Tuesday, February 4, 2020

सिद्धी, प्रसिद्धी आणि गांधी

Image result for priyanka dehli campign"

A lie gets halfway around the world before the truth has a chance to get its pants on. - Winston Churchill

२०१४ च्या लोकसभेत कॉग्रेसचा दारूण पराभव झाल्यावर राहुल गांधी पाच वर्षानंतर येणार्‍या सतराव्या लोकसभेतही कॉग्रेसचा तितकाच लज्जास्पद पराभव व्हावा म्हणून झपाट्याने कामाला लागलेले होते. मात्र ते साध्य गाठल्यावर राहुल थकले आहेत आणि आता २०२४ सालच्या कॉग्रेसी पराभवासाठी त्यांच्या भगिनी प्रियंका वाड्रा कंबर कसून कामाला लागलेल्या आहेत. त्यांनी तीन वर्षापुर्वी उत्तर प्रदेशात कॉग्रेस नामशेष करण्यात भावाला मोठे योगदान दिले आणि आठ महिन्यापुर्वी आपल्या भावाला अमेठी या वडिलार्जित मतदारसंघातही दणदणित पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आणली. यापेक्षा त्यांचे नेमके कोणते राजकीय कर्तृत्व आहे, त्याचा शोध अनेक नेहरूवादीही अजून लावू शकलेले नाहीत. किंबहूना केवळ नेहरू इतकाच विषय घेऊन इतिहासकार बनलेले रामचंद्र गुहा दिर्घकाळ राहूल व प्रियंका यांच्या कर्तबगारीचे अवशेष भारतातल्या अनेक डोंगरातल्या गुहांमध्ये शोधत असतात. पण त्यांनाही प्रसिद्धी मिळवण्यापलिकडे या भावंडांनी काही केल्याचे आढळलेले नाही. म्हणून चिडून शेवटी गुहांनीही गांधी घराण्याने कॉग्रेसची मानगुट सोडावी, म्हणून जाहिर आळवणी केलेली आहे. पण प्रियंकांनी गुहांनाही दाद दिलेली नाही. त्या तितक्याच उत्साहात दिल्लीत पक्षाला नामुष्कीच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी कटीबद्ध झालेल्या आहेत. अन्यथा त्यांनी अखेरच्या दिवसात दिल्लीच्या प्रचारात भाग घेऊन भाजपा व आपवर हल्ला कशाला चढवला असता? या दोन पक्षांना प्रसिद्धीपेक्षा अधिक काहीच करता आलेले नाही, असे सांगताना प्रियंकांनी केलेला युक्तीवाद त्यांच्याच घराण्याचा वारसा असल्याचे त्यांनाही आठवत नसावे ना? आपण कामे केली असतील तर त्याची जाहिरात कशाला? कामेच बोलली पाहिजेत, असा प्रियंकांचा दावा आहे. मग पंडीत नेहरू वा इंदिराजींपासून राजीव गांधींपर्यंत प्रत्येकाच्या नावाने स्मारके कशाला करावी लागली आहेत? प्रियंकांचे खरे मानायचे तर त्यांच्या या पुर्वजांनी काहीच काम केलेले नसून, फ़क्त आपल्यासाठी मरणोत्तर प्रसिद्धीची व्यवस्थाच केलेली असणार ना?

केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष वा भाजपाने काहीही कामे केली नाहीत. केली असती तर त्यांना जाहिरातीवर इतका खर्च करावा लागला नसता, असा प्रियंकाचा युक्तीवाद आहे. तोच निकष मानायचा तर स्मारके ही सर्वात मोठी जाहिरात असते. किंबहूना स्मारके ही सर्वकालीन जाहिरात असते. पण सहसा महापुरूष वा मान्यवरांची स्मारके इतरांनी व जनतेने उभारलेली असतात. नेहरू घराण्याने आपल्या हयातीतच आपली स्मारके उभारून घेतलेली आहेत. त्याचे कारण काय असावे? आपण सत्तेत होतो व महत्वाची पदे भूषवली, हे लोक विसरून जातील, याची त्यांना भिती होती का? नसेल तर आपल्या विविध पुर्वजांची व आपलीच स्मारके उभारण्याचे काय प्रयोजन होते? केजरीवाल किंवा भाजपा तरी आपल्या अलिकडल्या कामाच्या निवडणूकीपुरत्या जाहिराती करीत आहेत. त्यांनी पुढल्या पन्नास शंभर वर्षासाठी आपल्याला प्रसिद्धी देत रहातील, अशी आपलीच स्मारके उभारून घेतलेली नाहीत. त्यावर सरकारी तिजोरीतून खर्च केलेला नाही. पण प्रियंका गांधी वाड्रा यांनी असे कोणते महान कार्य आपल्या हयातीत केले आहे, की त्यांना इतकी प्रसिद्धी मिळत असते? बाकीच्यांची कामे विचारणार्‍या प्रियंकांनी आपल्या तमाम पुर्वजांच्या कामाची यादीच द्यायला हरकत नव्हती. त्यांनाही सात वर्षापुर्वी कॉग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केलेल्या कामाचा डिमडिम कशाला पिटावा लागतो आहे? त्यांनी कामे केलेली असतील, तर त्याचा गोषवारा प्रियंकानीही रंगवून सांगण्याचे कारण नाही. त्या कामाचे गोडवे दिल्लीकरांनी आपणहून गायले असते. प्रियंकांना त्याची आठवण करून द्यावी लागली नसती. पण द्यावी लागते. कारण पिढ्या बदलतात आणि लोकांची स्मरणशक्ती दुबळी असते. खेरीज श्रेयही चोरले जात असते. वाजपेयींच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मेट्रोची पायाभरणी झाली होती. पण श्रेय आजही प्रियंकाच लुबाडत आहेत ना?

दिल्लीसाठी शीला दीक्षित यांनी केलेल्या कामाचा गोषवारा देण्यापेक्षा प्रियंकांनी त्या कामावर आपल्या मातेने कसा बोळा फ़िरवला; त्याचा तपशील दिल्यास कॉग्रेसला अधिक मते मिळू शकली असती. कारण राजधानीतून कॉग्रेस पक्ष नामशेष व्हायचे खरे कारण सोनियांनी रिमोटने चालवलेले मनमोहन सरकार होते. त्या कालखंडात खुद्द पंतप्रधानालाही आपण काय करतो वा केले; त्याचा पत्ता नसायचा. त्यामुळे इतके घोटाळे झाले, की जाहिरातही करायची गरज भासली नाही. त्या घोटाळ्यांनी कॉग्रेस व शीला दीक्षितांच्या कर्तबगारीलाही कलंक फ़सला होता. किंबहूना त्यातूनच केजरीवाल नावाचे स्थानिक नेतृत्व उदयास आले आणि खुद्द शीलाजींना आपल्या विधानसभा मतदारसंघातही प्रचंड मतांनी पराभूत व्हावे लागलेले होते. शीलाजींचे आज गुणगान करणार्‍या प्रियंकांनी त्यांनाच इतक्या नामुष्कीने कशाला कोणामुळे पराभूत व्हावे लागले, त्याचे विश्लेषण जरा करावे. लोकपाल आंदोलनामुळे दिल्लीतून कॉग्रेस नामशेष झाली आणि केजरीवाल वा आम आदमी पक्षाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शीलाजींचे काम लोकांना पसंत होते. पण त्या कामापेक्षा दिल्लीकरांना सोनिया व कॉग्रेसश्रेष्ठींच्या भ्रष्टाचाराने भयभीत केलेले होते. म्हणूनच २०१३ सालात दारूण पराभव झाला आणि त्यापेक्षाही लज्जास्पद पराभव २०१५ सालात झाला. कॉग्रेसचा एकही आमदार विधानसभेत निवडून आला नाही. ते काम राहुल गांधींचे होते. त्याची जाहिरात कशी करायची ही कॉग्रेस समोरची सर्वात मोठी समस्या आहे. कारण राहुलचे काम जगाला दिसते आहे, त्याची जाहिरात करावी लागत नाही. मुद्दा कामाचा नसतो वा जाहिरातीचाही नसतो. त्यापेक्षा महत्वाची बाब केलेल्या कामामुळे जनतेला मिळालेला दिलासा परिणामकारक ठरत असतो. राहुल-प्रियंका तसे काही काम दाखवायच्या परिस्थितीत असते, तर त्याचीही जाहिरात झालीच असती. पण दाखवायचे काय? पतिदेव रॉबर्ट वाड्रांच्या जमिनजुमला खरेदीचे घोटाळे व आर्थिक गैरव्यवहार?

