अमेरिकेहून राहुल गांधी माघारी परतले आणि त्यांचा नुर पालटून गेला आहे. आपली आजवरची प्रतिमा झटकून त्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यातच गुजरात विधानसभेच्या निवडणूका लागल्याने त्यांच्या बोलण्याला व शब्दांना धार आलेली आहे. सहाजिकच त्यांचे पुरस्कर्ते आणि निष्ठावान खुशीत आले, तर नवल नाही. मोदी वा भाजपाचे असतील यांना भक्त म्हटले जाते. तर इंदिराजी वा त्यांच्या कुटुबियांच्या भक्तांना निष्ठावान म्हणायचा आपल्याकडे प्रघात आहे. तर असे निष्ठावान दिर्घनिद्रेतून बाहेर आले असून, त्यांना आता गुजरात जिंकून राहुल गांधींची अध्यक्षीय यात्रा सुरू होणार असल्याची स्वप्ने पडल्यास गैर नाही. मागल्या वर्षी याच दरम्यान देशातील सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश जिंकून राहुल आपली पक्षाध्यक्षीय कारकिर्द सुरू करणार असल्याचे सांगितले जात होते. पण तिथे मोदींचा दारूण ‘पराभव’ झाल्यामुळे राहुल ना मुहूर्त बदलून घ्यावा लागला. असो, आता गुजरातवर सर्व काही अवलंबून आहे. आणि खरेच राहुलनी आपली छाप पाडलेली आहे. त्यांच्या आक्रमकतेने मोदी सरकार भेदरून गेले असल्याचा निर्वाळा खुद्द जाणता राजांनी दिल्यावर आणखी कोणाची साक्ष काढण्याचे कारणच उरलेले नाही. सर्वकाही छान चालले असताना या अमेरिकन व जागतिक अर्थ संस्थांनी विचका करून टाकलेला आहे. राहुलनी देशातल्या तमाम बुद्धीमंत व अर्थशास्त्रज्ञानांना देश दिवाळखोर झाल्याचे पटवून दिलेले होते. इतक्यात नाणेनिधी वा जागतिक बॅन्क अशा संस्थांनी पाचर मारली व भारतीय अर्थव्यवस्था प्रगती पथावर वाटचाल करीत असल्याचे अहवाल बाहेर काढले. ते कमी होते म्हणून काय आता मुडी नावाच्या कुणा भुरट्या संस्थेने भारताचे पत मापांकन वाढवून दिलेले आहे. त्यामुळे तमाम राहुलनिष्ठांची झोप उडाली तर आश्चर्य नाही ना? हा काय प्रकर आहे, त्याचा शोध घेणे मग अपरिहार्य झाले.
खुप शोध घेतल्यावर अनेक विश्लेषक व अभ्यासक लोकांच्या लक्षात आले, की मुडी हा विकत घेता येणारा माल आहे आणि मोदी पैसा व सत्तेच्या बळावर कोणालाही विकत घेऊ शकतात. सहाजिकच आपण ज्या अर्थव्यवस्थेला बुडीत जाहिर केले आहे, ती प्रगती पथावर असल्याचे मुडी कसे सांगू शकेल? तो सांगत असेल तर त्यालाही मोदींनी विकतच घेतले असणार. अर्थात असा आरोप भाजपाला वा मोदीभक्तांना मान्य होणे शक्य नाही. तेही मग उलटे विरोधकांवर तुटून पडले. पण मुडी विकावू आहे काय? किंवा आजवर मोदींनी कोणा कोणाला कधी विकत घेतले, त्याचाही शोध घेण्याची गरज वाटलेली नाही. अर्थात त्याची गरज कधीच नव्हती. मोदींच्या विरुद्ध काहीही असले तर त्याच्या पुराव्याची कधी गरज नसते. नुसता आरोप वा शिव्याशापही पुरावेच असतात आणि ज्याक्षणी असे आरोप केले जातात, त्याचक्षणी ते सिद्धही झालेले असतात. मग शोध कसला घ्यायचा? मोदींनी मुडीला खरेदी केले आणि आपल्याला सोयीस्कर असे पत मापांकन मिळवले असल्याचा निष्कर्ष समोर आला. इतरांचा त्यावर विश्वास नसला, तरी मोदी कोणालाही खरेदी करू शकतात, यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे. अगदी आपल्या कडव्या विरोधकालाही खरेदी करण्याची कला वा कुवत मोदींनी आजवर अनेकदा अनेक बाबतीत दाखवलेली आहे. मग त्यांच्या तुलनेत मुडी काय लागून गेलाय? मोदी कोणालाही मॅनेज करतात, याचा सर्वात मोठा पुरावा खुद्द कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच आहेत. ज्यांनी मागल्या दहाबारा अर्षात मोदी विरोधात देशव्यापी अपप्रचाराचे अखंड नेतृत्व केले, त्या सोनिया सुद्धा मोदी मॅनेज करू शकतात. यावर अनेकांचा विश्वासही बसणार नाही, पण ते निव्वळ सत्य आहे आणि त्याचा पुरावाही उपलब्ध आहे. मग सोनियाच जर मॅनेज होत असतील, तर मुडीचे काय घेऊन बसलात?
