौलवी कुचकामी असावेत किंवा तिथे पवारांना कोणी प्रेषित मानत नसावेत. अन्यथा तुर्कस्थानसह अनेक मुस्लिम देशांनी अशी बंदी घालण्यापुर्वी मौलवींशी विचारविनिमय केला नसता, पण पवारांशीच सल्लामसलत केली असती. ज्या आवेशात पवारांनी उपरोक्त वक्तव्य केले आहे, त्याकडे बघता, पवारच इस्लाममध्ये अतिरेकी ढवळाढवळ करीत आहेत. कारण नसलेला तिहेरी तलाक त्यांनी आपल्या राजकीय मतलबासाठी थेट कुराणात घुसवण्याची मनमानी केलेली आहे. व्यवहारी पातळीवर हा प्रेषित पैगंबराचा अवमान व उपमर्द आहे.

पवित्र कुराणात कुठलाही फ़ेरबदल होऊ शकत नाही, हा इस्लामचा पायाभूत सिद्धांत आहे. कुराणात समाविष्ट असलेले आदेश साक्षात अल्लाचे म्हणजे इश्वराचे़च असून  ते आणणारा अखेरचा प्रेषित हजरत महंमद होते. पण पवार त्यात नवी भर घालत असतील, तर ते स्वत:ला अल्लाचा प्रेषित मानतात, असा निष्कर्ष काढणे भाग आहे. असे कुठलेही कृत्य इस्लामचा घोर उपमर्द आहे. अहमदीया नावाचा एक पंथ मुस्लिमात असून त्याचे म्होरके स्वत:ला पुढला प्रेषित मानतात. म्हणून जगभरात मुस्लिम त्यांना पाखंडी ठरवित असतात. पवार वेगळे काहीही करत नसून कुराणात नसलेली गोष्ट ते त्यात घुसवत आहेत. परिणामी इस्लाम वा कुराणात सरकार हस्तक्षेप करीत नाही, इतका मोठा हस्तक्षेप पवारांनी केला आहे. कुठल्याही निष्ठावान मुस्लिमाने म्हणूनच आधी पवारांकडे माफ़ीची मागणी केली पाहिजे. किबहूना असे वक्तव्य पवार करीत असताना त्यांच्या व्यासपीठावर मिरवायला बसलेल्या मुस्लिम नेत्यांना सामान्य मुस्लिमाने जाब विचारला पाहिजे. पत्रकारांनी असाउद्दीन ओवायसी यांना पवारांच्या या वक्तव्याबद्दल खुलासा करण्यास भाग पाडले पाहिजे. पवारांनीही विरोधकांची मोट २०१९ साठी बांधताना जे विषय बोलायचे आहेत, त्याचे थोडेफ़ार चिंतन मनन करण्याचे कष्ट घ्यायला हरकत नाही. दहापंधरा वर्षापुर्वी सामान्य लोक इस्लामविषयी जितके अजाण होते, तितके आज राहिलेले नाहीत. जगात मुस्लिम नसलेल्या लाखो लोकांनी आता कुराण वाचले व त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे असल्या पोरकटपणाला कोणी मुस्लिम महिलाही भुलणार नाहीत, तर बाकीच्या सामान्य मतदाराची गोष्टच सोडून द्या. असली शरि(दी)यत सांगण्यापेक्षा कुराणासह शरियतही साहेबांनी अभ्यासली नाही, तरी निदान वाचावी व चाळावी. मगच राजकीय प्रचारमोहिमेत हल्ला हो अखबारची गर्जना करावी.

http://deccanmirror.in/2018/02/03/ncp-chief-sharad-pawar-on-talaq/

Saturday, February 3, 2018

मध्यावधी अशक्य

Related image

एकाच दिवशी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आणि पाच पोटनिवडणुकांचे निकालही आले. त्यात भाजपाला कुठेच यश मिळालेले नाही आणि राजस्थान या आपल्याच खास बालेकिल्ल्यात भाजपाला जबरदस्त दणका बसलेला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाचा आधार घेऊन भाजपा लोकसभेच्या निवडणूका आधीच म्हणजे या वर्षाच्या अखेरीस घेईल, अशी अजिबात शक्यता नाही. पण राजकीय अभ्यासकांना वा भाष्यकारांना नेहमीच अंदाज वर्तवण्यात मजा वाटत असते. सहाजिकच काहीजणांनी तशी शक्यता वर्तवली आहे. प्रामुख्याने यावर्षीच्या अर्थसंकल्पात गरीब, ग्रामिण शेतकरी व महिलांना प्राधान्य असल्याने त्यातून मतदाराला आवाहन असल्याची अनेकांची समजूत झालेली आहे. पण लोकसभा विधानसभा एकत्र करण्याची कल्पना आणि हा अर्थसंकल्प यांचा परस्परांशी काडीमात्र संबंध नाही. असला आगावूपणा वा जुगार खेळण्याचा नरेंद्र मोदी यांचा स्वभाव नाही. म्हणूनच आणखी वर्षभर थांबण्यापेक्षा मोदी डिसेंबरमध्येच लोकसभेची निवडणूक घेतील, अशी शक्यता वाटत नाही. त्याची काही तार्किक कारणेही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आता तरी त्यांना पोषक वातावरण असल्याची कुठली चिन्हे नाहीत. मग आत्महत्या कशाला करायची, असा साळसूद विचार कोणीही राजकारणी करू शकतो आणि मोदी मुरब्बी राजकीय नेता आहेत. २००४ सालात तसा जुगार वाजपेयी यांनी प्रमोद महाजन यांच्या नादी लागून खेळला होता. त्यामुळे भाजपाची पिछेहाट झाली होती. प्रमोद महाजन कितीही धुर्त राजकारणी असले, तरी राजकीय अभ्यासक व पत्रकारांच्या आहारी गेलेले होते आणि मोदींची गोष्ट नेमकी उलटी आहे. ते कुठल्याही पत्रकाराचे सल्ले घेत नाहीत, की अभ्यासकांच्या आहारी जात नाहीत. म्हणूनच २००४ सालातली चुक ते पुन्हा करणार नाहीत. त्याची नव्याने मिमांसा म्हणूनच आवश्यक आहे.

२००८ सालात म्हणजे लोकसभेची मुदत संपण्यापुर्वी एक वर्ष युपीएचे सरकार अडचणीत आलेले होते. अणुकराराचे निमीत्त होऊन डाव्यांनी सरकारचा पाठींबा काढला तेव्हा मनमोहन सरकार अल्पमतात आलेले होते. पण मायावती व मुलायम अशा लोकांशी संगनमत करून सोनिया व मनमोहन यांनी सत्ता टिकवली होती. पुढला काळ त्यांनी अल्पमतात गेलेले सरकार कसेबसे चालवले. पण लोकसभा बरखास्त करून मध्यावधी घेण्याचा मुर्खपणा केला नाही. मग त्याच वर्षी मुंबईवर कसाब टोळीकडून भयंकर हल्ला झाला आणि त्यात अब्रु वाचवण्याची पाळी युपीएवर आलेली होती. विनाविलंब केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटिल यांना बाजूला करण्यात आले आणि फ़ारच गदारोळ झाला म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्रीही बदलावे लागलेले होते. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत युपीए व कॉग्रेस यांचा पराभव अपेक्षित होता. कोणी कॉग्रेस नेताही ठामपणे विजयाची ग्वाही देऊ शकत नव्हता. पण सोडून गेलेल्या मित्र पक्षांना दणका देत व आपले बळ वाढवीत कॉग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली होती. त्याचा अर्थ मनमोहन सरकार फ़ारच उत्तम कारभार करीत होते, असे कोणी म्हणू शकत नाही. दहा वर्षापुर्वीची वर्तमानपत्रे व अग्रलेख शोधून वाचले, तरी ते सरकार आजच्या मोदी सरकारपेक्षा किती बदनाम झाले होते, त्याची खात्री पटू शकेल. पण मुद्दा त्याच्या नाकर्तेपणाचा नव्हता. त्यापेक्षा पर्यायी सरकार स्थापण्याचा होता. तेव्हाचा लालकृष्ण अडवाणींचा भाजपा तितका मजबूत नव्हता, की त्याला सहकार्य देणारे कोणी प्रादेशिक पक्षही सोबत नव्हते. म्हणूनच सोनिया गांधी व मनमोहन या जोडगोळीला लोकांनी पुन्हा संधी दिलेली होती. त्यातून मतदाराची अगतिक मानसिकता लक्षात येऊ शकते. नाराज मतदारही सत्ता उध्वस्त करून टाकत नाही, तर पर्याय असेल तेव्हाच सत्ताबदल घडवत असतो.