भाजपा असो वा केजरीवाल असोत, त्यांची कामे कमी असतील व चुकाही भरपूर असतील. पण कॉग्रेसपेक्षा त्यांचा कारभार खुप सुसह्य आहे. लोकांना उचलून ७२ हजार रुपये असेच खिशात घालण्याच्या फ़सव्या योजना नाहीत वा गरीबी हटावची लबाडी नाही. त्यामुळे लक्षात रहाण्यासारखी भव्यदिव्यता त्यांच्यापाशी नाही. सहाजिक़च थोडे काम केले तर त्याची जाहिरात त्या पक्षांना करावी लागते. निदान मान उंचावून अभिमानाने सांगावे, अशी थोडीशी कामे त्यांनी केलेली आहेत ना? कॉग्रेसने मागल्या दहावीस वर्षात काय केले म्हणून छाती ठोकून सांगू शकणार आहे? घोटाळे सोडून काही सांगायलाच नसेल, तर जाहिरातीचा मजकूर बनवणे अशक्य होते ना? त्यामुळे प्रियंका आपण जाहिराती करीत नसल्याचे सांगतात. किंवा आप व भाजपा जाहिरातबाजी करतात, म्हणून तक्रार करीत आहेत. त्यांना कामे करता येत नाहीत फ़क्त प्रसिद्धी करता येते, असा प्रियंकांचा दावा आहे. मग खुद्द प्रियंकांनी तरी अशी कुठली कामे केलेली आहेत? आईच्या हाती सत्तेचा रिमोट असताना आपल्या पतीला अनेक राज्यातल्या जमिनी व भूखंड बळकावण्याला मदत करण्यापेक्षा प्रियंकांनी अधिक कुठले जनहिताचे काम केलेले आहे काय? असेल तर त्याची जरूर जाहिरात करावी. ते शक्य असते, तर प्रियंका सलग पंधरा वर्षे अमेठीत पक्षाचे काम करीत असताना तिथूनही राहुल गांधींवर केरळात पळून जाण्याची वेळ आली नसती. भावासाठी एका मतदारसंघातले काम संभाळता आले नाही, त्या विदुषी अन्य पक्षांच्या कामाची झाडाझडती घ्यायला निघाल्या आहेत. यापेक्षा कुठले धाडस असू शकते ना? अमेठीत त्यांना आपणच केलेले काम जाहिरात करून सांगता आले नाहीच. परंतु मतदारालाही ते दिसू शकले नाह., इतके महान कर्तृत्व प्रियंकापाशी आहे. आता त्यांनी राहुलच्या अनुपस्थितीत कॉग्रेसच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतलेली आहे. मग त्या पक्षाचे भवितव्य काय असेल?

आयुष्यात कुठलेही जबाबदारीचे पद न घेता फ़क्त तोंडाची वाफ़ दवडणार्‍या राहुल व प्रियंकांना वारेमाप प्रसिद्धी मिळत असते. त्याच्या तुलनेते केजरीवाल किंवा भाजपा यांना आपल्या केलेल्या कामाचीही पावती माध्यमे देत नसतील, तर जाहिराती कराव्याच लागतात. कारण खोट्याला झटपट प्रसिद्धी मिळते असे विन्स्टन चर्चिल म्हणाला होता आणि प्रियंकाच्या असल्या वक्तव्याला माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी त्याचाच पुरावा आहे. केजरीवाल जितके दावे लरतात, तितकी कामे झालीही नसतील. पण त्यापैकी काही तरी कामे जाहिरात करण्याइतकी झालेली आहेत. प्रियंकांचे गेल्या पंधरा वर्षातले काम कुठले? अमेठीतून सख्खा भाऊ तिनदा खासदार झाला, त्या जिल्ह्याला साधे मुख्यालय देण्यापर्यंतही प्रियंकांची मजल जाऊ शकली नाही. हा सिद्धीचा मामला आहे. प्रसिद्धीचा नाही. तिथे पाच वर्षापुर्वी पराभूत होऊनही सातत्याने हजेरी लावणार्‍या स्मृती इराणी काही कामे करू शकल्या म्हणून प्रियंकांची प्रसिद्धी त्यांना हरवू शकली नाही. व्यवहारात तिथे प्रियंकांचाच नाकर्तेपणा पराभूत झाला. आज त्याच महोदया दिल्लीच्या निवडणूकीत केजरीवाल वा भाजपाला जाहिरातबाज संबोधत आहेत. चांगले आहे, कारण त्यातून त्या २०२४ च्या पराभवासाठी कामाला लागलेल्या आहेत, हेच लक्षात येऊ शकते. कारण आता सामान्य जनता मतदार जाहिरातीला भुलत नाहीत. त्यांना डोळसपणे झालेली कामे व कर्तबगार नेते ओळखता येऊ लागलेले आहेत. अन्यथा राहुलच्या ७२ हजार किंवा चौकीदार चोर जाहिरातीलाही मतदार फ़सला असता. मतदाराला सत्य ओळखण्याइतकी बुद्धी प्राप्त झाली आहे. प्रियंकांनी म्हणूनच पक्षाला अशा गाळातून बाहेर काढण्यासाठी थोडे खरे बोलण्याचा सराव केलेला बरा. निवडणूक काळात असली चटकदार वाक्ये माध्यमातून खळबळ उडवायला उपयुक्त असली, तरी राजकीय भवितव्य घडवायला आता उपयोगी राहिलेली नाहीत.

