Wednesday, July 9, 2014

निखीलच्याच शब्दात निखील वागळे

   ‘आज दिनांक’च्या मृत्यूमागची राजकारणं आणि नाटकं अशी अनेक सांगता येतील, पण खरी गोष्ट ही, की आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळेच हे सायंदैनिक बंद पडलं. ठाकरेंची धमकी, रमेश किणी प्रकरण वगैरे केवळ निमित्त आहेत. स्वत:चा चेहरा आणि भूमिका नसल्याने हे सायंदैनिक कधीही ठाम पायावर उभं राहू शकलं नाही. अलिकडल्या काळात तर त्याचा खपही वेगाने घसरत चालला होता. वृत्तपत्र विक्रेत्याशी बोलून कुणीही वाचक याची खात्री करू शकेल. आवश्यक तेवढ्या जाहिरातीही या वृत्तपत्रात नव्हत्या. बाहेरून आयत्या मिळणार्‍या पैशामुळे खर्च प्रमाणाबाहेर वाढले होते. सुरूवातीच्या काळात हा तोटा मुकेश पटेल भरून काढायचे. पण त्यांचा हेतू साध्य झाल्यानंतर त्यांनी पैशाबाबत हात आखडता घेतला होता. या सायंदैनिकाच्या कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपुर्वी त्यांचे अडीच महिन्यांचे पगारही  थकलेले होते. छोट्या वृत्तपत्रांना अशा अडचणी येतात, पण त्यावेळी त्याचा व्यवहार पारदर्शक असेल तर वाचक त्यांच्या बाजूने उभा रहातो. ‘आज दिनांक’च्या बाबतीत नेमका हाच विश्वास वाचकांना वाटला नाही. मुकेश पटेल यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की हे दैनिक फ़ायद्यात होतं. लगेच दुसर्‍या दिवशी ‘सामना’मध्ये आलेल्या मुलाखतीमध्ये यांनी उलटं विधान केलेलं आहे. याचा अर्थ काय ते सांगायची संपादक आणि मालक यांची तयारी नाही. दैनिक फ़ायद्यात असेल, तर ते बंद करण्याचा मुर्खपणा कोणताही व्यापारी करणार नाही. या दैनिकाचं तीस टक्के शेअर होल्डींग संपादकांकडे होतं. उरलेलं सत्तर टक्के पटेल आणि राठोड यांच्याकडून विकत घेऊन ते दैनिक पुढे चालवू शकले असते. नवे दैनिक काढण्याची भाषा त्यांनी केली आहे. हाच पैसा ‘आज दिनांक’साठी वापरून भागभांडवलाचे स्वरूप बदलून हा अकाली मृत्यू टाळता आला नसता काय? पुन्हा नव्या सायंदैनिकासाठी या संपादकांना पैसे कोण पुरवणार हेही स्पष्ट झालेलं नाही. छगन भुजबळ हा पैसा उभारणार असल्याची चर्चा बाजारात आहे. हे खरं असेल तर आणखी एक दुर्दैव हे संपादक ओढवून घेणार आहेत. कारण याआधी भुजबळांनी ‘प्रभंजन’ नावाचं साप्ताहिक निवडणूकीपुरतं काढलं आणि नंतर बंद केलं आहे. त्याचे संपादक नारायण आठवले पुढे शिवसेनेत गेले आणि खासदारही झाले. अशा भुजबळांच्या संगतीने नवे सायंदैनिक कसं काय तगू शकेल? पटेल राठोड यांच्यापेक्षाही मोठी राजकीय महत्वाकांक्षा भुजबळांच्या मनात आहे. त्यांच्या सोयीनुसार ते या सायंदैनिकाचा उपयोग करतील आणि यथावकाश मोडून खातील. म्हणूनच नव्या सायंदैनिकाच्या जन्मापुर्वीच सावधगिरीची सूचना देणं महत्वाचं आहे.

