Tuesday, February 18, 2020

ध्रुवीकरणाचा डाव यशस्वीच

Image result for shaheenbaugi

दिल्ली विधानसभेचे निकाल लागण्यापर्यंत खुद्द केजरीवाल यांनाही आपल्या इतक्या मोठ्या यशाची खात्री नव्हती. अगदी एक्झीट पोलचे आकडे बघूनही त्यांना इव्हीएमवर शंका घ्यायचा मोह आवरला नव्हता. पण निकाल लागले आणि मतदाराने कसे कामाला मत दिले; त्याचा डंका सर्वत्र वाजू लागला. खुद्द आपचे कार्यकर्ते नेतेही त्याची ग्वाही देऊ लागले. दुसरीकडे पोपटपंची करणारे राजकीय विश्लेषकही भाजपाचा डाव कसा फ़सला, त्याचे दाखले देत ‘धृवीकरण’ फ़सल्याचे ढोल वाजवू लागले. हे फ़सलेले धृवीकरण काय भानगड आहे? तर भाजपाने नागरिकत्व कायदा सुधारणा व शाहीनबागचा प्रचारात अतिरेकी वापर केलेला होता. त्यात मुस्लिमांचा पुढाकार असल्याने त्याच मार्गाने भाजपा हिंदू-मुस्लिम असे मतदाराचे ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप सर्रास केला जात होता. तसे झाले नाही म्हणून तो भाजपाचा डाव फ़सला, हा निष्कर्ष काढला जातो आहे. पण वास्तवात दोन्ही बाबी चुकीच्या आहेत. कारण या मतदानात धृवीकरण नक्कीच झाले आणि त्यासाठीचा कॉग्रेसचा डाव मात्र पुरता तोंडघशी पडला आहे. कारण धृवीकरणाचा डाव भाजपाचा नव्हता, तर आपले नामशेष झालेले अस्तित्व टिकवायला कॉग्रेस पक्षाने तो पद्धतशीरपणे केलेला डाव होता. ते धृवीकरण यशस्वी झाले. मात्र त्याचा लाभ केजरीवाल यांना मिळून गेला आणि कॉग्रेस राजधानी दिल्लीत आणखी धुळीस मिळाली. विश्लेषणात त्याचा उहापोह आवश्यक असताना भाजपाच्या अपयशाने सुखावलेल्यांना वास्तव कसे बघता येणार? विश्लेषण गेले चुलीत, भाजपा अपयशाचा उत्सव सुरू झाला आणि तिथेच वास्तवाचा बळी गेला आहे. हे धृवीकरण काय असते आणि त्याचा लाभ केजरीवाल यांना आणि नुकसान कॉग्रेसचे कसे झाले? त्यासाठी बारकाईने निकालांचा अभ्यास करावा लागतो. आधी उत्तर काढून नंतर गणित वा समिकरण मांडल्याने विश्लेषण होऊ शकत नसते. दिशाभूल मात्र करता येते.

पहिली गोष्ट म्हणजे नागरिकत्व सुधारणेचा अवास्तव प्रचार भाजपाने केला, ही चुक मान्य करावीच लागेल. स्थानिक मतदानात व निवडणूकीत राष्ट्रीय वा परराष्ट्र धोरणाचे मुद्दे फ़ारसे यशस्वी ठरत नसतात. त्यापेक्षा स्थानिक मुद्दे निर्णायक ठरत असतात. त्यामध्ये स्थानिक नेता व प्रादेशिक विषय अगत्याचे असतात. दिल्लीकरांसाठी भाजपाने आकर्षक मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिलेला नव्हता आणि नागरिकत्व कायदा वा शाहीनबाग येथील धरण्याला महत्व दिले. त्यापेक्षा शहरी लोकसंख्येच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर केजरीवाल आपला प्रचार केंद्रीत करून होते. उलट कॉग्रेसही भाजपाप्रमाणेच राष्ट्रीय मुद्दे घेऊन मैदानात उतरली होती. आपली मते फ़ारशी नाहीत, पण एखाददुसरा आमदार आला, तरी नव्याने पक्षाला पालवी फ़ुटावी इतकीच कॉग्रेसची अपेक्षा होती. त्यातला अधिकचा हिंदू मतदार आपण मिळवू शकतो, हा आत्मविश्वास कॉग्रेसने पुर्णपणे गमावला आहे आणि म्हणूनच अधिकाधिक मुस्लिम मतदार आपल्याकडे खेचून तितके तुटपुंजे यश मिळवण्यासाठी कॉग्रेसने धृवीकरणाचा डाव खेळला होता. फ़क्त डाव नाही, तर त्यासाठी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावलेली होती. विधानसभा प्रचारापेक्षाही कॉग्रेसने आपली ताकद शाहीनबागमध्ये ओतली होती. शशी थरूर यांच्यापासून प्रत्येक नेत्याला तिकडे जाऊन कॉग्रेस मुस्लिमाचा पक्ष असल्याचे सिद्ध करण्याच्या कामासाठी जुंपलेले होते. त्यातून एकगठ्ठा मुस्लिम मते आपल्याला मिळवून एकदोन आमदार यावेत; अशी इच्छा बाळगली होती. म्हणजे मुस्लिम मतांचे धृवीकरण ही कॉग्रेसची रणनिती होती. तो आम आदमी पक्षासाठी धोक्याचा इशारा होता. तरीही केजरीवाल अतिशय सावधपणे त्याकडे बघून होते आणि अशा मुर्खपणातून आपला हिंदू मतदार विचलीत होऊ नये, याची पुरती काळजी त्यांनी घेतली होती. तिथेच कॉग्रेसचा धृवीकरणाचा डाव फ़सला.

एक मात्र मान्य करावे लागेल. एक गठ्ठा मुस्लिम मते आपल्यालाच मिळावीत, म्हणून कॉग्रेसला धृवीकरण करायचे असले तरी त्यात भाजपाची जाणता अजाणता मदत मात्र आवश्यक होती आणि भाजपाने ती मदत पुरवली हेही मान्य करावेच लागेल. हिंदूमतांचे धृवीकरण होऊन सर्व मते आपल्याला मिळतील, अशी भाजपाची अपेक्षा कधीच नव्हती. कितीही आटापिटा केला तरी सर्व हिंदू आपल्यामागे एकवटणार नाहीत, हे एव्हाना भाजपाच्या लक्षात आले आहे. पण भाजपाने हिंदूत्वाचा गवगवा केला, मग मुस्लिम मतांचे धॄवीकरण व्हायला हातभार लागतो, हे देखील तितकेच सत्य आहे. कारण मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात, ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही. पण मुस्लिम नेहमी एकाच पक्षाला निष्ठेने मतदान करतात, असे अजिबात नाही. धृवीकरणाची ही गठ्ठा मते भाजपाला पराभूत करू शकेल अशा पक्षाकडे वळत असतात. त्यामुळे मुस्लिमांना त्यांचा कट्टर समर्थक भासवणार्‍या पक्षाकडेच हा गठ्ठा वळू शकतोम, ह्या भ्रमात रहाणार्‍यांची दुर्दशा होत असते. इथे एक बाब लक्षात् घेतली पाहिजे. केजरीवाल यांनी कितीही झाले तरी शाहीनबागला भेट दिली नाही वा आपल्या भाषणातून त्याचे समर्थन केले नाही. पण भाजपावर तोफ़ा डागल्या होत्या आणि दिल्लीत भाजपाला तेच पराभूत करू शकतील; अशी मुस्लिमात समजूत निर्माण व्हाची हा नेमका डाव खेळला होता. परिणामी शाहीनबाग विषयी मौन धारण करूनही त्यांनाच मुस्लिमांच्या मतांचा गठ्ठा मिळून गेला. उलट कॉग्रेसला त्यापैकी एकदोन टक्केही मते मिळाली नाहीत आणि त्या तमाशामुळे हिंदूमते मात्र कॉग्रेसने अकारण गमावलेली आहेत. म्हणजे डाव कॉग्रेसचा पण नुकसानही कॉग्रेसचेच होऊन गेले. त्यामुळे धृवीकरण झाले नाही, असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही. ते कोणी केले व कोणाच्या पथ्यावर पडले ते समजून घ्यायला हवे आहे.