8 comments:

  1. बियंका व राओल आम्हाला तहहयात हवे आहेत भाऊ उगाच काँग्रेसजनांना सावध करू नका असले खरे लिखाण करून

    ReplyDelete
  2. इनकॉम्पिटन्ट डायनेस्टी हा काँग्रेस समोरचा सर्वात मोठा सर्वात अडचणीचा अडथळा ठरतो आहे. काँग्रेस मध्ये सो कॉल्ड डायनेस्टी ला आरसा दाखवणारा एकही मर्द नाहीये. काँग्रेस च्या घराणेशाहीला इनकॉम्पिटन्ट डायनेस्टी ह्यासाठी
    म्हणावे लागते कि जगभरात डेमोक्रेटिक देशात आयडेंटिटी पॉलिटिक्स चा वरचष्मा आहे अन काँग्रेस त्याच्या इनकॉम्पिटन्ट डायनेस्टी मुळे आयडेंटिटी पॉलिटिक्स च्या युगात मैलो न मैल मागे पडली आहे. एक लक्षात घ्या भाऊ
    २००९ साली काँग्रेस अन काँग्रेस आघाडीला सत्ता मिळाली अन काँग्रेस चा डाऊनफॉल लपला गेला. १९८०- ९० च्या
    दशकाच्या अखेरीस काँग्रेस ने राजीव गांधी ह्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. ह्यात काँग्रेसला
    ५४५ पैकी १९७ जागा मिळाल्या होत्या. त्यांना ३९.५३% मत
    मिळाली. २००९ मध्ये काँग्रेसला नो डाउट १९७ पेक्षा थोड्याच जास्त म्हणजे २०६ जागांवर विजय मिळाला. पण ह्या २०६ जागा मिळवताना काँग्रेसची मतांची टक्केवारी २८.५५% घसरली. इतकेच नव्हे तर काँग्रेस अन मित्रपक्षांना
    जरी २६२ जागा एकत्रित मिळाल्या तरी काँग्रेस अन मित्रपक्षांना एकंदरीत ३७% मत मिळाली. १९९० च्या
    दशकातील निवडणुकीत काँग्रेसने एकट्याने स्वबळावर ३९% मत घेतली त्यापेक्षा तब्बल २% कमी मतं काँग्रेस अन मित्रपक्षांना २००९ मध्ये मिळाली. काँग्रेसला हि मृत्यू घन्टा ऐकूच आली नाही कारण इनकॉम्पिटन्ट डायनेस्टी च्या
    छापाचे बोळे काँग्रेसने स्वतःहून स्वतःच्या कानात कोंबून घेतले. गांधी नेहरू, गांधी नेहरू करत सेक्युलर दांडू फिरवत
    काँग्रेसने इनकॉम्पिटन्ट डायनेस्टी ला पोसणे चालूच ठेवले
    आहे. गांधी कुटुंबियांना निवृत्त करून कायमचं इटालीला पाठवून काँग्रेस ने नरसिंहराव सारख्या एखाद्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली जर विरोधी पक्ष म्हणून तगवले तर काँग्रेसला
    आशा आहेत. protect the family at all costs हे धोरण काँग्रेस ने सोडायलाच हवे. गांधी नावाच्या इनकॉम्पिटन्ट डायनेस्टी मुळे काँग्रेस पक्ष म्हणून एकजीव राहतो ह्या बिनडोक गृहिताकामुळे protect the family at all costs सुरु झालं. गांधी फेमिलीला एकतर्फी इटली ला
    जाउ द्यावे व ज्यांना काँग्रेस सोडायची त्याना काँग्रेस सोडू दयावी. जे राहतील तेच काँग्रेसचे आशास्थान असेल. तो पर्यंत प्रियांका ताईंचा तमाशा बघू






    ReplyDelete
  3. How that Priyanka use Sir name Gandhi. ?

