स्वातंत्र्योत्तर काळापासून गुजरातमध्ये राजकारणात पटेलांचाच वरचष्मा राहिला होता. जसा महाराष्ट्रात कुठलाही मुख्यमंत्री असला तरी मराठा जातीचेच वर्चस्व राहिले तसेच गुजरातमध्ये संख्येतील प्रमाणात पटेल समाज वरचढ राहिला. त्याला शह देण्याचा प्रयास कॉग्रेसनेही केला. पण १९७१ सालात मोरारजी देसाई यांचा गुजरातमधील प्रभाव खालसा केल्यापासून इंदिरा गांधींनी पद्धतशीर रितीने पटेल समाजाला राजकारणात खच्ची करण्याचा चंग बांधला. त्यासाठी १९८० नंतर माधवसिंह सोळंकी यांना नेतृत्व देण्यात आले. त्यांनी खाम नावाचे कडबोळे तयार केले. खाम हे इंग्रजी अध्याक्षरांनी तयार झालेले कडबोळे आहे. क्षत्रिय, हरीजन, आदिवासी व मुस्लिम असे समिकरण होय. त्यातून बहुसंख्य असूनही पटेल समाजाला दुय्यम बनवण्याचा घाट घातला गेला. त्याचा एक परिणाम असा झाला, की हा समाज कॉग्रेसपासून दुरावत गेला. तसे बघितल्यास सुखवस्तू अशीच पटेल समाजाची व्याख्या होऊ शकते. विविध क्षेत्रात आपल्या उद्यमशीलता व कल्पकतेमुळे आर्थिक यश संपादन केलेला हा वर्ग आहे. पण राजकारणात मात्र त्यांना तितके सन्मानाचे स्थान कायम नाकारले गेल्याची भावना रुढ झाली. सरदार वल्लभभाई पटेल हे नेहरूंना आपल्या नेतृत्वगुणांनी आव्हान होते. पण महात्मा गांधींमुळे पटेलांना देशाचे पहिले पंतप्रधान होण्याची संधी नाकारली गेली. देशातील बहुतांश कॉग्रेस कमिट्या सरदारांचे समर्थन करीत असतानाही केवळ महात्माजींच्या आग्रहाखातर पटेलांना आपला हक्क सोडावा लागला. ही धारणा आजही वेदनेप्रमाणे बोलून दाखवली जाते. तिथून जी सुरूवात होते ती थेट १९८० नंतरच्या काळात खाम कडबोळ्यामुळे वाळीत टाकल्यासारखी पटेल समाजाला मिळालेली वागणूक इथपर्यंत येते. आजच्या हार्दिक पटेल नामक चमत्काराकडे बघताना ही पार्श्वभूमी विसरून चालणार नाही.
इंदिरा गांधी यांनी खुलेआम पटेलांना दडपण्याचा प्रयत्न केला, त्याला पहिले आव्हान देणारा पटेलच होता हे विसरता कामा नये. १९७१ च्या प्रचंड यशावर स्वार झालेल्या इंदिराजींच्या श्रेष्ठी असण्याला पहिले आव्हान गुजरातचा नवा मुख्यमंत्री नेमताना चिमणभाई पटेल यांनी दिले होते. पक्षाचे बहुसंख्य आमदार कोंडून ठेवून मुख्यमंत्रीपद मिळवणारा पहिला नेता गुजरातचा होता आणि त्याचे नाव चिमणभाई पटेल. पण १९८० सालात पुन्हा इंदिराजी आणिबाणीचे प्रायश्चीत्त घेऊन राजकारणात परतल्या, तेव्हा त्यांनी पटेलांची मुस्कटदाबी आरंभली आणि तेच काम माधवसिंह सोलंकी यांच्यावर सोपवले. त्यांनीच मग खाम असे कडबोळे बनवून पटेल समाजाला गुंडाळून टाकले. त्याला शह देताना आपल्या पक्षबांधणीसाठी भाजपाने पद्धतशीरपणे केशूभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पटेल समाजाला पर्यायी राजकारणात उभे करण्याचा डाव खेळला. अन्य बारीकसारीक समाजाला सोबत घेऊन केशूभाई, वाघेला व नरेंद्र मोदी अशा संघ प्रचारकांनी हिंदूत्व या छत्रीखाली पटेल समाजाला एकवटण्याचे राजकारण केले. त्यातून एक गठ्ठा पटेल मतांची बेगमी भाजपाकडे झाली आणि इतर समाजगटांच्या सोबतीने कॉग्रेसचे खाम कडबोळे वीस वर्षापुर्वी मोडीत निघाले. पर्यायाने पटेल म्हणजेच भाजपा अशी एक राजकीय भूमिका तयार झाली आणि त्याच्या परिणामी तिथल्या भाजपात विविध गट केशूभाईंच्या पटेलनितीला आव्हान द्यायला उभे राहू लागले. त्यातून हे नवे राजकीय समिकरण ढासळू लागले आणि म्हणून त्यात कुठेही न बसणारा नरेंद्र मोदी हा पर्याय भाजपाने पुढे आणला. त्याने पटेल वा इतर गट बाजूला टाकून व्यापक हिंदूत्व उभे करताना मुस्लिम आक्रमक हिंसक राजकारणाचा बागुलबुवा यशस्वीरित्या उभा केला. त्यात पटेल अस्मिता मागे पडली तशीच इतरही लहानसहान अस्मिता निकालात निघाल्या होत्या.
