Saturday, July 20, 2019

पाकिस्तानचे राहुल गांधी

Image result for kulbhushan jadhav

मध्यंतरी दोन अडीच वर्षे निघून गेली हे सत्य आहे. दरम्यान कुलभूषण जाधव या भारतमातेच्या सुपुत्राला शारिरीक यातनाही सहन कराव्या लागल्या यात शंका नाही. पण अखेरीस आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानचे थोबाड फ़ुटायचे राहिले नाही. आता त्याचा निकाल आल्यावर आपली गेलेली अब्रु झाकण्यासाठी पाकचे पंतप्रधान इमरानखान यांनी त्यातही आपलाच कसा विजय झाला आहे, ते सांगायला खुळा युक्तीवाद केलेला आहे. कुलभूषणला भारताच्या हवाली करण्याचा निर्णय् कोर्टाने दिला नाही, म्हणूनच तो भारताचा पराभव असल्याचे त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे. असे लोक ज्या देशाचे नेतृत्व करतात, त्यांची कॉग्रेस व्हायला पर्याय असतो का? ज्यांना आपण एखादी कृती कशासाठी करीत आहोत आणि त्यातून आपलेच नुकसान होईल, याचाही अंदाज घेता येत नाही, त्यांना कुठले भवितव्य नसते. पाकिस्तान आता त्या स्थितीला जाऊन पोहोचला आहे. अन्यथा त्यांनी कुलभूषण प्रकरण या थराला जाऊ दिलेच नसते. इथे पाकची नाचक्की कुठे झाली आहे? भारताचा विजय कसा झाला आहे? भारताने मुळातच कुलभूषणला मुक्त करावे किंवा भारताकडे सोपवावे, अशी मागणीच केलेली नव्हती. पाकिस्तानात त्याला अटक झालेली असल्याचा दावा होता आणि तो भारतीय नागरिक असल्याने त्याला तिथेही मानवी हक्कानुसार न्याय्य वागणूक मिळावी, इतकाच भारताचा आग्रह होता. त्यासाठी जंगजंग पछाडून झाल्यावरही पाकिस्तान दाद देईना, म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागावी लागलेली होती. पाकने भारताच्या ह्या साध्या मागण्या मान्य केल्या असत्या, तर हा खटला झाला नसता, की पाकला आपले नाक कापून घ्यायची नामुष्की आलीच नसती. पण् तसे घडून गेलेले आहे आणि आता तो इतिहास बदलता येणार नाही. पण मुळातच पाकने असल्या उचापती कशाला केल्या तेही बघितले पाहिजे.

इथे नुकत्याच लोकसभा निवडणूका संपलेल्या आहेत आणि त्यात कॉग्रेस पक्षासह तमाम पुरोगामी मंडळींना राहुल गांधींनी तोंडघशी पाडलेले आहे. जवळपास तशीच्या तशी पाकिस्तानची कुलभूषण कहाणी आहे. ती एक सामान्य घटना नव्हती. कुलभूषणला पाकने इराणच्या चाबाहार बंदरातून पळवून नेले आणि नंतर त्याला पाकमध्ये अटक झाल्याचा दावा केलेला होता. पण त्यातही उलटसुलट बातम्या दावे आलेले होते. एकदा पाकिस्तान म्हणायचा, की त्याला बलुचिस्तानात पकडले. तर दुसर्‍यांदा असा दावा करण्यात आला, की कुलभूषण सिंध प्रांतामध्ये घातपाती कारस्थान करताना पकडला गेला. त्यासाठी मग त्याच्यावर कुठल्याही घातपाताचे आरोप लावण्यात आले आणि तिथल्या इतर खटल्यामध्ये त्याला आरोपी दाखवण्यात आले. याचा सुगावा लागताच भारताने तो आपला हेर असल्याचे साफ़ नाकारून, त्याला पाकच्या कोर्टात न्याय्य वागणूक मिळावी, म्हणून आपल्या दुतावासामार्फ़त प्रयत्न सुरू केलेले होते. भारतीय राजदूतांना त्याला भेटण्याची परवानगी मिळावी. त्याला वकिली सहाय्य देण्यासाठी दुतावासाला संधी द्यावी, अशा अनेक विनंत्या भारतातर्फ़े करण्यात आलेल्या होत्या. पण अशा सतरा विनंत्यांना पाकने केराची टोपली दाखवली आणि त्याला हेर दहशतवादी घोषित करून लष्करी कोर्टासमोर उभे करण्यात आले. तिथे त्याला आपल्या बचावाचीही संधीही नाकारून थेट फ़ाशी फ़र्मावण्यात आली. त्यातून मानवी हक्कांचा भंग होत असल्याने भारताला आंतरराष्ट्रीय कोर्टात जावे लागले. त्याचे कारण तो भारतीय नागरिक असला तरी नौदलातून निवृत्त झालेला अधिकारी होता. म्हणूनच त्याला सैनिक वा हेर म्हणून वागवण्याचा कुठलाही अधिकार पाकिस्तानला नव्हता. तितकी सुविधा दिली असती, तरी पाकला नाक कापून घ्यावे लागले नसते. पण हे सर्व घडले त्यामागे पाकिस्तानची चुक नाही, त्यात एक मोठा कुटील डाव होता. तोच त्यांच्यावर उलटलेला आहे.