    ReplyDelete
  4. "A lie gets halfway around the world....."

    हे वाक्य चर्चिलने म्हटलेले नाही. पण त्याच्या नावावर खपवले जाते. मूळ वक्ता अज्ञात आहे.



    https://www.politifact.com/factchecks/2017/oct/09/colin-kaepernick/nfls-colin-kaepernick-incorrectly-credits-winston-/



    "... there’s no evidence that Churchill ever said it — although the British Bulldog does often get the credit."

    ReplyDelete
  5. भाऊ, प्रियांकावर आपण केंव्हा लिहाल याची वाटच पहात होतो, छान वाभाडे काढले आहेत. पण या गांधी घराण्याचा वीट आला आहे. इंदिरा गांधी नंतर घरातला एकही वारस नेता व्हायच्या लायक नसावा ही शोकांतिका आहे. प्रत्येक पिढीत बापसे बेटा सवाई निघावा (मूर्खपणाच्या बाबतीत) हेच आश्चर्य आहे. राहूलने लग्न न केल्याने लायकी नसताना देशातील सर्वोच्च पदावर बसण्याची अथवा देश चालवण्याची पिढीजात लालसा संपेल असे वाटते पण कॉंग्रेसचे नेते पण मूर्ख केवळ इंदिरेचा भास होतो म्हणून प्रियंका देश की नेता? यातूनच महात्मा गांधीचा कॉंग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला आमलात येईल असे वाटते. केजरीवाल आणि भाजपा यानी असेच काम करत रहावे, जनतेसमोर ठेवावे, या मर्कटांना असेच बडबडू द्यावे, यांना मद्य पाजायला तथाकथित पूरोगामी आणि मिडिया आहेतच. आम्हा सामान्यांना तेवढीच करमणूक.

    ReplyDelete
  6. भाऊ।

    सद्य स्थितीत काँग्रेसचे नेते कोणीही या तयारीत नाहीत की नेतृत्व तेचते करतंय तर स्वतः पुढे येऊन काहीतरी वेगळे करावे जो तो हाच विचार करतोय की काँग्रेसचे काहीही होवो माझी सीट राहिली पाहिजे . त्यामुळे तो पक्ष या थराला पोचला आहे आणि हे असेच चालू राहणार आहे .

    ReplyDelete
  7. भाऊ आपल्या लेखात आपण परखड पणे गांधी घराण्यातील दिवाळखोर भावंडांचे वाभाडे काढले आहेत.या दोघा भावंडांनी काँग्रेसला संपवायचा विडाच उचललेला दिसतो. काल दिल्ली येथिल प्रचार सभेत राहुलबाबा यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करत मोदी खोटारडा आहे,त्याला घरी बसवले पाहिजे,बेरोजगार युवकांनी त्याला लाठीने मारले पाहिजे अशी मुक्ताफळे उधळली आहेत. आज लोकसभेत मोदींनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला उत्तर देताना राहुलच्या वक्तव्याचा समाचार घेतला व हा निर्लज्ज पणे हसत होता तिकडे प्रियांका आपल्या मुलांना घेउन केरळ गेली असता आपल्या दोनही मुलांना लोकां समोर प्रस्तुत केले व आपल्या पुढच्या पिढीसाठी तजवीज करायला सुरुवात केली आहे. सर्व सामान्य जनतेला या गांधी घराण्याचा व राहुल प्रियांका जोडगोळीचा वीट आला आहे त्यांच्या मध्ये असलेले विनोद मुल्य पण संपत आले व केवळ उपद्रव मुल्य आहे. देशहित विरोधी भुमिका व मुस्लिमांचे लांगुलचालन आता सहन करण्या पलीकडे गेले आहे व दिल्ली येथिल निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल.शाहीन बाग घटनेमुळे जनमत काँग्रेस व आम आदमी पार्टी यांच्या विरोधात हिंदूंच्या संघटना मुळे एकवटत आहे व यासाठी राहुल व प्रियांका काँग्रेस मध्ये सक्रीय रहाणे भाजप साठी फायद्याचे आहे.

    ReplyDelete