Sunday, July 28, 2019

प्रतिभावंतांच्या उलट्या बोंबा

No photo description available.

एका माणसाला एकूण तीन मुलगे होते आणि त्यांचे स्वभाव एकमेकांपेक्षा खुपच भिन्न होते. त्यापैकी पहिला अत्यंत सुस्वभावी आणि सदगुणी होता. त्याच्याबद्दल घरात वा बाहेरही कोणाची कसली तक्रार नसायची. तो आपोआपच आईवडीलांचा लाडका होता. धाकटा मुलगा त्याच्या नेमके उलटे टोक होते. तो व्यसनी बिघडलेला व नसते छंद करणारा होता. मधला मुलगा मात्र अजब होता. त्याला धड चांगला म्हणता येत नव्हते की बिघडलेला असाही शिक्का मारता येत नव्हता. त्यांचा पिता त्या मधल्या मुलाला खुप वचकून व घाबरून असायचा. कारण थोरला सत्यवादी असल्याने त्याच्याबद्दल चिंता नव्हती आणि धाकटा बिघडलेला असलेल्याने कोणीही कसली तक्रार केल्यास प्रतिवाद करायची गरज नसे. निमूट माफ़ी मागून वा भरपाई देऊन निसटता येत होते. हा मधला मात्र गफ़लतीचा होता. तो कधी खोटा बोलेल आणि कधी खरे बोलेल, त्याचा नेम नव्हता आणि तीच बापाला सतावणारी गोष्ट होती. कारण एखाद्या प्रसंगी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो खोटा निघाला तर? किंवा कधी विश्वास ठेवला नाही आणि तो खरं बोललेला असेल तर? सगळीच अनिश्चीतता होती. म्हणूनच पिता त्या मधल्याला घाबरून असायचा. आपल्या देशातले बहुतेक बुद्धीमंत प्रतिज्ञावंत त्या मधल्या मुलासारखे झाले आहेत. ते कधी धडधडीत खोटे बोलतात आणि कधीकधी शंभर टक्के खरेही बोलतात. त्यामुळेच त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणे कोणालाही शक्य होत नाही. मध्यंतरी त्यांनी देशात कमालीची असंहिष्णुता माजल्याचा ओरडा सुरू केला होता, चार वर्षापुर्वी असाच कांगावा करून त्यांनी आपापली नावाजलेली पारितोषिके व पुरस्कार परत करण्याचेही नाटक रंगवले होते. मात्र हळुहळू अशा नाटकांना जमणारा प्रेक्षक घटल्याने, या नाटक्यांची संख्या खुपच घटलेली आहे. आणखी चारपाच वर्षात त्यांची ही कांगावखोरी पुर्ण संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे.

मध्यंतरी अशा सहाशे लोकांनी असंहिष्णुतेचे नाटक रंगवून एक जाहिर पत्रक काढले होते आणि त्यात बरेच लोक बंगाली प्रतिभावंत होते. पण त्याच कालखंडात ममता बानर्जींनी एका चित्रपटाला प्रतिबंधित केल्याची त्यांना खबरही नव्हती. त्या टोळीत अनेक बंगाली चित्रपट लेखक कलावंत दिग्दर्शक होते. पण त्यापैकी कोणालाही त्यांच्याच बंगाल प्रांतात चाललेली ती कलेची गळचेपी असल्याचे समजूही शकलेले नव्हते. पण सुप्रिम कोर्ट वा तिथले न्यायाधीश प्रतिभावंत बुद्धीमंत नसल्याने त्यांना बंगालची ती असंहिष्णूता समजू शकलेली होती. त्यामुळेच गळचेपीच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार्‍या कलाकारांना सुप्रिम कोर्टाने न्याय देऊन ममता सरकारचे कान उपटले होते. चित्रपटाला संरक्षण देण्याच्या आदेशासोबतच ममता सरकारला वीस लाख रुपये दंड ठोठावला होता. थोडक्यात ज्याला खरीखुरी असंहिष्णूता किंवा गळाचेपी म्हणतात, ती अशा प्रतिभावंतांच्या अंगणातच चालू होती. पण त्यांना तेव्हा खरे बोलायची हिंमत झाली नाही आणि एका चित्रपट निर्माता दिग्दर्शकला न्यायासाठी कोर्टात जावे लागले. अगदी तिथे त्याच्यावरचा अन्याय सिद्ध झाला, तरी कुणा प्रतिभावंताला त्याच्या समर्थनाला उभे रहाण्याची इच्छा झाली नाही. सहाजिकच त्यावर कुठे गाजावाजा झाला नाही, किंवा पुरस्कार वापसी वगैरेची नाटके रंगली नाहीत. पण ज्याचा आजवर कुठलाही पुरावा मिळालेला नाही वा कुठल्याही न्यायालयाने ज्याची ग्वाही दिलेली नाही; अशा गळचेपीविषयी या प्रतिभावंतांना कायम चिंता लागून राहिलेली असते. त्यांना देशात असंहिष्णुता फ़ैलावल्याचे भास होत असतात. त्यांना तसे भास होतात, कारण पुर्वी ह्या घटनांच्या बातम्या होत नव्हत्या, किंवा वाहिन्यांवर त्या झळकत नव्हत्या, त्यामुळे त्यांना अशा हिंसक घटनांची खबरबात नसायची. आजकाल अशा हिंसक बातम्यांना प्राधान्य दिले जात असल्याने, या कुंभकर्णांना जाग आलेली असावी.

