Monday, February 10, 2020

करोना (ब्रेकिंग न्युज) व्हायरस

sharada pawar slapped के लिए इमेज नतीजे

शनिवारी खांबिया नावाच्या कुणा शरद पवार भक्ताने घनशाम पाटिल व भाऊ तोरसेकर हे शरद पवार हत्येचा कट शिजवित असल्याची ‘गोपनीय तातडीची तक्रार’ पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. त्याविषयी चौकशी करण्याचे व गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. त्यानंतर अल्पावधीतच ती बातमी बहुतेक मराठी वाहिन्यांवर ब्रेकिंग न्युज म्हणून झळकू लागली. काही वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर आली आणि एका वाहिनीच्या बातमीदाराने प्रतिक्रीया विचारण्यासाठी फ़ोन केल्याने मला समजली. हा सगळा प्रकार मग गाजावाजा करण्यासाठी वापरला गेला. आमचे युट्युब व्हिडीओ पवार हत्येला चिथावण्या देऊन प्रवृत्त करणारे असल्याचा जावईशोध त्या गृहस्थांनी लावला आणि विनाविलंब राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे कोणी चव्हाण नावाचे पदाधिकारी यांनी सोशल मीडियात आपल्या व्हिडीओसहीत आमचे हातपाय तोडण्याची जाहिर धमकी देऊन टाकली. त्यामुळे कोण कोणाला चिथावण्या देतोय व कोणाच्या हत्येचे ह कारस्थान आहे, त्याचाही पर्दाफ़ाश होऊन गेला. पण यानिमीत्ताने मुख्यप्रवाहातील माध्यमांच्या चेहराही समोर येऊन गेला. कुणाच्या निरर्थक पत्राची ब्रेकिंग न्युज होते. पण त्यावरून तंगड्या तोडून हातात देण्याच्या व्हिडीओची साधी दखलली त्याच वाहिन्या घेत नाहीत, ही पत्रकारितेची दुर्दशा आहे. या निमीत्ताने मग दुसर्‍या एका शरद नामक नेत्याचे स्मरण झाल्याशिवाय रहात नाही. सुदैवाने ते शरद नावाचे नेता महाराष्ट्रातले नाहीत किंवा पवारही नाहीत. पण त्यांचे वैचारिक बौद्धीक शहाणपण अधिक आहे, हे मानावेच लागते. माझ्यापेक्षाही त्यांनी असल्या पत्रकारितेच्या धमक पिवळेपणावर नेमके भाष्य संसदेच्या व्यासपीठावर केलेले होते आणि योगायोगाने ते महाराष्ट्रातल्या शरद (पवार) विषयीच असावे हा धक्कादायक भाग आहे. त्यांचे नाव आहे शरद यादव!