२००४ सालात वाजपेयी यांनी सरकार टिकवण्याची कसरत चालवली होती आणि म्हणूनच त्यांन ठामपणे कारभार करीत कुठले कठोर निर्णय घेता आलेले नव्हते. तरीही मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा चांगल्या मतांनी जिंकल्यामुळे वाजपेयी लाट असल्याचा शोध काही शहाण्यांनी लावला. तेव्हा एनडीटीव्ही या वाहिनीचा राजकीय संपादक असलेल्या राजदीप सरदेसाईने प्रमोद महाजन यांची मुलाखत घेतली होती आणि त्यात हाच मध्यावधीचा प्रश्न विचारला गेलेला होता. पण त्यात बोलताना महाजनांनी आपल्यापाशी पुर्वभारत व दक्षिण भारतात कोणी उपयुक्त मित्रपक्ष नसल्याचे सांगितले होते. किंबहूना म्हणूनच मध्यावधी निवडणूकीची शक्यता फ़ेटाळून लावलेली होती. पण तिथूनच वाजपेयींच्या लोकप्रियतेचा विषय पुढे आला आणि त्याच्या आहारी जात महाजन यांच्यासारख्यांनी लोकसभा बरखास्त करून मध्यावधीचा जुगार पक्षाला खेळायला लावला होता. महाजनांचा त्या वाजपेयी लाटेवर इतका विश्वास होता, की १९९९ सालातही त्यांनी काही महिने मुदत शिल्लक असतानाही महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करून एकाचवेळी मतदान घेण्याचा आग्रह शिवसेनाप्रमुखांच्याही गळ्यात मारला. मात्र त्याचे दुष्परिणाम युतीला भोगावे लागले होते. २००४ नंतर तर युपीए नावाचे अजब कडबोळे भारतीयांच्या गाळ्यात बांधले गेले. लोकसभा बरखास्तीमुळे विरोधकांना आपली तयारी करायला वेळ मिळतो. सहा महिन्यांचा कालावधी मिळाल्यावर सोनियांनी पडती बाजू पत्करून मायावती, पवार, पासवान व लालूंपर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवले होते. त्याची किंमत भाजपाला मोजावी लागली होती. सोनिया राजकारणात नव्या होत्या आणि त्यांना नवखेपणासह सहानुभूतीचाही लाभ मिळाला. तरी बहूमताचा पल्ला मित्रपक्षांसह गाठणे त्यांना अशक्य झाले आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या अटीवर डाव्या आघाडीनेही कॉग्रेसला पाठींबा दिला. तो सत्ताबदल मध्यावधीमुळे शक्य झाला होता.

वाजपेयींच्या तुलनेत आज मोदींची लोकप्रियता अफ़ाट व प्रचंड आहे. पण म्हणून मध्यावधी घेण्य़ाची काहीही गरज नाही. तितके त्यांचे सरकार अस्थीर नाही की संसद विस्काळीत झालेली नाही. शिवाय लोकसभा जिंकण्यासाठी वातावरण निर्मिती विधानसभांच्या प्रचारातून होत असते. मोदींच्या लोकप्रियतेवर विधानसभा जिंकता येणार नाहीत की विधानसभेतील अपयशाचा लोकसभेच्या मतदानावर काही परिणाम होणार नाही. १९९९ सालातले निकाल त्याचा दाखला आहे. विधानसभेत कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षांना मते देणार्‍या ८ टक्के मतदारांनी तेव्हाही एक मिनीटाच्या फ़रकाने लोकसभेसाठी युतीच्या उमेदवारांना मते दिलेली होती. २००९ सालात उत्तरप्रदेशात कॉग्रेसला लोकसभेच्या २१ जागा देणार्‍या जनतेने, दोन वर्षात विधानसभेला कॉग्रेसला अवघे २४ आमदार दिले होते. मुलायमच्या पक्षाला चक्क बहूमत दिलेले होते. कारण मतदार विधानसभा व लोकसभा यातला फ़रक समजतो आणि त्यातल्या पर्यांयानुसारच मतदान करीत असतो. लोकसभेसाठी भाजपाला पर्याय म्हणून अजून काहीही समोर आलेले नाही. पण राजस्थानची स्थिती तशी नाही. तिथे राज्यपातळीवर कॉग्रेस हा पर्याय आहे. तशीच गंमत बंगालमध्ये बघता येईल. हळुहळू पाय रोवून उभा रहाणारा भाजपा ममतांना धक्का देऊ शकत नसला, तरी विरोधकांची जागा व्यापत चालला आहे. मार्क्सवादी वा कॉग्रेस बंगाली राजकारणात पर्याय म्हणूनही उपयुक्त नसल्याची ती साक्ष आहे. मोदींना याची जाण आहे. मग त्यांनी मध्यावधी निवडणूका घेऊन आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याची गरज काय? त्यापेक्षा मोदींना पराभूत करण्यासाठी चाललेली जमवाजमव गतिमान होण्याने मोदींना निवडणूक जिंकणे सोपे होईल आणि तो मुहूर्त २०१९ सालातलाच आहे. अधिक काम करण्याचा हाताशी असलेला वेळ बरखास्तीचा जुगार खेळून वाया घालवण्याइतके मोदी जुगारी वा अव्यवहारी नाहीत.

Thursday, February 1, 2018

परराष्ट्रनितीचे रस्ते हमरस्ते (उत्तरार्ध)

chabahar to europe road के लिए इमेज परिणाम

चीन पाकिस्तान महामार्गाची व ग्वादार बंदराची रणनिती सुरू झाली, तेव्हाच भारतामध्ये राजकीय अस्थीरता आलेली होती आणि कुठलेही सरकार अंतर्गत विवादात इतके फ़सलेले होते, की भारताच्या परराष्ट्रीय हितसंबंधाचा विचारही सत्ता टिकवणार्‍यांपाशी राहिला नव्हता. वाजपेयी यांच्या कारकिर्दीत चीनी आक्रमकतेला शह देण्यासाठी पुर्वेकडे मोर्चेबंदी सुरू झालेली होती. पुर्वेला कोलकाता आसाम सोडल्यास बाकीचा इशान्य भारत अनाथ एकाकी पडलेला होता. त्याला विश्वासात घेऊन विकासाची योजना कधी आखली गेली नव्हती. वाजपेयींच्या काळात त्या दिशेने पहिली हालचाल सुरू झाली. त्यासाठी इशान्य भारत पुर्वेकडील देश व आग्नेय आशियाशी जोडण्याचा विचार सुरू झाला. त्यातून मग म्यानमार थायलंड यांना भूमार्गाने जोडण्याची कल्पना पुढे आली. आज अतिशय वेगाने ते काम चालू आहे. पण वाजपेयी सरकार गेल्यापासूनच्या पंधरा वर्षात त्याकडे जवळपास काणाडोळा झाला होता. हा मार्ग पुढे कंबोडिया, लाओस व व्हीएतनामपर्यंत विस्तारण्याचाही विचार झाला. इशान्य भारताला मुख्यभूमीशी व्यवहाराने जोडणे त्रासदायक काम असले, तरी पुर्वेकडील देशांचा भारताशी होणारा व्यवहार व व्यापार इशान्य भारतातून सुरू झाला, तर आजवर मागास राहिलेल्या इशान्येची भरभराट वेगाने होऊ शकणार आहे. कारण ह्या बाजूचे अनेक लहान देश अतिशय प्रगत आहेत. त्यांनी अमेरिकेच्या भांडवलशाहीचा वापर करून आपले अर्थकारण विस्तारलेले आहे. त्यांना इशान्य भारतीय मार्गाने भारताशी व्यवहार करता आला, तर त्यातून या डोंगराळ व दुर्गम भागात विकासाचे नवे दरवाजे उघडले जाणार आहेत. सवाल इतकाच, की भारताचे इशान्येचे दार म्हणून असा विचार त्यापुर्वी कशाला झाला नाही? वाजपेयी सत्तेत येईपर्यंत तसा कुठला प्रयत्नही का झाला नाही? रस्ते जर जनतेला स्वयंभू बनवत असतील, तर आंतरराष्ट्रीय रस्ते देशाला व त्याच्या अन्य भागांना किती संपन्न करू शकतील?

