Friday, July 18, 2014

पोरकटपणाचा नवा अध्याय



   गेले महिनाभर तरी आम आदमी पक्षाचे मुखीया अरविंद केजरीवाल यांचे नाव कुठे नव्हते. त्यामुळे असेल त्यांना कमालीच्या नैराश्याने ग्रासले असावे. अन्यथा त्यांनी दिल्लीच्या भाजपा अध्यक्षाच्या एका क्षुल्लक विधानाचे भांडवल करून इतके काहुर माजवले नसते. डॉ. हर्षवर्धन यांची मागल्या विधानसभा निवडणूकीपुर्वी भाजपाने प्रदेश अध्यक्षपदी निवड केली. पर्यायाने त्यांनाच दिल्लीचे भावी मुख्यमंत्री म्हणून पेश केले होते. पण आम आदमी पक्ष व केजरीवाल यांच्या यशामुळे ती संधी हुकली. उलट भाजपाला सत्तेपासून दूर राखण्याच्या पोरकट कॉग्रेसी डावपेचांनी केजरीवाल यांना थेट मुख्यमंत्री व्हायची अपुर्वसंधी मिळाली. खरे तर त्याचे सोने करून त्यांना आपल्या राजकीय महत्वाकांक्षा पुढे नेता आल्या असत्या. पण योगायोगाने मिळालेल्या यशाला व संधीला व्यक्तीगत करिष्मा समजून नशा चढलेल्या केजरीवाल यांनी ती संधी मातीमोल केली. आता त्यांची पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड चालू आहे. त्यासाठीच नव्हेतर पक्षाचे जे दोन डझन आमदार निवडून आलेत, त्यांना आपल्याच पक्षात राखण्याचीही धडपड करावी लागत आहे. त्यासाठी आधी त्यांनी विधानसभेच्या तात्काळ निवडणूका घेण्याची मागणी केली होती. यासाठी कोर्टात धाव घेतली होती. कारण त्यांच्याच नाट्यमय राजिनाम्यानंतर विधानसभा स्थगीत करून राज्यपालांची राजवट लावण्यात आलेली आहे. ती उठवल्यावर राजकीय पर्याय पुढे येऊ शकतो. एक तर राज्यपाल दिर्घकाळ तसेच चालू ठेवू शकतात किंवा कुठल्या पक्षाने बहुमत असल्याचा दावा केल्यास, तसा प्रयोग करू शकतात. तशी संधी दोघांकडे असू शकते. आम आदमी पार्टी वा भाजपा. कारण दोघांकडे बहूमताच्या जवळ जाण्याची संख्या आहे. दोनचार आमदार सोबत आले, तरी त्यांना सत्ता काबीज करणे शक्य आहे. पण तितके आमदार हवे तर एकमेकांचे फ़ोडायला हवेत किंवा कॉग्रेसचे ओढायला हवेत.

   भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षाने तशा शक्यतेचे नुसते सुतोवाच केले आणि केजरीवाल यांचे धाबे दणाणले. कारण भाजपा आपले आमदार फ़ोडेल, अशी त्यांना भिती आहे. तशीच कॉग्रेस आमदारही फ़ुटण्याची शक्यता आहे. कारण नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणूकीच्या मोजणीनुसार सत्तरपैकी साठ विधानसभा क्षेत्रात भाजपाने आघाडी मिळवली होती. सहाजिकच पुन्हा निवडणूका घेतल्यास भाजपाचे बहूमत पक्के आहे. उलट कॉग्रेस वा आम आदमी पक्षाला असलेल्या जागाही टिकवणे अशक्य आहे. त्यामुळेच त्या दोन्ही पक्षातल्या आमदारांना कुठलेही पद नको असून, आपली आमदारकी शाबुत राहिली तरी पुरेशी आहे. पण बड्या नेत्यांच्या अशा राजकारणात विधानसभा बरखास्त झाली, तर त्यांची आमदारकी संपुष्टात येणार आहे. म्हणूनच असे अनेक आमदार कुठल्याही मार्गाने आमदारकी म्हणजेच विधानसभा टिकवायला तयार होऊ शकतात. भाजपाने कॉग्रेस वा केजरीवाल यांच्या आमदारांना त्याच मार्गाने जवळ करायचे म्हटल्यास अवघड नाही. म्हणून भाजपाच्या नव्या अध्यक्षाच्या नुसत्या विधानाने केजरीवाल यांची झोप उडाली आहे. त्यांनी लगेच आपल्या जुन्या पद्धतीने बेछूट आरोप करायला सुरूवात केली. सध्याची महागाई व भाववाढ यामुळे दिल्लीत पुन्हा भाजपाची लोकप्रियता घसरून लोक आपल्याकडे धावतील अशी केजरीवाल यांची खुळी आशा आहे. अजून त्यांना राजकारणाचे अंदाज आलेले नाहीत. अशा पद्धतीने लोक बहकत नसतात आणि इकडून तिकडे जात नसतात. शिवाय केंद्रातील सत्ता हाती आलेल्या भाजपाला दिल्लीत भरपूर मते मिळाली आहेत आणि विधानसभा जिंकायची, तर अनेक सवलती केंद्राकडून देऊनही विधानसभा जिंकत येते. नेमका तोच डाव अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी खेळला. दिल्लीच्या त्रस्त नागरिकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प सादर करून त्यांनी विधानसभेच्या निवडणूकीची तयारी केलेली आहे.