मुळात अशा रितीने खरेखोटे एकमेकांचे नागरिक पकडून त्यांना हेर ठरवण्याचा उद्योग सर्वच देश करीत असतात. पाकिस्तानने आजवर शेकडो घातपाती घुसखोर इथे भारतात पाठवले आहेत आणि पकडले गेल्यावर ते आपले कोणी नाहीत, म्हणूनही हात झटकलेले आहेत. भारताने सहसा आपल्या नागरिकांना कधीच वार्‍यावर सोडले नाही. आरोप कितीही गंभीर असो, भारताने आपल्या नागरिकांना अन्य देशातून सुखरूप मायदेशी आणायचा आटापिटा केलेला आहे. त्यांना सर्वप्रकारची मदतही दिलेली आहे. युद्धभूमीतही अडकलेल्या नागरिकांना वाचवले आहे. त्यामुळे कुलभूषणला खर्‍याखोट्या कुठल्याही कारणास्तव पाकिस्तानने पकडलेले असेल, तरी त्याला सोडवून आणायची जबाबदारी भारताने टाळली नाही. पण पाकिस्तानला कुलभूषण पकडून साधायचे इप्सित भलतेच होते. जगभर पाकिस्तानची ख्याती जिहादी दहशतवादी निर्यात करायची आहे, तसाच आरोप भारतावर करता यावा, म्हणून कुलभूषणचे अपहरण करून रचलेले हे कुभांड होते. त्याच्यावर बेछूट आरोप करणे सोपे असले, तरी ते सिद्ध करणे केवळ अशक्य होते. म्हणूनच खटला चालवून त्याला शिक्षा देण्यापेक्षा भारताला यातून बदनाम करण्याचा मूळ डाव होता. म्हणूनच भारताचा हेर किंवा दहशतवादी ठरवून खुप डंका पिटला गेला. पण त्याच अनाठायी प्रसिद्धीत पाकिस्तानने आपले शेपूट अडकवून घेतले आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय कोर्टात त्याचा प्रत्येक दावा खोटा पडला. कुलभूषण् भारताचा हेर असल्याचा डंका पिटलेला पाकिस्तान त्या कोर्टात म्हणतो, कुलभूषण भारताचा नागरिक असल्याचे माहितीच नसल्याने भारतीय दुतावासाला त्याला भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. मग तोच भारताचा हेर असल्याचा डंका कशाला पिटलेला होता? परिणामी कोर्टामधला पाकचा युक्तीवाद त्यांच्याच फ़ुशारक्यांनी खोटा पाडला ना?

खरे तर असे एकमेकांचे पकडले गेलेले हेर असतात, त्याचा कुठलाही देश फ़ार गवगवा करीत नाही. ती गोष्ट गोपनीय राखली जाते. फ़क्त अशा पकडलेल्या हेर वा हस्तकाची माहिती त्याच्या देशाच्या गुप्तचर खाते वा सरकारला कळवली जाते. त्याची खातरजमा झाली, मग दोन्ही देश एकमेकांचे हरे देण्याघेण्याचा सौदा करतात. त्याची फ़ारशी चर्चा होत नाही. गुपचुप मामला असतो. पाकिस्तानने तिथेच पहिली चुक केली. त्यांना ह्या विषयाचे राजकीय भांडवल करायचे होते. खरेतर कुलभूषणला ज्या पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍याने प्रत्यक्षात अटक केल्याचा दावा आहे, तो आयएसआय आधिकारीही नेपाळमधून गायब झाल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. त्याचे भारतानेच अपहरण केल्याचाही आरोप आहे. त्यात किती तथ्य आहे देवेजाणे. कारण भारताने हा आरोप साफ़ नाकारला आहे. कुलभूषणच्याही बाबतीत हेच पाकिस्तानने केले असते, तर मामला परस्पर निकालात निघू शकला असता. ज्या पाक अधिकार्‍याचे नेपाळहून अपहरण झाले वा तो गायब झाला म्हणतात, त्यात म्हणून तथ्य असू शकते. पाक कुलभूषणचे अपहरण करू शकत असेल, तर भारतीय गुप्तचरांना पाकच्या कुणा बड्या अधिकार्‍याचे अपहरण करणे अशक्य नाही. कदाचित त्याचीच प्रचिती पाकला यावी म्हणून हा उद्योग भारतानेही केलेला असू शकतो. पण त्याविषयी पाकने कितीही आदळआपट केली तरी भारताने मौन राखले आहे. त्या आरोपाचा इन्कार केलेला आहे. ही कुठल्याही राजकीय प्रणालीची कार्यपद्धती असते. पाकला तितकेही समजत नसेल, तर त्यांच्या तोंडघशी पडण्याला पर्याय नव्हता. उद्या यातून आपलेच नुकसान असल्याचे पाक हेरखात्याला उमजले नसेल असे अजिबात नाही. पण त्यांचा हेतू कुलभूषणला बळीचा बकरा बनवून भारताला बदनाम करण्याचा होता. त्यात ते फ़सत गेले आणि नको तितकी मानहानी व्हायची पाळी आलेली आहे.

