Thursday, October 29, 2015

पानसरे, कलबुर्गी आणि छोटा राजन



तिकडे इंडोनेशियात छोटा राजनला पकडण्यात यश आलेले आहे आणि इथे त्याला आणल्यावर कोणकोणत्या रहस्यांचा पडदा उठेल, याची चर्चा रंगली आहे. पण त्यातला एक महत्वाचा दुवा या रंगार्‍यांच्या नजरेत आलेला दिसत नाही. बरोबर एक महिन्यापुर्वी एका इंग्रजी दैनिकाने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये राजन टोळीचा हात असल्याची बातमी दिली होती. पण त्याची आठवण कोणाला नाही. राजनला अशी कोणी सुपारी दिली असेल, तरच त्याने पानसरेंच्या हत्येचा उद्योग आपल्या हस्तकांकरवी करून घेतला असेल. त्याविषयी माहिती देताना संबंधित तपास अधिकार्‍यांनी कोठडीत असलेल्या समीर गायकवाड याचा हत्येशी संबंधही नसू शकतो, असे म्हटलेले होते. कारण त्याच्याशी सतत संपर्कात असलेला एक शंकास्पद माणूस राजन टोळीचा होता आ्णि यापुर्वीही अनेक गुन्ह्यांसाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे बातमीत म्हटलेले होते. तसे असेल तर पानसरे हत्येवरही राजन प्रकाश टाकू शकेल. पण दरम्यान आणखी एक महत्वाची बातमी बुधवारी उजेडात आली आहे. कलबुर्गी हत्येतल्या संशयिताचे जे रेखाचित्र तयार करण्यात आले, त्याच्याशी चेहरा जुळणार्‍या एका व्यक्तीचा मृतदेह कर्नाटकात हाती लागला आहे. अजून तरी त्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. म्हणूनच तो सामान्य नागरिक आहे की कुख्यात कोणी गुन्हेगार आहे, त्याचा खुलासा होऊ शकलेला नाही. केवळ चेहरा जुळतो म्हणून त्याला खुनी ठरवता येणार नाही. पण जंगलात मृतदेह सापडावा आणि त्याचा चेहरा इतका जुळतामिळता असावा, ही बाब धक्कादायक नक्कीच आहे. शिवाय राजन पकडला गेल्यावरच असा मृतदेह सापडावा, ही बाबही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. खरेच मृत इसम कलबुर्गी यांचा मारेकरी असेल आणि छोटा राजन टोळीशी संबंधित असेल, तर हे मोठे भयंकर कारस्थान असू शकते.

कारण राजनच्या टोळीचा संशय पानसरे हत्याकांडात घेतला गेला होता आणि मृतदेहाचा चेहरा कलबुर्गी मारेकर्‍याशी जुळणारा आहे. त्यात तथ्य निघाले, तर दोन्ही हत्या एकाच टोळीने केल्याचा निष्कर्ष निघू शकतो आणि त्यावर राजनच प्रकाश टाकू शकेल. पण अशा दोन निरागस माणसांची हत्या टोळीने कशाला करावी? तर अशा टोळ्या खुन-मारहाण खंडण्यांचे उद्योग करीत असतात. त्यांच्यापाशी व्यावसायिक मारेकरी कायम सज्ज असतात. खुन पाडण्याच्या सुपार्‍या म्हणजे कंत्राटच हे लोक घेत असतात. त्याची लाखो रुपयात किंमत मोजणारा असेल, तर हे मारेकरी कोणाचीही हत्या करू शकतात. सवाल इतकाच आहे, की दाभोळकर, पानसरे वा कलबुर्गी यांच्या हत्या करण्यासाठी अशा मारेकर्‍यांना कोणी लाखो रुपये कशाला मोजले असतील? तिन्ही हत्येमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे तिघेही राजकारणात कुणालाही अडचण बनलेले नव्हते वा त्यांच्या हत्येने राजकीय पारडे खालीवर होण्याची अजिबात शक्यता नव्हती. शिवाय कुठल्याही आर्थिक उलथापालथीमध्येही त्यांचा सहभाग नाही. मग त्यांना मारण्यासाठी कोणी लक्षावधी रुपये कशाला मोजावेत? हत्येची पद्धत बघितली तरी त्यात कोणा संघटनेचा हौशी मारेकरी इतका सफ़ाईदार गुन्हा करू शकणार नाही. ते व्यावसायिकाचेच काम आहे. नेमकी वेळ, जागा व काम उरकून निसटण्याची तयारी बघता, असे खुन कोणी हौशी मारेकरी करू शकणार नाही. म्हणजे टोळीकडून हत्या करून घेतल्या गेल्या आहेत. मग मुख्य सवाल तिथेच येतो, की यांना मारण्यासाठी इतका पैसा कोणी कशासाठी मोजला वा खर्चला असेल? त्यामध्ये राजन टोळी गुंतली असेल, तर त्यावर प्रकाश पडू शकतो. म्हणूनच कर्नाटकच्या जंगलात सापडलेला मृतदेह आणि दोनच दिवस आधी पकडला गेलेला राजन यामध्ये काहीतरी संबंध असण्याची दाट शक्यता आहे.