   ‘आज दिनांक’च्या मृत्यूच्या निमीत्ताने वृत्तपत्र सृष्टीला लागलेल्या एका रोगाकडे मला सर्वांचं लक्ष वेधायचं आहे. भ्रष्ट पैशावर उभं रहाणारं ‘आज दिनांक’ हे काही एकमेव वृत्तपत्र नाही. आज संपुर्ण देशात अशा वृत्तपत्रांची लाट आलेली आहे. उद्योगपती, व्यापारी, राजकारणी, दारूवाले, ट्रकवाले, हॉटेलवाले, यांच्याकडे वाममार्गाने मिळवलेला मुबलक पैसा आहे. हा पैसा वृत्तपत्रात घालून प्रतिष्ठा किंवा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न यापैकी अनेकजण करीत आहेत. उत्तरेतल्या राज्यात तर अशा दैनिकांचं थैमान चालू आहे. एकट्या दिल्लीत उदाहरणादाखल तीनचार नावं सांगता येतील. राष्ट्रीय सहारा, कुबेर टाईम्स, जेव्हीजी टाईम्स ही अलिकडल्या काळात जन्मलेली काही वृत्तपत्रं. यामागे चिटफ़ंडवाल्यांचा पैसा आहे. गरीब जनतेकडून मोठ्या लाभाचं गाजर दाखवून पैसा मिळवायचा आणि चिटफ़ंड निर्माण करायचे. नंतर हा पैसा वेगवेगळ्या धंद्यात गुंतवून स्वत:चं उखळ पांढरं करून घ्यायचं, हा उद्योग अनेकांनी आरंभला आहे. गरीबाला आवाज नसतो यावर यापैकी बहुतेकजणांचा विश्वास आहे. म्हणूनच पैसे परत मागणार्‍याला ते न देण्याची हिंमत ही मंडळी दाखवतात. वृत्तपत्राच्या जोरावर मिळवलेल्या ताकदीचा उपयोग सरकारी अधिकार्‍यांना दाबण्यासाठी आणि आपले गैरव्यवहार झाकण्यासाठी ते करून घेतात. हजारो रुपये पगार देऊन पत्रकारांना नोकर्‍या द्यायच्या, त्यांना गाड्या पुरवायच्या छानछोकीच्या आयुष्याची चटक लावायची, असाही प्रकार ही मंडळी करतात. पत्रकार अचानक झालेल्या सुखप्राप्तीने खुश होतो आणि आपलं लेखन स्वातंत्र्य गमावून बसतो. हळुहळू राजकीय दलालीसाठी त्याचा वापर केला जातो. आपण कुणासाठी काम करतो आहोत, कशासाठी वापरले जात आहोत याचं भान त्याला रहात नाही. वृत्तपत्राच्या जोरावर अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया ही मालक मंडळी करतात. राष्ट्रीय सहारा हे वृत्तपत्र त्याचा जळजळीत उदाहरण आहे. वृत्तपत्र सृष्टीत येणारा भ्रष्ट पैसा वेळीच रोखला नाही तर आपल्या सगळ्या स्वातंत्र्याचा बळी देण्याची पाळी पत्रकारांवर येईल. याचा पहिला फ़टका छोट्या वृत्तपत्रांना बसेल. देशातल्या बड्या बृत्तपत्रांची सुत्र पत्रकारांच्या हातात कधीच नव्हती. त्यात आता छोट्या वृत्तपत्रांचा बळी गेला तर सगळीच आशा संपून जाईल. युरोप अमेरिकेत रुपर्ट मर्डोक सारख्या बदमाशाने घातलेला हैदोस वृत्तपत्रसृष्टी अनुभवते आहे. आपल्याकडे दिसत आहेत त्या याच मर्डोकच्या गावठी आवृत्त्या. म्हणूनच वृत्तपत्र स्वच्छ पैशावर कशी उभी रहातील याचा विचार झाला पाहिजे. सर्वसाधारणपणे आर्थिक संस्था वृत्तपत्रात गुंतवणूक करत नाहीत. त्यादृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही. अर्थात आर्थिक संस्थांचा किंवा जनतेच्या भागभांडवलाचा पैसा आला तर हे वृत्तपत्र एका आर्थिक शिस्तीनेच चालवावं लागेल. संपादकाच्या आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याची रखवाली या भागधारकांना डोळ्यात तेल घालून करावी लागेल. वृत्तपत्राचं धोरण ते भागधारक ठरवू लागले तर नवा अनर्थ निर्माण होईल. म्हणून धोरण ठरवायचे अधिकार संपादक मंडळालाच असायला हवेत.

‘आज दिनांक’च्या मृत्यूच्या निमीत्ताने या गोष्टींचा गंभीरपणे विचार झाला तर बरंच काही साध्य होईल. नाहीतर नाटकं होतील, तमाशे होतील, हौतात्म्याचा आवही आणला जाईल. पण वृत्तपत्रसृष्टीच्या पदरात काही पडणार नाही. म्हणूनच अंतर्मुख होऊन हा मृत्यू तपासायला हवा. असा मृत्यू आणखी कुणाच्याही नशीबी येऊ नये या दिशेने ठोस प्रयत्न व्हायला हवेत. इमारत बांधण्यापुर्वीच तिचा पाया मजबूत करणं शहाणपणाचं नाही काय? 
------- (‘एका सायंदैनिकाचा मृत्यू’ -लेखक संपादक निखील वागळे, कॅलिडोस्कोप, ‘महानगर’ २५ आक्टोबर १९९६) 
----------------------------------------------

Nikhil Wagle
It's our baby.We create a newspaper or a channel with our blood n sweat. Then a crony capitalist/politician comes n snatches it away! Ha!
आज अठरा वर्षांनी निखील वागळे याची ही ट्विटरवरील उपरोक्त प्रतिक्रिया टाकली आहे. 