२००२ नंतरच्या राजकारणात पटेलांची महत्ता कमी होतेय हे ओळखून केशूभाई हातपाय हलवू लागले होते आणि काही प्रमाणात त्यांनी आपल्या झडापिया यासारख्या हस्तकांमार्फ़त मोदींना आव्हान उभे करायचे मनसुबे राबवलेही होते. त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करून कॉग्रेसशी हातमिळवणी करूनही बघितले. पण मोदींच्या हिंदूत्वापुढे त्यांची डाळ शिजली नाही आणि अखेरीस २०१२ च्या शेवटी खुद्द केशूभाईंना मोदीविरोधी आघाडी उघडावी लागली. तरीही ती निकामी ठरली. दरम्यान मोदी यांनीही आनंदीबेन पटेल यांनाच आपल्या विश्वासू सहाय्यक बनवून केशूभाईंना राजकीय शह दिला होता आणि त्यांनाच पुढे वारस म्हणून मुख्यमंत्री पदावरही बसवले. पण खरी सत्ता आजही मोदींच्याच इशार्यावर चालते आणि पटेलांना स्थान कमी अशी धारणा कायम आहे. त्याचा दुसरा भाग व्हायब्रंट गुजरात आहे. आजवर एकूण गुजरातच्या विकासात पटेल समाजाने बारीकसारीक उद्योग व्यापारात आपले वर्चस्व कायम राखले आहे. पण मध्यंतरीच्या दहा वर्षात मोदींनी परकीय व परप्रांतिय भांडवल आणून जो विकास घडवला; त्यातून मोठे उद्योग उभे रहाताना हजारो लघूउद्योग डबघाईला गेले. त्यात बहुतांश भरणा पटेलांचा आहे. विकासाच्या त्या गंगेत पटेल मागे पडले वा पडत चालले आहेत. त्यातून आलेली अस्वस्थता राजकीय नेत्यांना मोजता किंवा वापरता आली नाही. एका बाजूला व्यापार उद्योगात गुंतलेल्या पटेल समाजाने नोकरी चाकरीचा विचारही कधी केला नव्हता. पण विकासाच्या गंगेत वाहून गटांगळ्या खावू लागलेल्या त्याच पटेल समाजात गुजरात मॉडेलविषयी राग व प्रक्षोभ वाढतच गेला. आज नव्या हार्दिक लाटेमागचे तेच प्रमुख कारण आहे. त्याचा लाभ उठवायला अनेक राजकीय पक्ष व गट छुपेपणाने हजर असले व कॉग्रेस त्याचा आश्रयदाता असला, तरी त्यातली पटेलांची वेदना गैरलागू नक्कीच नाही. सरदार पटेलांपासून केशूभाईंपर्यंतची वेदना त्यात सामावलेली आहे. हार्दिकला मिळत असलेला प्रतिसाद म्हणूनच समजून घेतला पाहिजे व ओळखला पाहिजे.
आजच्या परिस्थितीत पटेल मुख्यमंत्री असतानाही गुजरातमध्ये एका कोवळ्या पोराला मिळणारा प्रतिसाद अनेक राजकीय हेतूंनी ग्रासलेला आहे आणि अनेक राजकीय हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत. म्हणूनच ते मोदींना घरातूनच उभे राहिलेले आव्हान आहे, की मोदींची लोकप्रियता ओसरू लागल्याचे लक्षण आहे? त्याविषयी घाईघाईने निष्कर्ष काढणे उतावलेपणाचे होईल. निदान मी तरी अशी घाई करणार नाही. कारण आता मोदी गुजरातच्या मर्यादेतले राजकारणी राहिलेले नसून राष्ट्रीय राजकारणात एक महत्वाचे पात्र झालेले आहेत. त्याला गुजरातच्या सीमा बंदिस्त करू शकत नाहीत. याचे पहिले कारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवर मोदींना आव्हान देवू शकेल, असा कोणी नेता आजतरी भारतीय क्षितीजावर दिसत नाही. पण बुडत्याला काडीचा आधार अशा मानसिकतेने मोदींना पाण्यात बघणार्यांना हार्दिक नावाची काडी मिळाल्याचे समाधान उपभोगायचे असेल, तर त्यात बिब्बाही घालण्याचे कारण नाही. मात्र या निमीत्ताने एक गोष्ट मोदींनाही लक्षात घ्यावी लागेल, की अमित शहांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात काय चुक झाली त्याचे मूळ यातून शोधायला हवे. ‘साडेपाच करोड गुजराती’ या भूमीवरून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात झेप घेतली, तीच भूमी ढासळू लागली आहे आणि राजकीय भूमी किती निसरडी अस,ते त्याचा बोध यातून घ्यायचा असतो. अवघे गुजराती एकदिलाने मोदींच्या पाठीशी नसतील तर सगळे भाजपाई सुद्धा तितके मोदीनिष्ठ असल्याच्या भ्रमात राहुन भागणार नाही. मग ज्याप्रकारची गुर्मी वा उद्दामपणा अमित शहा व अन्य भाजपाचे नेते दाखवतात, त्यांना वेळीच लगाम लावला नाही तर पुढला काळ अवघड असेल. हार्दिक पटेल हे मोदींसाठी राजकीय आव्हान नक्कीच नाही. पण खरे आव्हान केव्हाही उभे राहू शकते, याचा हार्दिक हा संकेत आहे. लोकसभेच्या यशानंतर शत-प्रतिशतचा नारा घेऊन मित्रांना शत्रू बनवण्याचा सपाटा अमित शहांनी लावला. त्याला येऊ लागलेली ही विषारी फ़ळे ओळखता आली, तरच मोदींना व त्यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपाला दिर्घकाळ देशाच्या राजकारणात आपले बस्तान बसवता येईल. गुजराती वा अन्य कुठल्या एका जाती समाज गटाचा वरचष्मा फ़ारकाळ टिकत नाही, हाच धडा आहे. पटेलांनी देऊ केलेल्या ह्या हार्दिक शुभेच्छांतून मोदी-शहा धडा घेतील ही अपेक्षा करावी का?