गेल्या दिडदोन वर्षात राहुल गांधींनी ज्या पद्धतीचे आक्रमक राजकारण केले आणि त्यातून कॉग्रेस पक्षाला अधिकच गाळात घेऊन गेले, त्यापेक्षा पाकिस्तानचा सगळा कुलभूषण बनाव अजिबात वेगळा नाही. किंबहूना कुलभूषण निरपराध असल्याचा तोच मोठा पुरावा आहे. तो खरोखरचा भारतीय हेर असता, तर पाकनेही त्याचा असा गवगवा केला नसता आणि आपल्या कुणा भारतात पकडलेल्या हेराला सोडवण्यासाठी सौदेबाजी केली असती. भारताला दहशतवादी म्हणून बदनाम करण्यापेक्षा पाकला आपला एखादा भारतात फ़सलेला हेर अधिक मौल्यवान असतो. त्याला सोडवण्यासाठी कुलभूषणला सोडणेही पाकला लाभदायक असते. पण तो हेर नसल्याने त्याच्या बाबतीत भारताशी् सौदा करता येणार नसल्याची पाकला खात्री होती. म्हणूनच मग त्याचे अपहरण करून नसता गदारोळ करण्यात आला. थोडक्यात सापळा लावला भारतासाठी आणि त्यातच पाकिस्तान गुरफ़टत गेला. आता त्यातून सुटताना पाकला मोठी किंमत मोजावी लागते आहे. कारण पाकिस्तानात काहीही करायची सवलत असली तरी जागतिक मंचावर मनमानी करण्याची सोय नसते. तिथे सर्वांना सारखे नियम लागू होतात आणि तिथेच पाकची फ़सगत भारताने करून ठेवलेली आहे. कुलभूषणला पाक कोर्टातही घातपाती ठरवणे शक्य नसल्याने त्याला लष्करी कोर्टात उभे करून परस्पर फ़ाशीची शिक्षा फ़र्मावण्यात आलेली होती. त्याला आंतरराष्ट्रीय कोर्टात गुन्हेगार ठरवणे कसे शक्य असेल? थोडक्यात तशी वेळ आणु द्यायची नसते. पण भारताने लष्करी कोर्टाच्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी मागितलेली दुतावास संपर्काची मागणी मान्य केली असती, तरी विषय जागतिक मंचावर गेला नसता. पण सांगायचे कोणी? राहुल गांधींची चौकीदार चोर प्रकरणातली अवमान याचिका आठवते? तसाच प्रकार झाला ना? आपलेच दात आपलेच ओठ म्हणायची वेळ आली.

