Tuesday, July 15, 2014

वैदिकाच्या पत्रकारितेचा वेदांत


                     (वैदिक यांचा रा. स्व. संघाशी संबंध असल्याचा सज्जड पुरावा)

   वेदप्रकाश वैदिक नावाच्या पत्रकाराने सध्या मोठेच काहूर माजवले आहे. एका शिष्टमंडळातून पाकिस्तानात गेलेल्या या ज्येष्ठ पत्रकाराने थेट सईद हाफ़ीज याची भेट घेतली आणि त्याच्याशी काश्मिरसारख्या वादग्रस्त विषयावर चर्चा केल्याने वाद उफ़ाळून आला आहे. अशा विषयावर तात्विक चर्चा वेगळी आणि त्यावरील उपाय उत्तरांचा उहापोह वेगळा. एका पत्रकाराला देशाच्या वतीने धोरणात्मक बाबींवर उहापोह करण्याचे कितपत स्वातंत्र्य असते? त्यातही तिथल्या पत्रकार नव्हेतर घातपाती जिहादी हिंसेच्या मार्गाने काश्मिर कब्जात घेण्याची भाषा नित्यनेमाने बोलणार्‍या व्यक्तीशी एक भारतीय पत्रकार अशी चर्चा करू शकतो काय? पत्रकार म्हणून कुणा भारतीयाला अशी मुभा असू शकते काय? कारण भारत सरकारने तसाच खुलासा केलेला आहे. एका पत्रकाराला तसे स्वातंत्र्य असल्याचा दावा सरकारने केलेला आहे. पत्रकारांना तशी मुभा नसेल, तर वैदिक यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई व्हायला हवी. कारण ज्या बातम्या येत आहेत, त्यानुसार त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होऊ शकतो. अर्थात असा आरोप ठेवणे आणि कोर्टात कायद्याच्या कसोटीवर असे आरोप सिद्ध करणे, दोन भिन्न गोष्टी आहेत. देशद्रोह कशाला म्हणायचे त्याचीही कायदेशीर व्याख्या असते. त्यात वैदिक यांची कृती बसत नसेल, तर सरकारला त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारता येणार नाही. वैदिक यांनी विविध माध्यमांना आपल्या सईद मुलाखतीविषयी सविस्तर मुलाखती दिलेल्या आहेत. पण पत्रकार मुलाखत देत नसतो, तर मुलाखती घेत असतो. पण वैदिक यांच्याच तिथल्या वाहिन्यांवर मुलाखती झाल्या आणि इथेही झाल्या आहेत. मग सवाल येतो, की त्यांना पत्रकार म्हणायचे की या विषयात ते स्वत:च कोणी नेता वा राजकीय प्रतिनिधी आहेत काय? वैदिक त्यापैकी काहीच वाटत नाहीत. त्यामुळेच त्यांची सईदभेट व एकूण प्रकरण मोठे रहस्यमय होत चालले आहे.

   माध्यमांना गदारोळ करून सनसनाटी माजवायला अशी प्रकरणे हवीच असतात. पण त्यातून जो देशभक्तीचा आव आणला जात आहे, तो शंकास्पद आहे. कारण यापुर्वी अनेक पत्रकारांनी अशाच समाजकंटक वा देशाचे शत्रू मानल्या गेलेल्या अनेकांच्या गुपचुप भेटी घेतल्या आहेत. चंदनतस्कर वीरप्पन वा तामिळी वाघांचा नेता प्रभाकरन, याच्यापासून भूमिगत माओवादी किशनजी अशांच्या मुलाखती घेणार्‍या पत्रकारांवर कोणत्या कारवाया झाल्या? का झालेल्या नाहीत? त्यांनी त्या गुन्हेगारांच्या घेतलेल्या मुलाखती वा भेटी आणि वैदिक-सईद भेट यात नेमका कितीसा फ़रक असतो? मध्यंतरी थोर लेखिका समाजसेविका अरुंधती रॉय यांनी काश्मिरी फ़ुटीरवादी यासिन मलिक यांच्याशी सहमती दाखवून काश्मिर स्वतंत्र करण्याची मागणी केली होती. त्याबद्दल काय म्हणायचे? संधी मिळाली तर श्रीमती रॉय पाकिस्तानात जाऊन सईद हाफ़ीजची भेट घेणारच नाहीत, अशी कोणी हमी देऊ शकतो काय? आणि तसे घडलेच, तर त्यांच्याही अटकेची मागणी इतक्याच उत्साहात होणार आहे काय? अनेक भारतीय पत्रकार सातत्याने पाकिस्तानच्या भेटीला जात असतात आणि तिथल्या शंकास्पद लोकांशी भेटीगाठी करीत असतात. त्यांच्याबद्दल किती काहूर माजवले गेले आहे? वैदिक यांच्याविषयी ज्या कारणास्तव काहुर माजवले जात आहे, त्याला त्यांचा मोदींशी असलेला संपर्क हे वगळता अन्य कुठले मोठे कारण आहे काय? वैदिक हे योगाचार्य रामदेव बाबा यांचे निकटवर्तिय मानले जातात. रामदेव बाबांनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. म्हणूनच वैदिक हे मोदींचे दूत म्हणून सईदला भेटायला गेले, असा निष्कर्ष आहे. तसा निष्कर्ष काढता आला नसता, तर कोणी या वैदिक नावाच्या वयस्कर पत्रकाराकडे ढुंकून तरी बघितले असते काय? गेल्या दहा वर्षात क्वचितच वाहिन्यांच्या पडद्यावर झळकलेला हा चेहरा, दोन दिवसात एकदम कुठून समोर आला याचेच लोकांना नवल वाटत असेल.