कॉग्रेस प्रमाणेच केजरीवाल यांनी मुस्लिम लांगुलचालन केले असते, तर त्यांचीही काही प्रमाणात हिंदूमते घटली असती. ती जाऊ नयेत म्हणूनच केजरीवाल शाहीनबाग बाबतीत मौन धारण करून बसले होते, त्यापेक्षा भाजपा रोखण्य़ावर त्यांनी भर दिला होता आणि त्याचे फ़ळ त्यांना मिळालेले आहे. लोकसभेत २२ टक्के मते मिळवणारी कॉग्रेस ४-५ टक्केपर्यंत खाली आली आणि ती घटलेली १७-१८ टक्के मते ‘आप’कडे गेली. त्यामुळे भाजपा व आप एकाच पायरीवर येऊन उभे राहिले. या समसमान मतांच्या टक्केवारीत आणखी दहाबारा टक्के मते अधिक मिळवू शकेल, त्याच्या गळ्यात सत्ता माळ घालणार होती. तिथे नवरामुलगा म्हणून केजरीवाल हा चेहरा समोर होता. तर भाजपाने आपला नवरामुलगा स्वयंवराच्या मंडपात आणलेलाच नव्हता. सहाजिकच उपलब्ध मुलाला स्वयंवर सोपे करून टाकलेले होते. दिल्ली हे अनेक लहानमोठ्या शहरांचे एक महानगर असून तिथे कारभारी लोकांना दिसणारा हवा असतो. त्यात केजरीवाल यांनी शहरवासियाला भुरळ घालणार्‍या योजना व आश्वासनांची खैरात केलेली होती. भाजपाला स्थानिक मुद्दे घेता आले नाहीत, की चेहरा पेश करता आला नाही. त्यातच कॉग्रेसच्या सापळ्यात भाजपा फ़सला आणि शाहीनबागेला त्यांनी प्रचारात प्राधान्य दिले. त्यात केजरीवालच्या पक्षाला ओढण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांनी सावधपणे भाजपाला दाद दिली नाही आणि हिंदूमतांच्या मनात आपविषयी संशय निर्माण होऊ दिला नाही. तिथे त्या पक्षाची हिंदूमते शाबूत राहिली आणि जिंकायला आवश्यक असलेला मुस्लिम मतांचा गठ्ठा कॉग्रेसने त्यांच्या झोळीत टाकला. त्यात भाजपाने अनावश्यक मुद्दे वापरून हातभार लावलेला आहे. त्यामुळे दिल्लीत धृवीकरण झाले नाही, या बाष्कळ बडबडीत अर्थ नाही. पण ते धृवीकरण भाजपाने केले नव्हते, तर कॉग्रेस पक्षाने करायचा डाव खेळला होता. त्याला भाजपाचा हातभार लागला आणि लाभ मात्र आपला मिळून गेला.

13 comments:

  1. भाऊ, स्थानिक निवडणुकीत नेत्याचा चेहरा महत्वाचा असतो हे आपले निरिक्षण अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रात फडणवीस १०५ आमदार मिळवून गेले. राजस्थान व मध्यप्रदेश येथे कॉंग्रेसला निसटते बहूमत मिळाले त्याचे कारणच हे आहे. पण भाजपाला आता आपल्या चाली बदलाव्या लागतील हेच खरे.

    ReplyDelete
  2. भाजपची व्यूह रचना चालली नाही, हे महत्वाचे.
    ये संयोग नही, प्रयोग है, हे मा.पंतप्रधानांचेच वाक्य, देशातील नागरिकांना सावधानतेचा इशारा होता व आहे.

    ReplyDelete
  3. ध्रुवीकरण= दोन ध्रुव एकमेकांच्या बरोबर विरुद्ध,लांब असतात.तसे होणे = ध्रुवीकरण.(धृ नव्हे ध्रु )poles apart आणि polarization आठवले की आपण ध्रुवीकरण वापरतो .

    ReplyDelete
  4. भाऊ, तुमच्या लेखनशैलीला सलाम.! तुमचे लेख वाचून तुमच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण होत आहे. तुमचे शब्दांचे भांडार पाहून खूप थक्क व्हायला होतं. तुमच्या नवीन ब्लॉगची मी दररोज वाट पाहतो आणि वाचतो.