२०११ साली शरद पवार युपीए सरकारमध्ये कृषीमंत्री होते आणि त्यावेळी एका शीख तरूणाने त्यांना दिल्लीतल्या कुठल्या समारंभाला उपस्थित रहायला जाताना गाठून थप्पड मारली होती. सुरक्षा कर्मचार्‍यांनी तात्काळ झडप घालून त्याला अटकही केली होती. मग ती देशातली सर्वात मोठी बातमी झाली होती. त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आणि पुढल्या काळात तो फ़रारीही झाला. पण त्याचे पुढे काय झाले, त्याची फ़िकीर शरद पवारांनी केली नाही किंवा हे कोणी खांबिया वा अन्य राष्ट्रवादी पदाधिकारी आहेत, त्यांनी केली नाही. माध्यमांनाही हल्लेखोर अमरिंदर वा हरविंदर नावाच्या त्या मारेकर्‍याचे काय होते, त्याकडे ढुंकून बघायची बुद्धी झाली नाही. असो, त्यावेळी हा विषय संसदेतही आलेला होता आणि त्यावर बोलताना जनता दल युनायटेड पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी मारेकर्‍यापेक्षा त्या बातमीचा गदारोळ करणार्‍या वृत्तवाहिन्यांवरच तोफ़ डागलेली होती. घडलेली घटना निषेधार्ह नक्कीच आहे. पण त्या मारेकर्‍याने पवारांना एकच थप्पड मारली, हेही विसरता कामा नये. मात्र त्या चित्रणाचे दिवसभर प्रक्षेपण करताना किंवा एकाच प्रक्षेपणात पुन्हा पुन्हा तेच दाखवून ‘माध्यमांनी मात्र पवारांना लक्षावधी थपडा मारून घेतल्या’. हा आक्षेप माझा नाही, तर शरद यादव यांचा आहे. त्यातून त्यांनी गुन्हेगाराचा निषध केला. पण माध्यमातल्या विकृतीवर नेमके बोट ठेवलेले होते. शनिवारी तोरसेकर व घनशाम यांच्याविषयी तक्रार होताच मराठी वाहिन्यांनी जे काहूर माजवले आणि ब्रेकिंग न्युज देण्याची धडाडी दाखवली, त्यामुळे शरद यादव आठवले. कारण यादवांनी केलेल्या व्याख्येला या वाहिन्यांनी ‘न्याय’ दिला. पत्रकारिता आणि माध्यमांना सध्या कुठल्या करोना (ब्रेकिंग न्युज) व्हायरसने ग्रासलेले आहे, त्याची लक्षणे अशा बातम्यातून सापडतात. अन्यथा ‘गोपनीय’ शब्दाची तरी त्यांनी लाज राखली असती ना?

पन्नास वर्षाच्या पत्रकारी जीवनात आम्हाला जी भाषा शिकता आली व लिहीण्याच्या मर्यादा आम्ही पाळल्या, त्यात गोपनीय शब्दाचा अर्थ झाकलेले किंवा गुपचुप करायचे काम वा चौकशी असे अर्थ आम्हाला शिकवले गेलेले होते. आजकाल मराठीच नव्हेतर सगळ्याच भाषांच्या शब्दकोषात आमुलाग्र बदल झाला आहे. पोलिस ठाण्यात कोणी ‘गोपनीय’ चौकशीसाठी तक्रार दिली तर विनाविलंब तिचा जगभर गवगवा करण्याला गोपनीय म्हणतात, हे मला नव्याने शिकायला मिळालेले आहे. अशा तक्रारी वा पत्रे आमच्या काळात खुलेपत्र वा अनावृत्तपत्र म्हटले जायचे. आजकाल भाषा व शब्दांचे अर्थ कमालीचे बदलून गेले आहेत. पुर्वीच्या काळात कारस्थान कट वगैरे गोष्टी गुपचुप व्हायच्या. निदान पत्रकार वा शहाण्या मानल्या जाणार्‍या वर्गाची तशी समजूत होती. आजच्या बुद्धिमान पत्रकारांच्या मते जाहिरपणे काही बोलण्याला वा करण्याला कारस्थान समजले जाते. असो, सांगायचा मुद्दा इतकाच, की आम्हा दोन सामान्य पत्रकारांवर जे आरोप झाले त्याची झटपट ब्रेकिंग न्युज करण्यातला उत्साहही समजू शकतो. परंतु तश्या बातम्या झळकल्यावर आमच्या तंगड्या तोडून हातात देण्याच्या व्हिडीओविषयी माध्यमांनी अज्ञानी रहायचे कारण समजू शकले नाही. अन्यथा असल्या गोष्टी वा धमक्यांचे व्हायरस बनवून प्रक्षेपित करण्याचे मोठे कौशल्य आजच्या पत्रकारितेत ठासून भरलेले आहे. त्यासमोर चीनचा करोना व्हायरसही बिचारा फ़डतूस ठरावा. साध्या पत्राचा इतका गवगवा आणि थेट हातपाय तोडण्याच्या धमकीला बातम्यात स्थानही नसावे, हे लक्षात आले आणि शरद यादव आठवले. हरविंदरने एकच थप्पड मारली. पण त्याचे निमीत्त करून माध्यमांनी तेव्हा पवारांना लक्षावधी थपडा मारून घेतल्या, असे यादव म्हणाले. घनशाम व भाऊ तोरसेकरच्या बाबतीत काय वेगळे घडले आहे? खांबियांनी एक साधे पत्र दिले. तर वाहिन्या व वर्तमानपत्रांनी आम्हाला शंभरवेळा तरी कारस्थानी म्हंणून घेतले ना? पण राष्ट्रवादीच्या युवक नेत्याच्या धमकीविषयी साळसूद मौन आहे. की ‘अर्थ’पुर्ण मौन आहे?