   वर्षभरापुर्वी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी अमेरिकेला गेलेले होते. तिथे अनेक भारतीय पत्रकारही हजर होते. त्यावेळी काही मोजक्या पत्रकारांना नाश्त्यासाठी आमंत्रित करून पाक पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी सिंग यांची खिल्ली उडवली होती. खेड्यातल्या ग्रामीण महिलेप्रमाणे सिंग तक्रारी करतात. अशी टवाळी ऐकून भारतीय पत्रकारांनी साधा निषेधही केला नव्हता. पण त्याची बातमीही कुठे झळकली नव्हती. मात्र त्यावर पाकच्या वृत्तवाहिन्या विश्लेषण करीत होत्या. मग त्याचा उल्लेख आपल्या एका प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांनी केला आणि खळबळ माजली. मोदींचे त्यावरील वक्तव्य बाकीच्या वाहिन्या प्रक्षेपित करीत असताना एनडीटीव्ही नेटवर्कच्या राजकीय संपादक बरखा दत्त यांनी वेगळीच खुलासेवजा बातमी अगत्याने तात्काळ प्रक्षेपित केली होती. शरीफ़ यांनी ती खिल्ली उडवली तेव्हा आपण तिथे हजर नव्हतो, असे बरखा कंठशोष करून त्यावेळी सांगत होती. त्याची काय गरज होती? कारण मोदींनी आपल्या भाषणात कुठल्या पत्रकाराचे नाव घेतले नव्हते. पण तिथे आपणच एकमेव भारतीय पत्रकार होतो आणि नेमके ते वक्तव्य झाले तेव्हा तिथे नव्हतो, असे कळवळून बरखाने सांगायची काय गरज होती? चोराच्या मनात चांदणे किंवा खायी त्याला खवखवे, यालाच म्हणतात ना? मुद्दा इतकाच, की भारतीय जवानांची सीमेवर मुंडकी कापली गेलेली होती आणि नियंत्रण रेषेवर सतत हल्ले चालू होते, अशा कालखंडातली ही घटना आहे. अशावेळी पाकिस्तानी नेत्यांशी अशा आपुलकीने वागणार्‍या व व्यक्तीगत संबंध ठेवणार्‍या पत्रकारांचे काय करायचे? सीमेवरील जवान व नागरिकांचे पाक हल्ल्यात बळी पडत असताना, पाक कलाकारांचे कार्यक्रम योजणार्‍या वा त्यासाठी हिरीरीने वकीली करणार्‍यांचे काय? त्यांचे पाकिस्तानप्रेम राष्ट्रनिष्ठा असते आणि वैदिकांची सईदभेट देशद्रोह असतो का?

   अशा देशप्रेम व देशद्रोहाचे नेमके निकष तरी कोणते? भारतामध्ये ज्या व्यक्तीला लोक तीनदा मुख्यमंत्री म्हणून निवडून देतात आणि त्याच्यासाठी भारत सरकार व्हिसा मागते, त्याला अमेरिकेने व्हिसा देऊ नये असे सामुहिक आवाहन करणारे संसदसदस्य राष्ट्रनिष्ठ असतात काय? त्यातून ते भारतीय कायदा व न्यायव्यवस्था यांच्यावर अविश्वास दाखवून परदेशी सत्तेकडे न्याय मागू लागतात, त्याला कुठल्या निकषावर राष्ट्रकार्य समजायचे? वैदिक यांच्या सईदला भेटण्याची वैधता तपासायला काहीच हरकात नाही आणि त्यात गल्लत झाली असेल, तर कठोर कारवाई व्हायलाच हवी. पण त्यासाठी आधी त्याच्याच मांडीला मांडी लावून उपोषण करणार्‍या यासिन मलिकवर कारवाई नको का व्हायला? संसदेवर हल्ला करणार्‍या टोळीतला गुन्हेगार अफ़जल गुरूच्या फ़ाशीचा शोक पाकिस्तानात जाऊन उपोषणाने करणार्‍या यासिन मलिकवर सरकारने कारवाई कशाला केली नव्हती? ती केली असती, तर आज त्याच पायंड्याचे अनुकरण करून मोदी सरकारला वैदिक यांना बेड्या ठोकाव्या लागल्या असत्या. पण यासिन मलिकला मोकाट फ़िरू देणारे व जाबही विचारायची हिंमत नसलेले, वैदिकच्या वर्तनाचा जाब मोदी सरकारला विचारत आहेत. यासिनला कॉग्रेसने मोकाट सोडले होते ना? त्यांच्याच कारकिर्दीत सईदच्या सोबत यासिन उपोषणाला बसला होता ना? त्याला ज्या निकषावर सुट देण्यात आली, त्याच निकषावर वैदिक दोन पावले पुढे गेला आहे. ज्या पत्रकारी स्वातंत्र्याचे ढोल पिटत बरखा दत्त वा अन्य पत्रकार पाकिस्तानशी चुंबाचुंबी करीत असतात, त्याचाच आडोसा घेऊन वैदिकाने ही मजल मारली आहे. त्यामुळे त्याला जाळ्यात ओढायचे झाल्यास, अनेक नामवंत पत्रकार व बुद्धीजिवींनाही गजाआड जाऊन पडावे लागेल. तशी कारवाई सुरू झाल्यास हेच काहुर माजवणारे टाळ्या पिटणार आहेत, की छाती बडवायला सुरूवात करतील? असा आहे वैदिकाच्या पत्रकारितेचा वेदांत.

1 comment: