Thursday, August 1, 2019

पुलोद नामक मायाजाल

भाजपातील मेगाभरतीच्या निमीत्ताने  (३)


१९७७ सालात जनता पक्षाची लाट होती आणि जनमत कॉग्रेस विरोधातले असताना महाराष्ट्रामध्ये कॉग्रेसी सत्तेला पहिले आव्हान उभे राहिले. जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आलेला होता आणि महाराष्ट्रामध्येही लोकसभेची आघाडी चालू राहिल, अशीच अपेक्षा होती. त्यातच कॉग्रेसमध्ये इंदिराजींनी दुफ़ळी माजवलेली होती, त्याचा लाभ होऊन जनता पक्ष सत्तेत येईल, असे अनेकांना वाटलेले होते. पण मार्क्सवादी पक्ष जनता पक्षाच्या सोबत राहिला, तरी शेकापने मात्र आघाडी मोडली व स्वतंत्रपणे लढायचा पवित्रा घेतला. त्यामुळे कॉग्रेस विभाजनाचाही लाभ मिळू शकला नाही. इंदिराजींची कॉग्रेस आणि यशवंतरावांची कॉग्रे़स् स्वतंत्रपणे लढले आणि त्यांनाही नुकसान झालेच. पण दोन्ही कॉग्रेसचे एकत्रित बळ विरोधकांपेक्षा अधिक होते. अशावेळी यशवंतराव गटाचे म्होरके व मुख्यमंत्री वसंतदादांनी दिल्लीला जाऊन इंदिराजींची मदत मागितली आणि दोन्ही कॉग्रेसचे संयुक्त सरकार आणण्यात यश मिळवले. उलट जनता पक्ष म्हणून एकत्र आलेल्या गटांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्यातच सुंदोपसुंदी माजली. जनसंघ व समाजवादी यांच्यातल्या वितंडवादाने विलंब केला आणि तितक्यात वसंतदादांनी सत्तेचे समिकरण जुळवले. थोडक्यात तेव्हाच्या कॉग्रेसविरोधी लाटेतही महाराष्ट्रातली कॉग्रेसची सत्ता अबाधित राहिली. मात्र एकत्र आलेल्या कॉग्रेसच्या दोन्ही गटात सामंजस्य पुरेसे नव्हते आणि त्याला बाधा आणण्यात शरद पवार हा यशवंतरावांचा शिष्योत्तम यशस्वी झाला. कोवळ्या वयात मुख्यमंत्री होण्याच्या आकांक्षेमुळे त्यांनी वडिलधार्‍या वसंतदादांना धक्का दिला आणि २२ आमदारांसह पक्ष सोडला. अर्थात त्यांनी आधीच सौदा केलेला होता आणि त्यानंतर त्यांनाच मुख्यमंत्रीपद देण्याच्या बदल्यात जनता पक्षाने सत्तेचा किरकोळ हिस्सा मिळवला. पवारांचे अवघे २२ आमदार होते आणि जनता पक्षाचे ९९, तरी त्यांना सत्तेत काय मिळाले? 