पाकिस्तानमार्गे ग्वादार बंदर विकसित करताना चीनला आपल्या मागास पडलेल्या पश्चीम प्रदेशाला थेट जगाशी जोडायचे आहे. पण त्यातच त्या देशाला भारताच्या थेट तोंडाशी अरबी समुद्रात आपली नौदलाची येजा करता येणार आहे. भारताची गोष्टही वेगळी नाही. इशान्येचा विकास करताना थायलंड व व्हीएतनामला पोहोचणारे हायवे प्रत्यक्षात चीनच्या दादागिरीला कंटाळलेल्या देशांना दिलासा देणारे आहेत. त्यांना भारतासारख्या चीनशी तुल्यबळ समर्थ देशाची मैत्री हवीच आहे. हा हायवे म्हणून एका बाजूला व्यापारी व आर्थिक महत्वाच आहे, तसाच दुसरीकडे चीनी पंखाखालून अनेक दक्षिण आशियाई देशांना दिलासाही देणारा आहे. परिणामी आपोआप भारताची सुरक्षा व्यवस्था भक्कम करणारा असा प्रकल्प आहे. मात्र विषय तिथेच संपत नाही. एका बाजूला पुर्वेकडे बघण्याचे हे धोरण मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून अत्यंत वेगाने राबवले आहे. पण पश्चीमेकडे अजिबात दुर्लक्ष केलेले नाही. अमेरिकेच्या पुर्वेला असलेल्या युरोपातील देशांपासून अमेरिकेच्या पश्चीमेला असलेल्या आग्नेय आशियाई देशांपर्यत रस्त्यांचे जाळे विणण्याचा मोदी सरकारच्या कालखंडातला प्रयास म्हणूनच चकित करून सोडणारा आहे. यापैकी आग्नेय आशियातील हायवे उभारणीचे काम अतिशय वेगाने चालू आहेच. पण त्याच दरम्यान भारताने पश्चीमेकडे इराणशी हातमिळवणी करून मारलेली बाजी चीनसह पाकिस्तानला हैराण करून गेलेली आहे. चाबाहार असे त्या चतुराईचे नाव आहे. या एका बंदराने चीनच्या पाकिस्तानातील ५६ अब्ज डॉलर्स गुंतवणूकीला सुरूंग लावला आहे. कारण त्या बंदराला जोडून उभारलेला महामार्ग पुढे मध्य आशियाई देश व पुर्व युरोपपर्यंत घेऊन जाण्याचे चीनी स्वप्न भंगलेले आहे. तसे सूतोवाच करण्यापुर्वी़च भारताने चाबाहार बंदराचा कामचलावू वापर आरंभलेला आहे. तो मार्ग भले भारताने योजलेला नसला तरी त्यामार्गे थेट युरोपला जाऊन भिडणे सोपे केले आहे.

kolkata bangkok vietnam corridor के लिए इमेज परिणाम

पश्चीम आशियातील म्होरकेपणासाठी इराण व सौदी यांच्यातली स्पर्धा १९८० नंतर सुरू झाली. त्यानंतर इराणी राज्यकर्त्यांनी सौदीला शह देण्यासाठी अफ़गाणिस्तान रशिया व मध्य आशियातील देशांना हाताशी धरून एक महत्वाकांक्षी योजना आखलेली होती. त्यानुसार ओमानच्या आखातामध्ये आपल्या दक्षिण किनार्‍यावर चाबाहार बंदर विकसित करायचे आणि तिथून थेट अफ़गाण, उजबेकिस्तान, तुर्कमेनीस्तान अशा मार्गाने रशियापर्यंत वाहतुकीचा हायवे उभारण्याचा मनसुबा इराणने रचला होता. त्यासाठी संबंधित देशांशी करारही झालेले होते. पण तालिबानी राज्यात त्याला खिळ बसलेली होती. पुढे अमेरिकेने तालिबानांची सत्ता उलथून पाडल्यावर जे अफ़गाण सरकार आले, त्याला पाकचा हस्तक्षेप नको होता. त्यालाही सागरी बंदर हवे़च होते. त्यातून पुन्हा चाबाहारला प्रोत्साहन मिळाले. तालिबान सत्ता गेल्यावर अफ़गाण भूमीत जे नवनवे विकास व पुनरूज्जीवनाचे प्रकल्प सुरू झाले. त्यात भारताचा सहभाग होता. बलुचिस्तान सीमेलगत हायवे आणि अन्य विकासाच्या योजना भारतीय कंपन्या व कामगारच राबवित होते. त्याचा लाभ उठवून इराणनेही भारताला आपल्या व्यापक योजनेत सहभागी करून घेतले. युपीए सरकार सत्तेत असताना त्यासाठीची सुरूवात झालेली होती. पण मोदी सरकार आल्यावर त्याला प्राधान्य दिले गेले आणि आता काही वर्षातच ते बंदर उभारून पुर्ण झालेले आहे. किंबहूना दोन महिन्यापुर्वी प्राथमिक पातळीवर भारताने त्याचा वापरही सुरू केलेला आहे. भारताचा लाखो टन गहू घेऊन काही जहाजे त्या बंदरात पोहोचली व तिथून तो अफ़गाण नागरिकांपर्यंत पोहोचला सुद्धा. याचा अर्थ असा, की चाबाहार बंदराच्या मार्गाने अफ़गाण व अमेरिकेला त्या भूमीत आवश्यक असलेली रसद मिळण्यासाठी आता पाकच्या कराची या बंदरावर अवलंबून रहाण्याची गरज उरलेली नाही. मग ग्वादार बंदराची महत्ता तरी काय उरली?

