Friday, August 9, 2019

पक्षांतराचे पोस्टमार्टेम

Image result for भाजपाची मेगाभरती

अजून विधानसभा निवडणुकांची अधिसुचना निघालेली नाही. पण राजकीय पक्षांना मात्र निवडणूकांचे वेध लागलेले आहेत. त्यात भाजपा आघाडीवर आहे आणि शिवसेना देखील मागे राहिलेली नाही. या दोन्ही पक्षांचे ‘काय ठरलंय’ तो गुलदस्त्यातला विषय आहे. पण निदान आज तरी ते एकत्रित लढतील अशी खात्री देण्यासारखी स्थिती दिसते आहे. विरोधी पक्षातल्या राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षातले अनेक इच्छुक व उत्सुक, या दोन्ही पक्षाच्या दाराशी येऊन उभे आहेत आणि त्यातल्या काहीजणांना पक्षात सामावून घेताना सत्तेतल्या दोन्ही पक्षांची काहीशी तारांबळ उडालेली आहे. प्रचाराचा आरंभ करताना अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी जागा संपल्या, आता भरती नाही अशीही घोषणा करून टाकली आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादी व कॉग्रेस यांच्यासमोर भवितव्याची चिंता भेसूर होत चालली आहे. कारण उमेदवार ठरवायला त्यांनी योजलेल्या मुलाखती व भेटीगाठीसाठीही विद्यामान आमदार दांडी मारीत आहेत. ह्याचा अर्थच त्या इच्छुक वा आमदारांना पुन्हा पक्षातर्फ़े निवडून येण्याची खात्री उरलेली नसावी. अन्यथा त्यांनी पक्षाच्या मुलाखती टाळल्या नसत्या. कारण मुलाखतीसाठी व्हीप वगैरे नसतो. पण अशा पळापळीतून राजकारणाचे वारे ओळखता येतात आणि सध्यातरी से्ना भाजपाचा जोर असल्याचे मानावे लागते. पण गंभीर बाब पक्षांतर करणार्‍या काही नेत्यांच्या वक्तव्यातून लक्षात येते. शिवेंद्रराजे हे राष्ट्रवादीचे सातारा या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत आणि त्यांनी पक्षात कमालीची मरगळ असल्याचे जाहिरपणे सांगून टाकलेले आहे. तर त्यांना टिकेचे लक्ष्य करण्यापेक्षा जे कोणी निष्ठावान आहेत, त्यांनी शिवेंद्र यांच्या विधानातले गांभीर्य ओळखून कामाला लागले पाहिजे. पुन्हा कॉग्रेस राष्ट्रवादी सत्तेत येऊ शकतील. अशी स्थिती नसल्याचे त्यांनी उघडपणे सांगितले आहे. हे त्यांना वाटत असेल, तर सामान्य कार्यकर्त्याचे काय?