मुद्दा इतकाच, की १९७८ सालात महाराष्ट्रातली कॉग्रेसची सत्ता ढासळू लागली होती आणि तरीही कॉग्रेसच सत्तेत होती. कारण जनता पक्षासह शेकापचा पाठींबा घेऊन पवार मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी पुरोगामी लोकशाही दल स्थापन केलेले होते. त्याचे नेतृत्व त्यांच्याकडे होते आणि पुढल्या आठ वर्षात शरद पवारांनी राज्यातील सर्व विरोधी पक्षाना मातीमोल करून टाकले. तेव्हा जनता लाट इतकी जोरात होती, की इंदिराजींचा पुन्हा उदय होईल किंवा त्या केंद्रात सत्तेवर येतील; अशी पवार वा चव्हाण यांनी अपेक्षाही केलेली नव्हती. त्यांनीच कशाला? देशातल्या बहुतांश राजकीय अभ्यासकांचीही तशी अपेक्षा नव्हती. पण ऐन महाराष्ट्र विधानसभेच्या पुर्वसंध्येला इंदिरा गांधींनी कॉग्रेसमध्ये दुसरी फ़ुट पाडली आणि त्यानंतर आजची कौटुंबिक मालकीची कॉग्रेस अस्तित्वात आली. त्याचा देशव्यापी परिणाम नजिकच्या काळात दिसून आला. पण महाराष्ट्रात त्याचे परिणाम दिसायला आणखी सोळा सतरा वर्षे जावी लागली. इंदिराजींशी निष्ठा असलेले निम्मे खासदार त्यांच्या गटात सहभागी झाले. ते शक्य होते, कारण तेव्हा पक्षांतर कायदा नव्हता आणि कुठलाही लोकनियुक्त प्रतिनिधी आपल्या इच्छेनुसार पक्षांतर करायला मोकळा होता. विधानसभेसाठी इंदिराजींच्या पक्षाला महाराष्ट्रात नाव घेण्याजोगे उमेदवारही मिळू शकलेले नव्हते. कॉग्रेसने वाळीत टाकलेल्या नगण्य दुय्यम नेत्यांनी तात्काळ इंदिराजींच्या पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवलेली होती. नाहीतरी त्यांना चव्हाणांच्या पक्षातल्या दिग्गजांसमोर दिर्घकाळ कॉग्रेसमध्ये संधी मिळण्याची शक्यता नव्हती. पण ज्यांनी तो जुगार खेळला त्यांचे कल्याण होऊन गेले. बाबासाहेब भोसले त्यापैकीच एक होते. त्यांना कॉग्रेस मुंबईत नगरसेवक पदासाठीही उमेदवारी देत नव्हती. त्या जुगारातून ते आमदार, मंत्री व पुढे मुख्यमंत्रीही होऊन गेले. मात्र त्या उलथापालथीतून महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांनी उभारलेली कॉग्रेस नावाची तटबंदी खिळखिळी व्हायला आरंभ झाला होता.

जनता पक्ष म्हणजे वैचारिक विरोधाभासाची आघाडी होती आणि एकत्र येऊन पक्ष झाला, तरी त्यांच्यातले मतभेद कधीच संपले नाहीत व संपणारेही नव्हते. त्यांची शोकांतिका लौकरच झाली आणि तीन वर्षातच जनता पक्षातील या बेबंदशाहीने त्यांचेच सरकार पाडले. त्याला आपल्या इंदिरा कॉग्रेस नामे पक्षाचा हातभार लावून इंदिरा गांधी यांनी कॉग्रेस ही एका खानदानाची मालमत्ता असल्याचा सिद्धांत यशस्वी करून दाखवला. तशी अन्य राज्यातली कॉग्रेस कधीच दुबळी होऊन गेलेली होती. त्या त्या राज्यात कोणी स्वयंभू नेता कॉग्रेस पक्षात उरलेला नव्हता. महाराष्ट्रातील मुठभर नेते सोडल्यास् देशात कुठल्याही राज्यात कॉग्रेस चालवणार्‍या नेत्याचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नव्हते. फ़क्त महाराष्ट्रातील कॉग्रेस त्यामुळेच शिल्लक उरली होती. इथे निदान पक्षाची तळागाळापर्यंत पोहोचलेली संघटना शाबूत होती. स्थानिक नेतृत्व संस्थात्मक बळावर आपापल्या मर्यादित क्षेत्रात तरी शाबुत होते. पण शरद पवारांच्या गद्दारीमुळे नाराज झालेले त्यातलेही काही लोक इंदिराजींना जाऊन मिळाले आणि कॉग्रेसचा इथला बुरूज ढासळायला सुरूवात झाली. तो कोसळत नव्हता, कारण अन्य राज्याप्रमाणे इथे पर्यायी राजकारणाचा पाया घातलेला कुठलाही शक्तीशाली पक्षच अस्तित्वात नव्हता. दुबळे डावे पक्ष आणि विखुरलेला शेकाप वा रिपब्लिकन गट; अशा दुबळेपणामुळे विरोधी राजकारण करायलाही उसना कॉग्रेसी नेता आणावा लागला होता. वसंतदादा इंदिराजींना शरण गेले होते आणि यशवंतरावांचा दबदबा संपलेला असताना शरद पवारांचा महाराष्ट्राचा नेता म्हणून उदय झाला. १९८० नंतरच्या काळात शरद पवार मराठी क्षितीजावर उगवलेले होते आणि विखुरलेल्या विरोधी राजकारणातून आपले राजकीय भवितव्य निर्माण् करायला धडपडत होते. विरोधकांनाही तितका आक्रमक दुसरा नेता त्या काळात उपलब्ध नव्हता. तो मिळाला तरी त्यातली एक अडचण कोणाच्या तेव्हा लक्षात आलेली नव्हती.