चाबाहार बंदराला जोडणारा हायवे इराणने स्वत:च बांधला आहे. पण पुढे अफ़गाण मार्गे तो थेट रशिया व युरोपला पोहोचतोच. चाबाहार ते कांडला या भारतीय बंदराचे किरकोळ सागरी अंतर तोडले, तर युरोप ते व्हीएतमानपर्यंतचा भूमार्ग भारताच्या आवाक्यातला होऊन जातो. चाबाहार बंदर विकसित केल्याने त्यावर भारताची हुकूमत रहाते आणि कांडलापासून सुरू होणारा भूमार्ग थेट थायलंड व्हीएतनामपर्यंत भिडणाराही भारताचीच कल्पना आहे. सहाजिकच युरोप ते दक्षिण आशियाची व्यापार वाहतुक भारताच्या पंखाखाली येऊ शकते. म्हणूनच एका बाजूला ह्या रस्त्याचे वा महामार्गाचे जाळे भारताचे असेल आणि त्यामुळे चीनच्या महत्वाकांक्षेला मोठा फ़टका बसणार आहे. दिसायला अशा योजना आर्थिक व व्यापारी स्वरूपाची गुंतवणूक असते. पण व्यवहारात ती सुरक्षेशी नाजूक जागी जोडलेली असते. चाबाहार ते मुंबई हे भारतीय व्यापारी बंदर अवघे १४०० किलोमीटर्स अंतराचे आहे. पण तितके अंतर तोडल्यास बाकी सगळा मार्ग खुश्कीचा म्हणजे भूमार्गाचा आहे. गुजरातचे कांडला बंदर तर त्याहीपेक्षा निम्मेहून कमी अंतरावर आहे. म्हणजे सहासातशे किलोमीटर्स सागरी मार्ग ओलांडला तर युरोप ते आग्नेय आशिया भूमार्गाने जोडला जाऊ शकतो. या मार्गाचा वापर जितके देश व कंपन्या करतील, त्यांच्यावर भारताला आपला प्रभाव पाडणे शक्य होत असते. अशा गोष्टी परराष्ट्र धोरण, सुरक्षा व अनेक बाबतीत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कामी येत असतात. खरेतर चीनी सत्ताधीशांनी मागल्या दहापंधरा वर्षात त्यासाठी योजलेले मनसुबे व केलेली गुंतवणूक चाबाहार वेगाने विकसित करून, भारताने मोठी मजल मारलेली आहे. आज जगात भारताचा दबदबा वाढलेला दिसतो, त्याला पंतप्रधान मोदींची लोकप्रियता हे कारण नसून, मागल्या चार वर्षात त्यांनी जी रणनिती व भौगोलिक राजकीय डावपेच योजलेले आहेत, त्याचा परिपाक आहे.

वरकरणी अशा रस्त्यांचे महत्व कोणाच्या लक्षात येणार नाही. त्यापेक्षा डोकलाम वा लडाखमध्ये चीनने केलेल्या उचापतींना आपल्या देशात अधिक महत्व दिले जाते. त्याच विषयावर काहुर माजवले जाते. पण इतक्या उचापती करायची दुर्बुद्धी चीनला अचानक कशाला होऊ लागलेली आहे वा त्याचे दुखणे काय आहे, त्याचा शोध कोणी घेत नाही. मध्यंतरी चीनने त्यासाठी खास प्रयत्न केलेले होते. आशियाई व अन्य देशांना आमंत्रित करून ओबोर म्हणजे ‘एक पट्टा एक मार्ग नावाची व्यापक संकल्पना मांडलेली होती. त्यात सहभागी होण्यास भारताने नकार दिला होता. पण इथले काही पाकप्रेमी व चीनी हितचिंतक सरकारची नाराजी पत्करूनही त्या ओबोर परिषदेला उपस्थित राहिले होते. सरकारने त्यांना रोखले नाही की त्या परिषदेला किंमत दिली नाही. कारण ती परिषदच भारताच्या अघोषित ओबोरला हाणून पाडायला योजलेली होती. चीन जे उघडपणे करण्याची भाषा बोलत होता वा आहे, ते न बोलताच भारताने प्रत्यक्षात राबवलेले धोरण आहे. त्यामुळे चीनपाशी अधिक पैसा किंवा भांडवल यंत्रणा असूनही काही बाबतीत चीन कमजोर झाला आहे. रस्त्याचे भारताने विणलेले जाळे चीनच नव्हेतर जगातल्या बहुतेक प्रगत व व्यापारी देशांना भारतीय वर्चस्वाखाली आणणारे आहे. रस्त्याची ही महत्ता आहे. सागरी किंवा हवाई वाहतुकीपेक्षा मालाची भूमार्गाने होणारी वाहतुक अधिक सुखरूप व वेगवान असू शकते आणि त्याचे जाळे ज्या भागात पसरलेले आहे, त्याला त्याचे अधिक लाभ मिळत असतात. युरोप ते व्हीएतमानला जोडणार्‍या ह्या जाळ्याच्या मध्यवर्ती जागी भारत हा खंडप्राय देश पसरलेला आहे. त्याच्या भूमार्गाने येजा होणार असेल, तर सर्वाधिक लाभ कोणाचा असेल? भारताच्या भोवतालासह इतरही देशांच्या व्यापाराची सुरक्षा आपोआपच भारताची सुरक्षा होते आणि तिच्याशी जगातला कुठलाही देश खेळ करू बघेल, तर तोही भारताच्या शत्रूंचा शत्रूच होऊन जाणार ना? रस्ते हे नुसते विकासाचाच मार्ग नसतात, तर सुरक्षेचाही तो अतिशय सुरक्षित मार्ग असू शकतो.  (संपुर्ण)

रस्त्यांची विकासातील महत्ता (पुर्वार्ध)

road development के लिए इमेज परिणाम

घोडा घाससे दोस्ती करेगा तो खायगा क्या? अशी हिंदीतली एक उक्ती आहे. तिचा अर्थ फ़ार उघड करून सांगण्याची गरज नाही. घोड्याची गुजराण गवत खाऊन होत असेल तर त्याला गवताशी दोस्ती करता येत नाही. नेमकी हीच गोष्ट जेव्हा राज्यकर्ते वा शासनातील लोकांची गुजराण किंवा ऐषाराम जनतेच्या गरीबीवर अवलंबून असतो, तेव्हा गरीबी संपवून चालत नसते. उलट गरीबी हटवण्याच्या गमजा कराव्या लागतात. पण गरीबी कधीही संपणार नाही, याची तजवीज करून लोकमत खेळवावे लागत असते. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या कल्याणासाठी आणि गरीबांच्या उत्थानासाठी कोट्यवधीच्या योजना आखल्या गेल्या आणि त्यासाठी अब्जावधी रुपयांची उधळपट्टी झालेली आहे. पण गरीबी संपण्याचे नाव घेत नाही, की गरीबांच्या नावाने जोगवा मागण्याची प्रथा संपलेली नाही. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार किती निर्माण केले? किंवा गरीबांसाठी काय केले, असले प्रश्न अगत्याने विचारले जात आहेत. पण साठ वर्षे ज्यांनी देशाची सत्ता उपभोगली व गरीबांना स्वप्ने दाखवली, त्यांनी काय केले त्याचा हिशोब कधी दिला जात नाही. कारण तो देण्याची वेळ आली तर अनुदान व गरीबी हटाव ही कशी निव्वळ लूटमार होती, त्याचाच मोठा पुरावा समोर येण्याची भिती आहे. अनुदानाने जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाची वा समाजातील गरीबी कधी दुर झालेली नाही. कुठल्याही अनुदानाने कुठल्या गरीब समाजाचे उत्थान होऊ शकलेले नाही. पण जिथे समाजातील तळागाळातल्या गरीबाला स्वयंभू बनवण्याला प्राधान्य दिले गेले, असे समाज जगातली महासत्ता म्हणून पुढे आलेले आहेत. त्यांच्या गुणवत्ता, कुशलता व पुरूषार्थाला चालना व संधी देणार्‍या सुविधा उभ्या करण्यातून गरीब सुखवस्तु झाले आणि एकूण समाजाचे उत्थान घडून आले आहे. त्याची साक्ष भारतातही किरकोळ प्रकरणात आपण तपासून बघू शकतो.