एका बाजूला मनसेला सोबत घेण्याची वकिली शरद पवार आणि राष्ट्रवादी करीत आहेत आणि तेच राज ठाकरे मात्र निवडणूकांची तयारी करण्यापेक्षा मतदान यंत्राच्या विरोधातले आंदोलन छेडण्याच्या तयारीत गुंतले आहेत. त्यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली. नंतर कोलकात्याला जाऊन ममता बानर्जींची भेट घेतली. पण सगळे तोंडदेखला पाठींबा देऊन अंग झटकत आहेत. म्हणजेच प्रत्येकाला यंत्राविषयी तक्रार करून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता वाटत नसावी. अर्थात अशा तक्रारी करण्यापेक्षा व यंत्रावर संशय घेण्यापेक्षा प्रत्येक पक्षाने व नेत्याने आपल्याच कार्यकर्ता व स्थानिक नेत्यांच्या आकलनावर विसंबून वागणे योग्य ठरेल. कारण यंत्रातला बिघाड किंवा गफ़लती कुणा जाणकार तज्ञापेक्षाही सामान्य कार्यकर्त्याला नक्की अधिक समजतात. आपापल्या विभागातल्या जनमानसाशी अशा दुय्यम नेते व कार्यकर्त्यांचा सतत संपर्क असतो आणि तिथे मतदानाचे प्रतिबिंब मतमोजणीत पडले नाही, तर कार्यकर्ता कमालीचा विचलीत होऊन जातो. तसा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता निकालांनी विचलीत झालेला नाही. कारण आपापल्या भागातील मतदार कुठल्या बाजूने झुकलेला आहे, त्याचे प्राथमिक ज्ञान सामान्य कार्यकर्त्याला असते. स्थानिक नेत्यालाही असते. म्हणूनच असे कार्यकर्ते नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपा किंवा शिवसेनेत दाखल व्हायला रांग लावून उभे आहेत. ही स्थिती इथेच नाही. देशाच्या अन्य भागात राज्यातही तशीच प्रचिती येते आहे. बंगालमध्ये इतर पक्षातले कार्यकर्ते भाजपात त्यामुळेच आलेत. कारण तृणमूल विरोधातल्या जनभावना त्यांना सतत बघायला मिळत असतात. महाराष्ट्रातले अनेक नेते व आमदार त्याच भावनेला शरण गेलेले आहेत. या वस्तुस्थितीला सामोरे जाऊनच निवडणूका लढवणे भाग आहे. जाणार्‍यांवर दोषारोप करून काहीही साध्य होणार नाही.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला ओव्हरफ़्लो झालेले जहाज म्हटले आहे. असे जहाज नक्कीच बुडते, असाही त्यांचा दावा आहे. हा दावा अनुभवातून आला आहे काय? कॉग्रेस अशीच बाहेरच्यांची भरती करून ओव्हरलोड होऊन बुडालेली नौका आहे काय? असेल तर त्यांना पक्षात आणणारे व पक्षाची नौका बुडवणार्‍यांचे काय? त्यांना कोणी रोखले कशाला नाही आणि कालपरवा पराभव होईपर्यंत त्याविषयी कोणीच का बोलले नाही? कॉग्रेसच्या मुंबईतील एका कार्यालयात काही उत्साही लोकांनी पेढे-लाडू वाटून आनंद व्यक्त केल्याचेही चित्रण वाहिन्यांवर दाखवले गेले. घाणकचरा गेला म्हणून हे लोक लाडू वाटत होते. इतकीच ती घाण असेल, तर मग इतके दिवस तिची साफ़सफ़ाई त्यापैकीच कोणी कशाला केलेली नव्हती? ती घाण आपोआप भाजपात जाईपर्यंत या निष्ठावंताना त्यातला कचरा कशाला ओळखता आला नव्हता? असे अनेक प्रश्न विचारता येतील. पण त्यामुळे राजकीय प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत किंवा समस्यांचा निचराही होत नाही. अशा बातम्या किंवा विधाने कृती लक्ष वेधून घेण्यासाठी ठिक असतात. पण त्यातून पक्षाची झालेली पडझड थोपवता येत नाही. हा सिलसिला मागल्या लोकसभेपासून चालू आहे आणि त्यालाही आता साडेपाच वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. तेव्हापासूनच खुप मोठा कचरा भाजपात किंवा अन्य पक्षात निघून गेलेला आहे. पण म्हणून कॉग्रेस वा राष्ट्रवादीला अजून मोकळा श्वास घेण्याइतकी मुभा मिळालेली नाही. एकामागून एक पराभव होत आहेत आणि त्यातून सावरण्याची संधीही मिळालेली नाही. त्याची काहीतरी कारणे असतील ना? नुसता कुणावर कचरा म्हणून दोषारोप ठेवून तुम्ही सुदृढ होत नसता. तुम्हाला तरारी येत नसते किंवा लढण्याची उभारी येत नसते. गमावलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी कॉग्रेस वा राष्ट्रवादी काहीही करीत नाहीत, अशीच जाणार्‍यांची तक्रार आहे आणि त्याचा अर्थ काय लागतो?

कचरा गेलेला नसून घरात माजलेला कचरा व दुर्गंधी सोसण्यापलिकडे गेलीय. म्हणून असे लोक सोडून जात आहेत. म्हणजेच ज्या कचर्‍याने या पक्षांना आजारपण आले आहे, त्याचा निचरा होऊ शकलेला नाही. राहुल गांधी यांच्या जागी नवा अध्यक्ष निवडणेही दोन महिन्यात पक्षाला साध्य झालेले नाही आणि आपल्या नावाचा वापर करू नका, अशी ताकिद आता प्रियंकांनी दिलेली आहे. खरे सांगायचे, तर आता कॉग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष वाहिन्यांच्या चर्चेत सहभागी होणार्‍या प्रवक्ते व युक्तीवाद; यापुरतेच शिल्लक राहिलेत. जितक्या आवेशात विरोधी पक्षाचे प्रवक्ते किंवा समर्थक वाहिन्यांवर आगपाखड करीत असतात, त्याचा लवलेश संघटनात्मक कामात दिसत नाही. तो दिसला असता, तर जाणार्‍यांना उलट्या पावली मागे फ़िरायची इच्छा झाली असती. अजून आपला पक्ष हिरीरीने निवडणूका लढवू शकतो आणि जिंकायलाही मागेपुढे बघायला नको, असा आत्मविश्वास त्यांच्यात आला असता. पण वाहिन्यांवरचा बोलाचा भात खावून कुठला पक्ष गुटगुटीत होऊ शकणार आहे? पक्षाला रामराम ठोकणार्‍यांना आता पक्षाविषयी किंवा नेत्यांच्या विजयी करण्याच्या कुवतीविषयी शाश्वती नसेल, तर त्यांना कचरा म्हणून काय साध्य होऊ शकते? एकदोन निवडणूकां गमावल्याने कुठलाही पक्ष संपत नाही किंवा अस्तंगत होत नाही. मुद्दा अशा पराभवातून नव्या दमाने उभे रहाण्याचा असतो. झालेला पराभव स्विकारून लढाईसाठी नव्याने सिद्ध होण्याला पक्ष म्हणतात. इथे पराभवाचे सत्य पचवण्याचीच क्षमता नेत्यांनी गमावली आहे. त्यापेक्षा आपल्या अपयशाचे खापर मतदान यंत्रावर फ़ोडून आणखी एका पराभवासाठी वाटचाल चालविली आहे. हे सत्य बघू शकणारेच इतरत्र आपली सोय लावायला निघालेले आहेत. नुसत्या सत्तापदासाठी हे आमदार वा नेते भाजपात गेलेले नाहीत. त्यांना आपल्या मुळ पक्षातल्या नेत्यांच्या विवेकबुद्धीची भिती सतावते आहे.