हे सर्व बघितले मग कर्तारसिंग थत्ते आठवले. आजच्या अशा बहुतांश स्टार पत्रकारांना ते नाव ऐकूनही माहिती नसेल. तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी चुकीच्या कालखंडात जन्म घेतला होता. आज असते तर वाहिन्या व वर्तमानपत्रांसाठी ते स्टार न्युजमेकर झाले असते. त्यांच्या बातम्या देण्यापलिकडे माध्यमांना राहुल गांधी वा संजय राऊत यांच्याकडे वळून बघायलाही फ़ुरसत मिळाली नसती. कोण होते कर्तारसिंग थत्ते?  ते अतिशय चमत्कारीक व्यक्तीमत्व होते. पण तेव्हा कर्तारसिंग थत्ते ज्या गोष्टी करायचे, त्याची आम्ही पत्रकार मजा बघायचो, त्यातला आनंद घ्यायचो. पण त्यांच्या वर्तनाला कधी महत्वाची बातमी मानले गेले नाही वा त्याला अशी ठळक प्रसिद्धी दिली गेली नाही. आजकाल देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक पक्षात तसल्या मनोवृत्तीचे वा विक्षिप्त लोक बोकाळले आहेत आणि माध्यमांसाठी ते न्युजमेकर होऊन गेलेले आहेत. त्या जमान्यात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याला शहाणपणा मानले जात होते आणि हल्ली त्यांनाच स्टार म्हणून पेश करायची माध्यमात स्पर्धा चालते. मला तो मुर्खपणा वाटतो, म्हणून मी स्वत:ला कालबाह्य पत्रकार समजतो. म्हणूनच इथे कर्तारसिंग थत्ते यांची थोडी माहिती पुरवणे अगत्याचे वाटले. कधीकाळी त्यांनी ‘लोकसत्ते’च्या कार्यालयात जाऊन विजय तेंडूलकर यांना छडीने चोपलेही होते. त्याची मात्र बातमी झालेली होती. किंवा थत्ते नेहमी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या विरोधात उत्तरप्रदेशच्या फ़ुलपूर मतदारसंघात जाऊन निवडणूकही लढवायचे. त्यामुळेही ती बातमी झालेली होती. पण ती आतल्या पानात कुठेतरी चार ओळीत संपवलेली असायची. मला वाटते आज थत्ते हयात असते, तर बहुधा देशभरच्या वाहिन्यांसाठी सुपरस्टारच ठरले असते.