कारस्थानामध्ये काही गोष्टी ठरवून घडवून आणल्या जात असतात. जशी सीआयए वा केजीबी या हेरसंस्था पुर्वीच्या काळात अनेक हत्याकांडे घडवून आणत असत आणि त्यातून स्थानिक राजकारणात उलथापालथ घडत असे. अशा हत्यांमधून जनमानस प्रक्षुब्ध करायचे आणि त्यातून राजकीय उठावाला चालना द्यायची, यासारख्या घटना जगात अनेकदा घडलेल्या आहेत. त्याचे तपशील नंतरच्या काळात बाहेर आलेले आहेत. चार वर्षापुर्वी ट्युनिशियामध्ये ‘अरब उठाव’ नावाचे नाटक रंगलेले होते. त्यातून मग एकामागून एक अरब राष्ट्रांमध्ये राजकीय सत्ता उलथून पाडल्या गेल्या. लाखो लोकांना निर्वासित म्हणून घरदार सोडून पळायची वेळ आली. अजूनही ती आग धगधगते आहे. त्या अरब उठावामागे फ़ोर्ड फ़ौडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पैशावर काम करणार्‍यांचा पुढाकार होता, हे लपून राहिलेले नाही. आता तर त्यांनाच नोबेल परितोषिकही देण्यात आलेले आहे. अशा घटना एका ठराविक पटकथेनुसार घडत असतात. त्यात एका बाजूला कायदा सुव्यवस्थेची समस्या उभी केली जाते, तर दुसरीकडे शासन व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्याचे नाटक रंगवले जाते. त्यासाठी मग अशा हत्या वगैरेचे राजकीय भांडवल केले जाते. त्यामध्ये माध्यमांपासून स्वयंसेवी संस्थांना आधी रान उठवायचे काम पार पाडावे लागते. मग त्यात समाजातील मान्यवरांचा लोंढा आणला जातो. इजिप्तच्या तहरीर चौकातले आंदोलन अजून जुने झालेले नाही. अशा राजकारणात अधिकारी व राजदूतही बळी दिले जातात, त्याचे पितळ सध्या अमेरिकन राजकारणात चव्हाट्यावर येऊ घातले आहे. म्हणूनच दाभोळकर ते कलबुर्गी या तीन हत्येमागचे रहस्य उलगडण्याची गरज आहे. त्याचीच बोंब ठोकून ज्या पद्धतीने एका विशिष्ठ विचारांचे, विविध क्षेत्रातील लोक मैदानात उतरताना दिसतात, तेव्हा या हत्यांमागे काही राजकीय हेतू असल्याची शंका घेणे भाग पडते.