उदाहरणार्थ १९८४ सालात इंदिराजींची हत्या झाली आणि त्याचा बदला म्हणून दिल्ली व आसपासच्या परिसरात हजरोच्या संख्येने शीख धर्मियांचे सामुदायिक हत्याकांड झालेले होते. पण् त्याच्या बातम्या गाजल्या नव्हत्या किंवा तेव्हा आजच्यासारख्या ब्रेकिंग न्युज देणार्‍या वाहिन्याही नव्हत्या. सहाजिकच या अज्ञ प्रतिभावंतांना देशात हिंसा वा असंहिष्णूता माजल्याचे कसे कळणार होते? कळलेच नसेल, तर त्यांनी त्याविषयी आपली चिंता तरी कशी व्यक्त करावी? शिवाय चिंता व्यक्त करण्यासाठी देशात तेव्हा भाजपाची सत्ता किंवा नरेंद्र मोदी कुठे पंतप्रधान होते? जेव्हा कुठल्याही गोष्टीसाठी निकष नरेंद्र मोदी इतकाच असतो, तेव्हा मग घटना वा कृती कोणती, त्याला तसूभर अर्थ उरत नाही. घटना वा कृती कोणती, ती बाब दुय्यम होऊन जाते आणि कृती करणार्‍याच्या निकषावर निष्कर्ष काढले जात असतात. म्हणजे असे की नरेंद्र मोदी पंतप्रधान नसताना किंवा राजीव गांधी पंतप्रधान असताना, सामुदायिक धार्मिक हत्याकांडे झाली, तरी ती संहिष्णूता असते. उलट मोदी पंतप्रधान असताना कुठे नुसती माशी शिंकली, तरी असंहिष्णूता असल्याचे साक्षात्कार होऊ शकतात. काश्मिरातून १९९० नंतर हजारोच्या संख्येने हिंदू पंडीतांना घरातून परागंदा व्हायची पाळी आली. त्यांची घरे बळकावली गेली, बायामुलींवर बलात्कार करून त्यांना पळवून लावण्यात आले. तेही धर्माच्या नावाने आणि अल्ला हू अकबर असल्या डरकाळ्या फ़ोडूनच. पण यापैकी किंवा तात्कालीन प्रतिभावंतांना त्यापैकी कुठल्या हिंदू पिडीताचा टाहो ऐकायला आलेला होता काय? त्यांनी तात्कालीन पंतप्रधानाला पत्र लिहून चिंता व्यक्त केलेली होती काय? आजही लाखोच्या संख्येने काश्मिरी पंडीत देशाच्या विविध शहरात निर्वासित म्हणून जगत आहेत आणि अशा दोन पिढ्या खच्ची होऊन गेलेल्या आहेत. पण कुणाच्या प्रतिभेला अंकुर फ़ुटला आहे काय?