कर्तारसिंग थत्ते यांच्याकडे मानसिक संतुलन बिघडलेला हुशार माणूस म्हणून बघितले गेले. कडवे सावरकरवादी ही त्यांची ओळख होती आणि हिंदू मुर्दाड झालेत अशी त्यांची तक्रार होती. म्हणून त्यांनी शीख धर्म स्विकारला होता व त्यातून आपल्याला हत्यार बाळगण्याचा अधिकार प्राप्त झाला, म्हणून ते खुश असायचे. त्यामुळे त्यांचे नाव कर्तारसिंग थत्ते झाले. ते धोतर नेसायचे आणि अंगावर पंचा पांघरून कमरेला खंजीर लावून फ़िरायचे. पण त्याचा हिंसक वापर त्यांनी केल्याचे कधी ऐकायलाही मिळाले नाही. तेंडूलकरांनी हिंदू भावना दुखावणारे लिखाण केले असा त्यांचा आक्षेप होता, म्हणून ते लोकसत्तेच्या कार्यालयात गेले व त्यांच्यावर छडी चालवली होती. पण विक्षिप्त म्हणून त्यावर पुढे काही झाले नाही. आपल्या त्या मानसिकतेमध्ये त्यांच्या प्रत्येक कृतीला हास्यास्पद मानून दुर्लक्ष करण्याला पत्रकारिता किंवा त्यातला पोक्तपणा मानले गेले. खरेच एका अर्थाने थत्ते आज दुर्दैवी वाटतात. बहुधा त्यांनी साल व शतक बघितल्याशिवाय जन्म घेतला. आजच्या काळातली माध्यमे त्यांना पोषक होती. पत्रकारिताही त्यांच्यासाठी पुरक होण्याच्या युगात त्यांची अनुपस्थिती खटकतेही. म्हणून मी स्वत:ला किंवा आमच्या पिढीतल्या पत्रकारितेला आजच्या युगात कालबाह्य समजतो. कारण कालपरवा ज्याने कोणी माझ्या विरुद्ध शरद पवारांच्या हत्येचे कट शिजवणारा म्हणून तक्रार दिली, त्याचा गाजावाजा होऊ शकला. तो मागल्या पिढीतले पत्रकार कार्यरत असताना होऊ शकला नसता. निदान अशी कोणी तक्रार वा पत्र दिल्यावर त्याची शहानिशा केल्याशिवाय बातमी दिली गेली नसती. शहानिशा म्हणजे तरी काय हे आजच्या पत्रकारांच्या खिजगणतीत नसते. त्यामुळे कोणीही कोणावरही काहीही बेताल आरोप करणे वा बेछूट बोलणे ही ब्रेकिंग न्युज वाटते. अन्यथा माझ्या विरोधातल्या तक्रारीचे बारकाईने वाचन करून मगच बातम्यांचे बार उडवले गेले असते. माझा अशा पत्राच्या निमीत्ताने यादवांच्या भाषेत ‘शरद पवार’ करून बातम्यांच्या थपडा लगावल्या गेल्या नसत्या.

19 comments:

 1. भाऊ दिल्लीतील निवडणुकांचे विश्लेषण लिहा.

  ReplyDelete
 2. ह्या लेखातील वाहिन्या आणि छापील वर्तमानपत्रातून सुरु असलेली सवंग पत्रकारिता या वरील विचार माझ्या सारख्या असंख्य लोकांच्या मनात बराच काळ रेंगाळत आहेत. राजकारणाने समाजाचा विनाश करण्याचा जणू चीन-पाकिस्तानकडून विडाच घेतला असावा.

  ReplyDelete
 3. भाऊ आपण जे बोललात ते अगदी योग्य आहे.

  ReplyDelete
 4. भाऊ, सध्या या भुक्कड पत्रकार लोकांचाच जमाना आहे व त्यांच्या बरोबर जुनेजाणते समजले जाणारे नेते पण भुक्कड झालेत. यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे. आपल्या विरोधातील या तक्रारीत किती तथ्य आहे हे आम्हाला सर्वांना चांगले माहिती आहे पण आपल्या लेखांची जाणत्याला भिती वाटते आहे हे त्यातील सत्य आहे. भाऊ तोरसेकर पवारांच्या खुनाचा कट रचायला पवार भाऊंचे ना राजकीय स्पर्धक ना विरोधक, पण हे समजायला नुसते जाणता हे बिरुद मिरवून चालत नाही तर तसे असावे लागते. पवार ना जाणते आहेत ना टिका समजण्या इतके दिलदार आहेत. त्यांना व त्यांच्या अनुयायाना टिका समजत नाही हेच खरे, म्हणून तर हातपाय तोडण्याची भाषा करुनसुद्धा पवारांची प्रतिक्रिया काहीच नाही नव्हे तर खुनाच्या कटाची तक्रार दिवसभर मिडियावर असतानासुद्धा कोणतिही प्रतिक्रिया नाही. हा सगळा प्रसिद्धी स्टंट असावा किंवा मला मारायला नवीन गोडसे तयार होतोय हे लोंकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न असावा, म्हणजे आपोआपच जात निघते.

  ReplyDelete
 5. एकंदर माहिती वाचून असे वाटले कर्तारसिंग थत्ते यांनी जो विक्षिप्तपणा केला तो पैसा, नाव मिळवण्यासाठी नसावा त्यामुळे आजच्या TRP लोभी प्रत्रकारांनाही त्यांच्या हातच्या छड्या खाव्या लागल्या असत्या! 😁😁

  ReplyDelete
 6. We are with you,pleas p continue your writing and enlightening people about nationalism and attacking dirty politicians.

  ReplyDelete
 7. भाऊराव,

  या गदारोळाचं मूळ शरद पवार आहेत त्यांच्याकडे येऊया. पवारांच्या चमच्यांनी पवारांना खूष करायला हा तमाशा केलाय. तर मग प्रश्न असं की, भाऊ तोरसेकर नामे यत्किंचित इसमावर शरद पवार खवळले का?

  माझ्या मते त्याचं काय आहे की, तुमच्या विश्लेषणामुळे पवारांचं राजकारण महाराष्ट्रातनं दखलशून्य झालंय. प्रत्यक्षात पवार जरी दखलपात्र शक्ती असले, तरी त्यांचं राजकारण झपाट्याने बेदखल (irrelevant) होत चाललंय. आणि वाचक मोठ्या प्रमाणावर या तथ्याशी सहमत होताहेत. म्हणून पवारांची सटकली.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 8. भाऊ तुम्ही आजच्या पत्रकारितेचे बरोबर विश्लेषण केले आहे, मला या गोष्टीचे खूप दुःख होते की खिशाला पेन आणि हातात माईक आला की हे लोक स्वतः ला पत्रकार समजू लागतात. एवढ्या पोकळ पत्रकारांची मला खूप दया येते आणि वाटते हेच का ते लोकशाहिचे चौथे खांब??

  ReplyDelete
 9. असूदे, चांगले झाले. युट्युब चॅनलला फुकटात प्रसिद्धी मिळाली

  ReplyDelete
 10. भाऊ तुमचे followers वाढणार एवढ नक्की. कारण आजकाल हाच ट्रेण्ड आहे. आणि तुम्ही म्हणाला तसे पत्रकारच त्याला जबाबदार असणार. जे लोक ह्या माध्यमापासुन लांब आहेत ते पण तुमच्या blog ला भेट देणार.

  ReplyDelete
 11. Harvindar cha satkar, karayla pahije.

  ReplyDelete
 12. भाऊ काल एका वाहिनीचा जेष्ठ पत्रकार म्हणे भाजप दिल्लीमध्ये सरकार स्थापन करु शकले नाही म्हणुन आनंदाने स्टुडिओत नाचला म्हणे.

  ReplyDelete
 13. भाऊ आपला लेख वाचला आणि नंतर रात्री ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्याविषयी बातमी वाचली. त्यांचे ते वादग्रस्त विधान तेथील उपस्थित काही लोकांनी ऐकले असेल. पण माध्यमांनी तेच विधान सविस्तर छापून लक्षावधी लोकांपर्यंत पोहचवले. त्यांना नोटीस पाठवली पण अशीच एक नोटीस माध्यमांना पाठवली पाहिजे. तेही अपप्रचाराला जबाबदार आहेत.
  पूर्वी शालेय जीवनात कधीतरी संध्यानंद वाचायला मिळायचा. त्यातील जगभरातल्या चमत्कारिक बातम्या निव्वळ मनोरंजन म्हणून वाचल्या जायच्या. सध्या माध्यमांची स्थिती त्याहीपेक्षा वाईट आहे. खोटे बिनदिक्कत छापतात, दाखवतात. कुणी बोट दाखवले की आहेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाखाली बोंब मारणे