मोदीपुर्व राजकारणात सलग दहा वर्षे युपीए नावाचे सरकार सोनिया गांधी रिमोट कंट्रोलने चालवित होत्या. त्यांनी मनरेगा किंवा राष्ट्रीय आरोग्य संकल्प, नागरी पुनर्निर्माण अभियान अशा अनेक कल्पनांसाठी अब्जावधी रुपयांची लयलूट केली. पण त्यातून किती गरीब सुखवस्तु होऊ शकले? त्याच्याही पुर्वी नेहरू, इंदिराजी वा राजीव गांधी यांच्या प्रदिर्घ कारकिर्दीत किती पैशाची लयलूट झालेली आहे. पण त्यातून किती गरीब दारिद्र्य रेषेखालून बाहेर येऊ शकले? नसतील तर का येऊ शकले नाहीत? त्याचे उत्तर कोणी मागणार नाही की दिले जाणार नाही. कारण अशा अनुदान व उद्धाराच्या योजना मुळातच गरीबांच्या नावावर पैसे लुटण्यासाठी तयार झाल्या होत्या. म्हणून तर तीन दशकापुर्वी राजीव गांधीच म्हणाले होते, शंभर रुपये गरीबासाठी बाजूला काढले तर त्याच्यापर्यंत फ़क्त दहापंधरा रुपयेच पोहोचतात. मग बाकीचे पैसे जातात कुठे? तर योजना बनवणार्‍यांपासून राबवणार्‍यापर्यंत प्रत्येकाचा हिस्सा काढून घेतला जाईपर्यंत १०-१५ रुपये शिल्लक उरत असतात. मग ती रक्कम कल्याण करून घेण्यात गुंतवण्यापेक्ष गरीबही लाभार्थी होतो आणि पैसे खर्चून मोकळा होतो. तो गरीबच रहातो आणि त्याच्या गरीबीसाठी झटणारे मात्र अल्पावधीत श्रीमंत होऊन जातात. त्यातून मागल्या सात दशकात हजारो राजकारणी, अधिकारी व त्यांचे निकटवर्ति श्रीमंत होऊन गेले आहेत. उलट वाजपेयी यांच्या बिगरकॉग्रेस कारकिर्दीतली गोष्ट आहे. कुठल्याही अनुदानाशिवाय वाजपेयी सरकारने अधिक गरीबांना त्या नरकातून बाहेर काढलेले आहे. हा काय चमत्कार आहे? त्यासाठी युपीए सरकारने सुप्रिम कोर्टात दिलेल्या एका निवेदनाचा तपशील समजून घ्यावा लागेल. साडेचार वर्षापुर्वी एका विषयात तो तपशील युपीए सरकारला कोर्टात सादर करावा लागला, त्यामध्ये समोर आलेले आकडे वास्तव सांगणारे आहेत.

स्वातंत्र्योत्तर ६५ वर्षात देशामध्ये एकूण ७६,८१८ किलोमिटर्स लांबीचे हायवे बांधले गेले. त्यातील २९ हजार किलोमीटर्सची उभारणी १९८० पुर्वी झालेली होती. त्यानंतर ३२ वर्षात ४७ हजार किलोमीटर्स लांबीचे रस्ते बांधले गेले. यापैकी केवळ १९९७ ते २००२ अशा पाच वर्षात २३ हजार किलोमीटर्सची उभारणी झाली. याचा अर्थ मधल्या ३२ वर्षात जितके पक्के व हायवे उभारले गेले त्यातली निम्मी उभारणी वाजपेयी सरकारच्या सहा वर्षाच्या कालखंडातली आहे. त्यामुळे काय होते? त्याचे उत्तर कोणी भाजपावालाही देऊ शकणार नाही आणि कॉग्रेसवाले देण्याची शक्यताच नाही. त्याचे उत्तर स्वामिनाथन अय्यर नावाच्या एका आर्थिक पत्रकाराने दिलेले आहे. नेहरूंपासून जो अनुदानाचा जमाना सुरू झाला व त्यात गरीबी हटवण्यासाठी जी वेगवेगळी अनुदाने दिली गेली, ती थेट गरीबांना व्यक्तीगत लाभ देण्यासाठी होती. पण त्यांच्यापर्यंत ती रक्कम वा लाभ पोहोचू शकले नाहीत. पण रस्ते बांधणीवर वाजपेयी सरकारने जे पैसे खर्च केले, ते व्यक्तीगत अनुदान नव्हते तर समाजासाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा होती. त्यातून समाज जितका स्वयंभू व स्वयंपुर्ण होत गेला, त्याने अधिक मोठ्या प्रमाणात गरीबी निर्मूलन झाले, असे अय्यर यांनीच मांडलेले आहे. एका लेखात त्यांनी त्याची आकडेवारीच सादर केलेली आहे. रस्ते, शिक्षण, संशोधन आणि जलसंधारण अशा पायाभूत सुविधा गरीबी दुर करण्याला मोठा हातभार लावत असतात. म्हणूनच एक दशलक्ष रस्त्यावर खर्चाने ३३५ लोकांना गरीबीतून बाहेर काढले तर तितकीच रक्कम संशोधनावर खर्च झाल्याने ३२३ लोक गरीबीमुक्त होऊ शकले. शिक्षणाच्या सुविधा उभारण्यातून दहा लाखामागे १०९ तर जलसंधारणात दहा लाख खर्चून ६७ लोक गरीबीतून बाहेर आले. उलट जी रक्कम अनुदानावर खर्च झाली तिचे परिणाम आहेत. कर्जारुपी अनुदान दिल्याने दहा लाखात अवघे ४२ आणि वीजवापरात अनुदानाने २७ तर खताच्या अनुदानाने केवळ २४ लोक गरीबी मुक्त होऊ शकले. मग अशी अनुदाने गरीबांसाठी होती की त्याची अंमलबजावणी व कारभार करणार्‍यांसाठी लूट होती?

याचा तपशील बाजूला ठेवू. कारण त्यातून देशांतर्गत राजकारणाचा विषय आपल्याला बघायचा नाही. तर यातील सरकारी गुंतवणूक कुठल्या क्षेत्रात व्हावी आणि त्याचे कुठले दिर्घकालीन लाभ देशाला व समाजाला होऊ शकतात, त्याची छाननी करायची आहे. त्यात रस्ते व संशोधन ही किती मोलाची गुंतवणूक आहे, त्याचा अंदाज यावा म्हणून उपरोक्त उहापोह आवश्यक होता. रस्त्यामुळे देशाच्या एका कोपर्‍यातील उत्पादन वा शेतीमाल दुसर्‍या कोपर्‍यात वेगाने व अल्पावधीत पोहोचू लागला. जिथे मालाला भाव मिळेल तिथे पोहोचण्याची सुविधा रस्त्याने उपलब्ध करून दिली असल्याने उत्पादक व शेतकर्‍याच्या हाती अधिक किंमत व पैसा खेळू लागला. त्यातूनच त्याची गरीबी अधिक वेगाने कमी होऊन शकली. अधिक प्रमाणात घटली. ही बाब नुसती देशांतर्गत विकास व उत्थानाशी संबंधित नाही. रस्ते हा विषय मानवी संस्कृती विकसित झाल्यापासूनचा आहे. देशातला पहिला महामार्ग शेरशहा सुरीने उभारला असे म्हणतात. त्याने नुसता हा रस्ता उभारला नाही, तर त्यावरून मालाची नेआण करणार्‍यांची लूटमार होणार नाही, याचीही काळजी घेतली होती. रस्ते व वेगवान नेआणीसाठी रस्ते हे शेरशहा सुरीला उमजलेले सत्य विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय राज्यकर्त्यांना कशाला समजू शकले नाही? वाजपेयी सरकार सत्तेत येईपर्यंत त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्नही का झाला नाही? रस्ते केवळ उद्योग व्यापाराची भरभराट करण्यासाठी नसतात, तर परदेशी संबंध व सुरक्षेसाठीही निर्णायक महत्वाचे असतात, हे आधुनिक भारतीय राज्यकर्त्यांना कितीसे समजलेले होते? समजले असते, तर त्यांनी अनुदानाची संस्कृती उभारण्यापेक्षा व त्यातून वाडगा घेऊन फ़िरणार्‍या भारतीयांची फ़ौज उभारण्यापेक्षा, स्वयंभू व स्वावलंबी भारतीय समाज उभारणे अगत्याचे मानले असते आणि एकविसाव्या शतकाचा उदय होण्यापुर्वीच भारत आशियातील महाशक्ती म्हणून ओळखला गेला असता.