गुजरात दंगल आठवते? त्या दंगलीचे राजकीय भांडवल करून मोदी व भाजपा विरोधात २००२ सालात आघाडी उघडली गेलेली होती. त्यावेळी मोदींची संभावना सोनियांनी मौतका सौदागर अशी केलेली होती. इतक्या टोकाला जाऊन भाषण करताना सोनिया काय सांगत होत्या? मोदी म्हणजे विनाश, मोदी म्हणजे दंगल, मोदी म्हणजे मृत्यूचे तांडव, मोदी म्हणजे अराजक, अशा शेलक्या भाषेत सोनियांनी त्या काळात गुजरातच्या सरकारची निंदा चालवलेली होती. त्याला मोदी अर्थातच राजकीय सभा व प्रचारातून चोख उत्तर देत होते. पण जाहिर गोष्टी वेगळ्या आणि प्रत्यक्षात तपासून काढलेले निष्कर्ष वेगळे असतात. त्याच काळात देशातल्या प्रत्येक राज्याचे सरकार व त्याच्या कारभाराचे मूल्यमापन राजीव गांधी फ़ौंडेशन या संस्थेतर्फ़े चालले होते. माहिती घेऊन तपास चाललेल्या राज्यांमध्ये गुजरातचाही समावेश होता आणि त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मोदीच सत्तेत बसलेले होते. त्यांचा कारभार सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फ़ौंडेशनला कसा वाटला असेल? गृहखाते, सामाजिक न्याय खाते, सामाजकल्याण अशा अनेक कसोट्यांवर देशातल्या अन्य राज्यांपेक्षा गुजरातच आघाडीवर असल्याचा निर्वाळा या फ़ौंडेशनने दिलेला होता. सामाजिक सुरक्षेच्या बाबतीतही मोदी सरकारच सर्वोत्तम असल्याचा निष्कर्ष या फ़ौंडेशनने काढला होता. याला काय परिक्षा म्हणायचे की मॅनेज करणे म्हणायचे? ज्या सोनिया गांधी गुजरातभर मोदी म्हणजे सैतान असल्याची भाषणे देत फ़िरत होत्या, त्यांच्या अध्यक्षतेखालच्या संस्थेने मोदी सरकार सर्वोत्तम असल्याचा निष्कर्ष काढणे शक्य होते काय? पण तसे झालेले आहे आणि त्याचेही कारण उघड होते. मोदींनी सोनियांना तेव्हा मॅनेजच केलेले असणार. जो माणूस दहाबारा वर्षापुर्वी सोनियांना इतक्या सहजपने मॅनेज करू शकला, त्याला आज अमेरिकेतील एक पत मापांकन संस्था मॅनेज करणे कितीसे अशक्य असेल?
मुडी मॅनेज केला, ह्याचा कोणी कॉग्रेसवाला पुरावा देऊ शकत नाही. कारण अशा गोष्टींचे कोणी पुरावे ठेवत नसतो. सोनियांना तेव्हा मोदींनी मॅनेज केल्याचाही कुठलाच पुरावा आपल्याला सापडू शकत नाही. पण आजवर प्रत्येक बाबतीत यश मिळाल्यावर मोदींनी ते मॅनेजच केल्याचा सरसकट आरोप होत असेल, तर मुडी काय सोनिया काय, सगळेच मॅनेज होत असले पाहिजेत. कारण मोदी हा पुरोगाम्यांच्या दृष्टीने कुठलीही गुणवत्ता वा कुवत नसलेला माणूस आहे. तो केवळ यशाचा आभास निर्मांण करतो. त्यासाठी समोर कोणी असेल, त्याला बेधडक मॅनेज करतो. मुडीपासून अन्य बाबतीत ते शक्य असेल, तर सोनियांच्या राजीव गांधी फ़ौंडेशनचा पुरस्कार तसाच मॅनेज केलेला असणार ना? आणि तसेच असेल तर खुद्द सोनियाही मॅनेज होतात असाच अर्थ निघतो ना? असो, विषय तिथेच संपत नाही. नरेंद्र मोदी इतकेच प्रत्येक गोष्ट मॅनेज करू शकत असतील, तर त्यांची घबराट भिती सुद्धा त्यांनीच मॅनेज केलेली असणार ना? दिल्ली वा बिहारचा पराभवही त्यांनी मोठ्या कुटीलपणाने मॅनेज केलेला असणार ना? फ़ार कशाला राहुल गांधींनाच कॉग्रेसच्या अध्यक्षपदी आणुन बसवणेही मोदींनी मॅनेज केलेले असणार, याविषयी शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही. उद्या गुजरातचा निकाल कसाही लागो, तोही मोदींनी मॅनेजच केलेला असेल. या माणसापाशी मोठी काही जादूची कांडी असावी. तो सर्वकाही मॅनेज करू शकतो. मग एकाच गोष्टीचे नवल वाटते, की मुठभर जे असंतुष्ट पत्रकार संपादक बुद्धीमंत बाजुला राहिलेत, त्यांनाच मोदी अजून कसे मॅनेज करू शकलेले नाहीत? बहुधा अशा मुठभरांना कायम आपल्या विरोधात शिव्याशाप देण्यासाठी मोदींनीच मॅनेज केलेले असू शकते. काही सांगता येत नाही, या माणसाविषयी. तो नोटांमध्ये चीप घालू शकतो, तर माध्यमे व बुद्धीवाद्यात आपले पित्ते शिव्या घालायला का घुसवणार नाही?