  ReplyDelete
 14. कर्तारसिंग हे नाव वाचल्यावर एकदम स्मृती जागृत झाल्या त्या काळात मी १६/१७ वर्षांचा असेन. मला ती लोकसत्ता संदर्भात बातमीही आठवली. त्यावेळी थत्तेंचे नांव कर्तारसिंग कसे? हे समजत नसे. पंडित नेहरू यांच्या विरोधात निवडणूक लावणारा माणूस ग्रेट वाटायचा. आता टीका कोणालाही सहन होत नाही, व सूर्यापेक्षा वाळू गरम असल्याचे स्पष्टच जाणवते. असो, आपल्या अशा अनेक लेखामुळे गतस्म़ृती जाग्या होतात हे नक्की.

  ReplyDelete
 15. भाऊ.
  नमस्कार
  आपले लिखाण योग्य मर्माचा वेध घेत आहे याचा पुरावा म्हणजे याधमक्या

  ReplyDelete
 16. भाऊ, हा प्रकार म्हणजे "राजापेक्षा सेवक राजनिष्ठ" अश्या सदरातील वाटतो. चाटूगिरी आणि चमचेपणाची मर्यादा ह्या खाबिया इसमाने ओलांडली आहे. कुतूहल म्हणून त्यांच्यावर गूगल शोध घेतला आणि त्यांचे एक आत्मस्तुतीने ओसंडून वाहणारे संकेतस्थळ सापडले. मला तर प्रश्न पडतो की ही फूस खरोखरच पवारांनी लावली असेल की अल्लड रडके बाळ जसे काहीतरी कारवाया करून आई-वडिलांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते, तसे खाबिया अगदी साहेबांच्या अनुग्रहासाठी आतुर झालेत? ह्या अश्या लीलांना जर साहेब संमती देत असतील आणि त्यांचा अनुग्रह होणार असेल तर त्यांच्या व्यवस्थापनाची, आणि राष्ट्रवादीत त्यांनी जोपासलेल्या राजकीय संस्कृतीची पण, कीव करावीशी वाटते. एकंदर, ज्या ज्या लोकांनी भाजपवर मोदींची शिवाजीशी तुलना करणारे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर टीका केली त्यांना या दोन घटनांमधले साम्य दिसत नाही हे पाहून सर्वसाधारण प्रगल्भता कुठे गेली असा प्रश्न पडतो.

  ReplyDelete
 17. Me dupari jevtana blog vachat hoto an tumch an ghanshyam patlanch naav vachun ghas hatat ch rahila. Aare kay challay, bgha jara hya mansankade bgha hyanchya dhyana kde futkal kuthali hi mahiti naste tr tarksangat mahiti aste. bahuda ti zombali asel samarthkanna.ghanshyam patil hyani pawar modi he Janata raja mhanun ghyaychya layakiche ka nahit he tyanchya video madhe sangitalech aahe. Aani bhauni Prapogenda media vs mahiti pradhan Patrakarita hyacha dakhavala.

  ReplyDelete
 18. Bhau तुम्ही पवारांच्या दुखण्यावर बोट ठेवले म्हणून तुम्हाला हा नाहक त्रास दिला जातोय

  ReplyDelete
 19. नमस्कार भाऊ, आपल्या लेखांमुळे कुठलाही तरुण पवारांचा खून करणार नाही परंतु आपल्या लेखांमुळे आमच्या डोळ्यांवरील झपाडं उघडल्या जात आहेत. घनशाम पाटील आणि तुम्ही मिळून सुरू केलेली ही चळवळ आम्हाला अतियश आवडत असून या चळवळीचा भाग होण्याची इच्छा आमची आहे

  ReplyDelete