जागतिकीकरण व मुक्त अर्थव्यवस्था आल्यावर चीनही जगाच्या आर्थिक पटलावर आला. सर्वप्रथम त्याने समाजवादी अर्थव्यवस्थेला मूठमाती दिली. सो्वियत साम्राज्यही कोसळून पडले होते आणि जगाच्या पाठीवर कुठेही समाजवादी व्यवस्था उरली नाही. पण याच दरम्यान चीनने भांडवलदारी सहाय्य मिळवून आपल्या कम्युनिस्ट हुकूमशाहीच्या आधारे आपली आर्थिक भरभराट करून घेतली. त्यात अनुदान संस्कृतीला फ़ाटा देऊन कामगाराच्या उत्पादक शक्तीला प्राधान्य देणार्‍या शोषणाची कास धरली. परदेशी भांडवलाचे स्वागत करून चीन कामगार पुरवणारा कंत्राटदार बनला. त्यामुळे आज चीन जगाचा कारखाना बनला आहे. त्याच्यापाशी अधिकचे उत्पादन होऊ लागल्यावर त्याला परदेशी बाजारपेठ मिळवणे अगत्याचे झाले आणि नंतरच चीनने सागरी वा भूमार्गाने जगाशी स्वत:ला जोडण्यचे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले. अधिकचा पैसा भांडवल बनवून इतर देशात गुंतवणूक केली आणि शेजारी देशांना भूमार्गाने व सागरी मार्गाने जोडून आपल्या आर्थिक विस्ताराचे स्वप्न पाहिले. चीन खंडप्राय देश असला तरी त्याला दक्षिणपुर्वेकडे असलेला किनारा सोडल्यास सागरी मार्ग नव्हता. म्हणून त्याने जुना मित्र पाकिस्तानला हाताशी धरून तिथे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली. आजघडीला ५६ अब्ज डॉलर्स इत्की गुंतवणूक चीनने एकट्या पाकिस्तानात केली आहे. अरबी समुद्र ते चिनी भूमीपर्यंत महामार्गाचे निर्माण करीत आणले आहे. त्यासाठी कराचीनजिक ग्वादार बंदर उभारले आणि ते चीनला जोडून पुढे मध्य आशिया व रशियापर्यंत विस्तारण्याचा मनसुबा केला. वरकरणी चिनी आर्थिक विस्तार वाटणारी ही योजना भारताची चहुकडून कोंडी करण्याची होती.   (अपुर्ण)

इशारा काफ़ी है

mamta vasudhara के लिए इमेज परिणाम

गुरूवारी अर्थसंकल्प मांडला जायचा नसता, तर सगळ्या वाहिन्यांवर एकच मोठी ब्रेकिंग न्युज झाली असती आणि ती म्हणजे बंगाल व राजस्थानमध्ये मतदान झाले त्या पोटनिवडणूकांची! कारण या तीन लोकसभा व दोन विधानसभा मतदानात भाजपाला एकही जागा मिळवता आलेली नाही आणि असलेल्या तीन जागा मात्र हातच्या गेल्या आहेत. त्या तिन्ही जागा राजस्थानमधल्या आहेत. अलवार व अजमेर अशा दोन लोकसभेच्या व मंडलगड ही विधानसभेची जागा भाजपाने गमावली आहे. याला जास्त महत्व आहे आणि अर्थसंकल्प नसता, तर सर्वच माध्यमात हे निकाल ठळकपणे चर्चिले गेले असते. कारण राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका व्हायच्या असून, त्यात कॉग्रेस हाच प्रमुख पक्ष भाजपासमोर आव्हान म्हणून उभा रहाणार आहे. त्याची चुणूक म्हणून या मतदानाकडे बघणे भाग आहे. कारण नुसत्या त्या जागा कॉग्रेसने जिंकलेल्या नाहीत तर भरघोस मतांनी तिथे विजय संपादन केलेला आहे. मग वर्षाच्या अखेरीस तिथल्या मतदाराचा कल किती वेगळा असू शकेल? चार वर्षे उलटल्यावर भाजपाच्या वसुंधराराजे सरकारच्या कामकाजावर व्यक्त झालेले मत म्हणून याकडे बघायला अजिबात हरकत नाही. पण हा कौल केवळ राजे सरकारसाठी महत्वाचा नसून, सोळा महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमुळे मोदींसाठीही हा निकाल महत्वाचा आहे. गेल्या लोकसभेत राजस्थानच्या सर्व २५ जागा मोदींनी जिंकल्या होत्या आणि त्यामुळेच त्यांना सबळावर बहूमताचा पल्ला गाठता आला होता. वर्षाच्या अखेरीस फ़क्त राजस्थानमध्ये निवडणूक नसून शेजारी मध्यप्रदेश व छत्तीसगडच्याही विधानसभा नव्याने निवडल्या जाणार आहेत. या तीन राज्यात मिळून लोकसभेच्या एकूण ६५ जागा होतात आणि म्हणूनच ताजे निकाल भाजपासाठी चिंतेचा विषय आहे.

राजस्थानच्या तीन जागा कॉग्रेसने जिंकल्या त्या काठावरचे मताधिक्य घेऊन जिंकलेल्या नाहीत. तर चांगले मताधिक्य घेऊन बळकावल्या आहेत. त्यातून केंद्र नव्हेतर राज्य सरकारच्या विरोधातले लोकमत व्यक्त झालेले आहे. तसे बघायला गेल्यास मागल्या काही महिन्यांपासूनच भाजपा किंवा वसुंधरा सरकारच्या विरोधात तिकडे नापसंती व्यक्त झालेली होती. पण भाजपाच्या नेतृत्वाने तिकडे लक्ष देण्यापेक्षा त्यावर पडदा पाडण्याला प्राधान्य दिलेले होते. जितका हा वसुंधराराजे यांचा पराभव आहे, तितकाच तो सचिन पायलट या तरूण कॉग्रेस नेत्याचा दणदणित विजय सुद्धा आहे. मागल्या खेपेस सचिन पायलट यांचा अजमेर या लोकसभा मतदारसंघात दारूण पराभव झालेला होता. आज तीच जागा त्यांच्याच प्रयत्नांनी पुन्हा कॉग्रेसने जिंकलेली आहे. पावणे दोन लाख मतांनी जी जागा गमावली, तीच लाखाहून अधिक मतांनी पुन्हा जिंकणे ही बाब लक्षणिय आहे. मात्र यावेळी पायलट तिथले उमेदवार नाहीत. त्यांच्याकडे कॉग्रेसने राज्यातील पक्ष संघटना नव्याने उभारण्याची कामगिरी दिलेली आहे. त्यांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवून तिथे अन्य उमेदवारासाठी खुप मेहनत घेतली, त्याचे हे फ़ळ आहे. उलट सर्व मंत्रीमंडळ प्रचाराला हजर असूनही वसुंधराराजे यांना तीनही जागा राखता आलेल्या नाहीत. अर्थात पोटनिवडणूकात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कौल जातो असाही युक्तीवाद केला जाऊ शकतो. पण तो फ़सवा आहे. कारण तसे असते तर बंगालमध्येही ममतांच्या पक्षाला फ़टका बसायला हवा होता. पण तसे झालेले नाही. बंगालच्या लोकसभा व विधानसभेच्या दोन्ही जागा पोटनिवडणूकीत ममतांच्या पक्षाने आरामात जिंकलेल्या आहेत. हा ममता व वसुंधराराजे यांच्यातला फ़रक मानता येईल. म्हणूनच भाजपासाठी हा येऊ घातलेल्या संकटाचा मोठा इशारा आहे. अर्थात सत्तेत मशगुल असणार्‍यांना इशारे कितीसे समजतात, हा भाग वेगळा!