शरद पवार धुर्त, चतूर व हुशार असले तरी त्यांची महत्वाकांक्षा त्यांची सर्वात मोठी शत्रू होती. प्रसंगावधान किंवा योग्य संधीची प्रतिक्षा करण्याइतका संयम त्यांच्याकडे नव्हता. तिथेच त्यांनी विरोधी राजकारणाचे नुकसान् केले आणि स्वत:चेही भवितव्य गोंधळून टाकले. पण एकूण आजपर्यंतचे राजकारण अभ्यासले, तर महाराष्ट्रामध्ये खर्‍याखुर्‍या विरोधी राजकारणाचा पाया घालण्यास योग्य असे पोषक वातावरण निर्माण करण्याची कामगिरी शरद पवारांनी पुढल्या दोन दशकात बजावलेली आहे. त्यांचे हे ऐतिहासिक कार्य अभ्यासकांनी कधीही विचारात घेतलेले नाही. इंदिराजींनी महाराष्ट्रातली कॉग्रेस संघटना मोडीत काढलेली असली, तरी तिची डागडुजी करून नव्याने तो बुरूज भक्कम करू शकण्याची क्षमता असलेला शेवटचा कॉग्रेसनेता शरद पवार हाच होता. अंतुले किंवा शंकरराव चव्हाण यांचे आव्हान पेलून पुलोदच्या माध्यमातून मुळच्या कॉग्रेसला नव्याने संजिवनी पवार देऊ शकले असते. मुलायम, लालू किंवा पटनाईक वा ममतांनी वेगळ्या नावाने आपापल्या राज्यातले कॉग्रेसी राजकारण पुढे रेटले, तसे इथे शरद पवारही करू शकले असते. कॉग्रेसला नव्या अवतारात उभे करू शकले असते. इथे कॉग्रेसचे खरे स्वरूप इंदिरा कॉग्रेस कधीच नव्हते. इंदिराजी वा केंद्रीय नेतृत्वाच्या लोकप्रियतेवर जगणारा पक्ष; असे कॉग्रेसचे महाराष्ट्रातील स्वरूप निदान १९८० पर्यंत तरी नव्हते. त्यातून त्या पक्षाला नवे रुप देण्य़ाची किमया शरद पवार करू शकले असते. पण त्यांना कर्तबगारी दाखवण्यापेक्षा सत्तापदाचा मोह इतका आनावर होता, की ते कॉग्रेसला सावरायला इंदिरा कॉग्रेसमध्ये दाखल झाले आणि तेही करू शकले नाहीत. दुसरीकडे त्यांनी कॉग्रेसी विचारांच्या जवळून चालणार्‍या तथाकथित पुरोगामी पक्षांचा महाराष्ट्रातील पायाच उखडून टाकण्याचे कार्य पार पाडले. परिणामी महाराष्ट्रामध्ये खर्‍याखुर्‍या बिगर कॉग्रेसी व भिन्न विचारांच्या राजकीय पक्षाची पाळेमुळे रुजावण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाली. भाजपा वा शिवसेनेचे पाय इथे भक्कम होण्यातले हे पवारांचे योगदान, सहसा कोणी अगत्याने सांगत नाही.
(आगामी पुस्तकातून)

5 comments:

  1. Pharch abhyaspurna lekh aahe, very good

    ReplyDelete
  2. Kya baat hai bhau!