   कायबीइन लोकमत ही वाहिनी सुरू करताना यापैकी कुठली काळजी निखीलने घेतली होती? अठरा वर्षापुर्वी जे तत्वज्ञान कपील पाटिल यांना शिकवण्यासाठी निखील अक्कल पाजळत होता, ते त्याच्यासाठीच पालथ्या घड्यावरचे पाणी नव्हते का? या नव्या भांडवलदारी म्हणजे क्रोनी कॅपिटॅलिझम प्रणित वृत्तवाहिनीमध्ये संपादक म्हणून रक्त व घाम गाळायला रुजू होण्यापूर्वी निखीलने त्यानेच अधोरेखीत केलेल्या धोक्यांपैकी कुठले धोके तपासून पाहिले होते? मुळ आयबीएन नेटवर्कचे भांडवल कुठून आले व त्यांच्याशी भागी करणार्‍या दर्डा कंपनीने कुठून भांडवलाची जुळवणी केली, त्याचा शोध निखीलने घेतला होता काय? नसेल तर मग कपील पाटिल याच्यावर ‘आज दिनांक’साठी जे काही दोषारोप अठरा वर्षापुर्वी निखीलने केले; तेच जसेच्या तसे त्यालाच लागू होत नाहीत काय? आणि ज्या वाचकाच्या विश्वासावर निखीलने हे प्रवचन झोडले आहे, तो त्याने ‘महानगर’मध्ये संपादन केला होता, तर तेच वृत्तपत्र त्याने कोणाला कशाला विकून टाकले? की त्यात निखीलने आपला घाम व रक्त गाळलेच नव्हते? ते वृत्तपत्र निखीलचे बेबी म्हणजे लेकरू नव्हते काय? असेल तर ते कोणी क्रोनी कॅपिटल टाकून बळकावलेले नाही. निखीलनेच आपले हे महानगरी लेकरू कुणा भांडवलदाराला विकलेले आहे. मग वाहिनी नावाचे लेकरू कोणी पळवतो, म्हणून कंठशोष, आक्रोश करणार्‍या निखीलने ‘महानगर’ नावाचे लेकरू विकले म्हणायचे काय? कुठला निखील खरा मानायचा? अठरा वर्षापुर्वीचा कपील पाटिलला पावित्र्याचे प्रवचन देणारा निखील खरा, की ‘महानगर’ नावाचे लेकरू विकणारा निखील खरा? तेव्हा मर्डोकच्या गावठी आवृत्यांना शिव्या मोजणारा निखील खरा, की गेल्या सहासात वर्षात अशाच गावठी मर्डोकला शरण गेलेला निखील खरा? 

   उपरोक्त तीन परिच्छेद निखीलच्याच अठरा वर्षे जुन्या लेखातले आहेत आणि त्यातला अखेरच्या छो्ट्या परिच्छेदातले त्याचेच वाक्य आहे ‘नाटकं होतील, तमाशे होतील, हौतात्म्याचा आवही आणला जाईल. पण वृत्तपत्रसृष्टीच्या पदरात काही पडणार नाही.’ आज तेच तसेच वाक्य खुद्द निखीलला लागू होत नाही काय? कायबीइन लोकमत वाहिनी म्हणजे आपले लेकरू असल्याची भाषा किती बनावट आहे, त्याचा हा निखीलच्याच शब्दातला पुरावा नाही काय? कुठल्या आदिवासी भागातली लेकुरवाळी महिला गरीबीला, भुकेला कंटाळून पोटचा गोळा विकते. तिच्यापेक्षा छानछोकीसाठी दिवाळखोरी करून पुन्हा आपले लेकरू बळकावण्याची भाषा आजच्या बुद्धीवादाची प्रतिष्ठीत भाषा झाली, तिथेच पत्रकारितेने मान टाकली आहे. तिचे केव्हाच दिवाळे वाजलेले आहे. तेहा निखील राजदीप वा तत्सम लोकांनी उगाच गळा काढण्याचे तमाशे नाटके रंगवू नयेत. 

8 comments:

  1. भाऊ, आपल्यासारखे पत्रकार आहेत म्हणून पत्रकारांवर लोकांचा विश्वास आहे. आपल्याला ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  2. एकदम परखड विश्लेषण.....

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. निखिलसर, तुम्ही 'बंड' करू शकला असता पण तुम्ही गपचूप निघून गेलात. बड्या बड्या राजकीय धेन्ड्याना उत्तर द्यायला लावण्यात आणि त्यांना निरुत्तर करण्यात तुमचा हातखंडा होता. पण इकडे तुम्ही; नि:शब्द का झाला? का पेटून उठला नाही. का तुम्ही जाब विचारला नाही?

    जरी लोकीकार्थाने तुम्ही राजीनामा दिला असला तरी सगळ्यांना माहित आहे तुम्हाला जायला सांगितलं. आणि तुम्ही गेलात.

    आज काल राजरोस पणे सामान्य पत्रकाराला जसे काहीही कारण न देता काढून टाकतात तीच तर्हा तुमची झाली. असामान्य माणसाला; सामान्य वागणूक दिली. मग तुम्हाला संताप आला नाही का? आला असेल तर का गिळून टाकला.

    काही दिवस कोठेतरी दुर निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे एकांतात राहण्याचा मानस जाताना व्यक्त केला. थोडे दिवस जाल...पण परत आल्यावर पुढे काय?..

    वागळेच्या आतल्या वागळेला RIP करायचं का?

    ReplyDelete