आपल्या पक्षाचा पराभव झाला, कारण आपला पक्ष जनमानसातून उतरला आहे. लोकांचा आपल्या पक्षावरील व नेतृत्वावरील विश्वास उडाला आहे, याचे भान पक्षांतर करणार्‍यांना आहे. मतदान यंत्रावर किंवा मतमोजणीवर अविश्वास, म्हणजे साक्षात मतदाराची पायमल्ली असल्याच्या जाणिवेने त्यांना पक्षातून बाहेर पडायला भाग पाडले आहे. २०१४ च्या दारूण पराभवानंतर असे पक्ष लोकमताची अपेक्षा समजून कामाला लागले असते आणि त्यांनी लोकांच्या अपेक्षा पुर्ण केल्या असत्या, तरी २०१९ च्या लोकसभेत त्यांना मतदाराने इतके फ़ेटाळून लावले नसते. हे दिल्लीत वा मुंबईत बसून उमजणार नाही. त्यासाठी लोकांमध्ये वावरावे लागते. सहाजिकच लोकांशी संपर्क नसलेल्यांना झाकपाक करायला कुठलीही कारणे पुरतात आणि त्यावरून युक्तीवादही रंगवता येतात. पण म्हणून मतदार बदलता येत नाही. परिणामी आंणखी एक पराभव पदरी येत असतो. तो पराभव राहुल गांधींनी ओढवून आणलेला असो किंवा शरद पवारांनी आणलेला असो; परिणाम पक्षातल्या सामान्य कार्यकर्ते नेत्यांनाच भोगावा लागत असतो. तो कितीकाळ सहन करायचा? या प्रश्नाचे उत्तर नेत्याकडून मिळत नसते. ते आपले आपल्यापुरते शोधावे लागत असते. त्यातून मग पक्षांतराचा मार्ग सापडतो. निष्ठावान म्हणून आमच्यासोबत कपाळमोक्ष करून घेण्यास सिद्ध व्हा, इतकेच धोरण घेऊन ठाम बसलेल्या नेत्यापासून कार्यकर्ते पळू लागतात. सध्या तेच चाललेले आहे. ज्यांनी अन्य पक्षांची कास धरली आहे, त्यांना नवे काही नको आहे, तर हाताशी आहे, तेच टिकवता आले तरी खुप; अशा स्थितीत त्यांनी अन्यत्र आसरा शोधलेला आहे. तो पक्षाच्या विचारधारा वा भूमिकेवरचा अविश्वास अजिबात नाही. त्या पक्षाच्या विद्यमान नेतृत्वावरचा तो अविश्वास आहे. नरेंद्र मोदी वा फ़डणवीस यांच्यावरील विश्वास नाही. कॉग्रेस आणि पवारांवरील अविश्वास नक्कीच आहे.

8 comments:

  1. अगदी योग्य विश्लेषण करून हे सांगितले आहे. प्रत्येक जण bjp मध्ये येताना म्हणतो की फक्त मोदी किंवा फडणवीस विकास करू शकतात परंतु ते सगळे बकवास असते . खरी गोष्ट फक्त आपली सीट मिळवणे एवढेच असते .

    ReplyDelete
    Replies
    1. आपापले संस्थान टिकवणे बाकी सब बकवास

      Delete
  2. आता तर ३७० मुळे तर NCP CONGRESS MNS हे भुई सपाट होणार हे नक्कीच

    ReplyDelete
  3. 370 चे कलम निकालात काढल्या नंतर तिनही राज्यांच्या निवडणूका भाजपने खिशात घातलेल्या आहेत असे दिसतेच आहे. परंतू त्या शिवाय ही, लढण्याची ताकद गमाऊन बसलेला विपक्ष काही आव्हान तरी उभे करू शकतो कि नाही हे केवळ त्या इश्र्ववराला किंवा मग भाउंनाच ठाऊक.

    ReplyDelete
  4. सुंदर विश्लेषणात्मक लेख

    ReplyDelete
  5. सुंदर विवेचन...

    ReplyDelete
  6. Aaj ghadila pakash badlnare lok BJP kadun nivdun yetil pan pan bhavishyat parat bandkhori Karun Sarkar padtil aas nahi ka vàtt

    ReplyDelete