    Ye to humne socha bhi nahi tha!!!!

    ReplyDelete
  3. यशवंतराव आणि शरद पवार हे गुरू-शिष्य कधीही काळाप्रमाणे विचार करू शकले नाही. दोघांनीही पक्षबदल केला. यशवंतराव हे मूळचे रॉयीस्ट. त्यांचा स्वतंत्र पक्ष असताना ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये असल्यामूळे मुख्यमंत्रीपद मिळाले व नंतर संरक्षणमंत्रीपद मिळाले. हा त्यांचा स्वतंत्र व्यक्तिमत्व सांगण्यासारखा काल. संरक्षणमंत्री झाल्यावर आणि दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राच्या नाड्या आपल्याच हातात असाव्या याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते जमले नाही. काँग्रेस फुटल्यानंतर ते ब्रम्हानंद काँग्रेसमध्ये राहिले आणि मृत्युपूर्वी थोडेसे आधी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आणि शरद पवार यांचे राजकारण स्वतंत्र ठसा न उमटता इतरांच्या पाठीशी जाऊन भरकटत गेले.
    शरद पवार हे स्वतःच्या पक्षात म्हणजे विरोधी पक्षात असताना भरभराटीत असलेल्या काँग्रेस पक्षात गेले आणि त्यानंतर एक महिन्याच्या आत बोफोर्स प्रकरण उघड झाले. त्यामूळे राजीव गांधी यांची दुष्किर्ती सुरू झाली. शरद पवार जर त्यावेळी विरोधी पक्षात असते तर विपी सिंग यांच्याऐवजी पंतप्रधान झाले असते. पण त्यांनी तसा विचार केला नाही.

    ReplyDelete
  4. लेख एकांगी आहे ,पवारांनी राजकारण चुकीच्या पद्धतीने केले असेल पण चांगली कामही खूप केली आहेत .

    ReplyDelete
  5. आगामी पुस्तकातून म्हणजे समजलो नाही
    भाऊ माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे स्वातंत्र्यपूर्वी नेहरु गांधींच्या भूमिका सावरकर यांचे राष्ट्रप्रेम स्वातंत्र्यानंतर नेहरूंच स्वार्थी राजकारण सरदार पटेल यांच योगदान नेताजी सुभाषचंद्र बोस याविषयी माहिती गांधींचा भलताच उदोउदो पवारांचं राजकारण आणीबाणी इंदिराजींविषयी भारत चीन युद्ध भारत पाकिस्तान युद्ध काश्मीर मुद्दा काश्मिरी पंडितांच्या हत्या याविषयी पुस्तके लिहा भाऊ ब्लॉग तुमचा वाचतोय शेअर करतोय पण भाऊ मला अस वाटत ही पुस्तके प्रकाशित होणे गरजेचे आहे ह्या तरुणांना खर काही माहीत नाही काँग्रेसने इतिहास लपवला तो सत्य उजेडात आलेलाच आहे वा येतोय त्याला झळाळी देण्याचं काम भाऊ तुम्ही करावं तुमच्यात सामर्थ्य आहे ते भाऊ भारताच्या महाराष्ट्राच्या हिंदूंच्या भवितव्यासाठी आपण लेखणी चालवा भाऊ मी खूप प्रभावित झालो आहे तुमच्या लेखणीने
    आपण पुण्यात भेटलो देखील होतो एका शाळेत मार्गदर्शनासाठी आला होता मला वाटत नूतन मंडळ अस काहीसं नाव होतं बाजीराव रोडला

    ReplyDelete