   आता विधानसभा बरखास्त केली तरी पावसात निवडणूका होत नाहीत. राष्ट्रपती राजवटीची मुदत ऑगस्ट महिन्यात संपते आहे. तेव्हा विधानसभा बरखास्त झाली तरी मतदान नोव्हेंबरमध्येच होणार. तोपर्यंत पावसाळा संपून भाजी इत्यादी बाबतीतली महागाई निकालात निघालेली असेल. सध्या भेडसावणारे दोन प्रश्न आहेत ते वीज व पाणी यांचे. त्यापैकी वाढलेल्या वीज बिलात सवलत देणार्‍या अनुदानाची तरतुद जेटली यांनी केलीच आहे आणि पाणीपुरवठ्याच्या दिर्घकालीन समस्येवर उपाय म्हणून पाईपलाईन व धरणाच्या भव्य योजनेची घोषणाही केली आहे. थोडक्यात मुक्तहस्ते सवलती घोषित करून जेटली यांनी विधानसभा बरखास्त करून आमदारकी जाणार, अशी भितीच अन्य पक्षांच्या सदस्यांमध्ये निर्माण केली आहे. सहाजिकच ज्यांना सत्तेपेक्षा केवळ चुकून मिळालेली आमदारकी टिकवण्याचीच महत्वाकांक्षा आहे, असे कॉग्रेस व आपचे आमदार विचलीत करण्याची चाल जेटली यांनी दिल्लीच्या अर्थसंकल्पातून खेळली आहे. आता महिनाभरात पर्यायी सरकार दिल्लीत स्थापन झालेच नाही, तर राज्यपाल विधानसभा बरखास्त करणार हे उघड आहे. तोपर्यंतच आमदारांना हालचाली करण्याची सवड आहे. त्यात आपण नव्या निवडणूकीला सज्ज आहोत, असाच सिग्नल जेटली व भाजपाने यातून दिला आहे. म्हणजेच ज्या बिगर भाजपा आमदारांना आपले पद टिकवायचे आहे, त्यांनी त्वरेने भाजपा गोटात जमा व्हावे, असाच त्यामागचा इशारा आहे. केजरीवाल अशा डावपेचांना नवे आहेत आणि त्यांना त्याचा गमभन सुद्धा ठाऊक नाही. म्हणूनच गुरूवारी भाजपावर आमदारांची खरेदी करण्याचा आक्रस्ताळी आरोप करून ते फ़सले. उलट त्यांचाच दूत कॉग्रेस आमदाराला पटवायला गेल्याचे चित्रण समोर आले. केजरीवाल या पोरकट माणसाने आपल्या हास्यास्पद महत्वाकांक्षेच्या आहारी जाऊन सामाजिक चळवळीत दिर्घकाळ कार्यरत असलेल्या मेधा पाटकर वा देशभरच्या अनेक नेते कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा विश्वासार्हता मात्र धुळीस मिळवली आहे. दिल्लीतला हा ताजा आरोपांचा तमाशा त्याचा नवा अध्याय म्हणता येईल.

No comments:

Post a Comment