बिनबुडाचा राजकीय आरोप राफ़ायल प्रकरणात करून राहुल मोकाट झालेले होते. त्या विमानखरेदी प्रकरणाला न्यायालयात आव्हान दिले गेल्यावर तिथल्या सुनावणीचा आधार घेऊन एकेदिवशी राहुलनी सुप्रिम कोर्टानेही मोदींना चोर म्हटल्याचे जाहिरसभेत विधान केले आणि मस्ती गळ्यात आली. मीनाक्षी लेखी नावाच्या भाजपानेत्याने त्याला आक्षेप घेत अवमान याचिका सादर केली आणि सुप्रिम कोर्टाने राहुलना दट्ट्या लावला. तरीही आपल्याला अवमान करायचा नव्हता असली मखलाशी करीत राहुलच्या वकीलांनी दिलगिरी व्यक्त करणारे प्रतिज्ञापत्र देण्याची सारवासारव केली. तेव्हा कोर्टाने चपराक हाणून स्पष्ट शब्दात माफ़ी मागायला लावलेली होती. मुळात राजकीय आरोपाचा विषय न्यायालयातील सुनावणीशी जोडण्याची गरज नव्हती. पण राहुलना शहाणपणा कोणी शिकवायचा आणि पाकिस्तानला अक्कल कोणी शिकवावी? शेवटी बिनशर्त माफ़ीपत्र देऊन राहुलना आपली शरणगती पत्करावी लागली. इथेही पाकिस्तानला २० कोटी रुपये मोजून त्या जागतिक न्यायालयात थप्पड सोसावी लागलेली आहे. एकीकडे भारताचे सुपुत्र हरीष् साळवे या महागड्या वकीलाने देशाच्या प्रतिष्ठेचा विषय म्हणून एकही पैसा न घेता जागतिक कोर्टात कुलभूषणची बाजू समर्थपणे मांडली आणि दुसरीकडे पाकिस्तानची बाजू मांडणार्‍या इग्लंडमध्येच वास्तव्य केलेल्या पाकिस्तानी वकीलानेच २० कोटी रुपये फ़ी आकारलेली आहे. ज्या देशाच्या पंतप्रधानाला अमेरिकेत गेल्यावर हॉटेलचे वास्तव्य परवडत नाही, म्हणून दुतावासात मुक्काम करण्याची नामुष्की आलेली आहे, त्याने या खटल्यासाठी इतकी प्रचंड रक्कम खर्ची घालावी काय? कशासाठी इतके पैसे खर्चावे? म्हणूनच पाकिस्तानचे नेतृत्व तिथले राहुल गांधी करतात म्हणायची पाळी येते ना? कारण इतकी रक्कम खर्च करण्याची काहीही गरज नव्हती. भारताला एक परवानगी वेळीच दिली असती तर?

राजकारणाच्या कुटील डावपेचात नेहमी आपले नुकसान टाळून समोरच्याला गोत्यात आणायचे असते. त्याला राजकीय डावपेच म्हणतात. पण राहुल गांधी असोत, किंवा पाकिस्तान असो, ते आपल्या चमत्कारीक डावपेचातून स्वत:लाच गोत्त्यात घालत असतात. भारताचा द्वेष करण्यातून पाकिस्तानने मागल्या सात दशकात स्वत:चा काही विका्स वा प्रगती केलेली नाही. आजकाल तर इतकी दिवाळखोरी झालेली आहे, की जागतिक बाजारपेठेत पाकिस्तान भिकारी म्हणूनच ओळखला जातो आहे. त्याला सौदी वा अन्य कुठल्या तरी देशासमोर वाडगा घेऊनच उभे रहावे लागते आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ़ यांची कन्या मरियमने इमरानखान यांची संभावना काय केली होती? नरेंद्र मोदी यांनी शरीफ़ यांच्याप्रमाणे खान यांना शपथविधीला आमंत्रण दिले नाही, त्यावर भाष्य करताना मरियम म्हणाली, तिथेही इमरान भिकेसाठी वाडगा घेऊन उभे रहातॊल म्हणून मोदींनी बोलावले नाही. अशी दुर्दशा ज्या देशाची झालेली आहे, त्याला कुलभूषणला गोत्यात घालण्यासाठी २० कोटी रुपये वकीलाची फ़ी परवडणारी नसते. पण किंमत मोजावी लागलेली आहे. हाती लागले काय? तर त्याच दरम्यान अमेरिकेला खुश करण्यासाठी सईद हाफ़ीजला अटक करावी लागली आहे आणि पाकिस्तानलाच दहशतवादी देश ठरवले जाऊ नये, म्हणून कसरती चालू आहेतच. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात, त्यातली कथा होऊन बसली आहे. नाहीतरी इथे राहुल गांधींनी कॉग्रेसची आणि तिच्या मागे फ़रफ़टलेल्या पुरोगामी पक्षांची काय दुरावस्था करून टाकलेली आहे? पण त्यांची भाषा तरी इमरानपेक्षा कुठे वेगळी आहे? गळ्यात हार घालून कत्तलखान्याकडे धावत सुटलेल्या बोकडांना कोण कधी वाचवू शकतो काय? कुलभूषणच्या निमीत्ताने आपण काय गमावले, ते कळण्यापर्यंत पाकिस्तान शिल्लक राहिला तरी खुप झाले.

3 comments:

  1. श्री हरिष साळवेंनी फी घेतली नाही हा भारतीय जनतेचा मोठा भ्रम आहे. त्यांनी 1 रूपया फी घेतली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. 1 rs फी घ्यावीच लागते, जर नाही घेतली तर त्याचा अर्थ त्यानी देशावर उपकार केले असा होऊ शकतो, देशा पेक्षा मोठे कोणी नाही,

      Delete