राजस्थान भाजपाला इतक्यासाठी महत्वाचा आहे की मागल्या खेपेस अशाच राज्यातील सर्व किंवा बहुतेक जागा जिंकल्याने भाजपाला लोकसभेत आपले बहुमत मिळालेले होते. त्यात कुठेही घट होत असेल, तर त्याची भरपाई अन्य राज्यातून करावी लागणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, हरयाणा अशा राज्यातून भाजपाने बहुतांश जागा जिंकलेल्या होत्या. त्यांची संख्या दोनशेच्या घरात जाणारी आहे. त्यात ४०-५० ची घट म्हणजे तितक्या जागा अन्य राज्यातून मिळवाव्या लागतील. तशी कुठलीही राज्ये आज तरी उरलेली नाहीत. बंगाल, ओडीशा व केरळ अशा राज्यात भाजपाने हळुहळू आपले हातपाय पसरले आहेत. पण त्यातून ४०-५० जागांची भरपाई करणे अवघड काम आहे. म्हणूनच राजस्थानचा इशारा महत्वाचा ठरतो. त्यातही ही बहुतांश राज्ये अशी आहेत, जिथे समोर फ़क्त कॉग्रेस हा़च प्रतिस्पर्धी पक्ष आहे. म्हणजे नुसते भाजपाचे नुकसान होणार नसून, संसदेतील प्रमुख विरोधक असलेल्या कॉग्रेसचे बळही त्यातूनच वाढत जाणार आहे. त्याचा अर्थ राष्ट्रीय राजकारणात भाजपासाठी कॉग्रेस हे समर्थ आव्हान म्हणून पुढे येऊ शकते. जितके हे आव्हान समर्थ होत जाईल, तितके इतर विरोधी पक्ष कॉग्रेसच्या पाठीशी एकजुट होण्याच्या प्रक्रीयेला वेग येऊ शकेल. म्हणूनच निकाल राजस्थानचे असले तरी परिणाम राष्ट्रीय राजकारण घडवणारे आहेत. त्याची फ़िकीर वसुंधराराजे वा त्यांच्यासारख्या राज्यनेत्यांना नसेल, तर त्यात केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. कारण याला कॉग्रेसने कितीही वैचारिक रंग देण्याचा प्रयत्न केला तरी ही विचारधारांची लढाई नसून, तो आकड्यांचा व स्थानिक कारभाराचा विषय आहे. त्याचीच प्रचिती उलट्या बाजूने बंगालमध्ये येताना दिसते आहे. तिथे ममतांनी बाजी मारलेली असली तरी भाजपाला मिळणारी मते विरोधकांसाठी इशारा आहे.

बंगालच्या उलूबेरीया मतदारसंघात आधी तृणमूलचा उमेदवार लोकसभेवर निवडून आला होता आणि आताही त्याच पक्षाने बाजी मारली आहे. पण यावेळी पडलेला फ़रक दुसर्‍या क्रमांकाच्या मतांमध्ये पडलेला आहे. मागल्या खेपेस तिथे डाव्या आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करून ममतांचा सहकारी जिंकलेला होता. यावेळी तिथे दुसर्‍या क्रमांकाची मते भाजपाने मिळवलेली आहेत. विधानसभा असो किंवा लोकसभा असो, दोन्हीकडल्या मतदानात हाच मोठा फ़रक पडलेला आहे. पाच वर्षापुर्वी बंगालच्या राजकारणात ममता, कॉग्रेस आणि डावी आघाडी हे़च प्रमुख खेळाडू होते. मागल्या दोन वर्षात तिथे मतदानाच्या विभागणीत फ़रक दिसून येतो आहे. हळुहळू भाजपाने तिथे आपला जम बसवला असून, त्याची प्रचिती ताज्या मतमोजणीतही आलेली आहे. उलूबेरीया वा नोवापारा या दोन्ही जागी तृणमूलने भव्य यश मिळवले असले, तरी दुसरा क्रमांक भाजपाच्या उमेदवाराने मिळवलेला आहे. डावी आघाडी तिसर्‍या क्रमांकावर गेली असताना, कॉग्रेस कुठल्या कुठे नगण्य झाली आहे. भाजपाच वाढता प्रभाव ममतांसाठी इशारा आहे. कारण आजची भाजपाची मते आणि पंधरा वर्षापुर्वीची ममतांची मते व धडपड, यातले साम्य अभ्यासण्यासारखे आहे. तेव्हाही पराभूत होणार्‍या ममतांची टिंगल झालेली होती. पण आपणच डाव्या आघाडीला पर्याय असल्याचे जनमानसात ठसण्याचे प्रयास ममतांनी सोडलेले नव्हते. मग २००६ सालात त्यांच्याकडे बंगालची सत्ता आलेली होती. त्याची पहिली पायरी २००१ साली विधानसभेत दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होण्याने गाठली गेली होती आणि आज भाजपालाही आगामी काळात बंगालमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा प्रमुख विरोधी पक्ष होण्याचीच महत्वाकांक्षा आहे. त्यातून डावे पक्ष व कॉग्रेस पुरती नामोहरम होत चालले आहेत. म्हणूनच राजस्थान हा जसा भाजपासाठी इशारा आहे तसा बंगालचे निकाल हा ममता व डाव्यांसाटी इशारा आहे.

हल्लाबोल, पण कोणावर?

Image result for pawar sonia

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अलिकडे धुर्तपणे काही खेळी केल्या. त्यापैकी एक खेळी हळूच राहुल गांधींचे कौतुक करण्याची होती आणि त्यातून आपणही राहुलचे नेतृत्व स्विकारत असल्याचे संकेत देण्याची होती. पण पवारांची असली भाषा इतरांच्या पचनी पडणारी होती, तरी सोनियांच्या मनाला ती पटलेली नसावी. अन्यथा त्यांनी दोन महिन्यांचा संन्यास सोडून पुन्हा क्रियाशील राजकारणात उडी घेतली नसती. डिसेंबर महिन्याच्या पुर्वार्धात राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपद सोपवून सोनियाजी खरोखरच अंतर्धान पावल्या होत्या. त्यांनी गोव्यात विश्रांतीसाठी जाऊन पक्षाच्या तमाम ज्येष्ठ नेत्यांना राहुलच्या नेतृत्वाखाली एकजुट होण्यास भाग पाडलेले होते. गुजरात प्रचारात राहुलनी झेप घेतली आणि त्यांच्या मुसंडीचे कौतुक करताना पवार यांच्यासारखा मुरब्बी राजकारणीही कौतुकाचे शब्द बोलू लागला होता. राहुलना मोदी सरकार घाबरले आहे, अशीही भाषा पवार बोललेले होते. पण गुजरातचे निकाल लागल्यानंतर हळुहळू पवारांनी आपली वेगळी चुल मांडण्य़ाचे डाव सुरू केले. त्यात हल्लाबोल हे आंदोलन व संविधान बचाव मेळावे यांचा समावेश होतो. यापैकी संविधान बचावमध्ये त्यांनी इतर पक्षांना सामावून घेतले आणि गडबड सुरू झाली. गुलाम नबी आझाद व आनंद शर्मा यासारखे राज्यसभेतील कॉग्रेसचे दोन प्रमुख नेतेही त्यांच्या बैठकीला होते. पण त्याच नेत्यांनी अज्ञातवासात गेलेल्या सोनियांना पुन्हा राजकारणात आणण्याचे सूतोवाच केलेले आहे. हा मोदींना शह देण्याचा खेळ आहे, की विरोधकांनी आपापसात एकमेकांचे पाय ओढण्याचा सुरू केलेला खेळ आहे? पवारांनी विरोधकांच्या एकजुटीसाठी पुढाकार घेईपर्यंत सोनिया गप्प कशाला होत्या? पुत्राकडे कारभार सोपवलेल्या सोनियांची झोप पवारांच्या कृतीशील होण्याने उडालेली आहे काय? नसेल तर त्यांनी अकस्मात नव्या हालचाली कशाला सुरू केल्या आहेत?