कधीकधी या तथाकथित बुद्धीमंत प्रतिभावंतांचे केविलवाणे प्रकार बघितले, मग उतारवयातला देवानंद आठवतो. एकेकाळी हिंदी चित्रपटातला हा लोकप्रिय नायक तारूण्य संपून वार्धक्यात गेला असतानाही तरूण नायकाच्या भूमिका करायचा थांबला नाही आणि चित्रपट काढतच राहिला. सत्तरी उलटून गेली आणि चित्रपटाचे तंत्रही बदलून गेले, तरी तो जुन्या जमान्यातून बाहेर पडू शकला नाही. त्यावेळी त्याच्यासोबतच म्हातारे झालेल्या त्याच्याच जुन्या चहात्यांनाही त्याची कींव वाटू लागली होती. कारण त्याचे असे चित्रपट व त्यातला सुरकुतलेला देवानंद ओंगळवाणा वाटू लागला होता. पण त्याला हे कोणी समजावू शकला नाही आणि नगण्य अभिनेता म्हणूनच त्याला पडद्याआड जावे लागलेले होते. ज्या ४९ प्रतिभावंतांनी पंतप्रधानांना जाहिर किंवा खुले पत्र लिहीले, त्यांची प्रतिभा किती आटून गेली आहे, त्याचा त्या पत्राइतकाच मोठा पुरावा दुसरा कुठला असू शकत नाही. कारण असल्या देखाव्याला फ़सण्याइतका आजचा पंतप्रधान भोळसट नाही आणि जनताही तितकी दुधखुळी राहिलेली नाही. असे बोगस प्रतिभावंत आपला राजकीय अजेंडा घेऊन असली पत्रके काढतात किंवा पत्रे पाठवतात, हे सामान्य लोकांनाही आता चांगलेच समजले आहे. म्हणून तर असल्या सातत्याच्या अपप्रचाराला झुगारून पाच वर्षापुर्वी लोकांनी त्याच माणसाला थेट पंतप्रधानपदी आणून बसवलेले आहे. किंबहूना त्यानंतरही असली पत्रके व नाटके रंगवण्यात आली, त्यांना लाथाडून अधिक मतांनी जनतेने मोदींच्या हाती सत्ता पुन्हा सोपवली आहे. ज्याला असले प्रतिभावंत चिंतेचा विषय समजतात, त्यालाच लोक सुरक्षिततेची हमी समजातात, इतकाच त्या मतदानाचा अर्थ आहे. पण अशा मुर्खांच्या लक्षात त्या गोष्टी यायला वेळ लागतो. किंबहूना अशा चाळ्यांमुळे लोकांचा प्रतिभावंत किंवा बुद्धीमंत यांच्या शहाणपणावरचा विश्वास कधीच उडालेला आहे.

या देशात शेकडो वर्षापासून झुंडशाहीने अनेकांचे बळी घेतले आहेत आणि जगातल्या कुठल्याही देशात अशा झुंडशाहीचे बळी नित्यनेमाने पडतच असतात. त्यासाठी सरकारला दोषी धरण्याचा किंवा एका समाज वा पक्षावर आक्षेप घेण्यात काहीही तथ्य नसते. पाकिस्तानात फ़ाळणीपुर्व असलेली हिंदू लोकसंख्या आज नगण्य होऊन गेलेली आहे. उलट त्याच कालखंडात भारतात मात्र मुस्लिमांची लोकसंख्या होती, त्याच प्रमणात टिकलेली आहे. यापेक्षा भारतातील धार्मिक समानतेचा अन्य कुठला पुरावा देण्याची गरज आहे? शेजारच्या बांगला देशातून हिंदूंना पळून यावे लागते आहे. पलिकडल्या म्यानमारमधून रोहिंग्या मुस्लिमांना जीव मूठीत धरून पळावे लागले आणि श्रीलंकेत अल्पसंख्यांक भयभीत हॊऊन जगतात. त्यांच्या तुलनेत भारतातल्या अल्पसंख्यांकांची मस्ती नित्यनेमाने वाहिन्यांवरच्या चर्चेतून सामान्य जनता बघत असते. वाहिन्यांवरचे मुस्लिम विचारवंत, मौलवी किंवा मुस्लिम नेते जी उद्धट उर्मट भाषा बोलतात, ती घाबरलेल्या अल्पसंख्यांकाची भाषा असत नाही. अत्यंत आक्रमक भाषा असते आणि तिथे चाललेले जिहादी समर्थन असंहिष्णूतेच्या उलट्या पुराव्याचीच ग्वाही देते. त्यातून जी प्रतिक्रीया उमटते, त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतात. बंगालमध्ये जय श्रीराम ही घोषणा कशाला झाली? तिथला हिंदू आपल्या सुरक्षेसाठी जय श्रीराम म्हणू लागला, त्याला सरकारने धार्मिक घोषणा द्यायला प्रवृत्त केलेले नाही. ममतांचा किंवा उपरोक्त प्रतिभावंतांचा जो काही सेक्युलर विचार व कार्यशैली आहे, त्याने हिंदूंना आपल्याच मायभूमीत असुरक्षित वाटायला लागल्याचा तो परिणाम आहे. त्यातून मग झुंडशाहीचे प्रकार घडू लागतात. शासकीय व्यवस्था, पोलिस वा न्यायालये सुरक्षेची हमी देत नसतील, तर लोकांना आपल्या सुरक्षेसाठी पुढाकार घ्यावा लागतो. त्यातून झुंडीचे बळी पडू लागले आहेत.