    ReplyDelete
  5. Is there a possibility of covert understanding between aap and con for muslim votes and the reciprocal arrangement where aap votes for con candidates in other states? I suspect the gameplan is very slyly worked out for Bihar and Bengal elections. BJP must have identified this. They have underestimated the male dominance over household and if they fail to recognize the failure of triple talaq and ujjwala scheme they will have to pay the price through their nose. The polarization of votes also needs to be evaluated from this angle. The pre-poll lecture of amanatullah Khan and blanket support of kejriwal to his announcement of raising salaries of mullahs etc should serve as an eye opener. The only silver lining of hope is the vote percentage of clouds in that election. The political analysts should keep a close watch on the actions of the chameleons.

    ReplyDelete
  6. भाऊ या मध्ये अजून एक गोष्ट घडली आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी उघडपणे शाहीनबाग आंदोलनाला पाठिंबा दिला आणि हे नेते शेवटच्या फेरीपर्यंत पिछाडीवर होते अक्षरशः कसेबसे निवडून आले, केजरीवाल यांना उघड उघड मुस्लिम समाजचा पाठिंबा घेणे शक्य झाले नाही, इथे कळीचा मुद्दा हा आहे की इथे मुस्लिम समाजाचा पाठिंबा कोणी चोरून घेईल आणि तरी पण हा समाज मजबुरीने भाजप एक गठ्ठा मतदान करील ही स्थिती कायमस्वरूपी राहील का?आणि इथेच अमित शहा यांचे धूर्त राजकारण दिसून येते ते म्हणजे हे सगळे प्रश्न त्यांनी पहिल्या सहा महिन्यात सोडवून टाकले, मोदी सरकारची मुदत संपण्याची वेळ मे 2024 मध्ये आहे तो पर्यंत कोणीही इतके प्रदीर्घ आंदोलन चालवू शकत नाही, मोदी विरोधी पुरोगाम्यांना शाहीनबाग आंदोलनाचा हाच एकमेव धडा आहे

    ReplyDelete
  7. श्री भाउ तोर्सेकर साहेब,

    आपले विश्लेषण योग्य वाटते. अजून एक शक्यतेचा विचार व्हावा. भाजपनेच मुद्दाम शाहीनबागेचा विषय पेटवून हिंदूंचे ध्रुवीकरण होते का ते तपासले असावे. भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. केजरीवाल यांना सुद्धा हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाची कुणकुण लागलेली असणार. म्हणून केजरीवाल यांनी शाहीनबागेचा विषय टाळला, कलम ३७० काढल्यावर सरकारला पाठींबा दिला आणि राममंदिराचा निकाल लागल्यावर समाधान व्यक्त केले.

    नरेन्द्र थत्ते

    ReplyDelete
  8. Sir, Probably BJP also would have tested 'Hindu Vote Bank' against 'development' agenda. Next General elections would be fought between BJP and all others. So BJP need to consolidate its vote bank.

    ReplyDelete
  9. Local strong leadership nirman karawich lagel.

    ReplyDelete
  10. ना खिचो कमान को..... म्हणजेच धनुष्यबाण आणि तलवारी एखाद्या देशाचे जेवढे नुकसान करू शकत नाहीत त्याहून जास्त असे देशाचे नुकसान (म्हणजेच एखाद्या तोफखान्यातील तोफगोळ्यांच्या इतके नुकसान) विकली गेलेली पत्रकारिता करू शकते पहायचे असेल तर अखबार उघडून पहा त्यात तुम्हाला भरपूर खोटे नाटे वाचायला मिळेल.

    ReplyDelete
  11. भाऊराव,

    मला एक अजिबात कळलं नव्हतं की सुप्रिया सुळे कशास्तव शाहीनबागेत गेलेल्या ते. हा लेख वाचून त्यांच्या वर्तनाची संगती लागते. काँग्रेसकडून त्यांना आग्रह झाला असणार. हा ध्रुवीकरणाचा डाव काँग्रेसचाच दिसतो आहे.

    गदारोळी गवताच्या गंजीत लपलेली तथ्यांची सुई चटकन दिसून येत नाही. मात्र तुमची पारखी नजर बरोबर ऐवज टिपते.

    धन्यवाद! :-)

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  12. Why BJP did not bring Harsh Vardhan ? Tiwari was no match for Kejariwsl.

    ReplyDelete