डिसेंबर महिन्यात राहुल यांचे राज्यारोहण होऊ घातले असताना कुणा वाहिनीशी बोलताना सोनियांनी आता आपली निवृत्तीची वेळ झाली आहे अशी भाषा वापरलेली होती. खरोखरच त्यांनी त्या सोहळ्यानंतर राजकारणातून जवळपास संन्यास घेतला होता. गुजरातचे निकाल असोत किंवा नंतरच्या अनेक घटना असोत, सोनियांनी त्याबद्दल कुठले वक्तव्यही केलेले नव्हते. पक्षाच्या बैठकांपासून विविध निर्णयांपर्यंत कुठेही सोनियांचे नाव येत नव्हते. पण विविध वाहिन्यांच्या मतचाचण्यांचे आकडे समोर आले आणि अनेक पक्षांच्या नेत्यांनी राहुलविषयी स्पष्ट बोलायचे टाळल्यावर सोनिया जाग्या झाल्या आहेत काय? चाचण्यांच्या निष्कर्षानुसार २०१९ साली सुद्धा मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर असणार आहेत आणि त्यांना शह द्यायचा तर सगळे मतभेद बाजूला ठेवून विरोधकांना एकजुटीने लढावे लागणार आहे. त्यामुळे अशा एकजुटीचे नेतृत्व कॉग्रेसलाच करावे लागेल आणि त्यासाठी राहुल सज्ज आहेत काय, अशीही चर्चा सुरू झाली होती. त्यावर विरोधकांच्या प्रतिक्रीया प्रतिकुल आल्या. त्याच दरम्यान शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुढाकार घेऊन भाजपा विरोधात आंदोलने व मोर्चांचे सत्र सुरू केले. त्यात इतर राज्यातील व पक्षातील नेते सहभागी करून घेतले. खुद्द कॉग्रेसच्याही नेत्यांना त्यात आणले. पुढे विविध राज्यातील नेत्यांना एकजुटीसाठी पवारांनी प्रयत्न सुरू केले. डाव्यांपासून अन्य प्रादेशिक पक्षांचाही त्यांना हलकासा प्रतिसाद मिळताना दिसू लागला. मात्र ह्या सर्व हालचाली करताना पवारांनी कटाक्षाने राहुल गांधी यांना दूर ठेवलेले होते. त्यामुळेच बहुधा कॉग्रेस व सोनियांची झोप उडालेली असावी. अन्यथा राहुलना बाजूला करून सोनियांना पुढे करण्याची खेळी झाली नसती. बैठक पवारांनी आपल्याच निवासस्थानी बोलावलेली होती. पण तिथे शर्मा व आझाद यांनी सोनियांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलावण्याचा विषय मंजूर करून घेतला.

पवारांच्या बैठकीत सोनियांच्या नेतृत्वाखाली बैठकीचा प्रस्तावच चमत्कारीक होता. एकजुटीचा कुठलाही ठाम निर्णय झालेला नाही. त्याची चाचपणी करण्यासाठीच या दोन बैठका योजलेल्या होत्या. पण त्यात सहभागी होऊन दोन ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांनी आपला अजेंडा पुढे सारला आहे. यातली खरी चमत्कारीक गोष्ट त्या नेत्यांनी कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनाही बाजूला सारण्यातली आहे. कॉग्रेसच्या वतीने इतर पक्षांशी बोलणी करणे किंवा मोदी विरोधी आघाडीचे नेतृत्व करणे, ही बाब कॉग्रेसच्या अध्यक्षांच्या आवाक्यातली आहे. सोनिया आता अध्यक्ष नसूनही त्यांनीच त्यात नेतृत्व करायचे, तर राहुल गांधी काय करणार आहेत? पक्षाध्यक्ष म्हणून संसदीय पक्षाचे वा युपीएचे नेतृत्व त्यांच्याकडे असायला हवे. बहुधा त्यातच अडचण आलेली असावी. पक्षात सर्व हुजरे असल्याने अध्यक्ष होण्यात कुठली अडचण नव्हती. पण मित्रपक्षांनी नेतृत्व पत्करावे, इतकी चमक राहुलनी आजवर एकदाही दाखवलेली नाही. किंबहूना त्यांनी अशा अनेक प्रसंगात मित्रपक्षांना तोंडघशी पाडलेले आहे. नोटाबंदी नंतरच्या काळात संसदेत विरोधकांनी कॉग्रेसच्याच नेतृत्वाखाली धुमाकुळ घातला होता आणि नंतर राष्ट्रपतींकडे दाद मागण्याचे ठरलेले होते. त्यासाठी सरकारशी संपूर्ण असहकार पुकारण्यात आलेला होता. अशावेळी राहुलनी अचानक पंतप्रधानांची वेळ घेऊन कॉग्रेसचे शिष्टमंडळच मोदींना भेटायला नेलेले होते. त्यामुळे विरोधक संतापले आणि त्यांनी राहुलसह राष्ट्रपती भवनात येण्यास नकार दिलेला होता. त्यातही सोनियांना हस्तक्षेप करून पुढाकार घ्यावा लागला होता. अशा अनेक लहानमोठ्या घटनांमुळे विरोधक कायम राहुलचे नेतृत्व स्विकारण्याबद्दल साशंक राहिले आहेत. आता पक्षाध्यक्ष झाल्यावरही तीच स्थिती असल्याने अज्ञातवास सोडून सोनियांना पुढे यावे लागले आहे. की विरोधकांची सुत्रे पवारांच्या हाती जाऊ नयेत, म्हणून सोनियांनी संन्यास सोडला आहे?

मोदी विरोधात कॉग्रेस नसेल तर सर्वमान्य होऊ शकणारा नेता शरद पवार होऊ शकतात, याविषयी कोणाचे दुमत नाही. तेच अनुभवाने व वयानेही ज्येष्ठ आहेत आणि बाकीच्या कुठल्याही पक्ष वा नेत्यापेक्षा त्यांच्या राजकीय चतुराईवर विश्वास ठेवणे भाग आहे. त्यांनाही शह देऊन सोनियांनी आपले राजकीय बस्तान बसवलेले होते. म्हणून विरोधकांना २००० नंतर सोनियांच्या नेतृत्वाखाली येणे शक्य झाले वा त्यांचे नेतृत्व मन्य करावे लागलेले होते. पण आज थकलेल्या सोनिया व मनमौजी राहुल यामुळे कॉग्रेसपाशी पर्याय उरलेला नाही. त्याचा लाभ पवारांना मिळू लागला आहे. म्हणूनच त्यांनी आमंत्रित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला अनेक पक्षाचे नेते हजर राहिले आणि कॉग्रेसलाही तिथे प्रतिनिधी पाठवावे लागले. किंबहूना त्यातूनच राहुल पुढाकार घेण्यात किती तोकडे आहेत आणि पवारांना पुढाकार कसा मिळत आहे, त्याची साक्ष मिळाली. परिणामी मोदीविरोधी एकजुट ही परस्परांच्या विश्वासापेक्षाही परस्पर संशयाने कशी ग्रासलेली आहे, त्याची प्रचिती येते. बहुतांश पक्षांनी कॉग्रेसशी निवडणूकपूर्व युती आघाडीला साफ़ नकार दिला आहे आणि त्याचे प्रमुख कारण त्यापैकी बहुतेकांना राहुलचे नेतृत्व मान्य नाही असाच होतो. तीच अडचण दुर करायला बहुधा सोनियांना पुनरागमन करावे लागत असावे. किंबहूना आज मोदींपेक्षा पवार हेच राहुल समोरचे आव्हान असल्याचे भय, सोनियांना माघारी येण्यास भाग पाडताना दिसत आहे. अध्यक्षपद सोडले तरी आपण राजकारण सोडलेले नाही, हेच सोनियांनी अशा खेळीतून दाखवून दिले आहे. हल्लाबोल आंदोलनातून कार्यरत झालेल्या पवार साहेबांना दिल्लीतून असा ‘हल्लाबोल’ होईल याची नक्कीच अपेक्षा नसावी. पुढल्या लोकसभा मतदानाला सव्वा वर्ष राहिले असताना, विरोधी एकजुटीतला असा बेबनाव भवितव्यावर शिक्कामोर्तब करीत असतो. हल्लाबोल हे खरे! पण कोणावर रोख त्याचे उत्तर महत्वाचे आहे.