Sunday, September 15, 2013

धुर्त मोदी, बिचारे अडवाणी



   गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून भाजपाने घोषित केले आहे. गेल्या राज्य विधानसभा निवडणूका मोदींनी तिसर्‍यांदा जिंकल्यापासूनच त्यांना भाजपाचे राष्ट्रीय नेता बनवण्याची सार्वत्रिक चर्चा चालूच होती. त्यांच्या कट्टर विरोधक व टिकाकारांनी जणू भाजपावर त्यासाठी दडपण आणले म्हणावे, अशी स्थिती होती. हिंमत असेल तर भाजपाने मोदींना उमेदवार करावेच, असे आव्हान त्या पक्षासमोर सर्वांनीच उभे केले होते. दुसरीकडे पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छाही तशाच होत्या आणि वारंवार होणार्‍या चाचण्यांमध्ये मोदींचेच नाव अन्य कुठल्याही पक्षाच्या नेत्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचे निर्वाळे दिले जात होते. पण मोदी पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी पुरेशा जागा व बहूमत मिळवू शकतात काय? आणि तसे होणार असेल तर सत्तेचे समिकरण जमवण्यासाठी सोबत मित्रपक्ष येणार कसे, या पेचात काही महिने भाजपाचे श्रेष्ठी अडकलेले होते. म्हणूनच तीन महिन्यांपुर्वी मोदींना पक्षाची सर्वोच्च संस्था असलेल्या संसदीय मंडळात सहभागी करून प्राथमिक प्रतिक्रिया आजमावण्यात आल्या. नंतर त्यांनाच निवडणूक प्रचारप्रमुख नेमून तोच पक्षाचा मतदारांपुढे जाण्य़ाचा चेहरा असल्याचेही सूचित करण्यात आले. त्यावरच्या मित्रपक्षाचे नेते नितीशकुमार व पक्षाचे जुनेजाणते वरीष्ठ नेते अडवाणी यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित होत्या. आधी अडवाणींनी पदांचे राजिनामे देऊन मागे घेत आपली नाराजी स्पष्ट केली; तर नितीशनी एनडीएतून बाहेर पडून आपला मोदी विरोध स्पष्ट केला. इतके होऊनही फ़ारसे नुकसान होत नसल्याचे व चाचण्या तशाच असल्याचे संकेत आले आणि मोदींचा मार्ग प्रशस्त होऊन गेला.

   नितीश व अडवाणी अधिक भाजपा नेत्यांचा दिल्लीतला मोदीविरोधी गट यांना मोदींना रोखायचे होतेच. पण त्यांनी त्या डावपेचात आपले हुकूमाचे पत्ते भरभरा समोर टाकले आणि मोदींचे काम अगदीच सोपे केले. पहिली बाब म्हणजे अजून निवडणूका घोषीत झालेल्या नसून किमान आठ महिने बाकी आहेत. थोडक्यात लढाई खुप दूर असल्याने अशावेळी पक्षाची व पर्यायाने एनडीएची सुत्रे मोदींच्या हाती जाण्यापासून रोखणे इतकेच नितीश अडवाणी गटाचे मर्यादित लक्ष्य होते व असायला हवे होते. पण त्यांनी अंतिम लढाईच असल्याप्रमाणे आपली सगळी ताकद व हाती असलेले सर्व पत्ते नुसत्या मोदींच्या प्रचारप्रमुख नेमणूकीसाठीच खर्ची घातले. तसा त्यांचा मोदींना विरोध असल्याचे दडपण नसते तर मागल्या जुनमध्ये गोव्यातच मोदींची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवड होऊ शकली असती. पण नितीश-अडवाणी जोडगोळीची मर्जी राखण्यासाठीच भाजपा नेतृत्वाने ‘प्रचारप्रमुख’ ही पळवाट शोधली होती. त्यावर रणकंदन माजवले गेले नसते आणि ह्या जोडगोळीने संयम दाखवला असता; तर आजही त्यांची मर्जी राखण्यासाठी मोदींची निवड उमेदवार म्हणून करायला भाजपानेते धजावले नसते. त्याचप्रमाणे नितीशची मर्जी राखण्यासाठी मोदींना बिहारचे रस्ते बंदच राहिले असते. आगामी चार विधानसभाच काय, त्यानंतर लोकसभा निवडणूकातही मोदींच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यापासून ही जोडगोळी भाजपाला रोखू शकली असती. म्हणजेच आज जसे मोदींना भाजपाचे मैदान आयते खुले होऊन मिळाले; तेही शक्य झाले नसते. पण त्या जोडीने घाई करून आपल्या हातातले पत्ते फ़ेकले आणि मोदींचा रस्ता खुला होऊन गेला. आता त्यापैकी कोणाची मर्जी जपत बसण्याची गरजच भाजपा वा मोदींना उरलेली नाही.

   प्रचारप्रमुख पदावर मोदींची नियुक्ती झाल्यावर याच दोघांनी अलिप्त राहून आपली नाराजी सुचित करण्याचे धोरण कायम ठेवले असते, तर आपण बाजूला होऊ वा साथ सोडू; ही धमकी देण्याचा व त्याखाली भाजपाला दाबून ठेवण्याचा पत्ता हुकूमाप्रमाणे त्याच दोघांना आजही वापरता आला असता. त्याचा राजकीय लाभ असा, की त्यामुळे नावाची घोषणा होण्यासाठी मोदी अधिकाधिक अस्वस्थ होऊन त्यांचा संयम सुटत गेला असता आणि उतावळेपणात त्यांच्याकडून चुका होऊन त्याचा लाभ याच जोडगोळीला मोदीविरोधात करता आला असता. पण झाले उलट. निदान दाखवायला तरी मोदींनी आपला संयम कायम राखला व नुसत्या प्रचारप्रमुखाच्या नेमणूकीचाच गाजावाजा करून या जोडगोळीला अस्वस्थ करून सोडले. आपले हुकूमाचे पत्ते त्याच दोघांनी आधी उतावळेपणाने टाकावे, अशी वेळ मोदींनी त्यांच्यावर आणली. हे दोघेही मुरब्बी नेते त्याला बळी पडले आणि जुन महिन्यातच त्यांनी मोदीविरोधी उघड पवित्रा घेत रस्ता साफ़ करून दिला. त्यानंतर मोदींच्या वाटेत कुठलाच अडथळा शिल्लक उरला नव्हता. तरीही अडवाणींची मर्जी व संमती मिळवण्यासाठी आपण कसोशीचे प्रयत्न केले, त्याचा नाटक रंगवण्याचा यशस्वी प्रयोग राजनाथ व मोदींनी केला. थोडक्याच त्यात रुसून बसलेले अडवाणी हास्यास्पद व्हावेत, हाच त्यामागचा खरा हेतू वाटतो. निर्णय इतका पक्का झालेला होता, तर इतके दिवस व इतके मध्यस्थ पाठवून अडवाणींची समजूत काढण्याचे नाटक कशाला हवे होते? तर मोदी किती संयमी व समंजस आहेत आणि अडवाणी कसे आडमुठे आहेत; त्याचा परिचय माध्यमांच्या चर्चेतून सामान्य जनता व कार्यकर्ता यांच्यापुढे नेण्याचा तो डाव होता. तो यशस्वी करण्यास बिचार्‍या अडवाणींनी मस्त साथ दिली म्हणायची.

No comments:

Post a Comment