प्रतिभावंतांना मुळातच वास्तवाचे भान नसते, किंवा घटनांची कुठलीही माहिती नसते. अन्यथा त्यांना अक्कू यादव कसा मेला वा मारला गेला, त्याचे भान असते. त्यांनी असले पत्र मोदींना लिहीण्यापुर्वी झुंडीचे बळी कशाला पडतात, त्याचा विचार तरी केला असता. अक्कू यादवलाही जमावाने चिंधड्या उडवून ठार मारलेले होते. त्याचे कारण काय होते? तर अक्कू मनाला येईल त्या महिलेवर बलात्कार करीत होता आणि विरोधात उभा राहिल त्यालाही झोडपून काढत होता. पोलिस वा न्यायालये त्याच्या हल्ल्यांना रोखू शकली नाहीत आणि सामान्य नागरिकांना आपल्या सुरक्षेसाठी झुंडीत रुपांतरीत होऊन अक्कू यादवचा अवतार संपवणे भाग झालेले होते. तब्बल १९ बलात्काराचा आरोपी अक्कूला पुन्हा जामिन मिळून तो तुरुंगातून बाहेर येऊ नये; म्हणून जमावाने त्याला नागपूरच्या न्यायालयातच खांडोळी करून संपवला. त्याला पहिल्या बलात्कारानंतर पोलिस, कायदा वा न्यायालये आवर फ़्गालू शकली असती, तर गांजलेल्या जनतेला झुंड होऊन अक्कूला ठार मारण्याची वेळ कशाला आली असती? सामान्य जनता ही गरीब असते आणि असहाय असते. पण अशा दुबळ्या वर्गाने आक्रमक रुप घेताना तिचे झुंडीत रुपांतर झाले; मग तो अक्राळविक्राळ राक्षस होतो आणि कायदा वा पोलिसही त्याला रोखू शकत नसतात. न्यायालयात त्याचा निवाडा होऊ शकत नसतो. किंबहूना सामान्य लाखो हजारो लोकांच्या मनात दडलेला असा भयभीत राक्षस शांत ठेवण्यासाठीच तर कायदे आणि न्यायालये असतात. ती दुबळी ठरू लागली, मग हळुहळू त्या झुंड नावाच्या सुप्त राक्षसाला जाग येऊ लागत असते आणि तो राक्षस प्रकट झाला, मग पंतप्रधान वा कायदाही त्याला वेसण घालू शकत नाही. तो राक्षस अशाच प्रतिभावंतांनी जागवलेला आहे. शहरी नक्षली म्हणून नाटके रंगवणार्‍यांनीच लोकांना झुंडीच्या न्यायापर्यंत आणून सोडलेले आहे.