कुठल्याही खुनी प्रकरणात दोन मुद्दे अगत्याचे व मुख्य असतात. एक हत्येचा हेतू व त्याचे लाभार्थी! या हत्याकांडांमध्ये कोण लाभार्थी आहेत, ते आता लपून राहिलेले नाही. ज्यांनी त्य हत्येतील मारेकरी शोधण्यावर भर देण्यापेक्षा पहिल्या दिवसापासून त्याचे राजकीय लाभ उठवण्याचा आटापिटा चालविला आहे, त्यांना लाभार्थी नाही तर काय म्हणायचे? दाभोळकरांच्या हत्येला दोन वर्षे झालीत, तर पानसरेंच्या हत्येला नऊ महिने झालेत. त्यात आधी एका संस्थेला आरोपी म्हणून रंगवण्यात आले व आता एकूणच सगळे खापर देशातील नव्या सत्ताधीशांच्या माथी फ़ोडून एक आंदोलन उभे करण्याचा खेळ सुरू झाला आहे. कदाचित त्याचेच धागेदोरे उघड करण्यासाठी छोटा राजनला उचलला आहे काय? महिनाभर आधी त्याचे नाव पानसरे हत्येमध्ये आलेले होते. त्यानेच या हत्याकांडांची सुपारी घेतली असेल तर हत्येची किंमत मोजणार्‍यांचा मुखवटा राजनच फ़ाडू शकेल. जे लोक राजिनामे फ़ेकतात वा पुरस्कार परत करतात, त्यांनाही आपण कोणाच्या हातची कळसुत्री बाहुली झालोय, त्याचा थांगपत्ता नसतो. ते आपापल्या राजकीय भूमिकेसाठी उतावळेपणाने त्यात सहभागी होतात. पण खरा सुत्रधार उजळमाथ्याने जगात वावरत असतो. राजनच्या साक्षीतून अशा सुत्रधाराचा मुखवटा फ़ाटण्याची शक्यता असते. मुंबई हल्ल्यातील डेव्हीड कोलमन हेडली सहभाग लपून राहिला नाही. पण जेव्हा त्याची जबानी घ्यायची वेळ आली, तेव्हा अमेरिकेने त्यासाठीची परवानगी भारताला नाकारली होती. इथेही या हत्याकांडाचे भांडवल करणार्‍या पडद्याआडच्या सुत्रधारांचे मुखवटे फ़ाटू शकतात. राजन बोलला तर? कारण या हत्या आणि देशभर चाललेले पुरस्कार परतीचे नाटक यांचा नक्कीच कारस्थानी संबंध आहे. काही घटना तर पद्धतशीर घडवून आणल्यासारख्या दिसतात. राजन त्यातला एक सांधा असू शकतो.

http://articles.economictimes.indiatimes.com/2015-09-28/news/66958047_1_sanatan-sanstha-govind-pansare-narendra-dabholkar

3 comments:

  1. 1.YouTube var rajiv dixit on andhashraddha nirmulan samiti paha......
    2. Karnatakat sapadlelya mrutdehacha photo polisani kadhla nasun to eka dusaryach manasane post kela ahe.
    3.Jivant hatti peksha melelya hattichi kimmat jaast asate... Tase jivant dabholkar peksha melelya dabholkar chi kimmat kunasathi jast ahe he shodhale pahije.

    ReplyDelete
  2. readers kahi kami zale ka sir, Facebook block kelyaver, me share kela aahe facebookvar. post madhyech share karnyache option karun ghya...mhanje vachlyanatar lagech share karta yeil lokana.

    ReplyDelete
  3. PURASKAR VAPASI VALYANCHYA DOLYAT ANAJAN GHALNARI AANI PURASKAR VAPASI VALYANNA UCHLUN DHARNARYA SARVADNYA TV CHANNELVALYANNA SANSANIT CHAPRAK DENARE HE LIKHAN AAHE. CHANGALI BAJU UJEDAT AANANARE ASE ALIKHAN PRESS MADHUN ABHAVANECH UMATATE....AABHAR AANI ABHINANDAN....!

    ReplyDelete