सामान्य माणसे कायदेभिरू असतात आणि कायद्यावर विसंबून असतात. पण जेव्हा कायदाच पांगळा किंवा असहाय झाल्याचा अनुभव लोकांना येऊ लागतो, तेव्हाच त्यांना स्वसंरक्षणार्थ मैदानात येण्याखेरीज पर्याय रहात नाही. कायदा व न्यायालये असहाय असल्याचा साक्षात्कार अशा बुद्धीमंत प्रतिभावंतांच्या नाटके पोरखेळातून होत असतो. याकुब मेमन किंवा अफ़जल गुरू यांना कायद्याने शिक्षा द्यावी, अशीच लोकांची अपेक्षा होती आणि तितका संयम लोकांनी दाखवलेला होता. पण त्यालाच फ़ाशीच्या दोरापासून वाचवायला प्रतिभावंत उभे रहातात, तेव्हा कायदा आणि पोलिस यंत्रणाही असहाय होऊन जाते. अशा प्रतिभावंत शहाण्यांना घाबरून काम करणार्‍या पोलिसांवर विसंबून रहाण्यापेक्षा आपणच न्यायनिवाडा करण्याची उर्मी जनतेत उफ़ाळून येते आणि त्यातून झुंड जन्माला येत असते. म्हणूनच जनतेचे वा लोकसंख्येचे रुपांतर झुंडीत होऊ नये, म्हणून प्रतिभावंतांनी आपल्या कल्पनाविलासाला लगाम लावणे अगत्याचे असते. याकुब,- अफ़जल किंवा जिहादी नक्षली यांना अभय देण्याची नाटके बंद करायची असतात. नसेल तर झुंडीला पर्याय नसतो आणि कुठलाही पंतप्रधान त्याला पायबंद घालू शकत नसतो. त्याला पत्र लिहून जे साध्य होणार नाहॊ, ते अशा प्रतिभावंतांनी घातपाती, नक्षलीं, जिहादींच्या निर्दालनाला सरकारच्या पाठीशी उभे रहाण्यातून साध्य होऊ शकते. त्यातून जनतेचा कायदा व न्यायावरील विश्वास प्रभावी बनवण्याला हातभार लावला, तर लोकांना स्वसंरक्षणार्थ झुंडीत रुपांरतीत व्हायची गरज भासणार नाही. गुन्हेगारांना घातपात्यांनाही प्रतिभावंत आपल्या समर्थनार्थ उभे रहात नाहीत असे दिसले, तर हिंसक उद्योग सोडावे लागतील आणि कायदा सुव्यवस्था सुदृढ होत जाईल. गुन्हेगारांच्या पोशिंद्यांनी सरकार व जनतेलाच मारेकरी ठरवण्याची भामटेगिरी आता मुखवटा फ़ाटून चव्हाट्यावर आलेली आहे. तिला जनताच केराची टोपली दाखवित असेल, तर मोदी कशाला किंमत देणार?

12 comments:

  1. श्री भाऊ हे so called पुरोगामी नुसती पुरस्कार वापसी करतात पण मग त्या बरोबर जी रोख रक्कम मिळाली ती परत केल्याचं काही ऐकलं वाचलं नाही बुवा, आणि त्या अनुषंगाने मिळणाऱ्या सोयी सवलती वापरणं बंद केल्याचं पण नाही कळलं

    ReplyDelete
  2. Sir, only you can write such truth. Salutes to you and your article. Very good sir, very good.

    ReplyDelete
  3. छान, मूलभूत विश्लेषण. बंगाल व इतरत्र, "जय श्रीराम" घोषणा का, हे सांगितले आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  4. भाऊ, यांच्या हाती मिडीया आहे, यांची प्रत्येक मत, प्रत्येक वाक्य मिडीया उचलून धरते त्यामुळे यांना आपल्या मताला खूप किंमत आहे असे वाटू लागलेय. म्हणून हे लोक फार शेफारले आहेत व काहीतरी खुसपट काढून नंगानाच घालू लागलेत, पण आमच्यासारखे सामान्य लोक यांना किंमत देत नाहीत. आस्तेआस्ते बंद होतील.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  6. बरोबर सांगितलंय प्रतिभावन्त लोकांना वास्तवाचं भान नसतं,,, सध्या भानावर फक्त भक्तगण आहेत आणि भाट गाणारे पत्रकार ..

    ReplyDelete
    Replies
    1. चाटूकार आणि चमचे कोमा मध्ये आहेत

      Delete